रेल आणि रिलचं एक अजब अफेअर
सदर - सिनेपंचनामा
शर्मिला फडके
  • 'छैंया छैंया...' या गाण्यातील एक दृश्य
  • Sat , 10 June 2017
  • सिनेपंचनामा शर्मिला फडके Sharmila Phadke मालिका TV Serial

खूप वर्षांनी सलग आणि मोठा प्रवास ट्रेननं करण्याची संधी आली. नाहीतर 'वेळ वाचतो' या एका अपरिहार्य कारणामुळे दर वेळी फ्लाईटचाच पर्याय माझ्याकडून स्वीकारला जातो. तरी ट्रेननं जाणार म्हटल्यावर ‘२०/२२ तासांचा प्रवास...अगं किती बोर होशील? आणि किती वेळ फुकट जाणार प्रवासात? शिवाय ट्रेन पोचणारही अवेळी, पहाटे. खूप त्रासाचं आहे टॅक्सीने शहरात जाणं...’ मिळालेले एक नाही सतरा सल्ले आणि टीका चक्क कानाआड केल्या.

मला हे सगळं माहीत होतं आणि कबूलही होतं. पण मला ट्रेननेच जायच होतं. एक तर या वेळी खरंच मला एरवी असते, तशी कमी वेळेची कटकट डोक्याशी नव्हती, वाचायच्या पुस्तकांचा बॅकलॉग खूप राहिला होता, काही कामाच्या नोट्स काढायच्या होत्या, काही महत्त्वाच्या इश्यूजवर शांतपणे विचार करण्याइतका निवांत वेळ हवासा वाटत होता आणि हे सगळं फक्त ट्रेनमध्येच एकट्यानं प्रवास करत असतानाच शक्य झालं असतं याची खात्री होती.

आणि मग खरंच ट्रेन अंगात अगदी भिनून गेली. प्रवास दोन रात्रींचा होता. सेकंड एसीचा डबा स्वच्छ, शांत होता. समोर एक जमशेदपूरला उतरणार असलेलं छोटं कुटुंब काही 'नॉर्मल' चौकशा सोडल्या तर फारसं नाकखुपसं नव्हतं. त्यांची आपापसातली मैथिली भाषा कानाला खूप गोड वाटत होती. दोन लहान मुलं पत्ते, उनो खेळायची, चित्रं काढायची, थोडं भांडायची आणि उरलेला वेळ त्यांच्या बाबाच्या लॅपटॉपवर सिनेमा बघायची. त्यांची आई त्यांना सारखी मधूनमधून खायला द्यायची. इतर वेळी झोपायची. राहिलेली सांसारिक झोप पूर्ण करायला तिलाही ट्रेनइतकी निवांत जागा मिळाली नसावी! नवरा ‘रिडर्स डायजेस्ट’ वाचायचा आणि सारखा बाजूच्या एका मोठ्ठ्या प्लास्टिकच्या पिशवीतल्या छोट्या, चकचकीत पाकिटांमधला पानमसाला खात तंद्री लावून बसायचा.

मी अगदी सुखानं पुस्तकं वाचली, गाणी ऐकली, थोडं लिहिलं आणि बाकी अख्खा वेळ नुसतंच खिडकीबाहेर बघत, प्रत्येक थांबणार्‍या स्टेशनवरची खास संस्कृती बघत निवांत मग्न राहिले. धावणार्‍या रुळांकडे बघत राहिलं की, मनातले सगळे इकडे तिकडे विस्कटून राहिलेले विचार कसे छान ओळीत मनात आपोआप लय धरतात...

ट्रेन पहाटे पाचच्या सुमारास पोचणार होती. समोरचं कुटुंब अडीच वाजता उतरून गेल्यावर मला झोपच आली नाही. खिडकीतून बाहेरचा मिट्ट अंधार आणि त्यात मिसळून गेलेलं काचेतलं माझंच प्रतिबिंब पाहत मी कधीपासूनच आवरून बसले होते. डोळ्यांवर अर्धवट झोप होती आणि अंगात गेल्या दोन दिवसांच्या ट्रेनच्या प्रवासाची गुंगी शीण धरून होती. मध्येच कधीतरी डुलकी लागली असणार बहुतेक. एकदम दचकून जाग आली, तेव्हा मंद हिसका देत ट्रेन मंद गतीनं पुन्हा लय पकडत होती. आता डुलकी लागली तर तिचं गाढ झोपेत रूपांतर होणार या भीतीनं थोड्या वेळानं मी उठून दरवाजात जाऊन उभी राहिले.

मध्ये कुठेही उंचवट्याचा अडथळा नसलेला पश्चिम बंगालचा दाट, काळसर हिरव्या रंगातला सलग मोकळा माळरानासारखा प्रदेश, छोटीशी घरं, मध्ये चौकोनी, लंबगोल तलावांचे चमकते आरसे आणि बाकी क्षितिजापर्यंत फक्त उंच, लवलवत्या पाणगवताच्या टोकावरच्या शुभ्र, सफेद काशफुलांच्या झुबक्यांचा समुद्र. पहाटेच्या अस्पष्ट अंधार-उजेडात वाहत्या वार्‍याच्या झुळकांवर लाटालाटांनी लहरत असणारा...

कुठे पाहिलं आहे मी हे या आधी? मनातली काही रिळं उलगडली...

(माझ्या मनात सिनेमाच्या पडद्यावरच्या काही दृश्यांची रिळं अगदी खोलवर रुतून बसलेली असतात. वेळी-अवेळी ही रिळं नजरेसमोर प्रोजेक्ट होत राहतात. कोणतंही निमित्त, कोणताही ऋतू त्यासाठी पुरेसा असतो. मला त्यात काही नवल वाटत नाही. आपल्या फिल्मी फॅसिनेशनचा हा एक अपरिहार्य भाग हे मी गृहीत धरलेलं आहे. या रिळांतली बहुसंख्य दृश्य ब्लॅक अँड व्हाईट सिनेमांमधलीच आहेत, काही इस्टमन कलर्ड आहेत, काही नुसतेच आवाज आहेत, काही ओझरते क्लोज अप्स आहेत, काही ठळक लँडस्केप्स आहेत...)

वार्‍याच्या झोतावर डुलणार्‍या या पांढर्‍याशुभ्र काशफुलांचा पसारा...त्यातून दोन मुलं धावत येत आहेत. खांबाला कान लावून क्षितिजापलीकडून येणार्‍या आगगाडीचा कानोसा घेणारी त्यातली ती सावळी, कृश, टपोर्‍या डोळ्यांची मुलगी आणि तिच्याकडे कुतूहलानं पाहणारा, कपाळावर कागदी चांदीचा मुकूट बांधलेला तो तिचा मस्तीखोर धाकटा भाऊ! मग कधीतरी निळ्या आकाशात काळ्या धुराचा लांबलचक पट्टा उमटवत एक ट्रेन धडधडत येते. वाफेच्या इंजिनाची शिट्टी मोकळ्या आसमंतात घुमते. ती दोघं त्या काशफुलांच्या समुद्रातून वाट काढत जीव खाऊन धावत जेमतेम रेल्वेट्रॅकजवळ पोचतात, तोपर्यंत क्षितिजाच्या पार पुन्हा दिसेनाशीही होते. धुराचा पट्टा आणि एक लांबलचक शिट्टी मागे सोडत.

नजरेसमोरून ते दृश्य इतकं स्पष्ट सरकत गेलं... वाटलं आत्ता त्याच ट्रेनच्या दरवाजात मी उभी आहे का? स्टेशन जवळ आलं आणि काशफुलं दिसेनाशी झाली. माझ्या डोळ्यांसमोरून उलगडत गेलेल्या त्या दृश्यांची रिळंही संपली.

उंच लवलवत्या गवताच्या टोकावरच्या काशफुलांच्या पसार्‍यामधून मान वर करून ट्रेनकडे अचंबित नजरेनं पाहणारा तो मुलगा... अप्पू त्याचं नाव. त्याच्यामागून धावत आलेल्या त्याच्या दीदीला, तिचं नाव दुर्गा; मात्र ती ट्रेन दिसलीच नव्हती. तिच्या आयुष्याचा पुढचा खंडित प्रवास सूचित करणारं सत्यजित रेंच्या ‘पाथेर पांचाली’तलं हे अविस्मरणीय दृश्य. अनेकांनी अनेक प्रकारे पुढच्या काळात इंटरप्रिट केलेलं. जिथं ते चित्रित झालं त्या पश्चिम बंगालमधल्याच एका काशफुलांच्या माळरानावरून माझी ट्रेन जात असताना या अंधार-उजेडाच्या ट्वायलाईटमध्ये मला ट्रेनमधून जाताना समोर काशफुलं होती म्हणून हे दृश्य आठवलं. पण समजा धुआंधार पाऊस असता तर ट्रेनमधल्या मला ‘इजाजत’ आठवला असता कदाचित.

एका अंधारून आलेल्या दिवशी पावसाचा दाट पडदा बाजूला सारत ट्रेनमधून उतरणारा आणि मग वेटिंगरूममध्ये दिवसभर बसून एकेकाळच्या पत्नीसोबत आयुष्यातल्या चुकलेल्या आणि निघून गेलेल्या वेळांचा जमाखर्च मांडत बसलेला त्यातला नासिरचा महेन आणि आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या नव्या जीवनसाथीसोबत त्याच स्टेशनात येणार्‍या ट्रेनमध्ये बसून एका नव्या प्रवासाचं प्रस्थान ठेवताना आधीचं सारं आयुष्य त्यातल्या आठवणींसकट कायमचं तिथल्या वेटिंगरूममध्येच सोडून निघून जाणारी सुधा आठवली असती.

मध्यरात्रीचा गडद अंधार असता तर कदाचित लांबून दिसणार्‍या एखाद्या दुसर्‍या ट्रेनच्या आवाजात मला 'यूंही कोई मिल गया था...सरे राह चलते चलते...' असं व्याकूळ आवाजात म्हणणार्‍या ‘पाकिजा’तल्या साहेबजानच्या नजरेत उमटलेली, रात्रीचा निराश अंधार चिरत येणारी, न होणार्‍या भेटीची ग्वाही देणारी त्यातली ती ट्रेनची शिट्टी ऐकू आली असती. त्या शिट्टीत एका मिट्ट काळोख्या रात्री ट्रेनमधल्या कम्पार्टमेंटमध्ये ती गाढ झोपेत असताना तिच्या नकळत घडून गेलेल्या एका अधुर्‍या मुलाकातीची सारी दास्तान उमटत असते. आपली नाजूक, गोरी पावलं जर्दलाल पर्शियन गालिच्यावर हलकेच थिरकवत गाणं गाणारी साहेबजान... त्या पावलांना जमिनीवर टेकवायचं नसतं तिला...न भेटलेल्या त्याने पैंजणात अडकवून ठेवलेल्या चिठ्ठीतून तसं बजावलेलं असतं म्हणून केवळ!

नुसत्या एका ट्रेनशी निगडित अशी सिनेमांची रिळं नक्की आहेत तरी किती आपल्या मनात? मला कुतूहल वाटलं!

सत्यजित रेंप्रमाणेच धावत्या ट्रेनचं मेटाफर वापरून त्याला समांतर असा आयुष्याच्या सुख-दु:खांचा, बदलत्या ऋतूंचा, दुरावत गेलेल्या आणि पुन्हा जवळ आलेल्या नातेसंबंधांचा लेखाजोखा सिनेमाच्या पडद्यावर कलात्मकरीत्या मांडणारे कितीतरी दिग्दर्शक देशी-विदेशी चित्रपटांच्या दुनियेत आहेत.

अगदी ‘ब्रीफ एन्काउन्टर’, ‘ब्रीज ऑन द रिव्हर क्वाय’ आणि ‘डॉ.झिवागो’सारख्या एकाहून एक भव्य चित्रपटांमध्ये ट्रेनला महत्त्वाची भूमिका देणार्‍या डेव्हिड लिनपासून ते सुटलेली ट्रेन पकडू शकण्याच्या किंवा न शकण्याच्या शक्यतेद्वारे मनातला प्रेमाचा गोंधळ-गुंता सोडवू पाहणार्‍या इम्तियाझ अलीपर्यंत अनेक जण. डेव्हिड लिनच्या ‘ब्रीफ एन्काउन्टर’मधलं द मिलफोर्ड जंक्शन स्टेशन जिथं अ‍ॅलेक-लॉरा चोरून भेटत असतात किंवा ‘जब वी मेट’मधली गीत चुकून उतरते ते स्टेशन... रेल आणि रिलचं एक अजब अफेअरच या स्टेशनांवरून सुटणार्‍या, तिथं थांबणार्‍या ट्रेनमध्ये जन्माला येत असतं.

चित्तथरारक साहसं, स्फोट, दरोडे, खून याबरोबरच हळुवार प्रेमप्रसंग, भेटी, ताटातुटींचीही दृश्यं, दोस्तीच्या कहाण्या, आयुष्याचा अर्थ समजावून सांगणारं तत्त्वज्ञान किंवा स्टेशनं एकदा मागे पडली की, त्याकडे वळून पाहण्याचा काहीच उपयोग नाही, आयुष्यात पुन्हा ते मुक्काम परतून येत नाहीत, त्यावेळी भेटलेली माणसं पुन्हा भेटत नाहीत अशा अर्थांची... आयुष्यातली प्रत्येक भावना जिला दृश्यात्मक परिमाण आहे, ती या पडद्यावरच्या रेल दुनियेमध्ये मौजूद आहे.

१९०३ मध्ये एडविन पोर्टरचा 'द ग्रेट ट्रेन रॉबरी' आला आणि पडद्यावरचं हे रेल-रिल अफेअर खर्‍या अर्थानं सुरू झालं. त्यानंतर मग आगगाडीवर पडलेल्या दरोड्यांना सिनेमामध्ये दाखवायची लाटच आली. बुच कॅसिडी अँड द सन डान्स किड -१९६९, मायकेल क्रिश्टनने १९७९ मध्ये पुन्हा त्याच नावाचा सिनेमा काढून पोर्टरच्या कामगिरीला जणू सलाम केला. मात्र हे कोणतेच मी पाहिलेले नाहीत. ७४ला आलेला अ‍ॅगाथा ख्रिस्तीच्या कादंबरीवर आधारित 'मर्डर ऑन द ओरिएन्ट एक्स्प्रेस'ची डिव्हिडी मात्र मिळाली. हा सिनेमा मस्त होता. त्यातली रात्री कम्पार्टमेंटस बाहेरच्या पॅसेजमधून जाणारी ती स्कार्लेट किमोनो घातलेली पाठमोरी बाई! एखाद्या कोसळत्या पावसाच्या किंवा हुडहुडी भरवणारी थंडी पडलेल्या रात्री मस्त उबदार ब्लँकेट पांघरून, गरम कॉफीचे कप संपवत बघावा हा सिनेमा!

१९३२ साली झालेल्या एका खर्‍याखुर्‍या किडनॅपिंग केसवरून अ‍ॅगाथाने ही कादंबरी लिहिली होती. इस्तंबूलची ती ओरिएन्ट एक्स्प्रेसही खरीखुरी. स्वतः अ‍ॅगाथाने कादंबरी लिहिण्याच्या काही वर्षं आधी त्यातून प्रवास केला होता. तेव्हा एका बर्फाच्या वादळामुळे तुर्कस्थानातल्या शेर्केस्को स्टेशनच्या आधी तब्बल सहा दिवस ती ट्रेन आणि त्यातले प्रवासी, ज्यात अ‍ॅगाथाही होती अडकून पडले. हे झालं १९२८ साली. त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे ३१ साली आपल्या आर्किऑलॉजिस्ट नवर्‍याला भेटून निन्वे गावातून परतताना पुन्हा एकदा अ‍ॅगाथाने ओरिएन्ट एक्स्प्रेसमधून प्रवास केला. यावेळी ती मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात रेल्वेलाईनच वाहून गेल्यामुळे पुन्हा २४ तास त्या ट्रेनमध्ये अडकून पडली. अ‍ॅगाथाच्या कादंबरीत आलेलं प्रत्येक पात्र म्हणजे तिला या दोन प्रसंगी ओरिएन्ट एक्स्प्रेसमध्ये भेटलेले खरेखुरे सहप्रवासी. अ‍ॅगाथाने १९३४ साली ही कादंबरी लिहिली आणि अर्थातच ती प्रचंड गाजली. १९७४ साली त्यावर हा सिनेमा काढला गेला, तो मूळ साहित्य कलाकृतीशी जास्तीत जास्त प्रामाणिक राहूनही उत्कृष्ट सिनेमा कसा बनू शकतो हे सिद्ध करणार्‍या अगदी काही मोजक्या सिनेमांपैकी एक ठरतो. याचं श्रेय दिग्दर्शक सिडनी ल्युमेटचं. १९२०-३० या काळातलं वातावरण इतकं हुबेहूब नैसर्गिक वाटतं यात. यातली मर्डर मिस्टरी जबरदस्त आहेच, शिवाय ग्लॅमरस कॉस्च्युम्स, कॅरेक्टर्सचा एलेगन्स, स्टाईल, देखणी सिनेमॅटोग्राफी, त्यातले ते एक से एक स्टार्स- शॉन कॉनेरी, अ‍ॅन्थनी पर्किन्स, लॉरेन बॅकाल, जॉन गिलगुड, व्हॅनेसा रेडग्रेव्ह आणि इन्ग्रिड बर्गमन! अशा कितीतरी कारणांनी हा सिनेमा माझ्या आवडत्या ट्रेन सिनेमांपैकी सर्वांत बेस्ट ठरतो.

रहस्यपटांचा अजून एक सम्राट आल्फ्रेड हिचकॉकसुद्धा या रेलदुनियेच्या प्रचंड प्रेमात होता. असं म्हणतात त्याला रेल्वे टाइमटेबलही तोंडपाठ असायचं. 'कम्पार्टमेंटस सीन्स' हे त्याच्या अनेक सस्पेन्स फिल्म्सचं महत्त्वाचं अंग. आठवून पहा- ‘३९ स्टेप्स’, ‘स्ट्रेन्जर्स ऑन अ ट्रेन’, ‘नॉर्थ बाय नॉर्थवेस्ट’. त्याचा ‘द लेडी व्हॅनिशेस’ हा सिनेमा तर संपूर्णपणे ट्रान्स-युरोपियन ट्रेनमध्ये सेट केला होता. ट्रेन कम्पार्टमेंटमधल्या मर्यादित, बंदिस्त जागेचा, गतीचा वापर करून दृश्यांमधली रहस्यमयता, उत्कंठा, थरार विलक्षण उंचीपर्यंत नेऊन पोचवण्याचं हिचकॉकचं कौशल्य अचाट होतं.

हॉलिवुडमध्ये बनलेल्या टिपिकल रोमँटिक ट्रेन सिनेमांची तर जंत्रीच डोळ्यापुढे येते. त्यातला ‘द फ्रेंच कनेक्शन’ लक्षात ठेवण्यासारखा. मात्र ट्रेनमध्ये भेटून नंतर नातं फुलत गेलेल्यांपैकी मला सर्वांत आवडलेला सिनेमा म्हणजे ९५ला आलेला रिचर्ड लिन्कलेटरचा 'बिफोर सनराईझ'. एकाच ट्रेनमधून प्रवास करणारे, आयुष्याला नुकतीच सुरुवात करणारे तरुण जेसी आणि सेलिन. तो अमेरिकन, पुढे जाऊन नक्की काय करायचंय याचा काहीच विचार मनात पक्का नाही, असाच भटकायला बाहेर पडलेला. ती फ्रेंच आर्टिस्ट. शिक्षण संपवून करिअर सुरू करायच्या आधी प्रवासाला बाहेर पडलेली, आजीला भेटायला जाणार असते. दोघांची ओळख होते, गप्पा जमतात. इतक्या जमतात की, दोघे ट्रेनमधून मध्येच एका स्टेशनवर, व्हिएन्नाला उतरतात. परतायची ट्रेन ठरलेली असते. पहाटेची. त्या वेळेपर्यंत, ती पूर्ण रात्र दोघं शहरातल्या रस्त्यांवरून निरुद्देश गप्पा मारत भटकतात... अखंड गप्पा... आवडीची पुस्तकं, सिनेमे, संस्कृती, सेक्स, भाषा, न सुटणारे प्रश्न, क्रायसिसवर शोधलेली उत्तरं असं काहीही. त्यातून एकमेकांची अंतर्बाह्य ओळख होते. आयुष्यातल्या संकल्पना स्पष्ट होत जातात... खूप अजब मैत्री जमते दोघांची आणि मग पहाटे सूर्य उगवत असताना दोघे एकमेकांचा फोन नंबरही न घेता आपापल्या ठरलेल्या ट्रेननं पुन्हा परतीच्या प्रवासाला लागतात. एक बेफिकिरी मनात असते कदाचित. आयुष्य इतकं मोठं आहे, गोलही आहे असं म्हणतात. ‘भेटू नक्की’ असंच स्टेशनवर पुन्हा कधीतरी. कदाचित दोनेक वर्षांतच?

त्यानंतर तब्बल नऊ वर्ष लोटतात. नऊ वर्षांनी दिग्दर्शकाने याचा सिक्वेल काढला. तो 'बिफोर सनसेट'. ज्यात जेसी आणि सेलिन पुन्हा भेटतात. नऊ वर्षांनीच. असंच अचानक. यावेळी दोघे जास्त मॅच्युअर्ड, अनेक अनुभव दोघांच्या गाठीशी. आपल्या तेव्हाच्या गप्पांचा, त्या वेळी व्यक्त केलेल्या मतांचा, तेव्हाच्या मनातल्या स्वप्नांचा लेखाजोखा आता ९ वर्षांनंतर पुन्हा एकदा एकमेकांशी ते मांडतात तेव्हा मजा येते. ट्रेनमध्ये सुरू झालेल्या मैत्रीचा असा पुढचा अनोखा प्रवास फार उत्कटतेनं यात साकार केला आहे. कोणत्याही हिंदी सिनेमामधे अशी म्हटलं तर औपचारिक पण तरी प्रवासात काही काळाकरता का होईना जमलेल्या नात्यांमधली उत्कटता दाखवली गेली नाही.

भारतीय रेल्वे संपूर्ण जगात सर्वांत जास्त लांबीचं जाळ असणारी म्हणून सुप्रसिद्धच आहे. इथली समाजसंस्कृती रेल्वेशी इतकी एकरूप झालेली. त्यामुळेच कदाचित पण अगदी नियम केल्यासारखा रेल्वेशी संबंधित निदान एक तरी सीन हिंदी सिनेमांमध्ये असतोच असतो. हिंदी सिनेमाच्या इतिहासात अगदी सुरुवातीच्या काळात तर अशा रेल-सिनेमांची रांगच होती. १९३०मध्ये ‘तुफान मेल’, ‘डेक्कन क्वीन’, ‘फ्रॉन्टियर मेल’. यातले ट्रेनच्या टपावरचे फियरलेस नादियाचे स्टंटसीन्स खूप गाजलेले होते म्हणे! सिनेमाच्या शेवटी सुटणार्‍या ट्रेनमधून निघून जाणार्‍या, डब्याच्या दारात उभ्या असणार्‍या हिरो किंवा हिरॉईनला भेटायला आख्खा प्लॅटफॉर्म संपेपर्यंत धावून मग शेवटी बाहेर आलेल्या हाताला पकडून वर ट्रेनमध्ये अलगद उडी मारणार्‍यांचे क्लायमॅक्स तर शेकड्यांनी सापडतील. अगदी ‘जब जब फुल खिले’पासून ‘डिडीएलजे’पर्यंत. (धावणार्‍या बहुतेक वेळा हिरॉइनीच आणि हात देऊन वर खेचून घेणारे मात्र हिरो, ही एक टिपिकल हिंदी फिल्मीगिरी).

मात्र एखाद्या ‘डोर’सारख्या सिनेमामध्ये अशाच तर्‍हेच्या क्लायमॅक्सला चालत्या ट्रेनच्या डब्यातून एका स्त्रीचा हात आधार द्यायला बाहेर येतो आणि तो पकडून आपल्या आयुष्याची पुन्हा एक नवी सुरुवात करायला ट्रेनमध्ये चढणारीही दुसरी एक स्त्रीच असते, तेव्हा असा वेगळा शेवट नक्कीच लक्षात राहतो.

मात्र हॉलिवुडच्या तुलनेत रेल्वेवर आधारित भव्य, थरारक दृश्ये साकारण्यातही हिंदी सिनेमा फारच कमी पडला. रवी चोप्राचा महत्त्वाकांक्षी ‘द बर्निंग ट्रेन’ हॉलिवुडच्या ‘द कॅसान्ड्रा क्रॉसिंग’ आणि ‘द टॉवरिंग इन्फर्नो’चं कडबोळं करून बनवला गेला. त्यात ८०च्या दशकातला प्रत्येक मोठा स्टार होता, बर्‍यापैकी कुशलतेनं केलेले स्टंटसीन्स होते, पण पडद्यावर बात कुछ जमीं नही. माझ्या दृष्टीनं अपवाद एकच- ‘शोले’तला तो घोड्यांवरच्या दरोडेखोरांचा आणि संजीव कुमार, जय-विरूचा मुकाबला. त्यात कोळशांचे ते धगधगते निखारे असलेलं इंजिन, तो गोळ्या लागलेला मोटरमन आणि फावड्यानं इंजिनात कोळसे लोटत असणारा धरम, टपावरून उलटी कोलांटी मारत गोळ्या उडवणारा अमिताभ... अजून प्रत्येक वेळी तो सीन बघताना सॉल्लिड मजा येते. ‘धूम २’ मध्येही ट्रेनमधली हाय प्रोफाईल रॉबरी दाखवली गेली, पण सिनेमाच्या शेवटी लक्षात राहिला तो फक्त हँडसम ऋतिकच.

पण हिंदी सिनेमांमधल्या ट्रेन्सच्या डब्यांमधून, खिडक्यांमधून रोमान्स मात्र असंख्य फुलले. त्यांची सुरेल गाणी बनली. ट्रेनमध्ये चित्रित झालेली ही सर्वच्या सर्व गाणी अगदी बिनचूकपणे मेलोडियसच आहेत. यातल्या अनेक गाण्यांमध्ये दार्जिलिंगची वळणदार रस्त्यांच्या कडेवरून हळूवारपणे धावणारी छोटीशी ट्रेन फार महत्त्वाची रोमँटिक वाहकाची भूमिका बजावते. त्यामुळे बतासिया लुपला अगदी ऐतिहासिकच महत्त्व प्राप्त झालंय. या दार्जिलिंग ट्रेनच्या मोहातून अमेरिकन दिग्दर्शक वेस अँडरसनही सुटला नाही. त्याने तर 'द दार्जिलिंग लिमिटेड' नावाचा सिनेमाच काढला. पण त्यातून प्रवास करताना आपल्यातले गैरसमज, भांडणं सोडवू पाहणार्‍या तीन भावांची कहाणी कुछ खास जमी नहीं.

मात्र हिंदी सिनेमाचा खरा प्रेक्षक खुश होतो, तो या दार्जिलिंग ट्रेनच्या टपावर बसून त्यांचा लाडका देव आनंद जेव्हा ‘जिया हो.. जिया हो जिया कुछ बोल दो..' अशी प्रेयसीला मनवणारी गाणी म्हणतो तेव्हा. कधी तो ट्रेनच्या डब्यात बसून बेफिकीरपणे 'है अपना दिल तो आवारा...न जाने किसपे आयेगा..' गातो किंवा वरच्या बर्थवर झोपलेल्या वहिदाला उद्देशून 'अपनी तो हर आह इक तुफान है...उपरवाला जानकर अंजान हैं...' असं खट्याळपणे छेडतो... 'फुलोंकी रंग से दिल की कलम से तुझको लिखी रोज पाती..' अशा काव्यमय प्रेमाची बेहतरीन गाणी गातो, तेव्हा हिंदी सिनेमातल्या ट्रेन्स खर्‍या अर्थानं लयबद्ध धावायला लागतात!

हिंदी सिनेमांच्या पडद्यांवर असे अनेक अविस्मरणीय रेल-रोमान्स आले आहेत. ट्रेनच्या खिडकीत पुस्तक वाचण्याचा बहाणा करणार्‍या, पण सारं लक्ष रस्त्यावरून जाणार्‍या जीपमध्ये बसून 'मेरे सपनों की रानी कब आयेगी तू...' हे किशोरचं सर्वांत प्रसन्न गाणं गाणार्‍या रुबाबदार राजेश खन्नाकडे असलेली, प्रत्येक वेळावलेल्या मानेच्या लाडिक झटक्यातून आणि गालावरची खळी दाखवणार्‍या खट्याळ हसण्यातून फुल टू फ्लर्टिंग करणारी ‘आराधना’तली शर्मिला टागोर (आणि त्याच ट्रेनमधून ३६ वर्षांनंतर आलेल्या ‘परिणिता’मधे 'कस्तो मजा..' गाणारा तिचा मुलगा सैफ), टपावर बसून रडणार्‍या उदास पद्मिनीला 'होगा तुमसे प्यारा कौन...हमको तो तुमसे है प्यार...ओ कांची' गात समजावणारा गोड ऋषी, 'झोंका हवाका आजभी जुल्फें उडाता होगा ना...' असं हळुवारपणे आठवणारा ‘हम दिल दे चुके’मधला सलमान, टपावर बेभानपणे 'छैंया छैंया...' नाचणारा आणि ‘डीडीएलजे’च्या सुरुवातीला आणि शेवटी क्लायमॅक्सलाही ट्रेन पकडण्यासाठी जीव तोडत धावत येणार्‍या काजोलला आश्वासकतेनं हात देऊन वर खेचून घेणारा किंवा 'और मै चाहता हूं ये ट्रेन बार बार छुटे' म्हणणारा शाहरुख...‘तिसरी मंझिल’च्या ओपनिंग सीनमध्येच ट्रेनच्या डब्यात आशा पारेखला सतावणारा शम्मी आणि त्याच्यासोबतचा तो गोलमटोल शेटजी, अशा कितीकांना सोबत घेत, प्रत्येक पिढीतल्या सिनेमाप्रेमींसाठी हिंदी सिनेमाच्या पडद्यावर ही रोमँटिक रेल्वे अखंड धावत राहिली आहे.

प्रेम, मैत्री, वियोग, पुनर्भेटीची हळुवार स्टेशन्स घेत पुढे जाणारी हीच रेल्वे इतिहासातल्या काही काळ्या मानवी कृत्यांनाही पोटात घेऊन धावली आहे. विसाव्या शतकातल्या मानवी क्रौर्याची आणि सहनशीलतेची परिसीमा गाठणार्‍या, मानवी संस्कृतीचा सारा नक्षाच उतरवून टाकणार्‍या दोन घटना-एक ज्यूंचे सामूहिकरित्या केलं गेलेलं भयानक शिरकाण आणि दुसरी भारत-पाकिस्तान फाळणी दरम्यान उसळलेल्या दंगलीत दोन्ही देशांतल्या निरपराध नागरिकांची झालेली कत्तल. फक्त मानवच जबाबदार असलेल्या या दोन भयंकर क्रूर घटनांवर आधारित सिनेमे जखमेवरची खपली मुद्दाम उचकटून काढण्याचा शापच मिळाल्यासारखे पुन्हा पुन्हा येत राहतात.

स्टिव्हन स्पीलबर्गच्या ‘द शिन्डलर्स लिस्ट’मधला हृदय पिळवटून टाकणारा ज्यूंचा तो ट्रेनमधला शेवटचा प्रवास, पामेला रुक्सचा 'ट्रेन टु पाकिस्तान', दीपा मेहताचा ‘१९४७-अर्थ’, अनिल शर्मांचा ‘गदर’- यातल्या प्रत्येक सिनेमातली ती निरपराध नागरिकांच्या रक्तबंबाळ देहांनी भरून ओसंडणार्‍या ट्रेन्सची दृश्यं काळीज थिजवून टाकतात.

२८ डिसेंबर १८९५ हा जागतिक सिनेमाचा जन्मदिवस. ल्युमिएर बंधूंनी पॅरिसमधल्या ग्रँड कॅफेमध्ये 'सिनेमातोग्राफ'चं प्रथम प्रात्यक्षिक करताना जो 'चित्रपट' दाखवला, त्यात स्टेशनात शिरणारी एक ट्रेन होती. स्टेशनवर ट्रेनच्या येण्याकडे डोळे लावून बसलेले प्रवासी होते. दूर जाणारे रुळ होते. कोळशाच्या इंजिनाचा धूर सोडणारी आगगाडी स्टेशनवर येताच प्रवाशांची लगबग उडते असं त्यात दाखवलं होतं. सिनेमा पहिल्यांदाच बघणारे प्रेक्षक ती स्टेशनात शिरणारी ट्रेन बघून आधी प्रचंड घाबरले, मग विस्मयचकित झाले आणि त्यानंतर ते जे त्या स्टेशनावरच्या ट्रेनच्या विलक्षण मोहात पडले, ते आजपर्यंत... एक शतक उलटून गेल्यानंतरही त्या झुकझुक आवाज करत, निळ्या आकाशात काळ्या धुराची रेघ सोडत जाणार्‍या पडद्यावरच्या आगगाडीचं आकर्षण यत्किंचितही उणावलेलं नाही.

सिनेमाच्या पडद्यावरचा हा प्रवास अविरत चालूच राहणार आहे; कारण Like diamonds... Trains are Forever!

लेखिका कलासमीक्षक आहेत.
sharmilaphadke@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

varsha bhade

Fri , 16 June 2017

कॉपीराईट ? :) :) :) हा लेख तर 'श्री व सौ' मासिकाच्या मार्च २०१० च्या अंकात प्रसिद्ध झालाय. काय शर्मिलाबाई जरा लिहा की नवीन काही, काय सारखं आपलं इकडून तिकडं.. तिकडून आणि तिकडं!!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......