अजूनकाही
मराठी भाषेइतकीच हिंदी, इंग्रजी, गुजराती या भाषांतील रंगभूमीही समृद्ध आहे. या रंगभूमीवर वेगवेगळ्या आशय-विषयांची नाटकं सादर होतात. वेगवेगळे प्रयोग होतात. यातील बरीचशी नाटकं मुंबई-पुणे-नागपूर या ठिकाणीही होतात. या रंगभूमींवर काय चाललं, कुठली नाटकं सादर होत आहेत, याची ओळख करून देणारं हे पाक्षिक सदर.
……………………………………………………………………………………………
गेली दोन वर्षं आदित्य बिर्ला उद्योगसमूहाच्या ‘आद्यम’तर्फे भारतातील उत्तमोत्तम नाटकं मुंबई व दिल्लीतील रसिकांसाठी सादर केली जातात. या वर्षी या उपक्रमांत सात नाटकं सादर केली गेली. त्याची सुरुवात मुंबईत एप्रिलच्या शेवटच्या आठवडयात झाली. त्यात डॅनिश हुसेन यांचं ‘गार्डस् अॅट ताज’ व मोहित टाकळकर यांचं ‘गजब कहानी’ ही नाटकं सादर केली गेली. यातील पहिल्या टप्प्यातील प्रयोग महालक्ष्मीच्या ‘जी 5 ए’ या आगळ्या प्रकारच्या कलादालनात झाले.
‘गजब कहानी’चे प्रयोग पुणेस्थित ‘आसक्त कलामंच’ या नाट्यसंस्थेतर्फे सादर करण्यात आले. ही नाट्यसंस्था गेली काही वर्षं रंगभूमीविषयी गंभीरपणे काम करत आहे. ‘गजब कहानी’ हे जरी हिंदी नाटक असलं तरी त्याचे मूळ प्रयोग २०११मध्ये मराठीत सादर झाले होते. ते पाहून ‘आद्यम’तर्फे हे प्रयोग हिंदीत करावेत अशी सूचना करण्यात आली. त्यानुसार आता हे नाटक हिंदीत सादर झालं आहे.
हे नाटक जुझे सारामागु या पोतुर्गीज लेखकाच्या ‘द एलिफंटस जर्नी’ या कादंबरीवर आधारित आहे. या लेखकाला १९९८ साली साहित्याचं नोबेल पारिताषिक मिळालं आहे. ही कादंबरी २००८ साली प्रकाशित झाली होती. तिचं नाट्यरूपांतर करण्याचं शिवधनुष्य अमितोष नागपाल यांनी लीलया पेललं आहे.
या बहुचर्चित कादंबरीत लेखकाने १५५१ साली एक हत्तीनं केलेल्या प्रवासाचं वर्णन आहे. त्या काळी युरोपात हत्ती हा प्राणी अगदी दुर्मीळ होता. सॉलोमन नावाचा हत्ती व त्याचा शुभ्रो नावाचा माहुत यांनी लिस्बन (पोर्तुगाल) ते व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) दरम्यान केलेला प्रवास म्हणजे ही कादंबरी व पर्यायानं हे नाटक. हा प्रवास होण्याअगोदर या जोडीनं गोवा ते लिस्बन हा प्रवास केलेला असतो. काही वर्षं लिस्बनमध्ये घालवल्यानंतर आता सॉलोमन व शुभ्रो यांचा दुसरा प्रवास सुरू होतो. एवढं लक्षात घेतलं की, या कथेतलं नाट्य डोळ्यांसमोर येतं.
सॉलोमन व शुभ्रो गेली अनेक वर्षं लिस्बनच्या कोणत्या तरी अंधाऱ्या जागेत पडून असतात. काही वर्षांपूर्वी त्यांना भारतातून पोर्तुगालमध्ये नेण्यात आलं होतं. त्यांची नवलाई संपल्यावर अशा प्राण्यांचे किंवा वस्तूंचं होतं, तसंच सोलोमन व शुभ्रोचं झालं आहे. अचानक पोर्तुगालच्या राजाची मर्जी फिरते आणि तो सोलोमन व शुभ्रोला ऑस्ट्रियाचा राजा दुसरा मॅक्सीमिलनच्या लग्नाची खास भेट म्हणून पाठवण्याचं ठरवतो. त्यामुळे सोलोमन व शुभ्रो यांचा लिस्बन ते व्हिएन्ना हा खडतर प्रवास सुरू होतो.
त्या दरम्यानचा प्रवास म्हणजे हे नाटक. प्रवासादरम्यानचा अनुभव व त्यातून व्यक्त झालेलं जीवनविषयक तत्त्वज्ञान या नाटकाचा गाभा आहे. शुभ्रो त्यांच्याबरोबर असलेल्या सैनिकांना गणपतीची गोष्ट सांगतो. भगवान शंकरानं कसं स्वतःच्या मुलाचं डोकं उडवलं आणि नंतर तिथं हत्तीचं डोकं कसं लावलं वगैरे. ही कथा ऐकून ख्रिश्चन कप्तान व त्याचे सैनिक त्याची थट्टा करतात. शुभ्रो कमालीच्या शांतपणे त्यांना सांगतो की, तुमचा देव शुक्रवारी मेला व रविवारी जसा जिवंत झाला, त्याच प्रकारे शंकराच्या चमत्कारावर विश्वास ठेवावा लागतो.
परका प्रदेश, परकी व अजिबात न समजणारी भाषा वगैरेमुळे सोलोमनला शुभ्रो व शुभ्रोला सोलोमन अशी जोडी जमते. तसं पाहिलं तर ही जोडी आधीपासूनच जमलेली असते. आता त्यांचा दुसरा प्रवास सुरू झाला आहे. यात समुद्रमार्गे केलेला प्रवास आहे, कडाक्याच्या थंडीत आल्पस पर्वत ओलांडण्यासारखा अतिशय जीवघेणा प्रवास आहे. या दरम्यान सोलोमन व शुभ्रो कसे एकमेकांना सांभाळून घेतात, हे सर्व रंगमंचावर दिसतं.
प्रतिकूल परिस्थितीत माणूस व प्राणी एकमेकांचे मित्र होतात. यातील प्राणी हत्ती शाकाहारी असतो. ‘लाइफ ऑफ पाय’ या चित्रपटात भर समुद्रात एक तरुण मुलगा व वाघ यांच्यात झालेली मैत्री दाखवली आहे. तसंच काहीसं या नाटकातही आहे.
असं प्रवासवर्णनात्मक नाटक जेव्हा सादर होतं, तेव्हा त्यातील महत्त्वाचं आव्हान असतं की, प्रेक्षकांना हा प्रवास आपणसुद्धा करत आहोत असं भासवणं. या निकषानुसार ‘गजब कहानी’ हे एक यशस्वी नाटक मानलं पाहिजे. हे नाटक मुंबईतील ‘जी 5 ए’ या एक प्रकारच्या इंटिमेट थिएटरमध्ये सादर करण्यात आलं. दिग्दर्शक मोहित टाकळकर यांनी प्रेक्षकांच्या खुर्च्या गोल फिरवता येतील अशा ठेवल्या. यामुळे थिएटरच्या चारही बाजूला नाटक घडत असतं, तेव्हा प्रेक्षक खुर्च्या फिरवून डावीकडे, उजवीकडे, पुढे व मागे बघू शकतात. यासाठी टाकळकरांनी रंगमंचाचा व्यवस्थित वापर करून घेतला.
नाटकात तीन प्रमुख पात्रं आहेत. हत्ती (गीतांजली कुलकर्णी), शुभ्रो (अजित सिंग पालावत) आणि सैन्याचा कप्तान (नकुल भल्ला). यांच्या सोबतीला अनेक सैनिक आहेत, तर काही ठिकाणी ख्रिश्चन धर्मगुरू आहेत. सर्वांचा अभिनय दर्जेदार आहे. यातही खास उल्लेख करावा लागतो तो अजित सिंग पालावत यांचा. या तरुण कलाकाराने माहुताची भूमिका हेवा वाटावा इतक्या सहजतेनं सादर केली आहे. त्याची आवाजावरची हुकमत, लवचीक देहबोली व परकीय वातावरणात टिकून राहण्यासाठी केलेली धडपड सर्वच उल्लेखनीय आहे. साम्राज्यवादी मानसिकतेनुसार जेव्हा ऑस्ट्रियाचा राजा सोलोमनचं नाव बदलून सुलेमान ठेवतो, तेव्हा शुभ्रोला वाईट वाटतं. तो म्हणतो की, ‘नाव हे फक्त नाव नसतं तर त्याच्याभोवती कितीतरी स्मृती जोडलेल्या असतात, एक संस्कृती उभी असते. नाव बदलल्यामुळे जुन्या नावाभोवती असलेल्या स्मृतींचं काय करायचं?’ अशा प्रसंगी अजीत सिंग यांचा अभिनय दाद घेऊन जातो.
नकुल भल्लाचा कप्तानसुद्धा एक गुंतागुंतीची व्यक्तिरेखा आहे. त्याला एकीकडे सोलोमनला सुखरूपपणे व्हिएन्नाला न्यायचं आहे, तर दुसरीकडे प्रवासात भारतीय संस्कृती नावाच्या गुंतागुंतीच्या प्रकरणाला तोंड द्यावं लागतं. जेव्हा शुभ्रो ख्रिश्चनधर्मीय सैनिकांच्या धर्मातील विसंगती दाखवतो, तेव्हा सर्व सैनिक त्याच्यावर तुटून पडतात. अशा वेळी शुभोचं रक्षण कप्तान करतो. जेव्हा प्रवास संपतो व निरोप घेण्याची वेळ येते, तेव्हा कप्तानाला मनापासून वाईट वाटतं. या वेगवेगळ्या भावना नकुल भल्ला यांनी सफार्इदारपणे रंगवल्या आहेत.
हत्तीच्या महत्त्वाच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी आहेत. त्यांनी ही भूमिका या नाटकाच्या मराठी अवतारात केली होती. विशेष म्हणजे त्यांच्या हिंदी उच्चारांना मराठीपणाचा वास नाही. अन्यथा मराठी रंगभूमी व सिनेमातील अनेक गुणी नटांचे हिंदी उच्चार ऐकवत नाहीत. याला डॉ. श्रीराम लागूंचासुद्धा अपवाद नाही. या मंडळींच्या उच्चारातील सदाशिव पेठ किंवा हिंदू कॉलनी लपत नाही. गीतांजली कुलकर्णी यांनी हा पहिला पण महत्त्वाचा अडथळा पार केला आहे. मात्र इतर पात्रांच्या तुलनेत त्यांच्या अभिनयातील ऊर्जेची पातळी थोडी कमी पडत होती. अन्यथा त्यांचा अभिनय परिणामकारक आहे. जेव्हा शुभ्रोला कळतं की, सोलोमनचं नाव आता सुलेमान झालं आहे, तेव्हा त्याच्या मनात विचार येतो की, राजा आपल्याला नोकरीवर काढून टाकेल आणि दुसऱ्या कोणाला तरी सुलेमानचा माहुत म्हणून नेमेल. तेव्हा त्याच्या भाव ओळखून सुलेमान त्याला सांगतो की, तो असं होऊ देणार नाही. या प्रसंगी गीतांजली कुलकर्णीचा अभिनय लाजबाब आहे.
या नाटकातील बरेचसे संवाद हिंदीत आहेत, तर काही संवाद जिबरीश भाषेत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना सर्वच्या सर्व संवाद समजत नाहीत, पण एकंदरीत संदर्भांमुळे त्या परदेशी व्यक्तीला काय म्हणायचं आहे हे लक्षात येतं. जीबरीश भाषेच्या वापराबद्दल उत्तरपक्ष करता येईल. परदेशी पात्रांचे संवादही हिंदीत ठेवले असते, तर नाटकाचा परिणाम उणावला असता का, हा प्रश्न आहे.
प्रत्येक नाटकात वेशभूषा व प्रकाशयोजना हे महत्त्वाचे घटक असतात. या नाटकात तर त्यांना जास्त महत्त्व आहे. वेशभूषेचा विचार जास्त महत्त्वाचा ठरतो, कारण नाटक १५५१ साली व तेही युरोपात घडतं. तेव्हाच्या सैनिकांच्या, राजेरजवाड्यांच्या पोशाखाचा विचार महत्त्वाचा ठरतो. ही जबाबदारी इशा अहुलीवालिया यांनी समर्थपणे सांभाळली आहे. या नाटकात भरपूर प्रसंग आहेत व रंगमंचाचा अवकाश तसा कमी होता. प्रकाशयोजनाकार प्रदीप वैद्य यांनी ही जबाबदारी योग्य प्रकारे पेलली आहे. मोहित टाकळकर हे नाव आज प्रस्थापित झालेलं आहे. म्हणूनच त्यांच्या या नव्या नाटकाबद्दल उत्सुकता होती. त्यांनी अपेक्षेपेक्षा जास्त चांगल्या प्रकारे नाटक दिग्दर्शित केलं आहे. तथापि नाटकाच्या लांबीबद्दल काही शंका आहेत. नाटकातील काही अनावश्यक प्रसंग जर काढून टाकले तर नाटक अधिक बांधेसूद होईल. उदाहरणार्थ हत्तीचा विष्ठा करण्याचे प्रसंग. या प्रसंगांमुळे नाटकाच्या गतीत बाधा निर्माण होते. ते थोडे संपादित केले तर त्याचा गोळीबंद प्रयोग सादर करता येईल.
नाटकाचा आशय मात्र सर्वकालीन आहे. सर्वंकष सत्ता किती मग्रुर असते याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे नाटक. यातील हत्ती सत्ताधारी वर्गाचा अन्याय निमूटपणे सहन करणाऱ्या जनतेचं प्रतीक ठरतो. एका राजाला वाटलं म्हणून त्याने एका हत्तीला भारतातून लिस्बनला नेलं, नंतर त्याला वाटलं म्हणून तो त्या हत्तीला ऑस्ट्रियाच्या राजाला भेट म्हणून पाठवतो. यात हत्तीला काय वाटतं याचा विचार चुकूनही त्याच्या मनात येत नाही.
जुझे सारामागु हा लेखक पुरोगामी विचारांचा व साम्राज्यवादाचा कडवा विरोधक होता. त्याने हत्ती हे रूपक वापरून कादंबरीतून साम्राज्यशाहीचा अमानुष चेहरा समोर आणला. त्यावरचं हे नाटक अवश्य बघावं.
लेखक मुंबईमध्ये अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत.
nashkohl@gmail.com
……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment