हमीद दलवाई यांच्या ४० व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने, हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूट आणि साधना साप्ताहिक यांच्या संयु्नत विद्यमाने, ३ मे २०१७ रोजी पुण्यात दिवसभराचे चर्चासत्र आयोजित केलं होतं. त्यातील एका सत्रात दलवाईंच्या ‘मुस्लिम पॉलिटिक्स इन इंडिया’ या पुस्तकावर पाकिस्तानातील लेखक-संपादक अजमल कमाल आणि विनय हर्डीकर यांची भाषणं झाली. त्यातील विनय हर्डीकरांचं संपूर्ण भाषण. हे भाषण संपल्यावर मेहरून्निसा दलवाई यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया अशी होती की, ‘हे पुस्तक मला वाचून जेवढं कळलं नव्हतं, तेवढं या भाषणामुळे कळलं आहे.’
.................................................................................................................................................................
‘मेरे सेक्युलर साथियों’ म्हणून मी भाषिक प्रश्नावर उत्तर शोधलं आहेच; मात्र यापुढच्या माझ्या भाषणातून माझ्या तोडक्या मोडक्या हिंदीमुळे जी काही थोडीबहुत समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे, ती आपण सांभाळून घ्याल, अशी माझी अपेक्षा आहे...
आत्ताच विनोद शिरसाठ यांनी आपल्याला हमीद दलवाईंनी ‘साधने’त १९६७ मध्ये दिलेल्या चार भाषणांविषयी सांगितले. (ती चार भाषणे आणि सात लेख यांचा समावेश करूनच ‘मुस्लिम पॉलिटिक्स इन इंडिया’ हे पुस्तक तयार झाले आहे.) मला आजही ती भाषणे आठवतात. त्या वेळी मी अठरा वर्षांचा होतो आणि त्या ठिकाणी उपस्थितही होतो.
अर्थात, दलवाईंबद्दलची ही माझी एवढी एकच आठवण आहे. असे मात्र नाही. उलट, या भाषणांच्या वेळच्या आठवणीपेक्षाही मोठी आणि आवर्जून उल्लेखावी अशी एक आठवण एस. पी. कॉलेजमधील सभेची आहे. त्या वेळी ‘एस.पी.’त एका राजकीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यात एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, ‘मजलिसे मशावरत’चे एक नेते किंवा खरं तर विचारवंतच म्हणू या असे ते आणि या सगळ्यांच्या सोबतीला हमीद दलवाईदेखील उपस्थित होते. दलवाई हे इस्लाम धर्मावर नेहमीच अतिशय स्पष्ट आणि रोखठोक शब्दांत टीका करतात, हे त्या काळी सर्वांनाच ठाऊक होते. त्यामुळे त्या कार्यक्रमाला आलेल्या अनेक लोकांमुळे आणि त्यातही अगदी ठरवून उपस्थित राहिलेल्या संघ स्वयंसेवकांनी सभागृह अगदी खच्चून भरून गेल्याचेही मला आठवते.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
त्या कार्यक्रमादरम्यान एक कठीण प्रसंग उभा राहिला होता. सभागृहात बहुसंख्येने उपस्थित असलेल्या संघाच्या लोकांनी त्या दुसऱ्या मुस्लिम जमातवादी नेत्यांना त्यांचे भाषण करूच दिले नाही. त्यामुळे कार्यक्रमाचे अध्यक्ष ‘एसेम’सुद्धा काळजीत पडले होते. पण काहीच वेळात एसेमना लक्षात आले की, ही सारी मंडळी दलवाईंचे भाषण ऐकायला आतुर झालेली होती. ते खरेही होतेच... आणि मग पुढचा जवळपास तासभर ‘पिनड्रॉप सायलेन्स’ वातावरणात सगळ्या कट्टर संघवाल्यांनी दलवाईंचे ते भाषण एकाग्रचित्ताने ऐकल्याचे मी पाहत होतो.
हा खरं तर एक चमत्कारच त्या वेळी झाला असल्याचे मी म्हणेन. मुळात संघामध्ये वैचारिक वगैरे म्हणता याव्या अशा भाषणांची परंपरा आहे तरी कुठे?... किंबहुना, तशी ती नाहीच, असे आमचे अनुभवातून तयार झालेले स्पष्ट मत आहे. संघाची वैचारिक ताकद काय आहे आणि ती किती आहे, हे आम्हाला पुरेसे ठाऊक आहे. आज जरी हे संघीय लोक राजकारणात बरेच पुढे गेल्याचे चित्र दिसत असले, तरीही विचारांनी ही मंडळी नेहमीच संकुचित आणि छोटी राहिली आहेत, हे वास्तव कोण नाकारू शकणार आहे?... त्यामुळे, आंबेडकरांचे नाव घेणे सोपे असले, तरी आंबेडकरी विचारांच्या रस्त्याने चालणे यांना कधीच शक्य होणारे नाही, हे निश्चित.
.................................................................................................................................................................
Muslim politics in India - Hamid Umar Dalwai,
Indian Secular Forum, Mumbai,
Pages - 134, Price - 120 Rs
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3495
.................................................................................................................................................................
मात्र भारतीय संविधानाचा पाया ज्यांनी रचला, त्यांच्याच पावलांवर पावलं ठेवत हा देश पुढे जाणार आहे. आणि म्हणून ही संघीय गर्दी म्हणजे धावत्या महामार्गावर मधूनच कधी तरी होणारा ‘ट्रॅफिक जॅम’ आहे. त्याचा फारसा बाऊ करून घेण्यात काही अर्थ नाही. असो... आता दलवाईंच्या पुस्तकाबद्दल बोलतो. मला सुरुवातीपासूनच असे ठामपणे वाटत आले आहे की, या पुस्तकाविषयी आपण जे बोलत आहोत, आणि त्याच्याकडे ज्या दृष्टीने पाहत आलो आहोत; त्यात जरा बदल व्हायला हवा आहे. माझ्या मते हे पुस्तक ‘मुस्लिम पॉलिटिक्स इन इंडिया’ अर्थात या देशातील मुस्लिम राजकारणाबाबतचे नसून, हे पुस्तक म्हणजे एकूण भारतीय राजकारणाच्या सेक्युलरायझेशनचा मूर्तिमंत जाहीरनामा आहे!
याच दिशेने जात मी आणखी एक महत्त्वाची मांडणी करू इच्छितो आणि ती आहे हमीद दलवाईंबद्दलची. दलवाईंची अद्यापही ‘मुस्लिम समाजसुधारक’ अशी जी एक चुकीची आणि खरे तर मर्यादित अशी ओळख आहे, त्याबद्दल मला बोलायचे आहे. विशेष म्हणजे, ही ओळख देण्याची चूक केवळ संघवाल्यांनीच नाही, तर इतरांनीसुद्धा केली. मुस्लिम समाजसुधारक ही ओळख दलवाईंवर लादली गेली, असे माझे स्पष्ट मत आहे. दलवाईंची खरी ओळख एक ‘सेक्युलर विचारवंत’ अशीच व्हायला हवी! भारतीय राजकारणाचे सेक्युलर रूप कसे निर्मिता येईल, यासाठी आयुष्यभर झटणारा अस्सल कार्यकर्ता म्हणजे दलवाई होते. आणि म्हणूनच, त्यांच्या या पुस्तकाकडे मी ‘भारतीय राजकारणाच्या सेक्युलरायझेशनचा जाहीरनामा’ म्हणूनच पाहीन.
हे पुस्तक आकाराने अगदीच छोटेसे आहे. अगदी खरेय! अगदी प्रस्तावनेसह मोजायचे झाले तरी उण्यापुऱ्या एकशे वीस पानांत ते संपूनही जाते. पण या ठिकाणी हेही लक्षात घेणे गरजेचे की, मुळात जाहीरनामे अर्थात मॅनिफेस्टो हे आकाराने लहानच असतात. कम्युनिस्ट मॅनिफेस्टो तरी असा कितीसा मोठा आहे? साधारणतः दीडशे पानांत तो संपतो. जाहीरनामे हे नेहमीच आकाराने छोटे, थेट काय ते बोलणारे आणि समोरच्याचे लक्ष चटकन वेधून घेणारे असेच असतात. दलवाईंचे हे पुस्तकही अगदी तसेच आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
आणखी एक महत्त्वाचे- हे पुस्तक फक्त मुसलमानांसाठी नाही, ते सर्वांसाठी आहे. ही भाषणंसुद्धा फक्त मुसलमानांसाठी नव्हती, ती सर्वांसाठी होती. दलवाई हे स्वतः एक मुसलमान होते हे खरे असले, तरीही त्यांचे जे काही म्हणणे होते ते सर्वांसाठीच होते. सात महिलांना सोबत घेऊन दलवाईंनी त्या वेळी (१९६६मध्ये) सचिवालयावर नेलेला मोर्चा आणि त्याच वेळी पुढ्यात उभी असणारी तोंडी तलाकची गंभीर समस्या- या गोष्टी मुसलमान महिलांसाठी निकराच्या असल्या, तरी त्यांना हे प्रश्न सर्वांपुढे मांडायचे होते.
या पुस्तकातही समाजबदलाचे जेवढे आवाहन मुसलमानांना केले गेले आहे, तेवढेच ते हिंदूंनादेखील करण्यात आलेले आहे, हे लक्षात घेणे महत्त्वाचे ठरेल. किंबहुना, जेवढी टीका दलवाईंनी मुसलमानांवर केली आहे, तेवढीच हिंदूंच्या विविध रूढींवरदेखील केली आहे! पुस्तकात कित्येक ठिकाणी तर हिंदूंविषयी एक आशावादसुद्धा पाहायला मिळतो. हिंदू समाजात धार्मिक सुधारणांची प्रदीर्घ परंपरा आहे, तिचे स्वागत केले पाहिजे, तिचा आदर केला पाहिजे- असे दलवाईंनी लिहून ठेवले आहे. एवढेच नव्हे तर, जो सुधारणावादी मुसलमान आहे, त्याने सुधारणावादी हिंदूंकडून आणि हिंदू धर्मातील सुधारणा चळवळींतून काही तरी शिकायला हवे, असेही त्यात अनेकदा म्हटले आहे. शिवाय, हिंदूंनी कोणत्या रूढी सोडून द्यायला हव्यात, याचेही उल्लेख या पुस्तकात वाचायला मिळतात.
दलवाईंच्या या पुस्तकातील आशय हा खचितच राजकीय आहे, हे मान्य; मात्र त्यामागील उद्देश आणि आधार शतशः सेक्युलर असाच आहे. किंबहुना, दलवाईंच्या सेक्युलर असण्याला आतून नेहमीच करुणेची एक भरीव किनार लाभल्याचे आपणाला पाहायला मिळते. त्या तलाकपीडित मुस्लिम महिलेचे दुःख, तिच्या वेदना आणि तिची दयनीय परिस्थिती यांविषयी दलवाईंच्या मनात ज्या सहवेदना होत्या; त्यांचेच प्रतिबिंब त्यांच्या मनातील सेक्युलरायझेशनच्या संकल्पनेत दिसते.
.................................................................................................................................................................
भारतातील मुस्लिम राजकारण - हमीद दलवाई
साधना प्रकाशन, पुणे
पाने : १६०, मूल्य - १५० रुपये.
पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3492
.................................................................................................................................................................
दलवाईंना अपेक्षित असणारे हे सेक्युलरायझेशन आणि जीनांना जे सेक्युलरायझेशन पाकिस्तानमध्ये अपेक्षित होते, त्या दोहोंत मोठा फरक आहे! जीनांचे सेक्युलरायझेशन केवळ बुद्धिजन्य होते. त्यात भावनांना स्थान नव्हते. दलवाईंचे सेक्युलरायझेशन मात्र बुद्धी आणि भावना यांना एकत्र घेऊन पुढे जाणारे होते, मानवतावादी होते. स्वतः दलवाईच एके ठिकाणी म्हणतात-‘येत्या काळात आपणां सर्वांनाच आधुनिक उदारमतवादी मानवता-वादाच्या दिशेने वाटचाल करणे गरजेचे ठरणार आहे’... आणि त्या दिशेने जाण्यासाठीचे पहिले पाऊल असेल ते सेक्युलरायझेशनचे. आणि सेक्युलरायझेशन हवे असेल, तर त्यासाठी प्रत्येक धर्मातील चुकीच्या चालीरीतींची त्या-त्या धर्मातील सुधारणावादी लोकांनी विधायक मार्गाने चिकित्सा आणि टीका केल्याखेरीज पर्याय असणार नाही! ‘धर्माची चिकित्सा ही इतर सर्व चिकित्सा अन् टीकांची माता आहे’ हे वाक्य कार्ल मार्क्सनेदेखील म्हणून ठेवले आहेच...
दलवाईंचे हे पुस्तक आकाराने लहान असेलही, पण त्यातील प्रत्येक प्रकरण म्हणजे एका स्वतंत्र पुस्तकाचा विषय होऊ शकतो, एवढे मूल्य त्यात सामावले आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत ए. बी. शहा यांनी जग-भरातील मुस्लिम समाजातील कट्टरता आणि सनातनी वृत्ती यांवर भाष्य केलेले दिसते. आपल्या विवेचनाच्या शेवटी शहा म्हणतात- ‘दलवाई जे काही बोलताहेत, मांडताहेत; ते सगळं हिंदूंची युवा पिढी ऐकत आहे, हे अतिशय चांगले आहे. कारण दलवाई सर्वच धर्मांतील सेक्युलरायझेशनविषयी बोलत आहेत.’
या पुस्तकात दलवाईंनी मुसलमानांच्या चुका अतिशय स्पष्ट शब्दांत मांडल्या आहेत, पण त्यातही त्यांनी दोन प्रमुख गोष्टींविषयी अधिक भाष्य केले आहे. पहिली म्हणजे, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मुस्लिम समाजाने जेवढ्या ताकदीनिशी उतरायला हवे होते, तेवढ्या ताकदीने ते उतरले नाहीत- आणि दुसरी चूक- पाकिस्तानच्या निर्मितीमुळे खरं तर मुसलमानांचा तोटाच झाला आहे. उलट त्याचा फायदा हिंदूंना अधिक झाला आहे, हे आपण यानिमित्ताने लक्षात घ्यायला हवे. (आणि हे वास्तव आजही लागू आहे. २०१४ च्या निवडणुकांत भाजपला ३१ टक्के मते मिळाली आहेत. समजा, भारताची फाळणी न होती आणि आज पाकिस्तान व बांग्लादेश अशा दोन्हीकडचे मुसलमान भारतात असते आणि ते मतदारही असते; तर कल्पना करा- भाजप नक्की कुठे असता?) म्हणजे पाकिस्ताननिर्मिती ही हिंदूंच्या फायद्याची ठरली, मुसलमानांच्या नव्हे; हे वास्तव मुसलमानांच्या लक्षातच येत नसल्याचे दलवाईंनी म्हणून ठेवले आहे.
.................................................................................................................................................................
हमीद दलवाई : क्रांतिकारी विचारवंत - संपा. शमसुदिन तांबोळी
डायमंड पब्लिकेशन्स, पुणे
पाने : १२०, मूल्य - १३० रुपये.
पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3423
.................................................................................................................................................................
या पुस्तकातील ‘रीडिंग द माइंड ऑफ इंडियन मुस्लिम्स’ हा लेख तर मुळातून वाचावा असाच आहे. या लेखात ‘आम्ही जगज्जेते होतो’, ‘आम्ही भारतावर राज्य केले होते’ अशा स्वरूपाच्या इतिहासाचे जे ‘ओझे’ आधुनिक काळातही मुसलमान लोकांच्या मनांवर टिकून आहे, त्याची सविस्तर समीक्षा केलेली आहे. (गंमत म्हणजे, अशाच प्रकारचे ऐतिहासिक(!) दाखले संघवालेसुद्धा देत असतात. म्हणजे, एके काळी आम्ही अख्ख्या जगावर राज्य करत होतो, वगैरे.)
या एकूण मानसिकतेतच मनोरंजन सामावले आहे, असे आपल्याला जाणवेल. मग ते मुस्लिम असू द्या किंवा हिंदू. म्हणजे असे की, हिंदू समाज वास्तवात चातुर्वर्ण्य आणि अस्पृश्यता अशा गोष्टींना कितीही खालच्या थरावर जाऊन मान्यता देऊ देत. किंवा मग दुसरीकडे मुसलमानांनी तोंडी तलाक किंवा मग अत्यंत निम्न स्तरावरील शिक्षणाला पाठिंबा देत आपले मागासलेपण सिद्ध करू देत; पण तरीही या दोहोंना आपापल्या पातळीवर ‘आपणच कसे जगावर राज्य करणारे होतो’ असे आत्मप्रौढी मिरवणारे भ्रम होत राहतात, हे मोठेच गमतीशीर आहे! दलवाईंनी त्यावर पुरेसे आसूड ओढले आहेतच. शिवाय, असल्या भ्रमांतून मुसलमान जेवढ्या लवकर बाहेर पडतील, तेवढे ते देशासाठी सुलक्षण ठरेल, असेही सांगून ठेवले आहे.
आणखी एक महत्त्वाचे म्हणजे, ‘राष्ट्रवादी मुस्लिम’ कोण आणि ‘जातीयवादी मुस्लिम’ कोण, याचीही एक चांगली चर्चा या पुस्तकात करण्यात आली आहे. ‘जे भारतात राहू इच्छितात, ते राष्ट्रवादी मुस्लिम’ आणि ‘जे भारतात राहू इच्छित नाहीत, जे पाकिस्तानला आपली मातृभूमी मानतात ते जातीयवादी मुस्लिम’ अशी सरसकट व्याख्या करता येऊ शकते. मात्र, त्यातही गुंतागुंतीचा खोडा असा की, भारतभूमीवर राहू इच्छिणाऱ्या आणि त्यामुळे राष्ट्रवादी असणाऱ्या मुसलमानांचा मात्र इस्लाममधील मूलभूत सुधारणांना व इस्लामच्या धर्मचिकित्सेला साफ विरोध आहे. हे पुस्तक अशा अनेक ‘बुऱ्यां’ना हटवण्याचे काम निश्चितच करते.
इस्लाम धर्मचिकित्सेला असणारा धर्मांतर्गत विरोध आजही तेवढाच पाहायला मिळतो. तरी, नुकतीच तोंडी तलाकबाबत काही तरी आचारसंहिता आणण्याची चर्चा सुरू होणे, हा त्यातल्या त्यात एक दिलासा. मी सुरुवातीसच म्हटले तसे, हे पुस्तक धर्मचिकित्सेकडे अनेक अंगांनी पाहते. त्यातील एका प्रकरणात कम्युनिस्टांच्या मानसिकतेवरदेखील दलवाई प्रकाश टाकतात. वर्ग आणि वर्णव्यवस्थेला प्रातःस्मरणीय मानणारे हिंदू मूलतत्त्ववादी म्हणजे आपले पहिले शत्रू, असे कम्युनिस्ट मानतात. दुसरीकडे, काँग्रेसने आणलेल्या स्वातंत्र्यानंतरही श्रमिक वर्गाचे भले न झाल्यामुळे कम्युनिस्टांचा काँग्रेसलादेखील विरोध! त्यामुळे काँग्रेस आणि आरएसएस या दोहोंना शह द्यावा, या हेतूने मुळात धर्मसंस्थेवर ज्यांचा विेशास नाही अशा कम्युनिस्टांनीच मुसलमानांचे तुष्टीकरण करायला सुरुवात केली. हा खरे तर कम्युनिस्टांच्या हातून घडलेला वैचारिक अपराधच म्हणायला हवा. दलवाईंनी त्याचीही चर्चा केलेली आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
ज्याला आपण धर्मशासित किंवा ईश्वरशासित राज्यसत्ता असे म्हणतो, त्याविषयीही दलवाईंची मतं स्पष्ट आहेत. पाकिस्तानाप्रति निष्ठा दाखविणाऱ्यांचा विरोध करणे एक वेळ सोपे आहे; मात्र लोकशाहीच्या चेहऱ्याआडून काम करणाऱ्या धर्मशासित राज्यव्यवस्थेचे काय करायचे? या सत्तेला आपल्या निष्ठा बहाल करणे मोठे धोक्याचे असते. दुर्दैवाने आपल्याकडे हे घडताना दिसते. महत्त्वाचे म्हणजे, हे करण्यात हिंदू-मुस्लिम असा कुठलाही राजकीय पक्षांमधला भेद नसून, सर्वच त्यात समानरित्या समाविष्ट आहेत.
आपल्याकडे मतदानाप्रति पाहायला मिळणारी उदासीनता हीदेखील एक गंभीर समस्या म्हणायला हवी. अनेक लोक मतदान करत नाहीत, जे करतात त्यातील कित्येक लोक केवळ जिंकेल (किंवा जिंकू शकेल) त्यालाच मत देतात. या व्यवस्थेला प्रौढ अन् प्रगल्भ लोकशाही म्हणायचे का? हीच का आपल्याकडील मतदारांची ‘अॅडल्ट फ्रँचाइजी’? मी तर या व्यवस्थेला ‘प्रौढ’ म्हणूच शकत नाही. ही तर लहान मुलेच म्हणायला हवीत. (आपल्याकडील मतदारांची राजकीय बुद्धिमत्ता म्हणजे नक्की काय भानगड आहे, हे तो बिचारा शेरलॉक होम्सच उलगडू जाणे.)
आणखी एक महत्त्वाचा उल्लेख दलवाई या पुस्तकात करतात, जो ते नेहमी इतरत्रही करत असत. ‘आपला देश हळूहळू संकोच पावत चालला आहे’ अशा स्वरूपाचा हा उल्लेख. आज आपण आसपास पाहिले तर- दलवाई जे म्हणून गेले, तेच आपल्याला समकालीन भारतात होताना दिसत आहे. आज आम्हाला एकच भाषा हवीय, एकच आहार हवाय, एकाच प्रकारचे आणि एकाच दिशेने जाणारे शिक्षण हवेय, एकच नेता हवाय, एकच पक्ष हवाय... सारे कसे एक, एक, एक. हे सारे काय दर्शविते? आपल्या देशात होत चाललेल्या सांस्कृतिक अवकाशाचा ठरवून केला जाणारा संकोच हाच तर यातून दिसून येत आहे. हे वास्तव भीषण आहे. पण याकडे नुसते बघत बसून चालणारे नाही, त्याचा तीव‘ विरोध करायलाच हवा!
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
गेल्या वर्षी तर आमच्या महाराष्ट्रात एक नवीच फॅशन आली होती. ‘मराठा मूक मोर्चा’ असे तिचे नाव. अक्षरशः लाखोंच्या संख्येने मराठा जातीचे लोक रस्त्यांवर उतरत होते. त्यांच्या काही मागण्या होत्या म्हणे. (आता, मुळात एक क्षत्रिय वंश असणारी मराठा जात स्वतः लोकशाहीला फारशी काही मानत नाही. मराठ्यांना फक्त स्वतःचेच राज्य हवे असते, हे बोचरे वास्तव क्षणभर अलाहिदा ठेवू या) आम्ही त्या वेळी या मोर्चाचे स्वागतच केले. जर आपली धसमुसळी शैली बाजूला ठेवून मराठा समाज शांततेच्या मार्गाने रस्त्यावर उतरून आपल्या मागण्या ठेवू पाहत असेल, तर त्यात गैर काहीही नाही. पाहता पाहता प्रत्येक जिल्ह्यात मराठा मोर्चा निघू लागला. आमच्याकडील मीडियाला तर हे मोर्चे म्हणजे ते आहेत त्याहीपेक्षा मोठे करून दाखवण्याची जणू सुवर्णसंधीच (!) होती. मग मीडियाच्या आभासी लाटेवर स्वार होत हे मोर्चे अधिकच भव्य वाटू लागले. सगळाच सावळा गोंधळ!
अर्थात, हे सगळे लोकशाही मार्गाने सुरू असल्यामुळे समस्या अशी काही नव्हती त्यात. पण त्याचा एक वेगळाच परिणाम मात्र झाला. तो असा की, मराठ्यांना प्रतिकि‘या म्हणून दलितांनी सुद्धा आपला मूकमोर्चा काढला. मग ओबीसी तरी कसे दूर राहू शकतील?... मग त्यांनीही आपले मोर्चे काढले. गम्मत अशी की सुरुवातीस यांच्या मोर्चांत मुसलमान सहभागी असायचे, पण पुढे त्यांनीही आपापले स्वतंत्र मोर्चे काढायला सुरवात केली. आता तर म्हणे ब्राह्मणसुद्धा आपला एक मोर्चा काढण्यास सज्ज होत आहेत... हे पाहून महाराष्ट्राची सुधारक परंपरा खरोखरच धन्य होत असेल, नाही! ज्या भूमीत फुले झाले, आंबेडकर झाले, आगरकर झाले, लोकहितवादी झाले; त्या भूमीत जातींचे ध्रुवीकरण करत हे मोर्चेसुद्धा होताहेत.
मला प्रश्न पडतो- आपल्याकडील समाजधुरिणांनी याच दिवसासाठी समाजसुधारणेचा अट्टहास केला होता का? जर आपापल्या जातींसाठीच संघटन बनवणे एवढे आवश्यक असते; तर लोकमान्य टिळक, ‘बाळशास्त्री जांभेकर यांनी आपापले चित्पावन ब्राह्मण संघ’ आणि ‘कऱ्हाडे ब्राह्मण संघ’ नसते का बनवले? भांडारकरांनी सारस्वतांची एखादी संस्था तयार केली असती, प्राच्यविद्या संशोधनात कशाला पडले असते बिचारे? पण दुर्दैवाने या साध्या सरळ गोष्टीही आमच्याकडील सुशिक्षित वगैरे म्हटल्या जाणाऱ्या लोकांनाही उमजत नाहीत. वंचितांचे सोडून देऊ, पण ज्यांची पोटं भरलेली आहेत अशांनी तरी विचार करायला हवा की नको? दलवाईंच्या या पुस्तकात विचार कसा आणि काय करायला हवा, हे ठिकठिकाणी सांगितले आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
मग ह्या सगळ्या पोर्श्वभूमीवर सेक्युलरायझेशनकडे आपण कसे पाहायला हवे? तर, सेक्युलरायझेशन म्हटले की, मुसलमानांच्या धार्मिक सुधारणांची चर्चा व्हायला हवी; आणि हिंदूंच्या जातिप्रथेबाबत सुधारणांची चर्चा व्हायला हवी. हिंदूंसाठी तर जातिप्रथेचे समूळ उच्चाटन, हाच खरा सेक्युलॅरिझम ठरेल!
आपल्याला ठाऊक असेलही कदाचित दलवाईंनी त्याच वेळी असा इशारा देऊन ठेवला होता की, भारताची मदत कुणीही करणार नाही. भारताला स्वतःच स्वतःची मदत करावी लागेल. इतर राष्ट्रांना तर भारतापुढे काही ना काही समस्या निर्माण करण्यातच रस आहे. आपल्या लोकशाहीविषयी अनेकांच्या मनात आजही मत्सर आहे. (आपल्या लोकशाहीचे सामर्थ्यही फार मोठे आहे. आज ज्यांना देशाला आपल्या एकछत्री अमलाखाली आणायचे आहे, तेसुद्धा याच लोकशाही मार्गाने सत्तेवर आले आहेत, हे त्यांनी विसरू नये. येत्या पाच-दहा वर्षांत याच लोकशाही मार्गाने त्यांची गच्छंतीसुद्धा होणार आहे, हेही त्यांनी लक्षात ठेवावे. लाट जिथून उठते, तिथूनच तिच्या अंताचा प्रवासही सुरू होत असतो. त्यामुळे ही ‘लाट’ परतेल हे नक्की. ज्या पद्धतीने तिचा प्रवास उजवीकडे सुरू झालाय, तसाच तो पुन्हा एकवार मध्यमार्गाच्या दिशेने सुरू होईल, हे निश्चित. प्रत्येक बुडबुडा कधी तरी फुटतोच!) तर, दलवाई म्हणतात त्याप्रमाणे, आपल्याला कुणावर अवलंबून न राहता, स्वतःची ताकद स्वतःच सिद्ध करावी लागणार आहे.
स्वतंत्र भारतातील मुसलमानांच्या योगदानाबद्दल बोलायचे झाल्यास, राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रांत मुसलमानांनी दिलेले योगदान महत्त्वाचे असेच आहे. १९७७ च्या मार्चमध्ये उत्तर भारतातील मुसलमानांनी एकतर्फी मतदान केले नसते, तर आणीबाणी हटणे केवळ अशक्य होते, हे आपल्याला विसरून चालायचे नाही. त्या वेळी आधी मुसलमानांनी आणि नंतर जगजीवन राम यांनी इंदिराजींची साथ सोडली, (तेव्हा उत्तर भारतात ३०० पैकी एकही जागा काँग्रेला मिळाली नव्हती.) ज्याचा मोठा फटका त्या वेळी काँग्रेसला बसला होता. मला वाटतं, देशाने यासाठी मुसलमानांचे आभारच मानायला हवेत. शिवाय, हिंदुस्थानी संगीत, भारतीय खेळ, आपली संतपरंपरा अशा सगळ्यांत मुसलमानांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यामुळे, हिंदू-मुसलमानांनी आपापल्या योगदानाचा सन्मान करावा आणि आपल्या नात्यांचा पूल बांधत या देशाला अधिक बळकट व समृद्ध करावे, हा आशयही आपल्याला दलवाईंच्या लेखनात सापडतो.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
आपल्याला कधी तरी आपल्या इतिहासाबद्दलच्या अवाजवी प्रेमाला एका मर्यादेवर थांबवावे लागेलच! संविधाननिर्मितीनंतरच्या नव्या भारताकडे आपल्याला आता पाहावे लागेल. कधीपर्यंत त्याच शिळ्या कढीला ऊत आणणार?... आपण आता शक्य तेवढे भविष्याकडे पाहायला हवे. इतिहासातील वाईट घटनांची पुनःपुन्हा उजळणी करून हाती काहीही लागणार नाही. त्या इतिहासाच्या ओझ्याखाली दबणे आता पुरे. हे पाऊल आपल्याला हव्या असलेल्या खर्या सेक्युलर भारताच्या दिशेने नेणारे ठरेल... आणि म्हणूनच दलवाईंचे हे पुस्तक ज्याला मी सेक्युलर भारताचा मॅनिफेस्टो म्हणालो, ते या प्रवासात नक्कीच महत्त्वाचे ठरेल...
शब्दांकन आणि अनुवाद : स्वप्नील जोगी
(‘साधना’ साप्ताहिकाच्या १० जून २०१७च्या अंकातून साभार)
.................................................................................................................................................................
लेखक विनय हर्डीकर पत्रकार, लेखक आणि कार्यकर्ते आहेत.
त्यांचा मोबाईल नं. - ९८९०१ ६६३२७.
vinay.freedom@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment