अजूनकाही
सिद्धार्थ देवधेकरांच्या 'न सांगितलेल्या गोष्टी' (लोकवाङ्ममय गृह, २०१६) आजवर खरंच कुणी सांगितलेल्या नव्हत्या. ‘सदाशिव पेठी’ म्हणून हिणवल्या गेलेल्या साहित्यापासून दलित साहित्यापर्यंत 'त्या' घाणीत प्रत्यक्ष न उतरणाऱ्या कुणासाठी हे जग जणू अस्तित्वातच नव्हतं. अपवाद असतील, तसे काही करुणार्द्र वगैरे उल्लेखही असतील, पण त्यातले तपशील किमान ललित साहित्यात तरी, एवढे उघडेवाघडे केलेले वाचण्यात आले नव्हते. कुणालाच ते जग आपल्या आसपास नको होतं? का टाळता तर येणार नाही म्हणून जणू त्यांचं कामानंतरचं अस्तित्व आपल्या जाणिवेपलिकडे असावं म्हणून सगळे धडपडत होते? मग मनपाचा तो गोल छोटा टँकर आणि त्यावर बसलेले दोन-तीन कामगार लांब नजरेच्या टप्प्यात जरी दिसले तरी 'त्या' वासानं येणाऱ्या शिसारीच्या कल्पनेनंही लांब सरकणारे आम्ही प्रत्यक्ष त्या नरकात उतरणाऱ्यांच्या माणूसपणाच्या कशा चिंध्या होत असतील हे कसे जाणणार होतो?
देवधेकर हे सगळं चित्रदर्शी पद्धतीने मांडतात, तरी हे भंगीकामाचं दस्तऎवजीकरण नव्हे, त्यातून काही सहानुभूती मिळवावी असाही काही हेतू नाही. (देवधेकर स्वतः मुंबई महापालिकेत सफाई कामगाराचं काम करून पदोन्नत झालेले, तरी हा मोह त्यांना झालेला नाही.) हे सगळं करणाऱ्या, व्यवस्थेनं बहुतांशी 'करणं' भाग पाडलेल्यांच्या आयुष्यातल्या माणूसपणाच्या नोंदी ते करतात. म्हणून हे कुणी या कामासाठी परग्रहावरून उतरलेले जीव नाहीत तर तुमच्याआमच्यासारखी हाडामासांची, रागलोभापासून किळस, घृणा असणारी माणसंच हे काम करतात याची माहीत असलेलीच तरी स्मृतीतून आम्ही हाकलून दिलेली चरचरीत जाणीव हे पुस्तक देतं.
संग्रहात चार गोष्टी चार वेगवेगळी नावंगावं असलेल्या माणसांच्या असल्या तरी ही एकाच नकोशा आयुष्याची वेगवेगळ्या टप्प्यावरची दीर्घकहाणी आहे. 'बॉय' या पहिल्या कथेत चौदा-पंधरा वर्षाच्या जेमतेम उंची, अंगयष्टी असलेल्या भाच्याला घेऊन सफाई खात्यातून निवृत्त होत असलेला मामा भरतीच्या रांगेत उभा आहे. शाळेत भेट द्यायला आलेल्या बीट ऑफिसरना अचूक उत्तरं देणारा, तू शिकून कोण होणार?' असं त्यांनी कौतुकानं विचारल्यावर इवल्याशा फुगलेल्या छातीनं 'मोठा साहेब' असं उत्तर देणारा बॉय...मामाबरोबर भरतीच्या रांगेत तो हताश केविलवाण्या चेहऱ्यानं उभा आहे. आजूबाजूच्या खाकी डगल्यातल्या कुतूहलाबरोबरच दुःस्वास भरलेल्या नजरांनी त्याच्यातली उरलीसुरली ऊर्जा वितळून जाते, स्वप्नं थिजून जातात. त्याच्या डोळ्यासमोर घरची नको असतानाही येणारी, तिथंच ठाण मांडणारी चित्रं देवधेकर थोडक्यात पण तपशीलानं उभी करतात. ठिकठिकाणी पावसांत थपथप गळणारं घर, काटकोन झालेल्या शरीरानंही राब राब राबणारा आजा, थरथरत्या हातानं आवत वळणारी आजी, सुटकेचा मार्ग नसल्यानं कातावून गेलेली हगेहगेस्तो मारणारी आई, भाद्रपदात वाटेवर गांडुळं येऊन पडावीत तशी भूकेनं उघडीनागडी वळवळत पडलेली भावंडं…त्याचे पर्याय व्यवस्थेनं बंद केले आहेत. पहिल्या रात्री बिछान्यावर ठणकत्या, किळसून गेलेल्या अंगानं त्यानं केलेलं दारिद्र्यावरचं संशोधन पहाट होईतो संपत नाही…कामाच्या ओढीनं उठून यंत्रवत तो झपाझप सर्व आवरायला लागतो...
'गणपत आणि त्याच्या आईची गोष्ट' ही काहीशा मनाविरुद्ध, नाईलाजानं बॉय झालेल्या, कालांतरानं तिथंच लग्नाच्या वाटेनं स्थिरावलेल्या गणपत आणि गावी एकाकी पडलेल्या त्याच्या आईची, पापभीरु गणपतच्या होणाऱ्या घुसमटीची कथा आहे. लांब मुंबईला नोकरीच्या सुखात राहतोय मुलगा या पातळ भरवशावर गावी बेवारशासारखं असहाय जिणं रेटणारी म्हातारी कुडातंच केव्हातरी मरून पडते. पाच-सहा वर्षांच्या गणपतला पदरात सोडून एका अपरात्री जनावर चावल्यानं त्याचा बाप मरून गेला, तेव्हापासून कुडाचं राहतं घर आणि तळहाताएवढं शेत सांभाळत गणपतला वाढवण्याची, शिकवण्याची शिकस्त करणाऱ्या बहिणीच्या ओढगस्तीला कायमचा टेकू द्यावा म्हणून यापार उनाडक्या करत फिरणाऱ्या गणपतला मामा निवृत्त होता होता आपल्या जागेवर बॉय म्हणून भरती करून घेतो. सवय नसलेले शारीरिक श्रम, मुंबईचा नकळत्या वयातला भूलभुलैय्या, पराकोटीच्या घाणीची शिसारी यातून तात्पुरत्या का होईना, सुटकेच्या प्रयत्नातली व्यसनाधीनता, त्यासोबत येणारा कर्जबाजारीपण या दुष्टचक्रात फसलेल्या गणपतला गावाकडच्या एकाकी आईचा सोईस्कर विसर पडतो. बायकोसह पोटभाडेकरू म्हणून नाकपुडीएवढ्या संसारातलं हरिकिर्तन कसंबसं रेटता रेटता आईच्या मरणाची तार त्याला आणखी हतबल करून टाकते...तातडीनं जाण्यासाठी पैशाच्या तजविजीच्या सर्व वाटा बंद झालेला गणपत पुन्हा दारूला शरण जातो…
……………………………………………………………………………………………
न सांगितलेली गोष्ट : सिद्धार्थ देवधेकर,
लोकवाङ्मय गृह, मुंबई,
पाने : १६०, मूल्य : २०० रुपये.
पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3491
……………………………………………………………………………………………
कोवळ्या वयातली व्यसनाधीनता, बाहेरख्याली, त्यातून येणारे शारिरीक आजार आणि कमजोरी, मानसिक हतबलता या साखळीचे करुण चित्र 'संभ्रम'मध्ये येतं. अंगात ताप, छातीतून मधूनच येणारी चमक, कुठेही उकळत्या पदार्थासारखी आतून उसळी घेणारी टीबीची उबळ...सहकारी अचकट विचकट बोलून हिणवतात...आसपास लोक नाकाला रुमाल लावत अंगावर पाल पडल्यागत चेहरा करतात...स्वतःचीच घृणा येते. अंगावर नेहमीचं कर्ज आहेच, त्यावर आणखी बोजा वाढवून केलेल्या मर्यादेतले खासगी उपचार काम करू देण्याइतपत उभं करतात, कमजोरी राहतेच… लग्नानंतरचे काही - काहीच - दिवस मजेचे, घाणीविना थंड वाऱ्याच्या कोवळ्या झुळकीसारखे येतात न् जातात. पुन्हा मैला चिवडणं, बायकोपासून दडवून ठेवलेल्या आजाराशी झुंजणं, सहकाऱ्यांचे टोमणे आता विखारी होत आहेत, त्याचा सामना…गावी आईजवळ एकट्या राहणाऱ्या उफाड्याच्या बायकोला आपण शारीर 'न्याय' देऊ शकणार नाही हा संभ्रम या रोजच्या थेट, विषारी वाग्बाणांनी मनात पक्का होत जातो. मुळातलं पापभीरु मन खाऊ लागतं. गावी दृष्टीआड घडत असेल त्या कुरतडणाऱ्या कल्पनेशी रोज झुंजण्यापेक्षा बायकोला दुसऱ्या लग्नासाठी मोकळे करावं या निर्णयाप्रत येऊन तो सासुरवाडीला पत्र लिहितो. त्यात घायाळ करणारा कबुलीजबाब आहे. रोगापेक्षा मानसिक हतबलतेशी झुंजणाऱ्या शरीराचं ओझं ओढत तो पत्रपेटीकडे जाऊ लागतो...
‘वर्तन परिवर्तन' ही शेवटची कथा हा देवधेकरांनी आळवलेला दीर्घकालीन संध्याराग आहे. तृप्त, शांत, समाधानी तरी आत कसलंसं काहूर असलेली मारव्याची संथ आलापी… पंधरा-सोळाव्या वर्षी परिस्थितीच्या दबावाने काहीशा मनाविरुद्ध बॉय म्हणून या मानवी नरकाशी जोडला गेलेला सुहास रामचंद्र, लेबर मग मुकादम असा पदोन्नत होत शरीर-मनाची मर्यादेपलिकडे हेळसांड न करता राबत आता निवृत्त होतोय. नरकातल्या घाणीचं पर्व स्मृतीत असलं (तिथून ते आता त्याच्याबरोबरच जायचं) तरी प्रत्यक्षात संपून बराच काळ गेला आहे. कधी गावी गेल्यावर अंगणात पडलेल्या आभाळातल्या चांदण्याचा सडा अनुभवण्याइतकी संवेदना उरी जपलेला सुहास रामचंद्र आता नव्या उमेदीनं पत्नी आणि निवृत्तीच्या पैशाची उब सोबत घेऊन गावी आला आहे… मनात स्वप्नं आहेत, मुलाला आपल्या जागी लावण्याचा सोपा पर्याय टाळून एक नकोशी पण बहुतेकांना पर्याय नसलेली साखळी त्याने आधीच तोडली आहे. गावी घर सुधारणं - वाढवणं, मुलांचं भविष्य मार्गाला लावणं न् शेवटी बुद्धप्रतिमेच्या रूपानं घरी शांती आणि समाधानाचं अधिष्ठान प्रस्थापित करणं…अशा भैरवीवर ही कथा संपते.
चार कथांच्या या छोट्या संग्रहाला जयंत पवारांच्या ब्लर्बची पाठराखण आहे. मराठी कथाभ्यासातली देवधेकरांच्या कथेची अपरिहार्यता स्पष्ट करणारा हा ब्लर्ब अप्रतिम. शिवाय देवधेकरांचं छोटं मनोगत, डॉ. आनंद तेलतुबंडेंची आटोपशीर प्रस्तावना आणि शेवटी डॉ. श्रीधर पवार यांचा परिशिष्ट म्हणून आलेला दीर्घ लेख (२३ पानी त्यात सहा पानांची संदर्भसूची) असा कडेकोट बंदोबस्त आहे. या लेखनाचं समाजशास्त्रीय महत्त्व अधोरेखित होण्याच्या दृष्टीने हे आवश्यकच होतं, पण विशेषतः पवारांचा लेख या पुस्तकाच्या निमित्ताने अन्यत्र कुठे आला असता तर पुस्तक पोचायला अधिक मदत झाली असती असं वाटतं. या कथा निव्वळ कथा म्हणूनही अव्वल, काहीसा अपराधगंड देणारी अस्वस्थता संवेदनशील वाचकाच्या मनात निर्माण करण्यास सक्षम आहेत.
हे लेखन वाचताना नेहमीप्रमाणे अलिकडे समांतर काही वाचलेले स्मृतीतून तरंगत वर येत होते, त्यात अलिकडेच पाहिले-वाचलेले पद्मश्री सुधारक ओलवेंचं छायाचित्रांचं पुस्तक होतं (त्यासोबतचं लेखन अतुल देऊळगांवकर यांचं) त्याचं शीर्षक 'न्यायाच्या व सन्मानाच्या शोधात - सफाई कामगारांची न सांगितली गेलेली कथा' असंच होतं. (भारतीय महिला फेडरेशन, ठाणे समितीचे प्रकाशन, वितरक लोकवाङमय गृह, मे २०१३ ) ही तशी सफाई कामगारांची 'फोटोबायोग्राफी'च म्हणायला हवी. प्रत्येक छायाचित्र म्हणजे एक कथाच असणाऱ्या या पुस्तकाने दीर्घकाळ अस्वस्थ केलं होतं. त्यातलेच फोटो या पुस्तकांत येणं साहजिकच होतं. ओलवेंनी दिलेली अस्वस्थता त्यामुळे आठवणीने आणखी गडद झाली.
……………………………………………………………………………………………
न्यायाच्या व सन्मानाच्या शोधात - सुधारक ओलवे,
भारतीय महिला फेडरेशन (ठाणे समिती) /लोकवाङ्मय गृह, मुंबई,
पाने : १४०, मूल्य - १०० रुपये.
……………………………………………………………………………………………
हे लेखन वाचत असताना या विषयावरची मराठीतली एकमेव (बहुदा) समाजशास्त्रीय पाहणी 'नरक-सफाईची गोष्ट' (अरुण ठाकूर/महंमद खडस, सुगावा प्रकाशन, द्वितीयावृत्ती, नोव्हेंबर २००७) ची आठवण होणं अपरिहार्य होतं. (यालाही प्रस्तावना, पुरस्कार असा बाबा आढाव, य. दि. फडके आणि निर्मलग्रामनिर्माणचे श्रीकांत नावरेकर असा कडेकोट बंदोबस्त आहे. थोरामोठ्यांनी शिफारस केल्याशिवाय अशी पुस्तकं वाचली जाणार नाहीत, असा समज दुर्दैवाने आपण खरा करून दाखवला आहे. असो. ) सफाई कामगारवर्ग आणि त्यांचं काम यांची राज्यभर विविधांगाने पाहणी करून लिहिलेलं हे दस्तऐवजात्मक पुस्तक, कुठल्याच अर्थाने ललित नाही तरी आपल्या संवेदनाहिनतेचा अर्क काढून समोर ठेवतं. वानगीदाखल त्यातलं फक्त एक उदाहरण. यात एका प्रकरणात राज्यातल्या काही जुन्या नगरपालिकांच्या दफ्तरातून हुडकलेला जवळपास शतकभराचा सफाईकामाचा इतिहास आला आहे.
……………………………………………………………………………………………
नरक-सफाईची गोष्ट - अरुण ठाकूर, महंमद खडस,
सुगावा प्रकाशन, पुणे,
पाने - १७१, मूल्य - १०० रुपये.
पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3497
……………………………………………………………………………………………
डोक्यावरून मैला वाहतूक हा त्या वेळी सफाईचा एकमेव मार्ग होता. ते पाहणंही नकोसं, घृणास्पद. म्हणून सर्वांच्या अपरोक्ष म्हणजे मध्यरात्री २ ते ४ या वेळेतच व्हावं हा दंडक. सार्वजनिक वीज हा अपवाद असलेल्या त्या काळी जेमतेम दोन-अडीच फुटी बोळकांडातून गंजले, फाटलेले चार फुट उंचीचे लोखंडी दरवाजे उघडून मध्यरात्री ही नरकसफाई कंदिलाच्या प्रकाशात होई. त्यासाठी लागणारं रॉकेल नगरपालिकेनं पुरवावं (एरवी कामगार स्वतः हा खर्च वेतनातून करत), यासाठी १९३२ साली कामगारांना संप करावा लागला होता. (सफाई कामगारांचा हा पहिला संप!) यावर काही भाष्य करायलाही शरम वाटते.
अनिल अवचटांनीही स्वतंत्रपणे पुस्तक लिहावं या हेतूने पंढरपूर, आळंदी अशा क्षेत्रांच्या ठिकाणी भंगीकामाची पाहणी केली होती (माणसं, धागे आडवे उभे, गर्द, वाघ्यामुरळी, कोंडमाराच्या काळात). पूर्ण झालेलं हस्तलिखित प्रकाशनाच्या टप्प्यावर गहाळ झालं. पोटी उलाघाल घेऊन थांबणं आलं. पुढे ३०-३५ वर्षांनी कॅनडात बहिणीकडे एका निवांत क्षणी ही पाहणी आठवली. त्याचे तपशील वाहून गेले तरी त्यावेळचे अनुभव स्मृतीत वळचणीला होतेच. त्याआधारे त्यांनी लिहिलेला दीर्घलेख काही वर्षांपूर्वी एका दिवाळी अंकात वाचनात आला होता (कधी न् नक्की कुठे हे स्मरणात नाही). ते लेखन असंच बधीर करणारं आहे. कामगार मैला डोक्यावरून वाहतात, ते टोपलं नेहमीपेक्षा मोठं असतं (खेपा कमी व्हाव्यात म्हणून?). कसा वाहत असतील एवढा वजनदार नरक... म्हणत अवचट ते भरलेले टोपलं उचलून काही अंतर चालून पाहतात... स्मृतीत हेही आहे.
दहा-बारा वर्षांपूर्वी वाचलेली या संदर्भातली एक बातमी आठवते (कधी, कुठे वाचली हे स्मरणात नाही.) उत्तर प्रदेशातल्या मेरठ (बहुदा) नगरपालिकेत सफाई कामगारांच्या भरती मोहिमेत मोठ्या संख्येनं तथाकथित सवर्ण, उच्चवर्णीय जातींमधल्या अनेक पदवीधरांनी अर्ज केले होते. ही बातमी आणि त्याच्या आसपासच याच पार्श्वभूमीवरची मधुकर धर्मापुरीकरांची ‘तु वेडा कुंभार’ ही 'अंतर्नाद'मध्ये वाचलेली, विषयामुळे लक्षात राहिलेली कथा. धर्मापुरीकरांच्या कथांमधून बदलांच्या रेट्यामुळे होणारी मध्यमवर्गीय समाजातली उलाघाल बारीक तपशीलानं आली आहे.
या कथेतला रत्नाकर त्र्यंबक जोशी हा वारकरी परंपरेतले एकेकाळचे प्रसिद्ध कीर्तन-प्रवचनकार भास्करमहाराजांचा नातू. लोक त्यालाही महाराजच (एकेरी) म्हणतात. भास्करमहाराजांची समाधी, तिथलं मंदिर, वाडादी मिळकतीला भावकीतले हेवेदावे, त्यापोटीच्या कोर्टकचेऱ्या याची कसर लागलेली. दोन प्रयत्नांत जेमतेम मॅट्रिक झालेला महाराज नगरपालिकेच्या वाचनालयांत रोजंदारी कारकून आहे. दूर बांधलेल्या दोन खोल्यात विधवा आई आणि बायकोसह दोन मुलांचा संसार कसाबसा ओढतो आहे. भास्करमहाराजांचा नातू म्हणून नसत्या जबाबदाऱ्या घेऊन येणारा फुकटचा मान आणि रोजंदारीतल्या असुरक्षिततेत हातातोंडाची गाठ घालताना बायको कातावून गेली आहे. नगरपालिकेची हद्दवाढ होऊन सफाई कामगारांच्या जागा वाढतात, पण त्या असलेल्या रोजंदारी कामगारांतूनच ज्येष्ठतेप्रमाणे भराव्यात असा शासनादेश. त्यात महाराज दुसरे. सीओसाहेबांना तातडीनं लिखित संमती वा नकार कळवायचा आहे.
...आपल्याला खूप वेगळं काही सुचलं आहे अशा खुशीत कथेतला लेखक भराभर लिहीत इथवर येऊन थांबला आहे. काय करेल महाराज? दुप्पट पगार आणि कायम होण्यातल्या सुरक्षिततेच्या आशेनं कामाठीपण स्वीकारत रस्ते झाडेल, नाले-संडास साफ करेल? का फुकटच्या मान घेत रोजंदारीत, कोर्टकचेऱ्यांत कुचंबेल? लेखकाला ठरवता येत नाही, महाराजाला काहीच ठरवता येत नाही असा शेवट करून तो वेळ मारून नेतो... प्रत्यक्षात या घटनेला वर्षं उलटलं आहे...गावांत मेहतरांतला एक तरुण स्पर्धापरीक्षेतून तहसीलदार झाला आहे, नगरपरिषदेतर्फे त्याचा सत्कार होतोय. खाकी शर्ट आणि हाफपँटमधला महाराज हातात खोरं आणि झाडू घेऊन रस्ता झाडतो आहे...
लेखक पुस्तकप्रेमी आहेत.
vaidyaneeteen@gmail.com
……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Jayant Raleraskar
Fri , 09 June 2017
आपण कधीच न विचार केलेल्या एका विश्वाची ही ओळख. पुस्तकाची ओळख करुन देताना किंचित का होईना विस्ताराने सांगितल्या कथा आणि या विषयावरील अन्य प्रसिद्ध लेख किंवा ललित याची माहिती पण झाली. नितीन वैद्य यांनी हे भीषण जग आपल्या समोर ठेवताना एरव्ही जे वाचले जाणार नाही याची ओळख करुण दिली. हे एक दिशा-दिग्दर्शन नवे वाचू पाहणाऱ्यासाठी. ---जयंत राळेरासकर,