टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • प्रणव मुखर्जी, घनश्याम तिवारी, योगी आदित्यनाथ आणि प्रकाश मेहता
  • Thu , 08 June 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या प्रणव मुखर्जी Pranab Mukherjee घनश्याम तिवारी Ghanshyam Tiwariयोगी आदित्यनाथ Yogi Adityanath प्रकाश मेहता Prakash Mehta

१. केंद्रातील मोदी सरकारच्या तृतीय वर्षपूर्तीनिमित्त विविध क्षेत्रांत संपादित यशाचा लेखाजोखा मांडला जात असताना राष्ट्रपतिपदाचा एका महिन्याचा कार्यकाळ शिल्लक असलेल्या प्रणव मुखर्जी यांनी देशातील बेरोजगारीच्या मुद्यावर चिंता व्यक्त केली आहे. रोजगार क्षेत्रात दरवर्षी कोट्यवधी तरुण पाऊल ठेवत आहेत. पण त्यांच्यासाठी त्या प्रमाणात नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होत नाहीत, असे ते म्हणाले. देशात दरवर्षी दोन कोटी रोजगारनिर्मिती करण्याचे आश्वासन मोदी सरकारकडून देण्यात आले होते. पण सरकारनेच राज्यसभेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी २०१४ पासून डिसेंबर २०१५ या दोन वर्षांच्या काळात प्रत्यक्षात पाच टक्के रोजगारही उपलब्ध झाले नाही, असे दिसून येते. दरवर्षी रोजगार बाजारात पाऊल ठेवणाऱ्या एक कोटी तरुणांसाठी नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होत नाहीत. देशाकडे सर्वाधिक युवाशक्ती आहे. पण आपल्याकडे असलेली ही शक्ती रोजगार उत्पादकतेत रुपांतरित होत नाही, तोपर्यंत आपल्याला त्याचा योग्य लाभ मिळणार नाही, असेही मुखर्जी म्हणाले.

राष्ट्रपती महोदय फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपवर नाहीत का? मग त्यांची ही समजूत होणं स्वाभाविक आहे. तेही कधी काळी राजकारणी होते. सगळ्याच रोजगाराच्या संधी उघड नसतात. काही रोजगार दिले तरी दिले असं सांगायचं नसतं. काही रोजगार तर आपण दिलेलेच नाहीत, त्यांचे त्यांनीच निर्माण केलेले आहेत, असं सांगायचं असतं. युवाशक्तीचा योग्य ‘वापर’ करून घेतल्याशिवाय का निवडणुकांमध्ये यश मिळतं?

……………………………………………………………………………………………

२. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची सुस्पष्ट भूमिका घेतल्यानंतरही शिवसेनेने सातत्याने चालवलेली टीका आणि शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देण्याची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका यांचा प्रतिवाद करण्यासाठी भाजपचे सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांमागे एकवटले आहेत. परदेशात सुट्टी उपभोगत असताना संपाला पाठिंबा कसला देता, असा सवाल करून गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर नेम साधला. मुख्यमंत्री हे आमचे कुटुंबप्रमुख असून मंत्रिमंडळ त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे उभे असल्याचेही मेहता म्हणाले.

परदेशात सुटीवर गेले असताना उद्धव ठाकरे यांनी समजा शेतकऱ्यांचा संप चुकीचा ठरवला असता आणि राज्य सरकारला पाठिंबा जाहीर केला असता, तर त्याबद्दल काय मत होतं मेहतांचं? जग आता छोटं झालंय मेहता, आता परदेशातून इथल्या जनतेला देशभक्तीचे डोस पाजता येतात किंवा इथल्या राज्यकर्त्यांवर दुगाण्या झाडता येतात, आपली मुलं इंग्रजी शाळेत पाठवून लोकांना मराठीचं महत्त्व पटवून देता येतं आणि सैन्याशी पाच पिढ्यांचा संबंध नसलेले लोक सैनिकांच्या हौतात्म्याचे कढ काढून त्यावर आपली पोळी भाजून घेऊ शकतात. पालकमंत्रीसुद्धा त्या जिल्ह्याशी संबंध नसलेला चालतोच की!

……………………………………………………………………………………………

३. ‘शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोहोचतो, त्यालाच लोकशाही म्हणतात, असे दीनदयाळ उपाध्याय म्हणायचेय. मात्र सध्या फक्त अदानी-अंबानी यांच्यासारख्या निवडक व्यक्तींचाच विकास होतो आहे,’ अशी टीका राजस्थानमधील भाजपचे आमदार घनश्याम तिवारी यांनी केली आहे. ‘डोक्यावर कर्ज नाही, असा एकही शेतकरी नाही. शेतकरी शेतमाल रस्त्यावर फेकून देत आहेत. दूध उत्पादक दूध रस्त्यावर ओतून देत आहेत. देशातील बेरोजगारी वाढत आहे. देशातील संपत्ती अवघ्या काही लोकांच्या हाती जात आहे. सर्व काही भांडवलशाहांच्या हातात गेले आहे,’ असे सांगत तिवारी यांनी मोदी सरकारवर थेट शरसंधान केलं.

बघा, याला म्हणतात पक्षांतर्गत लोकशाही. गेल्या ६० वर्षांत कोणा आमदाराची हिंमत होती का आपल्याच पंतप्रधानांवर आणि सरकारवर टीका करण्याची? आता या आमदाराने पक्षाचा जाहीरनामा गांभीर्याने घेतलाय की काय, हे पाहावं लागेल. सत्तेत येण्यासाठी लोकांना चंद्रही आणून देऊ, असं सांगावं लागतं, हे त्याला माहिती नाहीये बहुतेक. मूळ कुठल्या पक्षातून आलाय, हे कळलं की उलगडा होईल, त्याच्या अशा दुर्वर्तनाचा.

……………………………………………………………………………………………

४. राज्यातील सर्व पोलिसांना खादीसक्ती करण्यात आली असून, आठवड्यातून एकदा तरी खादीचा गणवेश परिधान करावा, असे परिपत्रक राज्य पोलीस दलाने जारी केले आहे. परिपत्रकात सक्ती नमूद केली नसली तरी आपले कर्मचारी खादीचा गणवेश परिधान करतात की, नाही यावर जातीने लक्ष ठेवण्याचं काम वरिष्ठांवर सोपवण्यात आलं आहे. खादीचा प्रसार व्हावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आग्रही असल्यामुळे पंतप्रधान कार्यालयाने दोन वर्षांपूर्वी केंद्र व राज्य सरकारला खादीचा वापर वाढवण्याचे आदेश दिले होते. मंत्रालयानेही सर्व कर्मचाऱ्यांसाठी तसे परिपत्रक जारी केले असले तरी ते फारसे कुणी गांभीर्याने घेत नाही. प्रत्येक पोलिसाने नेहमीच्या गणवेशासोबत खादीचा गणवेश विकत घ्यावा आणि आठवड्यातून एक दिवस तरी वापरावा, असे परिपत्रकात नमूद केलं आहे.

घ्या आता! पोलिस आणि मंत्रालयात ‘खादीची’ सक्ती करावी लागते आणि त्यासाठी एक दिवस मुक्रर करण्याची वेळ येते, हे भ्रष्टाचारमुक्तीच्या लढ्याला आलेलं केवढं मोठं यश आहे... काय म्हणता, ही ती खादी नव्हे काय? अच्छा, ही ती मोदी चरख्यावरून बसून काततात ती खादी आहे होय. हे गणवेश घ्यायला पैसे कोण देणार? अच्छा, ते कर्मचाऱ्यांनीच पाहायचंय होय. मग ‘खादी’ला चांगलंच प्रोत्साहन देतायत म्हणा की!

……………………………………………………………………………………………

५. हिंदू ही प्रत्येक भारतीयाची ओळख आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने हिंदू असल्याचा गर्व बाळगावा, पण संकोच बाळगू नये, असा सल्ला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त लखनौ विद्यापीठात आयोजित केलेल्या ‘हिंदवी स्वराज्य दिन’ कार्यक्रमात ते बोलत होते. अहिंसा, अभय आणि सत्य हे हिंदू सनातन संस्कृतीचे तीन प्रमुख आधारस्तंभ असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आदित्यनाथ यांनी स्वामी विवेकानंद यांच्या शिकागोमधील भाषणाचे उदाहरण दिले. शिकागोमध्ये परिषदेत त्यांना हिंदुत्त्वाबद्दल विचारले असता, मला हिंदू असल्याचा गर्व आहे, असे ते म्हणाले होते, असे आदित्यनाथ यांनी सांगितले. ‘सत्यम, शिवम…सुंदरम्…’ हा हिंदुत्त्वाचा मूळ हेतू आहे. हिंदू ही सत्याच्या सागरातील अमृत रसधारा आहे. तसेच अहिंसा, अभय आणि सत्य हे हिंदू सनातन संस्कृतीचे तीन आधारस्तंभ आहेत, असेही ते म्हणाले.

तातडीने हवी आहेत, इतिहास आणि धर्मशास्त्राची शालेय स्तरावरची मूलभूत पुस्तकं. सोप्या हिंदी भाषेत असणे आवश्यक. बात्रा-दीक्षित शाखा क्षमस्व. या गृहस्थांनी आता कोणी काय खायचं, याच्यापुढे जाऊन कोणी कशाबद्दल कसली भावना बाळगायची, हेही सांगण्यापर्यंत मजल मारली आहे. काही दिवसांनी हे गर्वोन्नत हिंदूंनी कोणत्या दिवशी कोणत्या रंगांची अंतर्वस्त्रं नेसली पाहिजेत किंवा न नेसली पाहिजेत, हेही सांगताना आढळतील, अशी दाट शंका येते.

editor@aksharnama.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......