अजूनकाही
१. इतिहासकार पार्था चॅटर्जी यांनी लष्करप्रमुख मेजर जनरल बिपिन रावत यांची ब्रिटिश जनरल डायरशी तुलना केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. चॅटर्जी यांनी एका लेखात काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांना रोखण्यासाठी ‘मानवी ढाली’चा वापर केल्याच्या घटनेवरून रावत यांची तुलना डायरशी केली आहे. यावरून लष्कराच्या माजी अधिकाऱ्यांनी चॅटर्जी यांच्यावर टीका केली आहे. दुसरीकडे आपण विचारांवर ठाम असल्याचे चॅटर्जींनी म्हटले आहे.
कोण हे चॅटर्जी? यांचा कसला इतिहासाचा अभ्यास आहे? यांना सीमेवर पाठवा. यांना काश्मीरला पाठवा. पुढच्या वेळी यांना जीपला बांधा. सैनिकांनी सीमेचं रक्षण केलं नसतं, तर पार्था चॅटर्जी हे बोलायला जिवंत असले असते का? अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे चोचले आहेत सगळे. (घेतलं उतरवून सगळं… शुद्धलेखन सोडा हो, भावना महत्त्वाची. आता व्हॉट्सअॅप, फेसबुक… आता मुद्दे पुढेमागे करून, आपल्या भाषेत लिहून सगळीकडे उडवून द्या धुरळा.)
……………………………………………………………………………………………
२. मांस खाणे हा रोग असल्यामुळे मुस्लिमांनी मांस खाणे सोडून द्यायला हवे, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक ज्येष्ठ प्रचारक इंद्रेश कुमार यांनी केलं आहे. दिल्लीच्या जामा मिलिया इस्लामिया विद्यापीठात रमजाननिमित्त आयोजित इफ्तार पार्टीत त्यांनी ही शाकाहारी मुक्ताफळे उधळली. मुस्लिमांनी रमजानच्या काळात झाडे लावावीत. घरात तुळशीचे रोपटे लावावे. अरबी भाषेत तुळशीला ‘जन्नत का झाड’ म्हटले असून त्यामुळे जन्नत प्राप्त होते. तिसरी गोष्ट म्हणजे मुस्लिमांनी मांस खाणे सोडून द्यावे. प्रेषित आणि त्यांच्या अनुयायांनी कधीच मांस सेवन केले नव्हते. मांस खाणे हा एक प्रकारचा रोग आहे. तर दूध हे औषध आहे. त्यामुळे मुस्लिमांनी त्यांच्या सरबतात दूध घालावे, असे कुमार यांनी म्हटले.
इंद्रेश कुमार यांचे आभार मानायला हवेत. त्यांच्या मातृसंस्थेच्या समरसतेच्या कल्पना काय आहेत, याचं विश्वरूपदर्शन त्यांनी घडवलं आहे. त्यांना सगळ्या हिंदूंनाही सुदैवाने त्यांच्या कल्पनेतले एकारलेले मध्ययुगीन हिंदू बनवता आलेले नाहीत; आता ते मुस्लिमांना रोजा पाळणारे आणि नमाज पढणारे शाकाहारी हिंदू बनवायला निघाले आहेत. नेमका रोग काय आहे, हे त्यांनी दाखवून दिलं आहे.
……………………………………………………………………………………………
३. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (AICTE) अस्तित्व संपुष्टात आणण्यात येणार आहे. त्याऐवजी उच्च शिक्षणासाठी एकच नियामक यंत्रणा आणण्याचा सरकारचा विचार आहे. असे झाल्यास ६१ वर्षांपूर्वीच्या विद्यापीठ अनुदान आयोगाचे अस्तित्वच संपुष्टात येणार आहे.
जुन्या संस्थांच्या बरखास्तीनंतर नवीन संस्था स्थापन केल्याने आपण काहीतरी क्रांतिकारक घडवल्याचा आनंद मिळतो खरा; पण, त्या संस्था कसलं काम, कशा प्रकारे करतात, ते अधिक महत्त्वाचं असतं. नियोजन आयोगाच्या बरखास्तीनंतर स्थापन झालेल्या नीती आयोगाच्या निस्तेज आणि निष्प्रभ कामगिरीवरून ‘हिऱ्या’च्या जागी अमेरिकन डायमंड हाती येण्याची भीती वाटली तर ती अनाठायी ठरू नये.
……………………………………………………………………………………………
४. गुजरातमध्ये उभारण्यात येत असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १८२ मीटर उंच ‘एकता पुतळ्या’साठी २०० कोटी रुपयांचा निधी उभारण्यासाठी तेल आणि वायु क्षेत्रातील कंपन्यांना वेठीस धरण्यात आले असून पेट्रोलियम खात्याने दिलेल्या आदेशानुसार या कंपन्यांना ठराविक रक्कम भरावी लागणार आहे. तेल क्षेत्रातील इतर पीएसयू, विशेषत: इंडियन ऑईलला या उपक्रमासाठी ५० कोटी रुपये देण्याचे निर्देश आधीच देण्यात आले आहेत. ओएनजीसी व आयओसी यांच्याव्यतिरिक्त तेल क्षेत्रातील इतर पीएसयू प्रत्येकी २५ कोटी रुपये देणार आहेत.
आता पेट्रोल-डिझेल भरताना गोरक्षा अधिभाराबरोबर, सरदार पुतळा अधिभारही भरायची तयारी ठेवा. आंतरराष्ट्रीय बाजारात फुकट इंधनवाटप सुरू झालं तरी आपल्याकडे त्याची किंमत आहे तीच राहील. पुतळे, स्मारकं, महत्वाकांक्षी महाप्रकल्प आणि भाकड प्राण्यांची संख्याच तेवढी आहे.
……………………………………………………………………………………………
५. भारतातील मुसलमान जगातील सर्वांत निर्लज्ज मुसलमान आहेत. आया-बहिणींवर अत्याचार होत असताना ते इस्लाम शांतताप्रिय धर्म असल्याचं सांगत फिरत आहेत. स्वत:ला मुस्लीम म्हणवून घेताना त्यांना लाज वाटायला हवी, अशी गरळ अल्-कायदाचा दहशतवादी झाकीर मुसा यानं ओकली आहे. एका ऑडिओ क्लिपमध्ये त्याने बिजनौरच्या धावत्या रेल्वेत एका पोलीस हवालदाराने मुस्लीम महिलेवर केलेल्या बलात्काराबद्दल बोलताना 'बहन, मैं शर्मिंदा हूँ और बहुत दुखी हूँ कि हम तुम्हारे लिए कुछ नहीं कर सके’, असं म्हटलं आहे. अन्याय व अत्याचाराविरोधात बोलू न शकणारे आमच्या धर्माचे असूच शकत नाहीत. पैंगबर आणि त्यांच्या अनुयायांनी हेच शिकवलं आहे का? त्यांनी युद्धात रक्त सांडलं आणि आया-बहिणींच्या रक्षणासाठी हौतात्म्य पत्करलं. अजूनही वेळ गेलेली नाही. पुढे या. गोरक्षकांना इस्लाम व मुस्लीम समाजाची ताकद दाखवून द्या, अशी चिथावणीही त्यानं दिली आहे.
मुसाभाऊ, रमझानच्या काळात हे काय अनापशनाप बकून राहिलात. या बिर्याणी खायला? इथले सगळे मुसलमान निर्लज्ज आहेत म्हणताय, तुम्हाला तर लाज आहे ना? तुमचं तर रक्त उकळतंय ना? मग या की इकडे अन्याय आणि अत्याचाराविरोधात लढायला... आयाबहिणींना न्याय मिळवून द्यायला. यांनी त्यांना ताकद दाखवून द्यायची, मग ते यांना ताकद दाखवून देणार, असा खेळ खूप खेळून झालाय इथे. त्यातून सगळ्यांची ताकद घटण्यापलीकडे काहीच साध्य होत नाही. या देशात धर्माचं नाही, लोकांचं राज्य आहे आणि धर्म प्रमाण नाही, राज्यघटना प्रमाण आहे आणि तेच बरं आहे, हे इथे सगळेच हळूहळू प्रयासाने शिकतायत. त्यात बिब्बा नका घालू.
editor@aksharnama.com
……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment