अजूनकाही
शास्त्रीय संगीतात मल्हार, मेघ-मल्हार, सुर-मल्हार, गौड-मल्हार या रागांतील खुप सुंदर सुंदर अवीट गोडीच्या बंदिशी आहेत. रागांवर आधारित बरीच गाणी हिंदी सिनेमांत आली आहेत. पावसाची पण खूप सुंदर गाणी रागांवर आधारित आहेत. पण शास्त्रीय संगीताचा बाज कायम ठेवून चित्रपटातही तसाच प्रसंग निर्माण करून आलेली गाणी फार थोडी आहेत.
रोशन यांनी ‘मल्हार’ (१९५१) मध्ये लताच्या आवाजात ‘गरजत बरसत भीजत आईलो’ ही पारंपरिक बंदिश घेतली आहे. कुठेही या बंदिशीचं हिंदी गाणं केलेलं नाही. केवळ तबला-पेटीच्या साथीने लताने हा गौड-मल्हार विलक्षण सादर केला आहे. पं.जसराज म्हणाले होते की, लता मंगेशकर शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात आल्या असत्या तर सगळ्यांची सुट्टी करून टाकली असती.
रोशनला मल्हाराची काहीतरी विलक्षण ओढ असणार. कारण पुढे ‘बरसात की रात’ (१९६०) मध्ये सुमन कल्याणपुर-कमल बारोट यांच्या आवाजात सुंदर अशी ‘गरजत बरसत सावन आयो रे’ ही चीज साकारली आहे. साहिरने या पारंपरिक बंदिशीला परत लिहून काढलं आहे. हे करताना कुठेही बंदिशींच्या पारंपरिक शब्दकळेला धक्का पोचू दिला नाही हे विशेष.
रिमझिम रिमझिम मेघा बरसे,
तडपे जियरा मीन समान,
पल पल छिन छिन पवन झकोरे,
लागे तन पर तीर समान
अशा शब्दांतून बंदिश पुढे सरकत जाते.
शेखर आणि निम्मी यांच्या ‘हमदर्द’ (१९५३) चित्रपटांत अनिल विश्वास यांनी ‘ऋतू आये ऋतू जाये सखी रे, मन के मीत ना आये’ ही बंदिश लता-मन्ना डे यांच्या आवाजात वापरली आहे. उन्हाळा-पावसाळा-हिवाळा अशा तीन ऋतूंची तीन कडवी यात आहेत. दुसरं कडवं पावसाचं आहे. त्याचे बोल आहेत-
बरखा ऋतू बैरन हमार
जैसे सास ननदिया
पी दर्शन को जियरा तरसे
आखियों से नीत सावन बरसे
रोवत है कजरारे नैंनवा
बिंदीया करे पुकार
बरखा ऋतू बैरन हमार
शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत असे विलक्षण मिश्रण करून सचिन देव बर्मन यांनी ‘जीवन ज्योती’ (१९५३) मध्ये लता-आशाच्या आवाजात वेगळं असं गाणं दिलं आहे- ‘छायी कारी बदरिया बैरनिया हो राम, घन बदरा गगनवा झुकन लागी हो’. झोक्यावर बसून स्त्रिया हे गाणं म्हणत आहेत असं दृश्य आहे. लोकगीतांचा अतिशय बारीक अभ्यास करून साहीरने अशी गाणी लिहिली असावीत. नसता ‘झुलनो पर गावन की रूत आयी रे, रतिया जगावन की रूत आयी रे’ असे सुंदर सहज शब्द आलेच नसते. क्लिष्ट उर्दू शब्द किंवा अर्थाच्या गहन छटा असलेले शब्द वापरण्याची आपली सवय साहीर सहज बाजूला ठेवतो.
आपल्या संगीतात पाश्चिमात्य वाद्यमेळ (ऑर्केस्ट्रा) जास्त वापरतो म्हणून शंकर जयकिशनवर आरोप केला जातो. पण याच शंकर जयकिशनने भारतीय लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीतावर आधारित अतिशय गोड सुंदर गाणी दिली आहेत. ‘बुट पॉलिश’ (१९५४) मध्ये मन्ना डेच्या आवाजात ‘मिया की मल्हार’ रागावर आधारित सुंदर चीज ‘लपक झपक तू आ रे बदरवा’ शंकर जयकिशनने दिली आहे. शैलेंद्रचा लोकगीतांचा अभ्यास दांडगा होताच, पण शास्त्रीय चिजांचाही होता याचा पुरावा म्हणजे या गाण्याचे बोल. पण या गाण्याचे चित्रीकरण विनोदी पद्धतीने केल्यामुळे हे गाणे गांभीर्याने घेतले जात नाही. दृश्य न बघता गाणं केवळ ऐकलं तर मन्ना डेच्या आवाजाने काय जादू केली आहे हे जास्त तीव्रतेनं लक्षात येतं.
याच वर्षी किशोर कुमार-वैजयंती माला यांचा चित्रपट ‘पेहली झलक’ (१९५४) पडद्यावर आला. त्याला सी.रामचंद्रचे गोड संगीत लाभलं होतं. तबला-पेटी-सतार-बासरी इतक्या किमान वाद्यांच्या साथीने ‘कैसी भायी सखी रूत सावन की’ हे गाणं लताने आपल्या आवाजात पेललं आहे. हातात तंबोरा घेऊन वैजयंतीमाला केवळ डोळ्यांतून गाण्याचे भाव व्यक्त करते ते मोठं गोड वाटतं. शैलेंद्र-साहीर सारखंच राजेंद्र कृष्ण यांनीही या गाण्याचे बोल लिहिताना शास्त्रीय चीजांचा अप्रतिम बाज आपल्या शब्दांत आणला आहे.
‘जेलर’ (१९५८) मध्ये मदनमोहननी पावसाचं एक गीत शास्त्रीय संगीतावर आधारीत असं रचलं आहे. अंध वादक स्टुडिओत या गाण्यासाठी वादन करताहेत असं दृश्य आहे. इसराजसारखं दुर्मिळ वाद्य यात मदनमोहनने वापरलं आहे. आवाज अर्थात लताचाच आहे. ‘बुंदनिया बरसन लागी रे, काहे शोर मचाये पपिहरा’ असे राजेंद्र कृष्णनी लिहिलेले बोल आहेत.
उस्ताद बरकत अली खां यांची ‘बागों मे पडे झुले’ ही चीज प्रसिद्ध आहे. त्याला समांतर अशी रचना ‘सावन के झुले पडे’ हिंदी चित्रपटात वापरली गेली. वसंत देसाई यांनी ‘प्यार की प्यास’ (१९६१) मध्ये भरत व्यासकडून हे गाणं लिहून घेतलं आणि लता-तलतच्या आवाजात रेकॉर्ड केलं. ‘सावन के झुले पडे, सैंय्या जी हमे तुम कहा भूले पडे’ या लताच्या तक्रारीला तलतने दिलेले उत्तर ‘ये नैना जो तुमसे लडे, गोरी जी तोरी पलकन के नीचे खडे’ फारच गोड आहे. शास्त्रीय संगीत हळूच भावगीताकडे वळवून त्याचं हिंदी गाणं कसं बनतं याचं हे उत्तम उदाहरण.
नाझिर हुसैनचा ‘फिर वोही दिल लाया हूं’ (१९६३) जॉय मुखर्जी-आशा पारेखला घेऊन प्रदर्शित झाला होता. याला संगीत ओ.पी.नय्यरचं होतं. नय्यरचे संगीत त्याच्या पंजाबी ठेक्यासाठी जास्त गाजलं. नय्यरला शास्त्रीय संगीतात गती कमी आहे असा आरोप केला गेला होता. पण नय्यरने तो ‘रागिणी’ (१९५८) मध्ये खोडून काढला. त्याच नय्यरने ‘फिर वोही दिल लाया हूं’ मध्ये आशा-उषा यांच्या आवाजात ‘देखो बिजली डोले बीन बादल की’ ही शास्त्रीय संगीतावर आधारित रचना सादर केली आहे. मजरूह सुलतानपुरीसोबत नय्यरची जोडी ‘मि.अँड मिसेस 55’, ‘आरपार’, ‘बाज’, ‘सी.आय.डी.’मध्ये चांगलीच जमली होती. याही चित्रपटांतील जवळपास सर्वच गाणी गाजली आहेत. ‘देखो बिजली डोले’वर केलेलं नृत्यही शास्त्रीयच आहे. शैलेंद्र, साहीर, राजेंद्र कृष्ण आणि आता मजरूह यांनी शब्दरचना करताना गाण्याचा शास्त्रीय बाज काळजीपूर्वक जपला.
‘रामराज्य’ (१९६७) हा बीना रॉय यांचा शेवटचा चित्रपट. सीतेची भूमिका केल्यावर रसिकांच्या मनात तिच प्रतिमा कायम राहावी असं मनात घेऊन बीना रॉय यांनी चित्रपट संन्यास घेतला. या चित्रपटाला वसंत देसाई यांचं संगीत आहे. यात त्यांनी लताच्या आवाजात ‘सूर-मल्हार’ रागावर आधारित एक नितांत सुंदर गाणं दिलं आहे. बोल अर्थातच भरत व्यास यांचे आहेत. भरत व्यास शब्दांचा वापर करताना त्यांना असं काही रूप देतात की, विचारायची सोय नाही. या गाण्यात एक ओळ आहे,
डर लागे गरजे बदरिया,
चमके मतवारी बिजूरीया,
मोरी सूनी हाय सेजरीया
आता ‘सेज’ या शब्दाचं ‘सेजरीया’ हे रूप जे बदरिया आणि बिजूरीयाशी अनुप्रास साधतं, हे केवळ भरत व्यास यांनाच सुचू शकतं.
वरील गाण्यात जास्त करून शास्त्रीय-उपशास्त्रीय बाज जशास तसा ठेवण्याकडे संगीतकारांचा कल दिसतो. काही गाणी मात्र पूर्णपणे शास्त्रीय संगीत नाही, पण त्याचा मुख्यत: आधार घेऊन हिंदी चित्रपटांत आली आहेत. मूळ बंदिशीपासून जराशी फारकत घेऊन, पण त्या सुरांशी प्रमाणिक राहून ही गाणी रचली गेली आहेत.
‘आझाद’ (१९५५) हा मीनाकुमारी-दिलीपकुमार यांचा गाजलेला चित्रपट. यातील गाण्यांनी मोठी धूम त्या काळात केली होती. यातील एक गाणं शास्त्रीय बाजाचं पावसावरचं आहे. सी.रामचंद्र यांचे लाडके गीतकार राजेंद्र कृष्ण यांचेच शब्द आहेत आणि आवाज अर्थातच लताचा.
जा रे जा रे ओ कारि बदरिया
मत बरसो रे मोरी नगरिया
परदेस गये है सावरीया
मीनाकुमारीचा काहीसा बाळबोध वाटावा असा नाच या गाण्यावर आहे. लताच्या पावसाच्या गाण्यांची एक मस्त भट्टी जमून आलेली आहे. त्यातलंच हे एक गाणं. त्या काळात जवळपास एका चित्रपटात असं एक तरी गाणं आहेच.
ज्या चित्रपटाने चित्रगुप्तला सगळ्यात जास्त नाव मिळवून दिलं तो चित्रपट म्हणजे ‘भाभी’ (१९५७). ‘चल उड जा रे पंछी’ किंवा ‘चली चली रे पतंग मेरी चली रे’ ही गाणी विलक्षण लोकप्रिय झाली. पण या चित्रपटात लोकसंगीत-शास्त्रीय संगीत असं मिश्रण करून चित्रगुप्तने एक पावसाचे गाणं लताच्या आवाजात दिलं आहे. या प्रकारातलं हे सर्वात लोकप्रिय गाणं आहे.
कारे कारे बादरा, जा रे जा रे बादरा,
मेरी अटरिया ना शोर मचा
श्यामावर हे गाणं चित्रित आहे. या आधी आलेल्या ‘भाई भाई’ मधल्या तिच्या लोकप्रिय ‘ए दिल मुझे बता दे’मधील नृत्याची छाया या गाण्यावरही आहे. राजेंद्र कृष्ण यांनी
काहे को जगाया ओ बैरी मै तो सोयी थी,
पापी तू क्या जाने मै तो सपनों मे खोयी थी,
अखियों से मोरी ले निंद उडा
असे साधे पण प्रवाही लोकगीताला शोभेलसे शब्द रचले आहेत.
शास्त्रीय संगीतावर आधारित पावसाळी गाण्यानंच एका संगीतकाराची कारकीर्द सुरू झाली. त्याचे वडील महान संगीतकार. त्यांची मनापासून इच्छा की, आपल्या मुलाची कारकीर्द सुरू होते आहे, त्याचं पहिलं गाणं त्या महान गायिकेनं गावं. पण गेली पाच वर्षं त्यांचं आणि तिचं शीतयुद्ध सुरू. एकदम संवाद बंद. मग अशा स्थितीत आपल्या मुलाच्या ध्वनीमुद्रणासाठी तिने नकार दिला तर? त्याच्या करिअरवर परिणाम व्हायला नको. शेवटी त्यांनी सगळा राग विसरून पोराच्या मायेपोटी त्या महान गायिकेला स्वत:हून फोन केला. तिनंही कुठलेही आढेवेढे न घेता एका संगीतकाराची कारकीर्द आपल्या आवाजानं सुरू करण्यास होकार दिला. हे गाणं होतं ‘छोटे नवाब’ (१९६१) चित्रपटातील
घर आजा घिर आये बदरा सावरीया
मोरा जिया धक धक रे चमके बिजुरीया
गायिका आहे अर्थातच लता मंगेशकर. संगीतकार राहुल देव बर्मन. १९५७ पासून १९६१ पर्यंत सचिनदेव बर्मनच्या संगीतात लताचा आवाज नाही. त्या दोघांत शीतयुद्ध चालू होतं. याच काळातील हे गाणं. राहून देव बर्मन यांच्या चित्रपट कारकिर्दीतील अधिकृत असं पहिलं गाणं. गाणं अतिशय गोड आहे. मजरूह सुलतानपुरीचे शब्द आहेत. अतिशय मोजक्या वाद्यांचा वापर करत आर.डी.ने गाणं रंगवलं आहे. पुढे चालून त्याच्या संगीताचं जे स्वरूप राहिलं त्याचा आणि या गाण्याचा काडीचाही संबंध नाही असंच वाटतं.
(‘बरसात मे हमसे मिले तुम’ या लताच्याच ‘बरसात’मधल्या गाण्यानं गीतकार शैलेंद्रची चित्रपट कारकीर्द सुरू झाली होती. संगीतकार शंकर जयकिशनचाही हा पहिलाच चित्रपट.) पण आपल्या धांगडधिंग्यात आर.डी.ने अधूनमधून अतिशय मधुर अशा चाली देत आपण सचिन देव बर्मनचा खरा सांगीतिक वारसदार आहोत हे सिद्ध केलं आहे.
मूळ शास्त्रीय संगीतापासून प्रेरणा घेऊन पावसाची गाणी स्वत:चा चेहरा घेऊन हिंदी चित्रपटांत अवतरली. पण नंतरच्या काळात त्यातील गोडवा हरवला आणि ‘आज रपट जाईयो’ म्हणत ती कानावर आदळायला लागली!
लेखक हिंदी चित्रपट संगीताचे अभ्यासक आहेत.
a.parbhanvi@gmail.com
……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment