२ ऑक्टोबर २०१९ रोजी म. गांधी यांची १५०वं जयंती वर्षं साजरं केलं जाईल. त्याचं निमित्त साधून वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमानं २१-२२ फेब्रुवारीपासून ‘गांधी १५० जयंती अभियान’ सुरू केलं आहे. (२२ फेब्रुवारी हा गांधींच्या पत्नी कस्तुरबा यांचा स्मृतिदिन असतो.) या अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम केले जाणार आहेत. त्याला प्रतिसाद म्हणून ‘अक्षरनामा’वर दर महिन्याच्या दोन तारखेला गांधींविषयी एक लेख प्रकाशित केला जातो… हा पाचवा लेख.
.............................................................................................................................
‘गो रक्षा मेरा प्रथम कर्तव्य है’. शपथ समारंभानंतर आदित्यनाथांनी लगेचच जाहीर केले. कारभाराची सूत्रे हाती घेतल्या घेतल्या उत्तर प्रदेशातील अवैध कत्तलखाने बंद करण्याचे आदेश देऊन त्यांनी ‘हिंदूंना पूज्य असणाऱ्या गायीला मुस्लिम मारतात’ हा सुप्त संदेश पुन्हा जागवला.
गोरक्षाप्रकरणी महात्मा गांधींचे सतत दाखले दिले जातात. यासंबंधी गांधींनी वेळोवेळी काय म्हटले होते? ‘गोसेवेचे व्रत मी अनेक वर्षांपूर्वीच घेतले आहे, पण माझा धर्म इतर सर्व भारतीयांचा धर्म कसा असू शकेल?’, १९०९ मध्ये गांधींनी ‘हिंद स्वराज’मध्ये लिहिले होते.
२५ जुलै १९४७ रोजी गोहत्या बंदीची मागणी करणारी पन्नास हजार पत्रे आणि तितक्याच तारा मिळाल्याचे बाबू राजेन्द्र प्रसाद यांनी जाहीर केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना गांधी म्हणाले, ‘पाकिस्तानची निर्मिती झाल्यावर हिंदूंना देवळात जाण्यास मनाई केली तर ते योग्य ठरेल का? शिवाय तेथील हिंदू देवळात जाण्याचे सोडतील का? आपला मार्ग ते शोधून काढतीलच. म्हणून मला वाटते की या तारा आणि पत्रे आता थांबली पाहिजेत. काही संपन्न हिंदू कुटुंबे गोमांस खात नसली तरी गोहत्येला प्रोत्साहन देतात. गोमास डबाबंद करून ते ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचा व्यवसाय ते करतात. धर्माचा खरा अर्थ समजून न घेता गोहत्या थांबवली पाहिजे, अशा फुकाच्या गर्जना केल्या जातात’.
कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर गांधी दक्षिण आफ्रिकेस रवाना झाले. दक्षिण आफ्रिका ही ब्रिटिश साम्राज्याची वसाहत होती. इंग्रजी आणि पाश्चात्य शिक्षणाचा परिपाक म्हणून या काळात गांधींची विचारसरणी काहीशी ‘व्हिक्टोरियन’ झाली होती. साम्राज्याचा एक नेक नागरिक होण्याचा ते प्रयत्न करत होते. जाणीवा उच्चवर्णीय तसेच ब्रिटिश होत्या. वंशवादाचा पूर्ण निषेधही नव्हता. पुढे या जाणिवांमध्ये बदल होत गेले. सुरुवातीस आफ्रिकेतील भारतीय व्यापारी, उद्योजक आणि व्यावासायिकांसोबत वकील म्हणून गांधींचा संबंध आला.
दक्षिण आफ्रिकेतील मळ्यांवर काम करणा-या भारतीय मजूरांशी त्यांचा संबंध आला नव्हता. त्यांच्या त्या काळातील विचारांत आणि वर्तनात ‘गांधीत्व’ नव्हते. ते नंतर विकसित होत गेले. महात्मा होण्याआधीचे गांधी आपल्याला हिंद स्वराजमध्ये भेटतात.
वकिलीच्या कामासाठी गांधींना प्रिटोरिया येथे जायचे होते. रेल्वेचे प्रथम वर्गाचे टिकिट असूनही त्यांना डब्यातून अक्षरशः ढकलून बाहेर काढले गेले. ‘फर्स्ट क्लासमध्ये कुलींना प्रवेश नाही’, रेल्वेच्या गोऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले. कृष्णवर्णीय नसतानाही प्रथम वर्गाच्या डब्यात प्रवेश मिळाला नाही म्हणून गांधी संतापले होते. भारतीयांना कृष्णवर्णीय आफ्रिकी नागरिकांपेक्षा वरचा दर्जा मिळाला पाहिजे अशी निवेदने त्यांनी सरकारकडे केली. नंतरच्या काळात हेन्री डेव्हिड थोरो या तत्त्ववेत्त्याच्या ‘सिव्हिल डिसओबिडियन्स’ या निबंधाचा गांधींवर प्रभाव पडला. सत्याग्रहाचे प्रयोग आकार घेऊ लागले. नेटिव्ह झुलू जमातीवर गोऱ्या सरकारने केलेल्या अमानुष अत्याचारामुळे गांधी अत्यंत व्यथित झाले. गुलामगिरीची जाणीव तीव्र होऊ लागली.
दक्षिण आफ्रिकेत ट्रान्सवाल सरकारने आशियाई वंशाच्या लोकांवर निर्बंध लादले होते. भारतीयांवर ‘आशियाई’ म्हणून नोंदणी करणे, हातांचे ठसे देणे आणि वंशाचे प्रमाणपत्र सदोदित जवळ बाळगण्याची सक्ती करण्यात आली. या वंशवादी धोरणाचा गांधींनी प्रतिकार करण्याचे ठरवले. आंदोलनाचे स्वरूप ठरवताना सविनय कायदेभंगाची संकल्पना गांधींनी मांडली. भारतीयांनी नोंदणी करण्याचे नाकारले. गांधींसह अनेकांना अटक करण्यात आली. जेलभरो आंदोलनाची नांदी आफ्रिकेत झाली. गांधींनी ब्रिटिश सरकारकडे अनेक निवेदने पाठवली. १९०८ साली गांधी एका शिष्टमंडळासहित बोलणी करण्यासाठी लंडनला रवाना झाले.
स्वराज्य, सत्याग्रह, सविनय कायदेभंग या संकल्पना आकार घेत असताना गांधीचे भारतातील घडामोडींकडे लक्ष लागलेले असे. त्यांना भारतात परतण्याचे वेध लागले होते. लॉर्ड कर्झननी बंगालचे विभाजन केले होते. त्याचे तीव्र पडसाद बंगालात आणि पूर्ण भारतातही उमटू लागले होते. सशस्त्र लढयाचा विचार मूळ धरू लागला होता. भारतातील तरुण जहाल गटात सामील होऊ लागले होते. या साऱ्या घटना गांधींना खुणावत होत्या आणि अस्वस्थही करत होत्या. डोक्यात एकाच वेळी अनेक विचारचक्रे सुरू असायची.
लंडन मुक्कामी तेथील भारतीय क्रांतिकारकांना ते भेटले तसेच ते सावरकरांनाही भेटले. सावरकर लंडनमध्ये आपले शिक्षण पूर्ण करत होते. भारतीय विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात दोघे सहभागी झाले आणि दोघांचीही तेथे भाषणे झाली होती. सावरकर आणि लंडनमधील भारतीय तरुण सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करत होते.
१९०९ साली लंडनमधील वास्तव्य संपवून गांधी समुद्रमार्गे परतीच्या प्रवासास निघाले. या प्रवासांत त्यांनी आपल्या मातृभाषेत म्हणजे गुजरातीत ‘हिंद स्वराज’ हे छोटेखानी पुस्तक लिहिले. नंतर ‘इंडियन ओपिनियन’ या वृत्तपत्रात त्याचे इंग्लिश रूपांतर क्रमशः प्रकाशित झाले. हे वृत्तपत्र गांधी आणि फिनिक्समधील त्यांच्या सहकाऱ्यांनीच सुरू केले होते.
‘या पुस्तकांत मांडलेले विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक वर्षे लागली आहेत. स्वराज्य प्राप्त करण्याचा केवळ हाच मार्ग आहे असे मला वाटते. सत्याग्रह- प्रेमाची नीती हीच जीवनाचीही नीती वा कायदा आहे. या तत्त्वापासून दूर झाल्यास फूट पडते. याचे निग्रहाने पालन केल्यास उन्नती होते’, ‘हिंद स्वराज’च्या १९१९च्या प्रस्तावनेत गांधी म्हणाले होते. तोपर्यंत चंपारनमधील निळीचा सत्याग्रह होऊन गेला होता आणि अन्याय प्रतिकाराची नवी नीती आकार घेत होती.
‘ब्रिटिशांनी आपल्या बळाने भारताला जिंकले नाही, त्यांना आपण तो देऊन टाकला’. ‘हिंद स्वराज’चे पहिले प्रकरण या मुद्याची चर्चा करते. वसाहतवाद आपल्या जाणीवेतून काढल्याशिवाय भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र होणार नाही. ‘मानसिक गुलामगिरीतून बाहेर न पडल्यास इंग्रजांनतर इतर कोणीही आपल्याला गुलाम बनवेलच’. १९०९ साली गांधी बेगडी स्वातंत्र्यानंतरची राजकीय चौकट कशी असेल याचा विचार करत होते.
‘हिंद स्वराज’च्या १९२१च्या प्रस्तावनेत गांधी म्हणतात- ‘जहाल गटाच्या शौर्याचे मला कौतुक वाटते, पण त्यांची दिशाभूल होतेय. आपल्या समस्या हिंसेने सुटण्यासारख्या नाहीत. भारतीय परंपरेतून आपल्या समस्येवर तोडगा मिळाला पाहिजे आणि स्वसंरक्षण हेच ते उच्चकोटीचे शस्त्र आहे. या पुस्तकात मी आधुनिक संस्कृतीचा धिक्कार केला आहे. हे मी १९०९ साली लिहिले होते. त्यावरील माझी श्रद्धा आज द्विगुणित झाली आहे’. आधुनिक संस्कृतीची समीक्षा हे एक प्रबळ सूत्र ‘हिंद स्वराज’मध्ये दिसून येते.
‘इंग्लंडमधील सद्यस्थिती’ या प्रकरणात गांधींनी इंग्लंडचे परीक्षण केले आहे. ‘पाश्चात्य आधुनिक संस्कृतीत शारीरिक/भौतिक कल्याण हेच जीवनाचे उद्दिष्टय असतं. माणूस सुखाच्या मागे पळतोय. मात्र त्यासाठी काहींना राबावं लागतंय. स्त्रिया आणि कामगार पिचतायत. इंग्लंडची सद्यस्थिती दयनीय आहे. भारतावर कधीही अशी पाळी येऊ नये अशी मी प्रार्थना करतो’. गांधी जेव्हा हे लिहीत होते, तेव्हा इंग्लंड एक तृतीयांश जगावर राज्य करत होते.
‘हिंद स्वराज’मध्ये सुखाच्या मागे धावणारी पश्चिमी संस्कृती आणि भारताची आध्यात्मिक संस्कृती अशी दुहेरी विभाजनाची मांडणी केलेली आहे. गांधींचा सुरुवातीच्या काळातील रोमँटिसिझम ‘हिंद स्वराज’मध्ये जागोजागी दिसतो.
विसाव्या शतकातील पूर्वार्धात इंग्लंडमधील निम्नवर्गातील स्त्रियांना मोलमजुरी करण्याशिवाय पर्याय नव्हता. साम्राज्याची फळे या वर्गाला चाखायला मिळाली नाहीत असे दिसते. आधुनिकतेचे समीक्षण करताना कारखान्यांत काम करणाऱ्या स्त्रिया गांधींच्या डोळ्यासमोर होत्या.
मिल आणि कारखान्यात काम करणाऱ्या स्त्रियांची स्थिती दयनीय होती. त्यांच्या हक्कांची पायमल्ली होत असे. या स्त्री कामगारांसंबंधी बोलताना मात्र गांधी पारंपरिक पितृसत्ताक भूमिका घेतात आणि म्हणतात, ‘जी घरकुलाची राणी असायला हवी ती कारखान्यात पिचतेय’.
इंग्लंडमधील स्त्री कामगारांवर होणाऱ्या अन्यायासंबंधी वा त्यांच्या हक्कांसंबंधी तसेच भारतातातील सरंजामशाही, जातिव्यवस्थेतील हिंसा, शेतमजूर, कामगार, दलित आणि स्त्रिया यांच्या वाईट स्थितीबद्दलचे भाष्य ‘हिंद स्वराज’मध्ये नाही. भारतीय संस्कृतीमध्ये विकार असे नव्हतेच, असलेच तर ते परकीय सत्तेमुळे असाही सूर ‘हिंद स्वराज’मध्ये दिसतो.
गांधीसाठी संस्कृती हा नैतिक उपक्रम होता. ‘खरी संस्कृती म्हणजे काय?’ या प्रकरणांत गांधी म्हणतात, ‘संस्कृती माणसाला आपल्या कर्तव्याचा मार्ग दाखवते. ग्रीस आणि रोम संस्कृती लयाला गेल्या, पण भारत मात्र अढळ आहे आणि हीच त्याची प्रतिष्ठा आहे. गुजरातीमध्ये संस्कृतीचा प्रतिशब्द आहे सद्वर्तन’.
ब्रिटिश पार्लमेंटबद्दल गांधी काय म्हणतात? ‘पार्लमेंट स्वयंप्रेरणेने चालत नाही. तिने स्वतःहून एकही चांगले काम केले नाही, ती मूल नसलेल्या स्त्रीसारखी आहे. पार्लमेंटला एक मालक नसतो. तो दर पाच वर्षांनी बदलतो. कधी बालफोर तर कधी अस्क्विथ. त्यामुळे ती वेश्येसारखीही आहे’. या अर्थालंकारांमुळे पार्लमेंटचा कमी आणि स्त्रियांचा अधिक अपमान झाला आहे. अपत्यांना जन्म देणे हेच स्त्रीच्या आयुष्याचे प्रयोजन असते का? वेश्येवर ठपका ठेवण्याचेही कारण काय? नैतिकतेची ही मांडणी स्त्रियांवर अन्याय करणारी आहे.
पार्लमेंटला अशा उपमा दिल्यामुळे गांधींची एक इंग्लिश मैत्रीण नाराज झाली होती. पत्राद्वारे तिने आपला आक्षेप गांधींना कळवला होता. ‘हिंद स्वराज’च्या १९१९ सालच्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत गांधींनीच याचा उल्लेख केला आहे. वेश्येची उपमा तिला रुचली नव्हती.
अशा उपमा दिल्यानंतर गांधी पुढे मात्र कळीचा मुद्दा सांगतात- ‘पार्लमेंटमध्ये भ्रष्टाचार झाल्याशिवाय निर्णय घेतले जात नाहीत’. संसदीय लोकशाही व्यवस्थेचे धोके गांधींनी फार लवकर ओळखले होते. वर्तमानात या व्यवस्थेची वाताहात आपण अनुभवत आहोत.
‘हिंद स्वराज’मध्ये आधुनिकीकरण, औद्योगिकीकरण आणि यांत्रिकीकरण यांवर प्रखर टीका केली होती. ‘आधिुनिक सभ्यतेचे प्रतीक म्हणजे यंत्रसामग्री. यंत्रसामग्री म्हणजे पापाचरणच’, गांधी म्हणाले होते. पण १९१९ पर्यंत त्यांच्या विचारात काहीसे बदल झाले होते. चाळीसच्या दशकांत यंत्रामुळे वेळ आणि श्रम वाचतात हे त्यांना पटले होते. पण यंत्रांमुळे मानवता हरपते आणि तंत्रज्ञानामुळे दुरावलेपण येते असेही त्यांना वाटत असायचे. शिवाय आधुनिकीकरणामुळे होणारा पर्यावरणाचा अनन्वित ऱ्हासही गांधींना दिसू लागला होता.
‘हिंद स्वराज’मध्ये डॉक्टर आणि वकिलांवर टीका केली आहे. ‘डॉक्टरांमुळे आपण आपल्या शरीराची काळजी घेणे सोडून दिले आहे. हॉस्पिटले तर आपल्या धर्माच्या अंतःप्रेरणेविरुद्ध काम करतात. त्यांच्या औषधांत जनावरांची चरबी आणि मद्य असते’. वकिलांवरही टीका केली आहे. ‘वकील जेव्हा काही चांगले काम करतात, तेव्हा त्या व्यक्तीच्या चांगुलपणामुळे ते कार्य झालेले असते, वकील म्हणून नाही’. असा विचित्र युक्तीवाद गांधींनी मांडला आहे. नंतरच्या काळात डॉक्टरी व्यवसायाबद्दल कठोर शब्द वापरले म्हणून गांधींनी दिलगिरी व्यक्त केली होती - ‘डॉक्टरांसाठी वापरलेले शब्द बदलण्यास मी तयार आहे, पण विचार मात्र मी बदलणार नाही’ असेही ते म्हणाले.
गांधींची मते वेळोवेळी बदलत गेली. पण ‘हिंद स्वराज’च्या नंतरच्या आवृत्त्यांमधील मजकुरात त्यांनी बदल केला नाही.
रेल्वे विरहित मुंबईची आपण कल्पना करू शकतो का? रेल्वे अन्य ठिकाणीही जीवनरेखाच आहे. या रेल्वेला गांधींनी विरोध केला होता. त्याला काही सबळ कारणेही होती. रेल्वेमुळेच साम्राज्याचा विस्तार झाला. एवढ्या मोठ्या देशाचा गाडा हाकण्यासाठी मोजकेच अधिकारी काम करत होते. ‘रेल्वेमुळे त्यांना देश पकडीत ठेवता आला. रेल्वेमुळे रोगप्रसार होतो, प्लेग तिच्यामुळे पसरला. भारतातील अन्नसुरक्षाही रेल्वेमुळे धोक्यात आली आहे. जास्त भाव मिळतो म्हणून दूरच्या मार्केटमध्ये अन्नधान्य पाठवले जाते. स्थानिक मार्केटमध्ये धान्याचा तुटवडा पडतो आणि त्याचे भाव वाढतात. गरिबांना रेल्वे मारतेय. पवित्र स्थळांवर गर्दी वाढतेय आणि ती अपवित्र होतायत’. ब्रिटिशकालीन रेल्वे ‘साम्राज्य’ हाकण्यासाठीच वापरली जात होती. ब्रिटनच्या पोलाद व्यवसायाला धंदा मिळण्यासाठी रेल्वे बांधणी सुरू करण्यात आली असे संसद सदस्य आणि लेखक शशी थरूर यांनी यांच्या ‘अॅन एरा ऑफ डार्कनेस’ या नव्या पुस्तकात पुराव्यासहित दाखवून दिले आहे.
रेल्वेमुळे संपर्क आणि उद्योगधंदे वाढले हे नाकारता येणार नाही. पण भारतातील उद्योग आणि मूलभूत सुविधा विकास हे ब्रिटिश रेल्वे निर्माणामागील उद्दिष्ट असले तरी गरिबी, रोगराई आणि इतर संकटाचा सारा दोष एकट्या रेल्वेवर टाकणे योग्य होणार नाही.
‘हिंद स्वराज’मध्ये गांधींनी पाश्चात्य औद्योगिक भांडवलशाहीचा सतत निषेध केला आहे. वसाहतवाद आणि औद्योगिकीकरण हातात हात घालून जाणारे विचार आहेत. भांडवलशाही आणि औद्योगिकीकरणाच्या चलनासाठी वसाहतवाद लागतो. ही युती कधी साम्राज्य मिळवण्यासाठी असते तर कधी बाजारपेठ काबीज करण्यासाठी. हे धोके गांधींनी अगदी सुरुवातीस ओळखले होते. यासंबबंधीचे आपले विचार त्यांनी मांडले असले तरी भारतातील भांडवलदारांसंबंधीची त्यांची मते काहीशी उदारमतवादी होती. जमनालाल बजाज आणि धनशामदास बिर्ला यांचे गांधींशी घनीष्ठ संबंध होते. विविध उपक्रमांसाठी निधी लागत असे आणि हे कारखानदार गांधींच्या उपक्रमांना योगदान देत असत. गांधी या भांडवलदारांचे अधिन झाले नाहीत.
उद्योजकांनी संपत्तीचे विश्वस्त व्हावे, कारभारी व्हावे पण मालक होऊ नये. स्वतःजवळ फारशी संपत्ती ठेवू नये आणि कमीतकमी संसाधनांचा वापर करावा अशी ट्स्टीशिपची कल्पना त्यांनी मांडली होती. गांधींच्या निकटचे भांडवलदार तेव्हाही विश्वस्त नीतीप्रमाणे वागत नव्हते. त्यामुळे हिंद स्वराजमध्ये आधुनिक पाश्चात्य औद्योगिक संस्कृतीचे परीक्षण करताना वेगळे मापदंड लावले होते का, असा प्रश्न पडतो.
‘हिंद स्वराज’ची सचना संवादात्मक आहे. वाचकाला अनेक प्रश्न पडलेले असतात. तो संपादकाला प्रश्न विचारतो आणि संपादक उत्तर देतो. उत्तरावरचा आपला युक्तीवाद वाचक मांडतो आणि संपादक ते खोडून काढतो. लेखक रामचंद्र गुहांच्या मते ‘हिंद स्वराज’ची मांडणी गीतेवर आधारलेली आहे. यातील वाचक किंकर्तव्यमूढ आणि संपादक कृष्ण द्वैपायन. परंतु यातील अजब किंवा अतर्क्य आणि अन्यायी वाटणाऱ्या युक्तीवादाला वाचक आव्हानही देतो. ब्रिटिश पार्लमेंटला मूल नसलेली स्त्री आणि वेश्येची उपमा देणे, डॉक्टर, वकील, रेल्वे आधुनिक संस्कृती यांचा धिक्कार आणि इतर अशाच मुद्यांवर वाचक आक्षेप घेतो. ‘मलाही अनेक मुद्यांबाबत स्पष्टता नाही’ असे ‘संपादक’ भूमिकेतील गांधी प्रांजळपणे कबूल करून टाकतात.
म.गांधींची जडणघडण व्हिक्टोरियन युगात- राणी व्हिक्टोरियाच्या काळात (१८३७-१९०१)झाली. ग्रेट ब्रिटन जगातील सर्वांत बलाढ्य राष्ट्र म्हणून पुढे आल होते. १९२० साली पृथ्वीवरील २४ टक्के भूमीचे आणि २३ टक्के जनतेचे ते मालक होते. ब्रिटिश साम्राज्यावरील सूर्य कधीही मावळत नाही असे म्हटले जात असे.
व्हिक्टोरियन काळ अत्यंत टोकाच्या शिष्टाचारांसाठी आणि खुळचट नीतिकल्पनांसाठीही प्रसिद्ध होता. त्या काळातील ब्रिटिशांच्या मागास नीतिकल्पना आपण अंगीकारल्या आणि त्याची फळे आजही आपल्याला भोगावी लागत आहेत. भारतातील सेन्लॉरशिप ही आपल्या वसाहतवादी राज्यकर्त्यांची देणगी आहे. लैंगिकतसंबंधींचे ब्रिटिशांचे विचारही कर्मठ होते. भारतात समलिंगी संबंधांची पूर्वापार सजग जाणीव होती. आपल्या महाकाव्यांत आणि लोककलांत तृतीयपंथी आणि लैंगिकतेच्या वेगवेगळ्या आयामांचे भरपूर उल्लेख आहेत. महाभारतातील बृहन्नडारूपी अर्जुन, किन्नर, शिखंडी आणि तमाशातली मावशी अशी अनेक उदाहरणे देता येतील. ब्रिटनमध्ये समलिंगी संबंध कायद्याने अवैध ठरवले होते. व्हिक्टोरियन काळातील ब्रिटिश लेखक आणि नाटककार ऑस्कर वाईल्ड यांना समलिंगी संबंधांबद्दल प्रदीर्घ कारावास भोगावा लागला. देशद्रोह (सेडीशन) हा भारतात अजूनही अस्तित्वात असलेला कायदाही वसाहतकाळातील आहे.
हा काळ समजून घेतला, गांधींची सामाजिक आणि वर्गीय पार्श्वभूमी समजून घेतली तर सुरुवातीच्या काळातील त्यांची मते आणि विचार यांची संगती लागते. बऱ्याच मुद्यांसंबंधींची त्यांची मते बदलत गेली. परंतु स्त्रिया आणि जातव्यवस्थेविषयीची मते काहीशी पारंपरिक राहिली होती, हे आंबेडकरांनी वेळोवेळी दाखवून दिले होते.
लेखिका मुंबईस्थित सेंट झेविअर महाविद्यालयाच्या झेविअर इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्समध्ये अध्यापन करतात.
alkagadgil@gmail.com
……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment