अजूनकाही
१. शेतकऱ्यांनी पुकारलेला संप हा शेतकऱ्यांचा नुकसान करणारा आहे. पाऊस पडल्यावर पेरण्या करण्यासाठी १० दिवस असतात. याच काळात जर शेतकरी संपावर गेले, तर शेतकऱ्यांचेच नुकसान होऊ शकते. शेतकऱ्यांना संपावर जाण्यास प्रवृत्त करणे म्हणजे ‘लाल दहशतवाद’ आहे, असे मत भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी येथे व्यक्त केले.
अरेच्चा, भंडारी यांच्या पक्षाने लाल रंगही पादाक्रांत केला की काय? शेतकऱ्यांना आत्महत्येला प्रवृत्त करणारे कोण आहेत, अशी त्यांची समजूत आहे? शेतकऱ्यांना विचारलं तर संपावर जायला या सरकारची शेतकरीविरोधी धोरणं कारणीभूत आहेत, असं ते सांगतील. आमचा भगवा आणि आमचाच लालही?
……………………………………………………………………………………………
२. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून लवकरच एक रुपये मूल्याची नवी नोट चलनात आणली जाणार आहे. या नोटेची छपाई पूर्ण झाली असून ती चलनात आल्यानंतरही सध्याची एक रुपयाची नोट वैधच राहणार आहे. नवी नोट दोन्ही बाजूंनी गुलाबी आणि हिरव्या रंगाची असेल. नोटेच्या दोन्ही भागांवर केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांता दास यांची स्वाक्षरी असेल. या नोटेवर ‘भारत सरकार’ या शब्दांबरोबरच एक रुपयाच्या नव्या नाण्याची प्रतिकृतीही असेल. तसेच भारतातील सर्व चलनी नोटांवरील ‘सत्यमेव जयते’ हे ब्रीदवाक्य नोटेवर छापण्यात आले आहे. नोटेच्या अन्य भागावर महाराष्ट्रातील ‘सागर सम्राट’ या तेल उत्खनन केंद्राची प्रतिमा आहे. याशिवाय, नोटेवर ‘L’ हे अक्षर कॅपिटलमध्ये छापण्यात आले आहे. तसेच नोटेवर अशोक स्तंभाच्या प्रतिमेबरोबर ‘1’ ही संख्या आणि ‘भारत’ हा शब्द अदृश्य स्वरूपात छापण्यात आला आहे.
ते सगळं ठीक आहे, पण ती गुप्त चिप कुठे बसवली आहे ते सांगा. नोटेमधला कॅमेरा काळा पैसा धारण करणाऱ्यांचे फोटो घेऊन पाच प्रतींमध्ये मोदी, शाह, पटेल यांच्याबरोबर सीबीआय आणि रॉ यांना धाडणार आहे, ते सांगा. नोटेतला तो रेडिओअॅक्टिव्ह सूक्ष्मकण उपग्रहांच्या मार्फतही टिपला जाईल आणि दहापेक्षा जास्त नोटा खिशात बाळगणाऱ्यावर पतंजलीच्या संरक्षण प्रयोगशाळेत तयार झालेल्या स्वदेशी गोकिरणांचा मारा केला जाणार आहे, ते सांगा. ते सांगितलं नाहीत, तर नवी नोट आली, यावर कुणाचा विश्वास तरी बसेल का?
……………………………………………………………………………………………
३. बाबर हा परदेशी होता आणि त्याला भारताशी काहीही देणेघेणे नव्हते. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी अयोध्येतील वादग्रस्त जागेचा उल्लेख बाबरी मशीद असा न करता रामजन्मभूमी असा करण्याचे आवाहन भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी केले.
कोण कुठून आला, याचीच उठाठेव करायची, तर बाबर त्या मानाने जवळून आला होता. शेजारीच म्हणायला हवा. रामाचे पूर्वज तर भलत्याच खंडातून मजल-दरमजल करत इथे आले होते, म्हणतात. अशा परकीयांच्या कुळातल्या मुलाच्या जन्माचा तरी इथे कशाला उल्लेख करायला हवा, असा युक्तिवाद त्या जन्माआधीपासूनच्या भूमिपुत्रांनी केला, तर चालेल का साक्षी महाराजांना?
……………………………………………………………………………………………
४. बिहारचे आरोग्यमंत्री तेजप्रताप यादव यांनी एका ज्योतिषाने दिलेल्या सल्ल्यामुळे पाटणा येथील सरकारी निवासस्थानाच्या प्रवेशद्वाराची दिशा बदलली आहे. त्यामुळे या निवासस्थानामागे गेल्या ५० वर्षांपासून राहत असलेल्या झोपडपट्टीवासियांच्या संकटात वाढ झाली आहे.
दरवाजाची दिशा बदलल्याने आपल्या याच जन्मातल्या पूर्वसुकृतातून जी काही कायदेशीर लचांडं मागे लागणार असतात, त्यांची आणि आपल्या घराची दशा बदलत नाही, हे कोणताही ज्योतिषी यांना कसा सांगत नाही? वेळीच दिल्लीत जाऊन काही ग्रहांची शांती केली असती, तर मग थोडाफार दिलासा मिळाला असता.
……………………………………………………………………………………………
५. गेल्या पंधरा वर्षात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने काय केले ते सांगावे, आम्ही अडीच वर्षांत काय केले, ते सांगायला तयार आहोत. त्यांनी एवढा गाळ केला आहे की तो काढण्याचे काम मी करीत आहे. हाच गाळ शेतात गेला असता, तर खताची गरज न भासता शेतकऱ्यांनी तीन-तीन पिके घेतली असती, अशी तोफ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डागली.
मुख्यमंत्री शेतकरी या विषयावर आजही बोलतात, हे मोठ्या धारिष्ट्याचं काम आहे. आपण शेतकऱ्यांसाठी काय काय केलं, हेही सांगायची त्यांची तयारी आहे, म्हणजे तर जबरदस्तच. अर्थात, योजनांची नावं आणि सरकारी आकडेवाऱ्या यांची फेकाफेकच करायची म्हटली तर ते अनेक तास बोलत राहू शकतात. शिवाय, कळीच्या प्रश्नांवर ‘ते त्याच गाळात अडकलंय, तोच आम्ही काढतो आहोत आईभवानीच्या आशीर्वादाने’ हे पेटंट उत्तर देता येईलच.
editor@aksharnama.com
……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment