मुक्ती कोन पथे? - भीम आर्मी आणि धर्मांतर
पडघम - देशकारण
संध्या नरे-पवार
  • भीम आर्मी
  • Wed , 31 May 2017
  • पडघम देशकारण भीम आर्मी Bhim Army चंद्रशेखर आझाद Chandrashekar Azad सहारनपूर Saharanpur उत्तर प्रदेश Uttar Pradesh

शब्बीरपूर येथील दलितांची घरं ठाकूर समाजाने जाळल्याच्या निषेधार्थ रुपडी, कुपूरपूर आणि इधरी या गावांमधील १८० दलित कुटुंबांनी घरातील हिंदू देव-देवतांच्या प्रतिमा नदीत विसर्जित करून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, जातवर्णवर्चस्ववादी हिंदू धर्माचा त्याग करत धर्मांतर केलं. ५ मेपासून सहारणपूर जिल्ह्यात सुरू असलेला ठाकूर-दलित संषर्ष, या संघर्षात दलितांच्या बाजूने उभी राहिलेली ‘भीम आर्मी’ ही संघटना आणि त्या संघटनेचा प्रमुख ॲड. चंद्रशेखर आझाद यांच्या बातम्यांनी माध्यमं व्यापून गेलेली असतानाच १८ मेला धर्मांतराची ही घटना घडली. विषमतावादी समाजरचनेला प्रत्युत्तर म्हणून हे धर्मांतर घडत असतानाही माध्यमांमध्ये या धर्मांतराची फारशी चर्चा झाली नाही. ‘हिंदू संघटना’चा वसा घेतलेल्या संघटनांही उत्तर प्रदेशातील दलितांच्या या धर्मांतराबाबत मौन धारण करून आहेत.

जानेवारी २०१६ मध्ये रोहिथ वेमुलाच्या आत्महत्येनंतर त्याच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या विद्यापीठीय व्यवस्थापनाच्या विरोधात संघर्ष करायला उभ्या ठाकलेल्या रोहिथच्या आईने, राधिका वेमुला यांनीही मुंबईत येऊन ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत बौद्ध धम्माचा स्वीकार केला. गुजरातमधील उना येथील चार दलित तरुणांना गोरक्षकांनी केलेल्या अमानुष मारहाणीनंतर इथल्या दलितांनी बंड करत मेलेली जनावरं आणि मैला उचलण्यास नकार दिला होता. त्या वेळीही इथल्या दलित कुटुंबांनी हिंदू देवदेवतांचा त्याग केला होता. तामिळनाडूमधील कुड्डालोर येथे २८ मेला चार दलित डॉक्टरांसह २० दलित बांधवांनी बौद्ध भिख्खूंच्या हस्ते विधिवत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. याआधीही सात महिन्यांपूर्वी कुड्डालोर येथे हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्म स्वीकाराची घटना घडली होती. ३० मेच्या ‘सम्राट’ या दैनिकात याविषयीची बातमी आली आहे.

उच्चजातीय समाजांकडून दलितांवर होणारे अत्याचार आणि त्याविरोधात दलितांकडून केलं जाणारं धर्मांतर याचा प्रारंभ नागपूरच्या दीक्षाभूमीवर १९५६ ला झाला आणि हे घटनाचक्र आज २०१७ मध्येही सुरूच आहे. आजही होणारं दलितांचं धर्मांतर हे केवळ आध्यात्मिक नाही तर ते सामाजिक आहे, राजकीय प्रत्युत्तर म्हणून आलेलं आहे. धर्मांतर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या हाती दिलेलं एक सामाजिक, राजकीय शस्त्र आहे. जातवर्णवर्चस्ववादी हिंदू धर्माचा त्याग केल्याशिवाय जातीय गुलामगिरीतून आणि अत्याचारातून दलितांची सुटका होणार नाही हे बाबासाहेबांनी १९३५ मध्ये ओळखलं. १९२७ मध्ये महाडमधला पिण्याच्या पाण्याच्या अधिकारासाठीचा, आजच्या परिभाषेत मूलभूत मानवी हक्कासाठी केलेला चवदार तळे येथील सत्याग्रह, १९३० पासून नाशिकमध्ये मंदिर प्रवेशासाठी केलेला काळाराम मंदिर सत्याग्रह हे अयशस्वी झाल्यानंतर १९३५ मध्ये येवला येथे झालेल्या सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलं, ‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही’. समानतेसाठी सुरू असलेल्या आपल्या संघर्षात आपल्याला यश मिळत नाही हे पाहिल्यावर, हिंदूधर्मिय आपली जातवर्णवर्चस्ववादी मानसिकता बदलायला तयार नाहीत, दलितांना समान दर्जा द्यायला तयार नाहीत, हे अनुभवल्यावर बाबासाहेबांनी धर्मांतराचा निर्णय जाहीर केला होता. सामाजिक बदलासाठी बाबासाहेबांनी धर्मांतराचा मार्ग स्वीकारला. दलितांना मुक्तीचा मार्ग दाखवणारा तो एक राजकीय निर्णय होता.

१९३५ मध्ये येवल्यात धर्मांतराचा निर्णय जाहीर केल्यावर १९३६ मध्ये मुंबईत झालेल्या परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना धर्मांतर का करायला हवं, हे विषद करून सांगितलं. बाबासाहेबांचं ते भाषण ‘मुक्ती कोन पथे’ या नावाने प्रसिद्ध आहे. या भाषणात बाबासाहेब सांगतात, “जर तुम्हाला आत्मसन्मान हवा असेल तर तुमचा धर्म बदला. धर्म माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही. जर तुम्हाला सहकारावर आधारित समाज हवा असेल तर तुमचा धर्म बदला. जर तुम्हाला सत्ता हवी असेल तर तुमचा धर्म बदला. जर तुम्हाला समानता हवी असेल तर तुमचा धर्म बदला. जर तुम्हाला स्वातंत्र्य हवे असेल तर तुमचा धर्म बदला. तुम्ही अशा धर्मात का राहावे जो तुमच्या माणूसपणाची कदर करत नाही? तुम्हाला मंदिरात प्रवेश करू देत नाही? तुम्हाला पाणी पिण्याची परवानगी देत नाही? तुम्ही अशा धर्मात का राहावे जो तुम्हाला पावलोपावली अपमानित करतो?”

समता आणि बंधुता या तत्त्वांवर आधारलेलं आत्मसन्मानाचं जगणं जगण्यासाठी बाबासाहेब दलितांना मुक्तीचा मार्ग दाखवतात आणि हा मार्ग विषमतावादी धर्माच्या त्यागाचा आणि नव्या धम्माच्या स्वीकाराचा आहे. आंबेडकरांचा धर्मांतराचा निर्णय म्हणजे विषमतावादी, मनुस्मृतीवर आधारित समाजव्यवस्थेविरोधातलं ‘सांस्कृतिक बंड’ होतं.

इथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. डॉ. आंबेडकरांनी धर्मांतराच्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी ‘घटना’ लिहिल्यानंतर, घटनेतील कलमांच्या आधारे अस्पृश्यता पाळणं हा गुन्हा ठरवल्यानंतर १९५६ मध्ये केली आहे. केवळ घटनेतील कलमं या समाजाच्या मानसिकतेत रुजलेली अस्पृश्यता, विषमता नष्ट करू शकणार नाहीत, हे त्यांनी ओळखलं होतं. आज सहारणपूरमध्ये, उनामध्ये याच मानसिकतेचा प्रत्यय येत आहे आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून दलितांकडून १९५६ च्या ‘सांस्कृतिक बंडा’चाच मार्ग अनुसरला जात आहे.

२५ नोव्हेंबर १९४९ या दिवशी घटनेचा मसुदा सादर करताना केलेल्या भाषणात सामाजिक समतेशिवाय राजकीय लोकशाही टिकणार नाही, असा इशारा बाबासाहेबांनी दिला होता, बंधुत्वाच्या अभावी समाज एकसंध राहणार नाही, असंही सांगितलं होतं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगतात, ‘२६ जानेवारी १९५० या दिवशी आपण विसंगतीने भरलेल्या आयुष्यात प्रवेश करत आहोत. राजकीय क्षेत्रात आपल्याला समानता मिळालेली असेल, पण सामाजिक आणि आर्थिक आयुष्यात आपण विषमतेचाच अनुभव घेत असू. राजकीय क्षेत्रात आपण ‘एक व्यक्ती एक मत’, ‘एक मत एक मूल्य’ हे तत्त्व स्वीकारलेलं असेल. पण आपल्या (परंपरागत) सामाजिक आणि आर्थिक रचनेमुळे सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात आपण ‘एक व्यक्ती एक मूल्य’ हे तत्त्व नाकारत राहू. किती काळ आपण आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात समानता नाकारणार आहोत? जितका दीर्घकाळ आपण सामाजिक समता नाकारत राहू, तितका काळ आपण आपली राजकीय लोकशाही धोक्यात घातलेली असेल.’

बाबासाहेबांचे हे शब्द २०१७ मध्येही खरे ठरत आहेत. उना ते सहारणपूर...प्रत्येक ठिकाणी सामाजिक समतेच्या अभावी राजकीय लोकशाही असतानाही दलितांना कसं पायदळी तुडवलं जात आहे, याचं प्रत्यंत्तर येत आहे.

सहारणपूर जिल्ह्यात दलितांवर झालेल्या अत्याचारांनंतर ‘भीम आर्मी’ची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. उत्तर प्रदेशच्या प्रशासनाला त्यात ‘नक्षलवाद’ दिसत आहे. पण ‘भीम आर्मी’ कशी जन्माला आली, ॲड. चंद्रशेखर आझाद यांचं नेतृत्व कसं उदयाला आलं, याच्या ज्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत आहेत, त्यांचं वाचन करताना एक गोष्ट सतत जाणवते, ती म्हणजे डॉ. आंबेडकरांनी देशाला घटना सादर करताना जे सांगितलं होतं त्यात किती द्रष्टेपण होतं. विषमतावादी समाज ‘एक व्यक्ती एक मूल्य’ हे तत्त्व नाकारत राहील आणि सामाजिक समतेशिवाय लोकशाहीचा प्रयोग अपूर्ण राहिल.

चंद्रशेखर आझाद सहारणपूर इथल्या एएचपी कॉलेजमध्ये शिकत असताना त्याने कॉलेजमध्ये उच्चवर्णियांच्या जातीयतेचा विदारक अनुभव घेतला. या कॉलेजमध्ये ठाकूर-राजपूत विद्यार्थ्यांबरोबर दलित विद्यार्थ्यांना बसू दिलं जात नव्हतं. दलित विद्यार्थ्यांना नळावर पाणी पिऊ दिलं जात नव्हतं. दलित विद्यार्थ्यांसाठी बसायच्या जागाही वेगळ्या होत्या. चंद्रशेखर आझादांनी इतर दलित विद्यार्थ्यांना जागृत करत या भेदभावाविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली. भीम आर्मीची सुरुवात ही अशी महाविद्यालयीन जीवनातील जातीयतेच्या बोचऱ्या अपमानास्पद अनुभवांतून झाली आहे.

या देशात दलितांना आजही ‘व्यक्ती’ मानलं जात नाही, महाविद्यालयासारख्या सार्वजनिक ठिकाणीही अस्पृश्यतेचं खुलेआम पालन होतं, आणि या अस्पृश्यतेचा परिपाक म्हणून जन्माला आलेल्या भीम आर्मीला, तिच्या प्रतिकाराला हिंसक ठरवलं जातं. अशा वेळी दलितांसमोर बाबासाहेबांनी दाखवलेल्या सांस्कृतिक बंडाच्या मार्गाखेरीज दुसरा मार्ग नसतो. निषेध म्हणून ते धर्मांतराचं शस्त्र उगारतात. मुक्तीचा मार्ग म्हणून बाबासाहेबांनी दिलेल्या ‘नवयान’ बौद्ध धम्माचा स्वीकार करतात. ‘नवयान’ बौद्ध धम्मामध्ये बाबासाहेबांनी २२ प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. यातील पहिल्या आठ प्रतिज्ञा या हिंदू देवदेवतांचा त्याग करण्याविषयीच्या आहेत. त्यामुळेच जेव्हा केव्हा दलितांकडून धर्मांतराची घोषणा होते, तेव्हा सर्वांत आधी हिंदू देवदेवतांचं जाहीर विसर्जन केलं जातं. हे विसर्जन केवळ देवतांच्या प्रतिमांचं नसतं तर ते आजही जाहीरपणे तसंच छुपेपणाने पाळल्या जाणाऱ्या अस्पृश्यतेचं, सामाजिक भेदभावाचं, अपमानास्पद जगण्याचं असतं. जगाच्या पाठीवर इतरत्र होणाऱ्या धर्मांतरांपेक्षा भारतातील दलितांचं हे धर्मांतर वेगळं आहे. हे धर्मांतर केवळ आत्मिक समाधानासाठी नाही तर सामाजिक उत्थानासाठी आहे. हे धर्मांतर म्हणजे विषमतावादी जात व्यवस्थेला चपराक आहे, ती एक सामाजिक कृती आहे.

मुस्लिम धर्मांतराला लक्ष्य करत ‘घरवापसी’ मोहिम चालवणारी मंडळी, सामाजिक विषमतेवर समरसतेचा लेप चढवू पाहाणारी मंडळी, या अशा धर्मांतराच्या वेळी गायब असतात किंवा मग बुद्धाला विष्णूचा दहावा अवतार ठरवण्याच्या खटपटीत असतात. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ही चालही ओळखली होती. त्यामुळेच धम्मस्वीकाराच्या वेळी घ्यावयाच्या २२ प्रतिज्ञांमधली पाचवी प्रतिज्ञा ही ‘बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे हा प्रचार खोटा आणि खोडसाळ आहे, असे मी मानतो’ ही आहे. विषमतावादी धर्मव्यवस्थेचे पाश पूर्णपणे तोडत नव्या मुक्तीच्या वाटेची दिशा बाबासाहेबांनी दाखवली.

या वाटेवरचा प्रवास आजही सुरू आहे. २०१७ मध्येही या राजकीय लोकशाहीमध्ये दलितांसमोर जातीय अत्याचाराला, विद्वेषाला उत्तर म्हणून धर्मांतर करण्याखेरीज दुसरा कोणताही पर्याय नाही, ही बाब गंभीर आहे.

लेखिका मुक्त पत्रकार आहेत.

sandhyanarepawar@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......