अजूनकाही
मासिक पाळी हा विषय आपल्याकडे अगदीच काही गुपित असल्यासारखा समजला जातो. त्यामुळे त्याबद्दल सगळ्यांची अळीमिळी गुपचिळी असते. खरं तर प्रत्येक स्त्रीला वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षापासून ते पन्नास-पंचावन्न होईपर्यंत पाळी येत असते. म्हणजे जवळपास ३५-४० वर्षं दर महिन्याला प्रत्येक बाईला मासिक पाळी येतेच. अपवाद फक्त तिच्या गर्भारपणाचा.
तर मासिक पाळी म्हणजे काय? बाईच्या शरीरात जे गर्भाशय आणि बीजांडकोश असतात, त्यांच्या संयुक्त क्रियेतून मासिक पाळी येते. एका विशिष्ट वयानंतर प्रत्येक बाईच्या बीजांडकोशात दर महिन्याला बीजांड तयार व्हायला लागतात. हे बीजांड रुजण्यासाठी गर्भाशयात एक प्रकारची गादी किंवा अस्तर लागतं. तसं ते तयार होतं. पण जर बीजांडाचा शुक्रजंतूशी संयोग झाला नाही तर ते बाहेर फेकलं जातं. त्याच वेळेला गर्भाशयाचं अस्तरही फेकलं जातं. हीच मासिक पाळी. आता ही खरं तर एक वैज्ञानिक, शास्त्रीय घटना आहे. पण जगभरातल्या वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये मासिक पाळीला वाईट, अशुद्ध मानलं गेलं आहे. यात भारताचा क्रमांक अगदी अग्रभागी आहे.
भारतात सर्व धर्मांमध्ये, विशेषतः हिंदू धर्मात मासिक पाळी आलेली स्त्री ही अशुद्ध आहे असं मानलं गेलं आहे. त्यामुळे या काळात त्या स्त्रीनं देवळात जाऊ नये, कुठल्याही धार्मिक कार्यात भाग घेऊ नये, घरातल्या वस्तूंना आणि माणसांना शिवू नये, बेगमीचे कुठलेही पदार्थ करू नयेत असं मानलं जातं. आज एकविसाव्या शतकातही अगदी चांगल्या, शिकल्यासवरल्या कुटुंबांमध्येही या समजुती कायम आहेत. माझ्या शिकलेल्या, नोकरी करणाऱ्या मैत्रिणी जेव्हा पाळी सुरू आहे म्हणून एखाद्या कार्यक्रमाला येऊ शकत नाही असं सांगतात, तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसतो. मला त्यांना सांगावंसं वाटतं की, अंतराळात जाणाऱ्या बायका बघा किंवा टेनिससारखे दमवणारे खेळ खेळणाऱ्या, पोहणाऱ्या बायका बघा. त्यांना काय पाळी येत नाही की काय? आणि आपल्या देवीदेवता? त्यांनाही पाळी येत नाही की काय?
मासिक पाळीविषयीची मराठी पुस्तके ऑनलाइन खरेदीसाठी पुढील लिंक्स वर क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3490
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3488
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3489
……………………………………………………………………………………………
जर शिकलेल्या घरांमधली ही कथा तर अशिक्षित घरांमध्ये काय परिस्थिती असेल? भारतात अनेक समाजातल्या बायकांना स्वच्छ शौचालयं उपलब्ध नाहीत, घरांमध्ये टॉयलेट्स नाहीत, मासिक पाळीच्या काळात आवश्यक असलेलं मुबलक पाणी उपलब्ध नाही. या काळात आवश्यक असलेली प्रायव्हसी मिळत नाही. या विषयावर घरातल्या पुरुष सदस्यांशी बोलणं तर दूरचंच. त्यामुळे या स्त्रियांना मासिक पाळी नकोशी वाटत असेल तर त्यात नवल ते काय. बऱ्याच बायका अजूनही या काळात बाजूला बसतात. त्यांना वेगळं ताटवाटी, अंथरूण-पांघरूण दिलं जातं. त्यांनी घरात कुणाला शिवायचं नाही असं सांगितलं जातं. हे सगळं किती भीषण आहे?
गावांमध्ये अजूनही बऱ्याच बायका मासिक स्त्राव शोषून घेण्यासाठी घाणेरड्या जुन्या कपड्यांचा वापर करतात. हे कपडे उकळलेले, निर्जंतुक केलेले नसतात. त्यांना भरतकाम असतं, हुक्स असतात, ते कपडे कॉटनचेच असतील याची शाश्वती नसते. हुक्समुळे संसर्ग होतो, तो स्वच्छता न पाळल्यानंही होतो. त्यामुळे लहान वयापासूनच या बायकांना गर्भाशयाच्या आजारांना तोंड द्यावं लागतं. हे आजार केवळ स्वच्छ कपड्याच्या आणि स्वच्छतेच्या बळावर टाळता येणं शक्य असतं.
तरी सुदैवानं भारतात अनेक स्वयंसेवी संस्था या प्रश्नावर काम करताहेत. सॅनिटरी नॅपकिनवाल्या माणसाची गोष्ट तर आता प्रसिद्धच आहे. आपल्या आईला-बहिणीला-बायकोला मासिक पाळीच्या काळात ज्या त्रासाला तोंड द्यावं लागतं, ते बघून या माणसानं स्वस्तात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याचा चंगच बांधला आणि तो प्रत्यक्षातही आणला.
गूंज या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक अंशू गुप्ता यांनीही या विषयावर बरंच काम केलं आहे. माणसाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आहेत. त्यातल्या अन्न आणि निवाऱ्यावर बरेच लोक-संस्था काम करतात. पण वस्त्र या मूलभूत गरजेकडे बरेचदा तितकं लक्ष दिलं जात नाही. गूंज ही संस्था वस्त्र या गरजेकडे लक्ष पुरवते. गरजवंतांना कपडे उपलब्ध करून देणं हे या संस्थेचं मुख्य काम. पण त्याच बरोबर खेड्यातल्या, गावांमधल्या बायकांना स्वस्तातले, पुन्हा-पुन्हा वापरता येतील असे सॅनिटरी नॅपकिन्स ही संस्था उपलब्ध करून देते.
हे सगळं आज लिहिण्याचं कारण म्हणजे आज ‘World Menstrual Hygiene Day’ म्हणजेच ‘जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस’ आहे. मासिक पाळीच्या काळात मूलभूत स्वच्छता पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यात स्वच्छ अंघोळ, स्त्राव शोषून घेणारा कपडा निर्जंतुक असणं आणि आवश्यक तो आराम गरजेचा आहे.
मासिक पाळीचा स्त्राव शोषून घेण्यासाठी जगभर मुख्यत्वे वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांचा वापर होतो. हे कपडे कॉटनचे असणं आवश्यक आहे. कपड्याचा वापर करत असाल तर ते कपडे उकळून, निर्जंतुक करून, कडकडीत उन्हात कोरडे करून वापरणं गरजेचं आहे. सॅनिटरी नॅपकिन हा दुसरा पर्याय. भारतात अनेक ब्रँड्सचे सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध आहेत. स्त्रावाच्या प्रमाणानुसार कोणत्या प्रकारच्या नॅपकिनचा वापर करावा ते ठरवता येतं. कारण त्यात वेगवेगळे साईज उपलब्ध असतात. सॅनिटरी नॅपकिन ठराविक वेळानं बदलणं गरजेचं असतं. नाहीतर संसर्गाची शक्यता असते. त्यामुळे स्त्राव कमी असो वा जास्त दर तीन-चार तासांनी नॅपकिन बदलणं श्रेयस्कर. पण या नॅपकिनमुळे अनेक बायकांना अॅलर्जी होते. त्यात जे जाळीचं कापड वापरलं जातं, त्यामुळे रॅश येतात. या नॅपकिनचा मुख्य प्रॉब्लेम आहे की, त्याची विल्हेवाट कशी लावायची? बऱ्याच ठिकाणी आपण रस्त्यावर कुत्र्यांनी आणून टाकलेले विद्रूप नॅपकिन बघतो. ते टाळायचं असेल तर नॅपकिन्सची योग्य विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. पण शहरांमध्ये कचऱ्याच्या डब्यांमध्ये टाकण्याशिवाय पर्याय नसतो आणि मग ते आपल्याला रस्त्यावर दिसतात. शिवाय सॅनिटरी नॅपकिनमुळे होणारा कचरा हा पर्यावरणासाठी हानिकारक आहे. कारण तो बायोडिग्रेडेबल नाही. तो कचरा विल्हेवाट लावल्यावर पर्यावरणात सामावला जात नाही. विचार करा, इतक्या लोकसंख्येच्या देशात इतक्या बायका सॅनिटरी नॅपकिन वापरणार आणि ते रोजच्या कचऱ्यात फेकणार तर पुढे त्याचं काय होईल?
मासिक स्त्राव शोषून घेण्याचा तिसरा पर्याय म्हणजे टॅम्पून्स. हे कॉटनसारख्या फायबरपासून तयार केले जातात आणि त्यांची स्त्राव शोषून घेण्याची क्षमता नॅपकिनपेक्षा किती तरी जास्त असते. पण टॅम्पून योनिमार्गात सरकवावे लागतात. त्यामुळे दरवेळेला त्यांचा वापर करताना हात निर्जंतुक करणं आवश्यक आहे. टॅम्पूनच्या वापराचा दुर्मीळ पण भयानक दुष्परिणाम म्हणजे टॉक्सिक शॉक सिंड्रोम. म्हणजे बॅक्टेरियांचा संसर्ग होऊन ओढवणारा मृत्यू.
मासिक स्त्राव शोषून घेण्यासाठी गेल्या पाच वर्षांत नवीन आणि कमीत कमी दुष्परिणाम असलेला पर्याय मिळाला आहे तो आहे मेन्स्ट्रुअल कपचा. हा एकदा घेतला की तो ५ ते १० वर्षं वापरता येतो. या कपचे अनेक फायदे आहेत. एक तर दर महिन्याला होणारा सॅनिटरी नॅपकिन्स किंवा टॅम्पून्सचा खर्च वाचतो. या दोन्हीच्या वापरामुळे जो कचरा होतो तो टळतो. दोन्ही बनवण्यासाठी रासायनिक द्रव्यं वापरली जातात ती मेन्स्ट्रुअल कप बनवताना वापरली जात नाहीत. हा कपही योनिमार्गात सरकवायचा असतो.
http://www.wikihow.com/Use-a-Menstrual-Cup
कप तुम्हाला ऑनलाइन खरेदी करता येतो. कपच्या खोक्यात कप कसा वापरायचा याविषयी सविस्तर माहिती दिलेली असते. कप फक्त महिन्यातून एकदा निर्जंतुक करायचा असतो. तो धुवून पुन्हा-पुन्हा वापरता येतो. शिवाय तो बारा तास बदलला नाही तरी चालतं. म्हणजे स्त्राव जास्त असताना रात्री उठून नॅपकिन बदलण्याचा त्रास वाचतो. झोप शांत मिळू शकते. कप वापरून तुम्ही पोहणं, खेळणं, व्यायाम अशा तुमच्या सर्व एक्टिव्हिटीज चालू ठेवू शकता.
या कपचा ज्यांनी ज्यांनी वापर केला आहे, त्यांनी त्यांनी या कपमुळे आपल्या आयुष्यात क्रांती घडली आहे असं सांगितलेलं आहे.
तेव्हा मासिक पाळी म्हणजे काही गुपित आहे असं न समजता सगळ्यांनीच त्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलायला हवा. घरातल्या पुरुषांनी बायकांना शक्य ती मदत करायला हवी, म्हणजे अगदी लागलं तर नॅपकिन खरेदीही करायला हवी. कारण हा फक्त स्त्रियांचा प्रश्न नाही. या बाबतीत अधिकाधिक मोकळेपणानं बोलून-लिहून आपले अनुभव शेअर केले पाहिजेत.
So happy reading and happy bleeding!
लेखिका ‘डिटीजल कट्टा’ या ऑनलाइन नियतकालिकाच्या संस्थापक संपादक आहेत.
sayali.rajadhyaksha@gmail.com
……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment