अजूनकाही
भाषा ही संस्कृतीची वाहक असते. भाषेमुळे संस्कृती टिकते. भाषेनुसार (संस्कृतीनुसार) राज्यांच्या सीमारेषा ठरतात- बनतात.
भाषा त्या माध्यमाच्या शाळेमुळे टिकतात.
कुठलीही भाषा मारायला तीन पिढ्यांची अनास्था पुरेशी असते.
वरील भाषेच्या व्याप्तीसंबंधी शिक्षित भारतीय माणसांनी विचार केलेलाच नाही.
भारताची राष्ट्रभाषा हिंदी, जगात सर्वाधिक वापरली जाणारी भाषा इंग्रजी, संगणकाची भाषा इंग्रजी, अशा एक ना अनेक अफवेवर आपण मराठी भाषिक जगत असतो. वास्तविक इंग्रजीने जशा इतर अविकसित देशांच्या भाषा संपवल्या, तशा भारतात हिंदीने अनेक बोलीभाषा संपवल्या.
राज्यात कुठली भाषा वापरावी? भाषा शुद्ध-अशुद्ध असते का? संस्कृतमधून मराठी की मराठीतून संस्कृत? अशा अनेक समस्येशी सध्या विविध भाषिक असलेला भारतीय माणूस झगडत आहे. खरं तर तो न्यूनगंडाने पछडलेला आहे. पण तो पुरेसा दांभिक असल्याने हा झगडा मनातल्या मनात आल्हाद चालू आहे. तो कधीच बाहेर आणू देत नाही.
हे सांगण्याचे कारण सध्या प्रदर्शित झालेल्या 'हिंदी मिडीयम' या सिनेमात याचविषयी व त्या भोवताली लपलेल्या छुप्या प्रवृत्तीचे दर्शन घडवले आहे.
मगाशी म्हटल्याप्रमाणे भारतीय माणसाच्या गुणधर्मानुसार मनातल्या मनात चालणारे, क्वचित व्यक्त होणारे भाषेचे त्रांगडे हे तितक्याच आल्हादपणे व सक्षमपणे दाखवण्यात दिग्दर्शक पूर्ण यशस्वी झालाय.
गरीब कारागीर ते श्रीमंत दुकानदार असा प्रवास स्वतःच्या गुणांवर (स्ट्रीट स्मार्टनेस) पार केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाची ही कथा. मुलीला दिल्लीतील टॉप ५ शाळांपैकी कुठल्या शाळेत टाकावे हा मोठा प्रश्न असतो. आईच्या मते मुलाचे आयुष्य अधिक चांगलं होण्याकरता चांगल्या (महागड्या) शाळेशिवाय पर्याय नाही. बाप (इरफान खान) यांच्या मते शिक्षण कुठूनही होऊ शकतं. पण त्याचे हे मत मुलीच्या प्रेमापोटी, बायकोच्या हट्टापायी त्याला कधीच आग्रही मांडता येत नाही. (त्यात त्याला साड्या विकण्यापुरते इंग्रजी येत असल्याने बायकोसमोर वेळोवेळी खजील व्हावे लागते, तर सार्वजनिक ठिकाणी मन मारून जगावे लागते.)
यासाठी पाच श्रीमंत शाळा निवडून त्यात प्रवेश मिळवण्यासाठी पालकांना करावी लागलेली कसरत म्हणजे हा सिनेमा.
यातले कुटुंब एकाच प्रतलावर जगताना एकदम श्रीमंत होत बेडकीसारखं पोट फुगवते, तर सामान्य भारतीय (त्यात दिल्लीकर) असल्याने भलताच जुगाडूपणा करून, भ्रष्टाचाराच्या विळख्यतून वाचण्यासाठी गरिबांचे जगणे जगते. कसेही करून मुलीला महागड्या शाळेत प्रवेश करवून देतात. सोबतीला हा 'कसाही करून' मिळवलेला प्रवेश कुटुंबाला आत कुठेतरी खात असतो. प्रायश्चित म्हणून एका सरकारी गरीब शाळेला देणगी देतात (जसे काही लोक मंदिरात देतात). पण रीळ व रिअल लाईफचा शेवट हा नव्हेच!
कलाकारांचा सहज अभिनय आपल्याला हसवून जातो. परंतु पिढीजात श्रीमंतांना हे नवं नसल्याने कदाचित त्यांना तितकं हसता येणार नाही. नवश्रीमंत प्रेक्षकांना हा नायक जवळचा वाटेल. म्हणजे तुम्ही 'भारतातून' बाहेर जाऊ शकता, पण भारत 'तुमच्यातून' जात नाही, असं काहीसं.
इंग्रजी माध्यमाच्या श्रीमंत शाळेची चालवलेली भलामण ऐकून ज्यांची मुलं आज इंग्रजी माध्यमात आहे, त्यांना हा सिनेमा पाहताना हसू येणार नाही. आलंच तर ते केवळ कलाकारांच्या अभिनयाचं व प्रासंगिक विनोदाचं यश असेल.
हा सिनेमा केवळ शाळा व शिक्षण माध्यम यालाच स्पर्श करत नाही, तर त्यासोबत शहरी जीवन, (दिल्लीत प्रामुख्याने दिसणारे श्रीमंत व गरीब असे दोन वर्ग) दोन भिन्न संस्काराचं समाजमन, स्टेटस टिकवून ठेवण्याची धडपड, त्यातील बरेवाईट अनुभव, सोशल मीडियाचा वापर, शिक्षणात झालेले मनमानी बदल (त्यामुळे एकाच ठिकाणच्या दोन शाळेतील मुलांचं वेगवेगळ्या पातळीवर वाढणं), ओव्हर प्रोटेक्टिव्ह, पुशिंग परेंटस्, जुगाड प्रवृत्ती, गरिबांना मिळणारे शैक्षणिक आरक्षण धोरण, स्थलांतरामुळे बदललेली भाषिक व सांस्कृतिक अस्मिता यावरही भाष्य करतो. तोही इतक्या सहज सौम्यपणे की आपल्याला जवळचं वाटावं. यात 'मी शिवाजीराजे भोसले...'सारखा भडकपणा नाही. प्रश्नांचाही नाही व नायकाचाही नाही. म्हणूनच या मुद्यावर भूमिका घ्यायला प्रेक्षकाला सोपं होईल, अशी जागा दिगदर्शकाने करून ठेवली आहे.
हे सर्व चित्रण सिनेमा पाहताना तुम्हाला खिळवून ठेवते, याचे श्रेय दिगदर्शक, संकलक व मुख्य कलाकार नायक-इरफान खानला! सिनेमाभर कुठलेही अतिनाटकीय प्रसंग व तर्कहीन वाद नसल्याने तुम्हाला सिनेमागृहाच्या अंधारात उघडं पडण्यावाचून गत्यंतर नसतं.
एरवी सिनेमाच्या शेवटाला नायक कथेच्या नायकाला शोभेल अशी हिरोगिरी करतो. धुशुम धुशुम मारामारी, भ्रष्ट व्यवस्थेची पोलखोल, टाळ्या मिळवणारं भाषण... यात असं अपेक्षित काही नाही. तर शिक्षणमाध्यम म्हणून, स्थानिक भाषेला व शाळा म्हणून सरकारी शाळेलाच स्वीकारतो. जे डोनेशन व फी इंग्रजी शाळांना चकाकायला लावणार असते, त्यापेक्षा कितीतरी कमी पैसे सरकारी शाळांची अवस्था चांगली करण्यासाठी वापरतो.
आणि म्हणून हा कुटुंबप्रमुख व सिनेमाचा नायक शोभतो. स्वतःच्या हट्टातील फोलपणा त्याच्या बायकोला मान्य होतो. शिक्षणमाध्यम म्हणून सरसकट सर्व विषय इंग्रजीतून शिकणं व ती केवळ भाषा म्हणून शिकणं, यातला फरक तिला याधीच अपमान झाल्यावर कळलेलाच असतो. त्यामुळे तीही बदलते.
शहाणपणाची कृती ही प्रायश्चितापेक्षा चांगली, हा चित्रपटाचा शेवट!
दुर्दैवाने खऱ्या जीवनात या भाषिक व शिक्षण माध्यमाच्या समस्येकडे कोणी असं शहाणपणाने पाहतच नाही.
आजमितीला मुंबईत ४१५ खाजगी मराठी शाळा बंद पडल्या आहेत. यासाठी पालकांकडून दिली जाणारी कारणं तकलादू आहेत. जगभरातील शिक्षणतज्ज्ञ, विकसित देश याबाबत काय सांगतात ते आपण ऐकत नाही. मुलांच्या प्रेमापासून ते शाळेच्या अवस्थेपर्यंत आपल्याला कुठलंही कारण पुरेसं असतं.
जी पिढी मराठी माध्यमात शिकून मोठी झाली, तेच या शाळांना, भाषेला आणि संस्कृतीला संपवण्यात प्रत्यक्ष हातभार लावत आहे.
(ताजा कलम - दादरच्या तृप्ती हॉटेलचे मालक असलेल्या सुखवस्तू 'भागवत कुटुंबा'ने आपल्या मुलाला सध्या संपूर्ण मराठी माध्यमाच्या शाळेतच प्रवेश दिला आहे. हे उदाहरण दिले कारण सिनेमाच्या नायकाशी भौतिक परिस्थितीशी साधर्म्य आहे. घरापासून लांब असलेली शाळा, सोबतीला गरीब वस्तीतील मुले असली तरी ते याबाबत आग्रही आहेत.)
……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment