अजूनकाही
संपूर्ण दक्षिण भारतात ५ राज्ये आहेत आणि त्यात प्रामुख्याने ४ भाषा बोलल्या जातात. तेलुगु (तेलंगण, सिमान्ध्र), तमिळ (तामिळनाडू), कन्नड (कर्नाटक), मल्याळम (केरळ). या चारही भाषांमध्ये सिनेमे बनवले जातात. त्यांची तोंडओळख करून देणारी ही लेखमालिका. आज तमिळ सिनेमावरील लेख. उद्या तेलुगू व कन्नड सिनेमांवर. आणि परवा मल्याळम सिनेमावरील शेवटचा लेख प्रसिद्ध होईल.
……………………………………………………………………………………………
एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ‘बाहुबली-२’ रिलीज झाला. तो पाहिल्यानंतर लोकांची ठेवणीतली वाक्यं कानावर यायला लागली, ‘काय ना हे लोक ‘रोबोट’ बनवतात, ‘कबाली’ बनवतात, आपल्याला कधी जमणार?’ त्यातून आपलं दाक्षिणात्य सिनेमाबाद्दलचं अज्ञान बाहेर आलं. कारण रजनीकांतचे सिनेमे आणि ‘बाहुबली’ हे दोन्ही दाक्षिणात्य असले तरी वेगवेगळ्या भाषेतील चित्रपट आहेत. रजनीकांत तमिळ भाषेत काम करतो, तर ‘बाहुबली’ ही तसा दोन भाषांमध्ये बनवली गेलेला सिनेमा असली तरी तो मुळात हैदराबादमध्ये बनवलेला तेलुगु सिनेमा आहे. ज्या दोन सर्वथा वेगळ्या भाषा आणि दोन वेगळ्या इंडस्ट्रीज आहेत.
इतका लोकप्रिय असूनही दक्षिण भारतीय सिनेमाबद्दल आपल्याला इतकी कमी माहिती का? याची तशी बरीच कारणं सांगितली जाऊ शकतात, पण त्यातलं सर्वात महत्त्वाचं कारण असेल भाषिक जवळीक नसणं. भारतात (तसे सहा पण) प्रामुख्याने बोलले जाणारे असे दोन भाषा समूह, इंडो-आर्यन आणि द्रविडीयन. दोन भाषा एका भाषासमूहातील असल्या की, त्या जाणीवपूर्वक न शिकताही थोड्याफार समजण्याची शक्यता असते. (जसे मराठी किंवा गुजराती भाषिकांना हिंदी समजते) संपूर्ण भाषासमूहच बदलला तर ती शक्यताच नगण्य होऊन जाते. दक्षिण भारतात बोलल्या जाणाऱ्या भाषा या द्रविडीयन भाषा समूहातून येतात. त्या तमिळ उपोदघात भाषा आहेत. त्यामुळे मुळातच या भाषा समजण्यात इंडो-आर्यन भाषासमूहातील भाषा बोलणाऱ्या लोकांना अडचण येते.
आता मुळात संपूर्ण भाषासमूहच समजत नसल्याने त्यातल्या भाषा वेगवेगळ्या आहेत हे समजून घेण्यात दक्षिणेतर भारतीय अजूनच कमी पडतात. त्यामुळे त्यांच्यात आपापसात सांस्कृतिकरीत्या भरपूर फरक आहेत, भाषिक फरक आहेत, हेही समजणे कठीण जाते. (त्यात आपल्या माध्यमांनाही विशेष रस दिसत नाही म्हणूनच कित्येक जण ‘बाहुबली’ला तमिळ फिल्म असं धादान्त बोलत, लिहीत आहेत.) मग नक्की या सिनेमांमध्ये आपापसांत फरक काय? या वेगवेगळ्या इंडस्ट्रीज कशा नावारूपास आल्या? सध्या त्यांच्यात वरचढ कुठली? आणि आपण सेट मॅक्सवर पाहतो ते नक्की कुठले सिनेमे? याबद्दलची आपली माहिती अत्यंत त्रोटक राहते. म्हणूनच दाक्षिणात्य सिनेमा थोडक्यात समजून घेण्याचा हा प्रयत्न.
संपूर्ण दक्षिण भारतात ५ राज्ये आहेत आणि त्यात प्रामुख्याने ४ भाषा बोलल्या जातात. तेलुगु (तेलंगण, सिमान्ध्र), तमिळ (तामिळनाडू), कन्नड (कर्नाटक), मल्याळम (केरळ). शिवाय हैदराबादी (दक्खनी) हिंदी, कर्नाटकमधील उर्दू, तमिळनाडूतील बागडा, कर्नाटकातील तुळू, आंध्रमधील बंजारा अशा अजून बऱ्याच छोट्या भाषा आहेत आणि त्यातील काही भाषांचा आपापला सिनेमा उद्योग आहे, पण तो बराच मर्यादित आहे. त्यामुळे त्यांना इथे समाविष्ट करत नाहीये.
जगातील कुठल्याही भागातील सिनेमाचा विचार केल्यास एक गोष्ट जाणवेल की, त्या ठिकाणचा प्रादेशिक सिनेमा तिथे चालत असतोच, पण तो नेहमी दुसऱ्या एका जवळच्या मोठ्या उद्योगाच्या प्रभावाशीही झगडत असतो. ज्या उद्योगाने व्यावसायिक सिनेमाचे आपले असे काही एक अर्थशास्त्र, सौंदर्यशास्त्र विकसित केलेले असते. त्यामुळे काही काळ तो जवळच्या इतर प्रदेशावर प्रभाव टिकवून राहतो. जसे की गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, पाकिस्तान या सर्व ठिकाणी प्रादेशिक सिनेमा असूनही बॉलिवुडचा पगडा अधिक आहे. आग्नेय आशियात तैवान, इंडोनेशिया, फिलिपिन्स, व्हिएतनाम या सर्व देशात हाँकाँग सिनेमा (ब्रूस ली, जॅकी चेनचे सिनेमे अथवा वूशिया फिल्म्स) वरचढ आहे किंवा होता म्हणूया.
युरोपीय देशांत प्रत्येक देशाचा सिनेमा उद्योग हिंदी सिनेमाइतका मोठा आहे, पण त्यांनाही हॉलिवुडच्या प्रभावाशी कायम लढा द्यावा लागतो. तसाच संपूर्ण दक्षिण भारतावर चेन्नईच्या कॉलिवुडचा प्रभाव आहे. दक्षिण भारतातल्या चार भाषेतल्या सिनेमात आर्थिक दृष्टीने तमिळ सिनेमा सर्वांत मोठा आहे. तर इतर (तेलुगु, मल्याळम, कानडी) भाषिक सिनेमा हा त्यापुढे प्रादेशिक सिनेमासारखा ठरतो.
तमिळ सिनेमा (कॉलिवुड)
तमिळ सिनेमा हा कायम संपूर्ण दक्षिण भारतीय सिनेमा उद्योगाच्या केंद्रस्थानी राहिला आहे. याला अर्थातच काही विशिष्ट कारणं आहेत. द्रविडी राजकारणाचं नेतृत्व हे कायम तामिळनाडूकडे राहिलं आहे. हिंदी शिकण्याला जो नकार इथून झाला तितका खचितच कर्नाटकामधून झालेला दिसतो. त्यामुळे स्वतःचा सिनेमा असावा ही भावनाही तामिळनाडूमध्ये सर्वाधिक प्रभावशाली होती. पण त्याहून मागे जाऊन विचार करावयाचा झाला तर आणखी एक कारण पुढे येईल, ते म्हणजे योग्य वेळेस त्याची सुरुवात होणं. १९२० च्या दशकाआधीच जेव्हा सिनेमा नुकताच भारतात सुरू होत होता, तेव्हा नटराज मुदलियार यांनी चेन्नईमध्ये सिनेमा बनवणे सुरू केले होते (कीचक वध, १९१८). ज्याचा प्रेक्षक तयार करण्याचा पाया तिथे आधीपासूनच रिलिज होणाऱ्या ब्रिटिश सिनेमांनी तयार करून ठेवला होता. पुढेही सामाजिक विषय हाताळणे, सायलेंट सिनेमाचे बोर्ड निरक्षरांसाठी खास वाचून दाखवणे असे प्रयोग करत तमिळ सिनेमा वाढत राहिला.
पण एक मोठा सिनेमा उद्योग उभा राहायचा असल्यास सर्वांत महत्त्वाची गरज असते, तिथे मोठे स्थिर स्वरूपातील स्टुडिओ उभे राहणे. सुरुवातीच्या काळात भारतातले सर्वांत मोठे स्टुडिओ हे मुंबई, पुणे आणि कोलकात्यात होते. ओघानेच डेव्हलपिंग लॅब्स आणि इतर तांत्रिक बाबीही तिथेच उभ्या राहिल्या. पण चेन्नई सिनेमाने ही काळाची गरज वेळीच ओळखून आधी जनरल पिक्चर्स कॉर्प आणि नंतर जेमिनी, विजय वाहिनी आणि एव्हीएमसारखे मोठे स्टुडिओ उभे केले. तांत्रिकतेच्याबाबतही स्वावलंबी होण्यावर भर दिला. त्यामुळेच तो आज दक्षिण भारतात ज्या ठिकाणी आहे तिथवर पोहोचू शकला.
आज जसा ‘बाहुबली’ सर्वाधिक निर्मितीमूल्य असलेला सिनेमा ठरला आहे, तसाच १९४८ मध्ये एस. एस. वासन यांच्या जेमिनी स्टुडिओचा ‘चंद्रलेखा’ ठरला होता. तो सबंध भारतभर गाजला होता. चेन्नईच्या स्टुडिओंचा गवगवा हा केवळ भारतातच नव्हता, तर तो श्रीलंका, सिंगापूर इथले सिंहली सिनेमेही चेन्नईत बनवत होता. मुंबईत आजही ज्या ठिकाणी केवळ दोन भाषेतच सिनेमे बनतात, त्या ठिकाणी चेन्नईत त्या काळी चार दाक्षिणात्य भाषा, सिंहली तसेच तमिळ सिनेमाचे बंगाली रिमेक, इतक्या भाषेत निर्मिती होत होती. (शिवाजी गणेशन सारख्या अभिनेत्याला भारताबाहेर ओळख होती. हॉलिवुडने त्याचा उल्लेख ‘भारताचा मार्लन ब्रांडो’ असा केला होता.)
हा झाला इतिहासाचा भाग. आजचा तमिळ सिनेमा समजून घ्यायला गेल्यास आपल्याला थोडीशी मागूनच सुरुवात करावी लागेल. तमिळ सिनेमाने नेहमीच संपूर्ण दक्षिण भारताचा विचार एक उद्योग म्हणून केला आणि त्याच वेळी तमिळ प्रादेशिकतेला साद घालण्याचा प्रयत्नही तो करू पाहतो. अशी दोरीवरची कसरत तो करत राहिला आहे. त्यामुळेच व्यावसायिक आणि कलात्मक सिनेमा एकत्रित करण्याचा थोडासा प्रयत्न त्यात झालेला दिसतो. ज्यात ‘बाळू महेंद्र’ (सदमा) आणि ‘के. भालचंद्र’ (एक दुजे के लिये) ही नावे सर्वांत आधी येतील. दोघेही २०१४ या एकाच वर्षात निवर्तले हाही एक योगायोग. या दोघांचीच धुरा आज गौतम मेनन, मणीरत्नम हे चालवत आहेत असे म्हणता येईल.
कुठलाही चित्रपट उद्योग योग्य स्थितीत आहे, त्याला उज्वल भविष्य आहे असे तेव्हा म्हणता येते; जेव्हा तिथे नवीन प्रयोग करणारे दिग्दर्शक (वेट्रीमारन, कार्तिक सुब्बराज); बरे पण हमखास यश मिळवून देणारे दिग्दर्शक (शंकर, ए आर मुरगॉदास) आणि या दोन्हींचा समन्वय साधून यश मिळवणारे दिग्दर्शक (मणीरत्नम, गौतम मेनन) यांचा समतोल साधलेला असतो. आजच्या तमिळ सिनेमात तो सुंदर रीतीने साधला गेलेला दिसतो. शिवाय मनीकंदन (काक मुत्ताई), लोकेश (महानगरं) अशी नवी फळीही येतेय. इलीयाराजा, ए. आर. रेहमानसारखे जागतिक दर्जाचे संगीत दिग्दर्शक तिथे काम करतायत.
हाच समन्वय इथल्या अभिनेत्यांमध्येही आहे. रजनीकांत आणि कमल हसन हे तिथले अत्यंत मोठे क्रिटिक प्रुफ अभिनेते आहेत, तर विजय, अजीत त्यांच्याच मार्गावर आहेत. सूर्या, विक्रम व्यावसायिक सिनेमात मर्यादित प्रयोग करतात, तर धनुष, सिद्धार्थ प्रयोगाला थोडेसे अजून सढळ समोर जातात. त्या पुढची पिढी या नवीन होणाऱ्या प्रयोगांबाबात आणखी खुली आहे.
मात्र आजच्या तमिळ सिनेमांत काही बाबी खटकणाऱ्याही आहेत. जसे की उत्तम निर्मितीमूल्ये असली तरी तांत्रिक बारकाव्यांवर लक्ष न देणे. ज्यात छायाचित्रण किंवा साऊंडसवरती बारकाईने काम करण्याचा दृष्टीकोन अजूनही तमिळ निर्मात्यांना आलेला नाहीये (तंत्रज्ञ नक्कीच त्या दर्जाचे आहेत असे आपण म्हणू शकतो, कारण ते मुंबईत उत्तम काम करतायत). तमिळ सिनेमा उद्योग हा सर्वाधिकरीत्या अभिनेत्यांवर अवलंबून आहे. जी फार स्वागतार्ह बाब नाही. कारण तंत्रज्ञान, तंत्रज्ञ आणि त्यांना मिळणारा मोबदला हे न सुधारण्यातला तो एक फार मोठा अडसर ठरतो आहे. तसेच दिग्दर्शक, त्याची शैली, कथेचे महत्त्वही या प्रकारामुळे घटते. पण नवीन आलेल्या फळीमुळे हळूहळू का होईना बदल घडत आहेत.
गेल्या ६४ वर्षांत केवळ २ राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या तमिळ सिनेमाची या वर्षी ‘विसरनाई’च्या रूपाने भारताकडून ऑस्करसाठी झालेली निवड झाली आहे. म्हणजे देशाच्या आतच कलात्मक मान्यता मिळवण्यासाठी झगडणारा तमिळ सिनेमा आज भारताबाहेर देशाचे प्रतिनिधित्व करतोय.
लेखक पुण्याच्या सिने क्राफ्ट इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
chavan.sudarshan@gmail.com
……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Ashutosh
Sat , 27 May 2017
मणीरत्नम चे चित्रपट, देवसेना, अवंतिका (बाहुबली) आणि रुद्ध्रमादेवी चा विचार करून चं शंका उपस्थित झाल्या. पण तुझ्याकडून आलेलं उत्तर हे अपेक्षित आणि निराशाजनक आहे :( पण मी जे काही थोडे थोडके पाहिले आहेत त्यात यांनी बरं काम केलं आहे निदान बॉलिवूड मधील सो कॉल्ड अभिनेत्रींपेक्षा पेक्षा !
Sudarshan Chavan
Sat , 27 May 2017
आशुतोष, माझा तेलुगु सिनेमावरचा लेख वाचल्यावर तुला जाणवेल की स्त्री प्रधान सिनेमे सोड स्त्री ला काही एक डायमेंशन असणारं पात्र म्हणूनही फार सिनेमे दाखवत नाहीत. त्यामुळे मजा अशी आहे की कोणीही कुठेही सूट होऊन जाईल कारण त्या पात्रांना तसे बारकाईने कंगोरे रेखाटलेच नाहीयेत. तू ज्या अभिनेत्रींची नावं घेतलीस त्यातल्या काजल आणि तमन्ना या उत्तर भारतीय आहेत. त्या सिनेमात आल्या त्या त्यांच्या रुपामुळे, त्यांच्या अभिनयाबद्दल मी काही बोलणार नाही पण त्या दोघींना आधी दाक्षिणात्य भाषाही येत नव्हत्या. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की दक्षिण भारतात, पुरुष आणि स्त्री कलाकारांच्या मानधनातली तफावत खूप आहे. त्यामुळे तमिळ आणि तेलुगु या दोन्ही भाषांत त्या कामे करतात. काजल, तमन्ना, असीन, अनुष्का या सगळ्याच अभिनेत्रीनी दोन्ही भाषेत कामे केली आहेत. तरी अनुष्का शेट्टीला रुद्रमादेवी, साईज झिरो असे स्त्रीप्रधान सिनेमे मिळालेत ही पुढच्या बदलांची चांगली सुरुवात म्हणायची. (आणि हो मणीरत्नम ची स्त्री पात्रही मला बहुतांशी आवडतात)
Ashutosh
Fri , 26 May 2017
सुदर्शन, लेख छान झाले आहेत दोन्ही. पण काही प्रश्न आहेत... इथे अभिनेत्रींना काही महत्व असतं की नाही ? का त्यांचा प्रवास Duet song to Duet song असाच असतो ? कारण तमन्ना, अनुष्का, श्रुती, काजल, असिन, समंथा ई. ना प्रचंड फॉलोविंग आहे सोशल मीडिया वर. या सर्व कोणत्या इंडस्ट्रीचा भाग आहेत ? या पॉप्युलर सोडून विद्या, तब्बू सारख्या अभिनय संपन्न अभिनेत्री सुद्धा आहेत का ? ज्या वेगवेगळे प्रयोग करतात ? का या सुद्धा चांगला अभिनय अथवा प्रयोगशील चित्रपट करतात ? आपल्याकडे इश्किया, द डर्टी पिक्चर पासून स्त्रीप्रधान चित्रपटांचा जसा ट्रेंड सुरू झाला तसा तिकडे आहे का ?
Sudarshan Chavan
Thu , 25 May 2017
डब पाहात असु तर सांस्कृतिक जवळीकतेमुळे फरक समजून न येणं नक्कीच शक्य आहे. (तशा दोघांच्या tonalities वेगळ्या आहेत पण डब मधून असं काहीही जज करणं कठीण होऊन जातं) आणि बऱ्याचदा सरसकट तेलुगुही ठरवल्या जातात. कारण शेवटी तोही आर्थिकदृष्ट्या बराच मोठा आहे. त्याबद्दल उद्याच्या लेखात लिहिण्यात येईलच.
Vineet Bhat
Thu , 25 May 2017
लेख फार माहिती वर्धक आहे. एक शंका होती.दाक्षिणात्य भाषिक चित्रपटांमध्ये भेद न करता येणं, यामागे असे पण कारण असू शकेल काय की साधारणपणे हे चित्रपट डब केलेले असतात आणि सांस्कृतिक जवळीकता असल्याने ते एकाच जातकुळीतले वाटतात, शेवटी फरक काळत नसल्याने सर्वात प्रसिद्ध आणि चर्चेत असलेले तमिळ चित्रपट असल्याने, सारेच सरसकट तमिळ ठरवले जातात?
Vineet Bhat
Thu , 25 May 2017
लेख फार माहिती वर्धक आहे. एक शंका होती.दाक्षिणात्य भाषिक चित्रपटांमध्ये भेद न करता येणं, यामागे असे पण कारण असू शकेल काय की साधारणपणे हे चित्रपट डब केलेले असतात आणि सांस्कृतिक जवळीकता असल्याने ते एकाच जातकुळीतले वाटतात, शेवटी फरक काळत नसल्याने सर्वात प्रसिद्ध आणि चर्चेत असलेले तमिळ चित्रपट असल्याने, सारेच सरसकट तमिळ ठरवले जातात?