काय आहे उत्तर भारतातील ‘भीम आर्मी’?
पडघम - देशकारण
कॉ. भीमराव बनसोड
  • ‘भीम आर्मी’चे एक पोस्टर
  • Wed , 24 May 2017
  • पडघम देशकारण भीम आर्मी Bhim Army योगी आदित्यनाथ Yogi Adityanath सहारनपूर Saharanpur उत्तरप्रदेश Uttar Pradesh

उत्तर प्रदेशमध्ये योगी राज आल्यापासून दलितावरील अत्याचारात वाढ झाल्याच्या घटना सतत घडत आहेत. तेथील सहारनपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दलित-राजपुतांमध्ये जातीय दंगली नुकत्याच झाल्या आहेत. उत्तर भारतातील दलितांवर होणाऱ्या सामाजिक भेदभाव व अन्याय-अत्याचाराविरोधात संघर्ष करण्यासाठी तेथे गेल्या पाच-सहा वर्षांपासून शिक्षित दलित तरुणांची एक संघटना स्थापन झाली आहे. त्या संघटनेचे नाव आहे- ‘भीम आर्मी’. परंतु सर्वच बाबतीत बलिष्ठ असलेल्या राजपूत ठाकुर समाजाने त्या परिसरातील अनेक गावांत दलितांवर हल्ले केले आहेत. उदा. शब्बीरपूर येथील दलितांची घरेदारे, मोटार सायकलींची जाळपोळ करून, घरातील धान्याची नासाडी, संत रविदास व डॉ.आंबेडकरांच्या मूर्ती व फोटोंची तोडफोड केली आहे. राजपुतांच्या अशा दहशतीला घाबरून गावातील दलित मंडळी आपापल्या नातेवाईंकाकडे गेली आहेत. १४ गंभीर जखमी दलितांना दवाखान्यात अॅडमिट केले आहे. त्यात महिलांचाही समावेश आहे.

या दंग्यादरम्यान महिलांशी असभ्य वर्तनाच्या अनेक घटना घडल्या असल्याची माहिती दवाखान्यातील महिलांनी तसेच गावात राहिलेल्या आबालवृद्धांनी दिली आहे. विशेष म्हणजे हा सशस्त्र हल्ला पोलिसांसमक्ष, त्यांच्या सहकार्यानेच करण्यात आला असल्याचेही या सर्वांनी सांगितले आहे. प्रस्थापित प्रसारमाध्यमांमध्ये नव्हे, पण सोशल मीडियावर, यु टयूबवर या सर्व घटनांचा इत्थंभूत वृतान्त पहायला मिळतो.

शब्बीरपूर येथील दलितावर झालेल्या घटनांबाबत विचार करण्यासाठी भीम आर्मीने सहारनपूर येथील संत रविदास वसतीगृहात महापंचायत बोलावली  होती. ९ मे रोजी बोलावलेल्या या महापंचायतीला आधी पोलिसांनी रीतसर परवानगी दिली होती. त्यात जो काही निर्णय होईल तो आम्ही तुम्हाला सांगू असेही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी बोलणे झाले होते. त्याप्रमाणे राज्यभरातील तरुण ९ मे रोजी या पंचायतीसाठी जमायला सुरुवात होत असताना सकाळी ८ वाजता अशी परवानगी पोलिसांनी नाकारली. ऐन वेळी हा पंचायतीचा कार्यक्रम रोखणे आयोजकांना कठीणच होते. ठरल्याप्रमाणे तरुण जमा होत असताना पोलिसांनी जमणाऱ्या तरुणांना ठिकठिकाणाहून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर लाठीचार्ज केला. त्यामुळे हे सर्व तरुण बिथरल्याचा फायदा घेऊन समाजकंटकांनी शहरातील दुकाने, मोटारगाड्या यांना आगी लावण्याचा प्रयत्न केला. त्यात दम घुसमटून एका राजपूत तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे राजपूत समाज आणखीच चिडला. त्यांनी मृताच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, अॅट्रोसिटी अॅक्ट रद्द करावा, चंद्रशेखर व इतर आरोपींना ताबडतोब अटक करण्यात यावी अशा मागण्या केल्या आहेत. राजपुताच्या कुटुंबियांना १५  लाख रुपये आगाऊ मिळाले आहेत, पण दलितांच्या झालेल्या नुकसानीबद्दल राज्य सरकारने काहीही जाहीर केलेले नाही.

भीम आर्मीसारखी संघटना स्थापन होण्यासाठी निमित्त झाले सहारणपूर येथील एएचपी कॉलेजमधील सामाजिक विषमतेचे. त्या कॉलेजमधील राजपूत-ठाकूर समाजाच्या विद्यार्थ्यांसोबत दलित विद्यार्थ्यांना बसू देत नव्हते की, त्यांच्या नळावर पाणीही पिऊ देत नव्हते. दोन्ही समाजासाठी वेगवेगळ्या बसण्याच्या जागा व स्वतंत्र नळ आहेत. अर्थात ही पूर्वापार परंपरा असली तरी तिला आता शिक्षित दलित तरुणांनी विरोध करणे सुरू केले आहे. त्यामुळे दलित-सवर्ण वादंगाला सुरुवात झाली. त्यात तेथेच शिक्षण घेतलेल्या व आता वकील झालेल्या चंद्रशेखर आझादने पुढाकार घेतला. त्यातूनच दलितांच्या हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने ‘भीम आर्मी’ म्हणजे ‘भारत एकता मिशन’ नावाच्या संघटनेचा जन्म झाला. या संघटनेतील तरुणांनी मोटार सायकलस्वारांचा एक जत्था तयार केला. परिसरात जेथे कोठे दलितांवर अन्याय झाला असेल तेथे हा जत्था जातो आणि आपल्यापरीने अन्यायाचे निवारण करण्याचा प्रयत्न करतो. यामुळे संघटनेची सर्वत्र प्रशंसा होऊन त्यात जास्तीत जास्त दलित तरुण सहभागी होत आहेत. त्यांचा भौगोलिक परिसरही वाढत आहे.

सध्या या संघटनेचे जाळे उत्तर प्रदेशबरोबरच पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान इत्यादी राज्यांत पसरले असून जवळजवळ १५,००० सभासद झाले असल्याची माहिती आहे. या संघटनेचे सभासद एकदुसऱ्याला ‘जय भीम’ असे अभिवादन करतात. त्यांच्या गळ्यात निळे उपरणे, मोटार सायकलवर ‘भीम आर्मी’चे स्टिकर असते. घराच्या दारावर व जेथे जमेल तेथे ‘भीम आर्मी’चे स्टिकर चिकटवले जाऊ लागले आहेत. पूर्वी दलितांना निरनिराळ्या कार्यालयात ज्या किरकोळ कामासाठी बरीच धावपळ करावी लागत असे, ती कामे आता ‘भीम आर्मी’च्या जत्थ्यामुळे सहज होऊ लागली आहेत. या जत्थ्यातील तरुणाजवळ मोटार सायकल आणि स्मार्ट फोनही असतो. शिवाय ते जातीव्यवस्थेला विरोध करतात. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच त्यांचे प्रेरणास्थान असल्याने हिंसक मार्गावर त्यांचा विश्वास नाही. पण राज्यघटनेतील तरतुदींची व समतेच्या कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे यावर मात्र त्यांचा कटाक्ष असतो. त्यांच्याकडील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या छायाचित्रामध्ये डाव्या कोपऱ्यात भगवान बुद्धाची जशी प्रतिमा असते, तशीच उजव्या कोपऱ्यात संत रविदासाची प्रतिमा असते.

उत्तर भारतात संत कबीरासारखाच जातीव्यवस्थेला चांभार समाजातील संत रविदासांनी विरोध केला आहे. म्हणूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संत कबीरांना आपले गुरू मानले आहे. त्याच प्रमाणे आपला ‘अस्पृश्य मूळचे कोण व ते अस्पृश्य कसे बनले?’ हा ग्रंथ संत रविदासांना अर्पण केला आहे, हे येथे आपण ध्यानात ठेवावे. पॉप संगीताच्या आधारावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची गाणी सर्वत्र लोकप्रिय होत असून दलित समाजातल्या तरुण-तरुणींतले गायकांचे जत्थेही तयार झाले आहेत. 

शहरी भागापासून तर ग्रामीण भागापर्यंत या संघटनेच्या शाखा असून त्यांचे पदाधिकारी व कार्यकारण्याही तयार झाल्या आहेत. खेड्यापाड्याच्या प्रवेशालाच ‘दि ग्रेट चमार’ लिहिलेले या संघटनेचे बोर्ड सर्वत्र लागत आहे. त्यावरूनही ग्रामीण भागात मोठे वादळ उठले आहे. कारण राजपुत संघटनेचे ‘दि ग्रेट राजपूत’चे बोर्ड पुर्वापार आहेतच, त्यात ही नवी भर पडल्याने आपल्या बरोबरीने हे आता यायला लागलेत की काय, याची सल त्या परिसरातील राजपूत-ठाकुरांना आहे. या संघटनेची महिला आघाडी असून ममता गौतम या आघाडीच्या प्रमुख आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारालाच प्रमाण मानून त्यांनी ‘हरिजन’ या शब्दाला विरोध केला आहे. ‘जब हमही खुद हरीको नहीं मानते, तो हम उनके जन कैसे?’ असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

तसा या संघटनेचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही, पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी (ज्यांना आपल्या नावापुढे ‘रावण’ लिहायला आवडते)  हे मात्र निक्षून सांगितले की, ‘निवडणुकीत आपणाला ‘हिंदू’ असल्याचे सांगितले जाते, मात्र त्यानंतर ‘दलिता’सारखेच वागविले जाते.’ बरेच जण असे म्हणतात की, बीएसपीचा यांना पाठिंबा आहे. पण बीएसपीने ते स्पष्टपणे नाकारले आहे. तरीही सहारनपूर येथील घटनेसंबंधी जवळजवळ ५० एफआयआर नोंदवून झाले त्यात या संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखरपासून तर बीएसपीचे माजी आमदार रविंद्रकुमार मोल्हु यांचाही त्यात समावेश आहे.

आता पोलिसांनी या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली गुन्हे दाखल केले असून या अध्यक्ष व आमदारासह बहुतेक जण फरार असल्याचे घोषित केले आहे. पण पळून गेलो नसल्याची ऑडिओ क्लिप चंद्रशेखर यांनी जाहीर केली असून २१ मे रोजी त्यांनी दिल्ली येथील जंतरमंतरवर धरणे आंदोलन केले. तेव्हा पोलिस प्रशासनाच्या ‘मुस्लिम आतंकवादी, आदिवासी माओवादी व दलित नक्षलवादी’ या आवडत्या सूत्रानुसार या घटनेत पोलिसांना ‘भीम आर्मी’चा नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा ‘सुगावा’ लागला आहे. त्यांनी त्या परिसरातील १०० गावांतील दलित तरुणांनाही त्यांचे ‘लक्ष्य’ केले आहे. पण शब्बीरपूर येथील दलितांवर सशस्त्र हल्ला करणाऱ्या राजपुतावर मात्र अद्यापपर्यंत साधे गुन्हेही दाखल केले नाहीत. यावरून मोदींचे योगी सरकार हे पक्षपाती व दलितविरोधी तर आहेच, पण दलितांवरील अत्याचाराचा घटनात्मक मार्गाने मुकाबला करणाऱ्या ‘भीम आर्मी’सारख्या संघटनेची पाळेमुळेच उखडून काढून तिला नेस्तनाबूत करण्याचा त्यांनी चंगच बांधला आहे, हे त्यांच्या कृत्यावरून दिसून येते आहे.

लेखक मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत.

bhimraobansod@gmail.com                                

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.                                              

Post Comment

Praveen Bardapurkar

Wed , 24 May 2017

उत्सुकता बऱ्यापैकी शमवणारी माहिती आहे !


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......