कुठल्याच लिफाफ्याला आपल्या आत काय ठेवले आहे, याच्याशी देणेघेणे नसते. लिफाफ्याला त्याच्याशी काही मतलबही नसतो. त्याला फक्त त्याच्या असण्याशीच मतलब असतो
पडघम - देशकारण
राम जगताप
  • अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी
  • Mon , 22 May 2017
  • पडघम देशकारण अटल बिहारी वाजपेयी Atal Bihari Vajpayee नरेंद्र मोदी Narendra Modi

अटलबिहारी वाजपेयी हे भाजपचे १९९८ ते २००४ या काळातले पहिले पंतप्रधान ज्यांनी सलग पाच वर्षे पूर्ण केली. त्यांच्या काळात भाजप निर्विवाद बहुमतात नव्हता हेही खरे. एनडीएची सत्ता होती. सज्जन, स्वच्छ आणि अजातशत्रू अशी व्यक्तीच आघाड्यांच्या सरकारमध्ये पंतप्रधानपदी राहू शकते. शिवाय ती उदारमतवादीही असावी लागते. वाजपेयी या दोन्ही निकषांत बसणारे होते. वाजपेयी संसदेत आणि संसदेबाहेरही फर्डे वक्ते म्हणून प्रसिद्ध होते. कला-साहित्य-संस्कृती यांची त्यांना उत्तम जाण होती. अशी अनेक वैशिष्ट्ये वाजपेयी यांच्याकडे होती. उदार दृष्टिकोन, शत्रूलाही आदर वाटेल, अशी ऋजुता आणि वाकपटुत्व ही त्यांची ताकद होती. त्यामुळे त्यांची ‘लार्जर दॅन लाइफ’ प्रतिमा उभी करण्यासाठी फारसे प्रयास करावे लागले नाहीत.

वाजपेयी ही तेव्हाच्या भाजपची आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज होती. आघाडीचे राजकारण सांभाळताना भाजपला लवचीकपणाची गरज होती आणि संघाला आपला सांप्रदायिक अजेंडा पुढे रेटण्यासाठी उदार चेहऱ्याची. वाजपेयी त्यासाठी ‘टु इन वन पॅकेज’ होते. म्हणजे वाजपेयी हे त्यावेळच्या संघ आणि भाजपच्या व्यूहरचनेतले पंतप्रधान होते. पण तरीही भारतीय जनतेला मात्र त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. वाजपेयी आता मोठी क्रांती करणार असे देशभर वातावरण तयार झाले होते. ‘शायनिंग इंडिया’ ही त्याचीच देण होती. पण हळूहळू वाजपेयींबाबत लोकांचा भ्रमनिरास होत गेला.

तीन-साडेतीन वर्षांपूर्वी अडवाणी यांचा पत्ता कापून भाजप व संघाने मोदी यांना पुढे आणले, तेव्हा उदारीकरणाला वीस वर्षांचा काळ उलटून गेला होता. काँग्रेसने जनतेचा दहा वर्षांत भ्रमनिरास केला होता. नव्याने उदयाला आलेल्या मध्यमवर्गाला एका मसिहाची, विकासपुरुषाची गरज होती. भ्रष्ट नसलेला आणि कार्यक्षम पंतप्रधान हवा होता. मोदी या सगळ्यांमध्ये चपखल बसत होते. म्हणूनच त्यांच्या गुजरातमधील दंगलींबाबतच्या पूर्वइतिहासाकडे दुर्लक्ष करत त्यांची ‘विकासपुरुष’ अशी प्रतिमा उभी केली गेली.

या कारणांमुळे मोदी आणि वाजपेयी यांच्यामध्ये पुष्कळ साम्य आहे. दोघेही अविवाहित. ब्रह्मचर्याला मान देणाऱ्या भारतीय संस्कृतीत अशा व्यक्ती कायमच आदरणीय वाटतात. दोघेहे फर्डे वक्ते. वाजपेयी यांच्या भाषणांमध्ये काव्य-शास्त्र-विनोदही असे. मोदींकडे टाळ्याखाऊ विधाने असतात, मोहात पाडणाऱ्या घोषणा असतात. वाजपेयी मास आणि क्लास दोन्हीकडे लोकप्रिय होते. मोदी मात्र जो मास जागतिकीकरणाच्या गेल्या वीसेक वर्षांत क्लासमध्ये गेला, त्यात विशेषकरून लोकप्रिय आहेत.

वाजपेयींवर काही अफरातफर केल्याचा आरोप त्यांचा कट्टर शत्रूही करणार नाही, तसेच मोदींबाबतही नाही. पण हेही तितकेच खरे की, ब्रह्मचारी, स्वच्छ चारित्र्य असलेले हे दोन्ही पंतप्रधान मंत्रिमंडळातील आपल्या सहकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराला आळा घालू शकलेले नाहीत. वाजपेयी यांनी त्यांच्या भ्रष्ट मंत्र्यांना जसे पाठीशी घातले, तसेच भ्रष्टाचाराला पायबंद घालू पाहणाऱ्या जगमोहनसारख्या मंत्र्याच्या बाजूनेही ते उभे राहू शकले नाहीत. मोदी सध्या आपल्या भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालण्याचे काम करत आहेत. अजून तरी त्यांच्या मंत्रिमंडळातील कुठल्याच मंत्र्याने भ्रष्टाचाराविरुद्ध आघाडी उघडलेली नाही. त्यामुळे मोदी यांची त्याबाबतची भूमिका अजून समोर येऊ शकलेली नाही.

दुसरे असे की वाजपेयी यांनी आपल्या कार्यकाळात दोन वेळा पाकिस्तानला भेट दिली. परवेझ मुशर्रफ यांना भारतात चर्चेसाठी बोलावले. दिल्ली-लाहोर बससेवा सुरू केली. इंडिया शायनिंगपासून अनंत घोषणा केल्या. पण वाजपेयी बोलतात एक आणि करतात भलतेच हे हळूहळू सिद्ध होऊ लागले. मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी देशातील मुस्लीम आणि पाकिस्तान या दोन्हींबाबत कठोर धोरण स्वीकारलेले दिसते किंवा भाजप, संघ यांनी ठरवलेल्या धोरणाला मोदी यांची मूक संमती आहे. म्हणून त्यांनी ना अजून पाकिस्तानला भेट दिली, ना नवाज़ शरीफ यांना भारताचे निमंत्रण दिले (शपथविधीचा अपवाद वगळता)!

जगभर दौरे करून भारताची आणि स्वतःची प्रतिमा उजळ करू पाहणाऱ्या मोदींनी पाकिस्तानबाबत मात्र काहीशी ताठर भूमिका घेतली आहे. दुसरीकडे स्वच्छ भारत, जनधन योजना, स्मार्ट सिटीज, डिजिटल इंडिया अशा घोषणा मात्र दर काही महिन्यांच्या फरकाने करतात. विशेष म्हणजे वाजपेयी आणि मोदी दोघांच्याही या योजना-घोषणा मध्यमवर्गाला केंद्रस्थानी ठेवून आखलेल्या असतात!

वाजपेयींच्या काळात देशातल्या बड्या उद्योगपती घराण्यांच्या पंतप्रधान कार्यालयातील हस्तक्षेपाबाबतही बोलले जात होते. मोदी यांच्या काळात देशातल्या याच बड्या उद्योगपतींवर आपल्या विरोधकांचा बंदोबस्त करण्याची कामगिरी पंतप्रधान कार्यालयाकडून सोपवली गेलेली दिसते. याचे एकच उदाहरण म्हणून टीव्ही 18 ग्रूपची बदललेली मालकी हे देता येईल.

भाजपचा कुठलाही नेता हा राष्ट्रवादी असतोच. ते वाजपेयी होते, तसे मोदीही आहेत. वाजपेयी यांच्या काळात कारगिल घडले. मोदींच्या काळात लष्कराने म्यानमारमध्ये जाऊन पूर्वेकडच्या काही नागा बंडखोरांचा खात्मा केला. पण त्याचे यश हे कारगिलएवढे मोठे नाही. भविष्यात तशी संधी मोदींनाही येईल.

मोदी यांचे प्रस्थ वाढीला लागले ते वाजपेयी यांच्याच काळात. गोध्रानंतर गुजरातमध्ये ज्या दंगली उसळल्या त्याने वाजपेयी सरकारची जगभर नाचक्की झाली. वाजपेयी यांनी मोदींना राजधर्माची आठवण करून देत आता मी परदेशात कसे तोंड दाखवू अशी हताशा व्यक्त केली होती. वाजपेयी यांच्यासारख्या कणखर मानल्या जाणाऱ्या पंतप्रधानालाही मोदींना किमान शब्दांनी फटकारता आले नाही, यातून त्यांची अगतिकता त्याच वेळी स्पष्ट झाली होती. पुढे वाजपेयींनी मोदींना गुजरात दंगलीनंतर मुख्यमंत्रीपदावरून हटवले नाही, ही मोठी चूक होती असे एका मुलाखतीत जाहीरपणे म्हटले होते. अर्थातच तेव्हा वाजपेयी माजी पंतप्रधान झालेले होते.

गोविंदाचार्य यांनी वाजपेयी ‘संघाचा मुखवटा’ असल्याची टीका केली होती. त्याची शिक्षा म्हणून त्यांच्यावर थेट राजकारण संन्यास घेण्याची वेळ आली. मोदींनी मात्र पक्षात आणि सरकारमध्ये आपल्यावर टीका करेल असा माणूसच ठेवला नाही. वाजपेयी वयोपरत्वे आधीच निवृत्त झाले होते. अडवाणी यांना सक्तीने निवृत्त केले गेले. भाजपमधील अडवाणी यांची पत २००८च्या लोकसभा पराभवातच कमालीची घटली होती. त्यामुळे २०१४च्या निवडणुकीतून त्यांना पूर्णपणे बाद करण्यात आले. तरीही त्यांनी आणीबाणीच्या तिशी निमित्ताने मोदी सरकारविरुद्ध काही वक्तव्ये केली. पण त्याची पक्ष आणि मोदी सरकार यांनी फारशी दखल घेतली नाही. अरुण शौरी, यशवंत सिन्हा यांनीही मोदी सरकारवर टीका केली, पण त्यांचेही ‘अडवाणी’ करण्यात आले.

थोडक्यात आता पक्ष आणि सरकार यात कुणीही मोदींविषयी ब्र उच्चारू धजत नाही. विरोधी पक्ष मोदींवर टीका करतात खरी, पण मोदी त्याची तडफेने परतफेड करतात. काँग्रेस पक्ष, सोनिया-राहुल गांधी यांना मोदींचे आव्हान पेलता येत नाही. त्यांची अवस्था भरकटलेल्या तारूसारखी झाली आहे. ते संसदेत आणि संसदेबाहेर मोदींना कडाडून विरोध करतात. पण त्याला कुठलीच दिशा नसते. शिवाय मोदींकडे फर्डे वक्तृत्व आहे. नेमकी त्याचीच सोनिया-राहुल यांच्याकडे वानवा आहे. त्यामुळे जाहीर सभांमध्ये मोदी बाजी मारतात.

वाजपेयींना आधी ‘मुखवटा’ म्हटले गेले. नंतर त्यांना ‘लिफाफा’ असेही म्हटले गेले. वाजपेयी हा भाजप आणि संघाचा असा मुखवटा होता, जो अल्पसंख्याकांच्या मनात दुहीची बीजे भरू शकत नव्हता, पाकिस्तानला शत्रू क्रमांक एक मानू शकत नव्हता. सांप्रदायिक ध्रुवीकरणाचे समर्थन करून शकत नव्हता. पण त्याच वेळी, या सर्वच गोष्टी वाजपेयी नावाच्या लिफाफ्यामध्ये भरल्या जात होत्या.

या दोन्ही भूमिका सध्या मोदी करत आहेत. फरक एवढाच की, ते मात्र संघाचा उग्र मुखवटा आहेत. वाजपेयी काही प्रमाणातच संघाचा लिफाफा होते, मोदी मात्र पूर्णांशाने लिफाफा आहेत. कुठल्याच लिफाफ्याला आपल्या आत काय ठेवले आहे, याच्याशी देणेघेणे नसते. त्याची निवड त्याला करता येत नाही. लिफाफ्याला त्याच्याशी काही मतलबही नसतो. त्याला फक्त त्याच्या असण्याशीच मतलब असतो. त्यामुळे आपल्या आत जे ठेवले जाईल, ते बिनबोभाट वाहून नेण्याचे काम लिफाफ्याला करावे लागते. त्याने एकच काम करायचे- जे ठेवले जाईल ते झाकून ठेवायचे आणि इच्छित स्थळी पोहचवायचे.

मोदी वेगळे काय करत आहेत?

(दै. ‘मी मराठी Live’मध्ये दोन वर्षांपूर्वी लिहिलेल्या लेखाचे पुनर्प्रकाशन)

……………………………………………………………………………………………

लेखक ‘अक्षरनामा’चे संपादक आहेत.

editor@aksharnama.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Praveen Bardapurkar

Mon , 22 May 2017

लेख व्यवस्थितच आहे . आवडला . फक्त एक "वाजपेयी वयोपरत्वे आधीच निवृत्त झाले होते" असं नसून प्रकृती अस्वास्थ्यामुळे वाजपेयी यांना बाजूला व्हावे लागले ; पर्यायच नव्हता ...


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......