किशोरी आमोणकर : आठवणींचा कोलाज
संकीर्ण - श्रद्धांजली
गणेश मनोहर कुलकर्णी
  • गानसरस्वती किशोरी आमोणकर - १० एप्रिल १९३१-३ एप्रिल २०१७
  • Mon , 22 May 2017
  • संकीर्ण श्रद्धांजली किशोरी आमोणकर Kishori Amonkar स्वरार्थरमणी Buy Swararthramani रागरससिद्धान्त Raagrasasiddhant रे बिरहा Re Biraha अवघा रंग एक झाला Avagha Rang Ek Zala

गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचं ३ एप्रिल २०१७ रोजी निधन झालं. त्याला पुढील आठवड्यात दोन महिने पूर्ण होतील. डोंबिवलीचे लेखक गणेश मनोहर कुलकर्णी यांचा किशोरी अमोणकर आदरांजली कार्यक्रमाच्या आयोजनातल्या अनुभवावर आधारलेला हा लेख. कुलकर्णी एक्स्प्रेस ट्रेनचे चालक आहेत. वृत्तीने चोखंदळ वाचक आणि संवेदनशील लेखक. भरधाव वेगाने ट्रेन हाकत असताना त्यांनी जो निसर्ग आणि त्या निसर्गाचे विभ्रम टिपले आहेत,  ते अफलातून आहेत.

…….…….…….…….…….…….…….…….…….…….…….…….…….…….…….…….…….

किशोरीताई गेल्या तेव्हा संगीतक्षेत्रातले सारेच हळहळले. आता सगळे संपले, पुढे काय, हीच भावना प्रत्येकाच्या मनात उमटत राहिली. अनेकांनी ताईंबरोबर साथ केली होती. ताईंकडे शिकले होते. मार्गदर्शन घेतले होते, त्यांच्या मैफिली ऐकल्या होत्या. प्रत्येकाचे स्वत:चे असे काही क्षण ताईंबरोबरचे होते. सामान्य रसिक ही सगळी दुनिया पार दुरूनच न्याहाळत असतो. त्याच्यापर्यंत यातलं फार कमी पोहचतं.

मग अनेक दिग्गज, शिष्य ताईंचे सोबती लिहिते झाले. प्रत्येकाने ताईंच्या बरोबरच्या आठवणी, त्यांची  शिकवण्याची पद्धत याबद्दल भरभरून लिहिले. अगदी ताईंचा दरारा कसा होता, त्यांची गातानाची समाधी अवस्था या सगळ्याचं लोकांना अपार कुतूहल वाटत राहिलं. ताईंच्या गाण्यानं मी ही समृद्ध झालो आहे. अनेक मैफिलीत त्यांना प्रत्यक्ष ऐकता आलं होतं. ताईंच्या आत दडलेला ‘अँग्री यंग मॅन’ आम्हा सामान्य रसिकांना हवाहवासा वाटायचा. बऱ्याचदा एखाद्या मैफिलीत ताईंचा छान मूड लागलेला असायचा आणि आपलीही ब्रम्हानंदी टाळी लागलेली असायची. अशा वेळी समोरचा व्हिडिओग्राफर आपली एकाग्रता भंग करण्याचा प्रयत्न करायचा. ताई त्याला स्टेजवरूनच ओरडायच्या ‘अरे तो लाईट बंद करा, मला त्रास होतोय’. तरीही तो तसेच करायला लागला तर ताई धमकावायच्या ‘लाईट बंद करतोस का, मी गाणं बंद करू?’. तो चुपचाप आपला कॅमेरा बंद करायचा, मधून बाजूला व्हायचा. आम्ही सुस्कारा सोडायचो. त्याला कुणीतरी हटकावं असं आम्हाला मनातून खूप वाटायचं, आयोजक हतबल असायचे. तेव्हा ताई आमच्या मदतीला धावून यायच्या. भारतीय शास्त्रीय संगीतात प्रत्येक जण ‘किशोरी अमोणकर’ असतो, पण किशोरीताईंनी ‘मी किशोरी अमोणकर आहे’ हे ठामपणे लोकांना सांगितले. अगदी आत्ता दोन महिन्यांपूर्वी पंचमनिषादची मैफल, त्यातला त्यांचा रागेश्री गाताना होणारा त्रास, पण तरीही गाण्याची असोशी माझ्यासारख्या रसिकाला पिळवटून टाकत होती. मध्येच संस्थेचे सर्वेसर्वा शशी व्यास यांच्यावर प्रेमानं रागावणं, कारण इतकचं की ते आभार मानण्यात फार वेळ घालवतात. ज्यामुळे ताईंचा गाण्याचा वेळ वाया जातो. त्यानंतरही शशीजी बोलतात, आपले बोलणे संपताना चटकन ताई कोणता राग गाणार याची घोषणा करतात. ताई स्वर मंडलवर आपल्या समाधीच्या अवस्थेत जाताना पुन्हा एकदा शशीजींना ओरडतात. त्यांच्या मते मला ऐकायला आलेला समोरचा रसिक इतका मूर्ख नाही की, त्याला रागाचे नाव सांगायला हवे. रसिकांनाही एका तऱ्हेने हा सन्मान देण्यासारखेच होते.

त्यानंतर फार त्रास होतानाही ताईंनी रागेश्रीची जी रूपे दाखवली ती आयुष्यभर पुरून उरणारी होती. कार्यक्रम संपला तरी रसिक जागचे हलेनात, उभे राहून त्यांना टाळ्यांनी मानवंदना देत होते. शेवटी ताईच रागाने म्हणाल्या ‘निघा आता’. तेव्हा फार मुश्किलीने आम्ही काढता पाय घेतला. ताईंचे ते तेजस्वी रूप डोळ्यात साठवताना आमच्यापुरती ताईंची ही शेवटचीच मैफल असेल याची कल्पना नव्हती. वयाच्या ८३ व्या वर्षीही त्यांची सुरांशी चाललेली झटापट, त्यावर मांड टाकण्याची धडपड बघून मी तर कळवळत होतो. हा सगळा वेळ मागच्या बाजूला बसलेले पं. मिलिंद रायकर ताईंची मैफल आपल्या व्हायोलिनवर समर्थपणे तोलून धरत होते. मध्येच त्यांना लागणारा चहा / गरम पाणी स्वत: देत होते. पं. रायकरांना ताईंचा खूप सहवास लाभला. तब्बल २१ वर्षे रायकर सर ताईंकडे गाण्याची दिक्षा घेत होते. पं. रायकर व्हायोलिन पं. डी. के. दातारांकडे शिकले, पण त्याच बरोबर त्यांनी ताईंची गायकी आपल्या व्हायोलिनवर वाजवता यावी यासाठी अपार मेहनत घेतली.

ताई गेल्या तेव्हा अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या, लेख लिहिले, टीव्हीवर शोक प्रकट केला, पण मिलिंद सर कुठेच दिसले नाहीत. आमचा त्यांच्याशी परिचय होता. त्या बळावर त्यांना दुसऱ्या दिवशी सांत्वनासाठी फोन केला. तेव्हा ते म्हणाले, ‘अरे, मला ताईंनी ललत पंचम कसा शिकवला, ताईंचं गाणं, त्यांची मिंड, माझ्या व्हायोलिन मधून वाजताना मी आणि ताई कसे एकरूप झालो यावर मला बोलायचंय’. मी म्हणालो, ‘या डोंबिवलीत. मी करतो सगळी व्यवस्था!’ सरही विनातक्रार ‘हो’ म्हणाले. १४ एप्रिल २०१७ रोजी कार्यक्रम करायचे ठरले.

मग मी कार्यक्रम कसा यशस्वी होईल याच्या मागे लागलो. सरांनी पं. विश्वनाथ-सीमा शिरोडकर व प्रदिप दिक्षित यांना बोलवावे असे सुचवले. मी त्यांच्याशी बोललो. ते ही सगळे विनातक्रार तयार झाले. डोंबिलीतले तबला वादक पं. विश्वनाथ शिरोडकर आणि पेटीवादक सौ. सीमा शिरोडकर यांनी ताईंबरोबर अनेक कार्यक्रम केले होते. पं. प्रदीप दिक्षितांनी ताईंच्या सगळ्या अभंगांसाठी पखवाज वाजवला आहे. प्रा. केशव परांजपे हे तर ताईंच्या खूपच जवळचे. त्यांनी ताईंना अनेक ठिकाणी बोलते केले आहे. मग मला पं. भीमसेन जोशींचे आवडते तबलजी नाना मुळ्ये यांना बोलवावेसे वाटले. ते ही कांदिवलीहून वयाच्या ७८ व्या वर्षीही यायला तयार झाले. डोंबिवलीतले लेखक / पत्रकार रविप्रकाश कुलकर्णी घरचेच तेही ताईंच्या प्रकाशित साहित्याबद्दल बोलतील असे ठरले. पं. मिलिंदजींचा अपार स्नेह / निर्मळपणा / प्रेमळपणा या सगळ्या प्रवासात मनापासून अनुभवता आला. एवढ्या मोठ्या देश / विदेशात सातत्याने कार्यक्रम करणाऱ्या कलाकाराने मला अगदी प्रेमानं सांभाळून घेतले. माझ्या चुका सावरून घेतल्या. माझ्या प्रत्येक हट्टाला दाद देत राहिले. तो पुरवत राहिले. त्यांच्या शब्दाखातर इतकी मोठी मंडळी निव्वळ आठवडाभर आधी विचारूनही अगदी सहज कार्यक्रमाला उपलब्ध झाली. या सगळ्यात एक समान दुवा होता. तो म्हणजे स्वरप्रज्ञ पं. मिलिंद रायकर हा मोठा कलावंत आहे. त्याने खूप मोठा काळ ताईंबरोबर एकत्र घालवला आहे. त्याला सोबत करायला हवी. त्यामुळे कुठल्याही अटी / शर्ती न लादता ही मंडळी माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या विनंतीला मान देऊन डोंबिवलीतल्या एका छोट्या हॉलमध्ये यायला तयार झाली. हे सगळे कलाकार निव्वळ ताईंच्या प्रेमापोटी एकत्र येणार होते. ही सगळी मिलिंद सरांची शिष्टाई आणि किशोरीताईंची पुण्याईं. मी निव्वळ निमित्तमात्र!

मला त्यांना फक्त योग्य वातावरण आणि जागा उपलब्ध करून द्यायची होती. मग मी डोंबिवलीतल्या सगळ्या मातब्बर संस्था / नामवंत, दानशूर व्यक्ती, तमाम हॉल, कॅटरींगवाले, बँका यांना भेटलो. त्यांना विनंती करू लागलो की, मला काही मदत करा. ताईंच्या प्रेमापोटी मी तो कार्यक्रम करतोय, हे पटवून द्यायचा प्रयत्न करू लागलो. पण माझी विनंती सरळ सरळ धुडकावली गेली. कुणीही मला साथ द्यायला तयार नव्हते. कारण माझ्या नावामागे कुठलेही वलय नव्हते. कोणत्याही संस्थेचा फलक नव्हता. याचबरोबर किशोरीताई हे प्रकरण आपल्याला झेपणारे नाही याचीही त्यांना जाणीव असावी. हा सगळा नकार घेऊन मी जेव्हा घरी आलो, तेव्हा सखी म्हणाली, ‘इतका निराश होऊ नकोस’. वर म्हणाली, ‘मी तुझ्याबरोबर आहे, आता मागे वळून बघू नकोस’. मग मला लक्षात आलं की, काहीतरी दैवी आपल्या हातून घडणार आहे. यासाठी सर्वांपासून मला नियतीनेच वेगळे ठेवले असावे. याचा प्रत्यय मला या कार्यक्रमाच्या आखणी दरम्यान पदोपदी येत गेला.

एकेक कलाकार जेव्हा या कार्यक्रमाशी जुळत गेला, तेव्हाच या कार्यक्रमाचे यश माझ्या डोक्यात पक्क झाले. माझे काम फारच किरकोळ होते. मी तो हमाल भारवाही... या श्रद्धेने मी कार्यक्रमाची आखणी करत गेलो. कार्यक्रमाचे शीर्षक ‘आठवणींचा कोलाज’ हे मीच ठरवले. त्यासाठी लागणारी पोस्टर्स एका मित्राने करून दिली. मोठाले बॅनर्स डोंबिवलीत स्वत: मित्रांबरोबर फिरून रस्तोरस्ती लावले. यावेळी अनेक जवळचे निव्वळ माझी मजा बघत होते. हा कार्यक्रम कसा करतो ते बघूया असेही म्हणत होते. काही म्हणाले, ‘तुझी किशोरीची आवड आमच्यावर का लादतोस?’ किंवा एका धनिक सद्गृहस्थाने तर असंही म्हणायला कमी केले नाही की, ‘तुला काय गरज होती, पं. रायकरांना हो म्हणण्याची.’ यात त्याने आपला जातीद्वेषही मिरवून घेतला. मी निव्वळ ब्राह्मण आहे. म्हणून मला मदत नाकारली. यात ब्राह्मण्याचा कुठे प्रश्न होता? या वेळी मी एकेका रुपयासाठी अक्षरश: तरसत होतो. एकदा एक रांगोळी कलाकार भेटला. म्हणाला, ‘मी किशोरीताईंच्या दोन वेळा रांगोळ्या काढल्या आहेत. ताईंनी माझं कौतुकही केलं आहे. काही मदत लागली तर सांगा.’ त्याला म्हटले कार्यक्रमाच्या दिवशी हॉलवर ताईंची रांगोळी काढावीशी वाटली तर काढ. तर त्याने तब्बल ५००० रुपये मागितले. मी तो विषयच सोडून दिला. प्रत्येकाचे तोंड फाटले होते. त्यांना वाटले हा किशोरीताईंसारख्या दिग्गज कलाकाराचा कार्यक्रम आखतोय म्हणजे याच्याकडे भरपूर स्पॉन्सर्स असतील, अमाप पैसा असेल. पण प्रत्यक्षात माझा परिवारच तेवढा माझ्या बरोबर होता आणि मी गमतीत म्हणायचोदेखील की, ‘अरे, माझी फॅमिली सुरू झाली की संपते. (मी /सखी / मुलगा)’ तेव्हा मागेही मीच आणि पुढेही मीच अशी माझी धावपळ सुरू होती. पण जेव्हा दहा जण नकार देत होते. त्याच वेळी पाच-सहा छोटे छोटे हात मला खंबीरपणे धीर देत होते. त्यांच्या पाठबळावर मी पुढे सरकत होतो. मग पोस्टर्स तयार केली. पोलिस स्टेशनची परवानगी घेतली. पत्रकारांना प्रेस नोट देऊन आलो. पण कुठल्याही पत्रकाराने याची नोंद घेतली नाही हे अलाहिदा! आदल्या दिवशी दै. ‘लोकमत’मध्ये एक छोटीशी चौकट होती. ‘लोकसत्ता’ने मात्र कार्यक्रमाच्या दिवशी एक चौकट ताईंच्या फोटोसहित सविस्तर छापली होती इतकेच. ‘झी चोवीस तास’वाले, निरगुडकरांना मी स्वत: फोन करून सांगितले. तेव्हा त्यांनी त्यांच्या खर्जातल्या आवाजात स्पष्टपणे नकार दिला. म्हणाले, ‘अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे तुमच्या कार्यक्रमाला मला वेटेज देता येणार नाही.’ म्हणालो, ‘तुम्ही नाही तुमच्यावतीनं कुणी आलं तरी चालेल.’ म्हणाले, ‘शक्य नाही.’ मला त्यांचा स्पष्ट नकार मनापासून आवडला.

असे काहीतरी मनाशी जुळवत पुढे चालत राहिलो. मग शास्त्री हॉलच्या जोशी काकांनी अगदी स्वस्तात हॉल उपलब्ध करून दिला. हॉल चालवणाऱ्या मामा देवस्थळींनी बाकी सगळी व्यवस्था पुरवण्याची तयारी दाखवली. एव्हाना लोकांच्या लक्षात यायला लागले की, काहीतरी भव्यदिव्य घडणार आहे. मग मला अनेक जण आडून आडून सुचवायला लागले की, आपण संयुक्तरीत्या हा कार्यक्रम करूया पण एव्हाना माझ्या कार्यक्रमाला अंतिम स्वरूप आलेले होते.

कार्यक्रमाच्या दिवशी जेव्हा रसिक साडेचार वाजल्यापासूनच हॉलवर जागा धरून बसायला लागले तेव्हा कार्यक्रमाला रसिक येतील की नाही ही शंका लगेच मिटली. माझे दडपण वाढलेले होते. आता कार्यक्रम चोख पार पाडायचा होता. कार्यक्रमाला सुरुवात पं. नाना मुळ्येंच्या आठवणींनी झाली. नानांनी किशोरीताईंना त्यांच्या गुरू मोगुबाईंकडे शिकताना प्रत्यक्ष बघितले होते. नंतर पं. प्रदीप दीक्षितांनी ताईंच्याबरोबर साथीला बसतानाचे अनुभव रसिकांना सांगितले.

प्रदीपदा सांगत होते - एकदा एका कार्यक्रमात पखवाज फाटला पण ताई गाताना इतक्या समाधी अवस्थेत होत्या की त्यांना ते शेवटपर्यंत कळलेच नाही. आपल्या साथीदारांवर त्या मनापासून प्रेम करायच्या. आपल्याबरोबर विमानातून नेताना, आणताना बरोबरच्या सगळ्यांना समान पातळीवर वागवायच्या. आपण इतके मोठे कलाकार आहोत, याचा उगाच आव / रुबाब त्यांनी बरोबरच्यांना कधीच दाखवला नाही.

याच्याच पुढचा दुवा जुळवताना पं. शिरोडकर पती-पत्नी अगदी भारावून गेले होते. सीमाताईंनी यमन हा एकच राग तब्बल दीड-दोन महिने ताईंकडे शिकला. त्यामुळे नंतर कुठेही कुणाहीबरोबर कुठलाही राग वाजवताना रागाचा किस काढणं अगदी सोपं झालं असे सीमाताई म्हणाल्या. त्यामुळे आजही सीमाताईंची पेटी फारच वेगळी वाजते. विश्वनाथजींनी ताईंचा वेगळाच पैलू उलगडला. ताईंना काय आवडत नाही हे सांगताना पं. विश्वनाथजी म्हणाले- ताईंना १३ तारखेला प्रवास करायला बिलकुल आवडायचा नाही आणि हिरव्या रंगाचे कपडे. कुणी स्टेजवर हिरवा झब्बा वगैरे घालून आले तर त्यांना ताई तिथल्या तिथे हाकलून द्यायच्या. एकदा विमान प्रवासात ताईंना खूप बोअर झाले, म्हणून विश्वनाथजींनी त्यांना छान जोक सांगितल्यावर ताई मन:पूत हसत राहिल्या. विश्वनाथजी म्हणाले- ताईंना हसताना बघणं, त्यांना हसवायला मिळणं हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. यानिमित्तानं विश्वनाथजी तबला जितका छान वाजवतात तितकीच उत्कृष्ट मिमिक्री देखील करू शकतात हे रसिकांना कळले.

नंतर रविप्रकाशजींनी ताईंच्या प्रकाशित पुस्तकांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. ताईंनी ‘स्वरार्थरमणी’सारखे रागांचा विचार करणारे पुस्तक लिहिले. त्याच्या पाच आवृत्त्या प्रकाशित झाल्या. पण त्यावर अजूनही समीक्षा / परिचयात्मक लेख कुणीही लिहिला नाही. रविप्रकाश म्हणाले- त्या पुस्तकाचं वजन कुणीतरी आम्हा रसिकांना समजावून द्यायला हवं पण ते कुणी करायचं हा  प्रश्न आहे. ताई जितक्या टेरर होत्या तितक्या प्रेमळही होत्या, प्रचंड ज्ञानी होत्या. त्यांचे चरित्र कुणीतरी तटस्थपणे लिहायला हवे, पण ते फार जोखमीचे काम आहे असेही म्हणाले. नंतर ‘अवलिया’ अशोक कुलकर्णी यांनी मिलिंद सरांच्या पहिल्या परदेश प्रवासासाठी ताईंनी कशी परवानगी दिली याचे सुरेख वर्णन सांगितले.

या सत्राचा शेवट प्रा. केशव परांजपेंच्या विवेचनाने झाला. केशवदा जे काही बोलले त्यामुळे कार्यक्रम पार एका उंचीवर गेला. ताईंचे गाणे कसे होते याबद्दल विवेचन करताना ते म्हणाले- भारतीय शास्त्रीय संगीताचा विचार करताना भारतावरच्या आक्रमणापूर्वीची संगीत परंपरा ते आक्रमणानंतरची संगीत परंपरा यात मूलभूत फरक काय होता ते ताईंनी अभ्यासपूर्वक मांडले होते. ताईंच्या मते पूर्वी आत्मरंजनासाठी असलेले संगीत आक्रमणानंतर लोकरंजनापर्यंत जाऊन पोहचले. याच्या पार उलटा प्रवास ताईंनी केला. ताईंनी लोकरंजनापासून आत्मरंजनापर्यंतचा प्रवास केला. तो प्रवास ताईंसाठी सोपा नव्हता. मळलेली वाट सोडून, कळलंय ते मागे सोडून, जे नाही कळलं त्याचा आयुष्यभर ध्यास घेत राहणं, हा खरं तर आत्मक्लेषाचाच भाग होता. तो ताईंनी सहन केला. रॉबर्ट फ्रॉस्ट एके ठिकाणी म्हणतो, ‘I took the path, less travelled’. या रस्त्यावर आपण एकाकी पडण्याचा धोका असतो. अनिश्चितता, खाचखळगे असतात. तो धोका ताईंनी आपखूशीने स्वीकारला. पण या प्रवासात ताईंनी जी मिळकत मिळवली ती आज आम्हा सर्वांची झाली आहे. किशोरीताईंच्या अनेक मैफिली आठवताना त्यांच्यातला पंडित मनात उमटत राहतो. आपल्याकडे बरेचसे कलाकार आत्मप्रेरणेने गातात. ताईंच गाणे विद्वत्ताप्रचुर होते. बऱ्याचदा आपल्याकडे कलावंत गातो, पण त्याला त्याचे विश्लेषण करणे जमत नाही. ताई मात्र जे गायच्या ते समजून-उमजून गायच्या.

ताईंनी ‘स्वरार्थरमणी’ हा ग्रंथ तब्बल सहा-सात वर्षे लिहीत होत्या. परांजपे म्हणाले की- आम्ही तयार झालेले कागद बऱ्याचदा ताईंपासून लपवून ठेवायचो. कारण ताई परत-परत त्यात दुरुस्त्या सुचवायच्या.

इथे नारायणबुवा जोशींचा एक किस्सा आठवतोय. (गजानन बुवांचे पुत्र आणि पं. अहमदजान थिरकवाँ यांचे गंडाशागीर्द!) नारायणबुवा डोंबिवलीच्या प्रसिद्ध महिला तबलावादक सौ. ऐश्वर्या नाडकर्णींना तबल्याची तालीम द्यायचे. अनेक वर्षानंतर कधीतरी ते ऐश्वर्या मॅडमकडे यायचे, म्हणायचे- ‘तबला काढ, वाजव ‘ना धींन धींना....’ अगदी बेसिक. मॅडम म्हणायच्या- सर, हे काल झालंय. तर बुवा म्हणायचे- अग कालचा ना वेगळा होता, आजचा ना वेगळा आहे. तसेच किशोरीताईंचेही होते. सतत नवीन विचार ताईंच्या डोक्यात येत असायचे.

परांजपे आपल्या व्याखानाचा समारोप करताना इतकेच म्हणाले की- कुणालाही भारतीय शास्त्रीय संगीताचा समग्र विचार करताना किशोरीताईंनी निर्माण केलेले युग ओलांडल्याशिवाय पुढे जाणे शक्य नाही!

दुसऱ्या सत्राला सगळे ज्यांची आतुरतेनं वाट बघत होते त्या स्वरप्रज्ञ पं. मिलिंद रायकरांच्या व्हायोलिन वादनाने सुरुवात झाली. सरांना अनेक वर्षे ताईंचा अद्वितीय / अद्भुत असा सहवास लाभला. सत्संगाचा प्रभाव काय असतो ते त्या दिवशी त्यांच्या वादनाने रसिकांना जाणवल्याशिवाय राहिले नाही. परांजपे रायकरांना वाजवताना काही प्रश्न विचारून बोलते करत होते. केशवदा / मिलिंद आणि किशोरीताई हे त्रिकुट होते. बऱ्याचदा रायकरांवर ताई रागवायच्या. रागाचे कारण ही फारच क्षुल्लक असायचे. अशा वेळी परांजपे मध्यस्थी करायचे. ताईंनाही आपण उगाचच रागावतोय हे पटायचे. ताईंचे रायकरांवर अपार प्रेम होते. ताईंशी पहिली ओळख कशी झाली यावर बोलताना रायकर म्हणाले, ‘एकदा ताईंनी रायकरांना टीव्हीवर हंसध्वनी वाजवताना पाहिले. तेव्हा त्या प्रा. केशव परांजपेंना म्हणाल्या, ‘अरे, हा कोण मुलगा आहे, छान वाजवतोय. त्याला माझ्याकडे घेऊन या. मी त्याला हंसध्वनीमधला निषाद कसा लावायचा ते शिकवेन.’ मग रायकरांचा ताईंबरोबरचा सुरेल प्रवास सुरू झाला.

रायकरांच्या मते ताईंच्याकडे एक निरागस भाबडे पण होते. त्यांच्या अनेक चांगल्या / वाईट गोष्टी प्रसिद्ध आहेत. जेव्हा पं. रायकर ताईंकडे शिकायला लागले, तेव्हा त्यांना तांत्रिक गोष्टींची खूपच अडचण जाणवली. त्यातून सुटका करून घेणे इतके सोपे नव्हते. ताई म्हणायच्या, दाखवायच्या तसे व्हायोलिनमधून वाजवणे खूपच अशक्य व्हायचे. मग तासन् तास रियाझ, सतत चिंतन / मनन यातून हळूहळू रायकर त्या तांत्रिक अडचणींवर मात करू लागले. या प्रवासात त्यांना ताईंच्या शिष्या नंदिनी बेडेकर आणि पं. रघुनंदन पणशीकर यांनी अपार साथ दिली. आताशा रायकरांच्या वादनाची एक स्वतंत्र शैली निर्माण झाली आहे. पं. डी. के. दातारांकडे व्हायोलिन शिकताना ताईंकडे गायकी अंगाचे धडे घेणे परत मधल्या वेळेत शाळेची नोकरी करण्यासारखं. कारण नुकताच सुरू झालेला संसार. घरात रात्री आल्यावर उशिरापर्यंत रियाझ, कारण ताईंनी शिकवलेले दुसऱ्या दिवशी वाजायला तर हवे. इतक्या कष्टमय प्रवासात पत्नी महिमा हिची साथही मोलाची होती. या रायकर या सर्वांचे ऋण वेळोवेळी मान्य करतात. या सगळ्या प्रवासाबद्दल सतत कृतज्ञ असतात. साथीला बसलेला सरांचा मुलगा यज्ञेशही खूप छान वाजवतो. रायकर एकदा मुलुंडच्या कार्यक्रमात बसंती केदार वाजवत होते. साथीला यज्ञेश होता. वाजवताना अचानक थांबले. म्हणाले- मला बसंती केदारताईंनी तब्बल १६ वर्षांनी शिकवला. पण यज्ञेशची ताईंकडची शिकवणी बसंती केदारनेच सुरू झाली.

भूप गावा तर ताईंनीच. किंबहूना भूप रागातली ‘सहेला रे’ ही बंदीश ताईंनी अजरामर करून ठेवली आहे. रायकरांनी खूप वर्षांनी जेव्हा ताईंना सांगितले की ताई मला ‘भूप’ द्या. तेव्हा ताईंचे पहिले वाक्य होते- ‘अरे, मलाच ’भूप’ अजून नीट जमत नाही. मी तुला काय शिकवणार?’ पण रायकरांनी जेव्हा खूप हट्ट केला, तेव्हा ताईंनी स्वत:च तंबोरा जुळवला. आणि तब्बल तीस - चाळीस मिनिटे ‘सहेला रे’ ही एकच ओळ २५-३० वेगवेगळ्या प्रकारे गाऊन दाखवली. तेव्हा रायकर या अदभुताकडे पाहून निव्वळ अचंबितच झाले. तीच पाळी आम्हां रसिकांवर आली, जेव्हा रायकरांनी स्टेजवर तीच ओळ गुणगुणून दाखवली. आज रायकर ताईंची भूपमधली मिंड जेव्हा लिलया वाजवतात, तेव्हा आपल्याच अंगावर रोमांच उभे राहतात. ताई सूरांवर प्रेम करायच्या. त्यांना रायकरांमधला सच्चा सूर जाणवला, तेव्हा गुरू या नात्यानं त्यांनी सरांना भरपूर दिले. रायकर यावर म्हणतात- मला दिलं भरपूर, पण मलाच घेणं जमलं नाही.

एकदा नेहरू सेंटरला ताईंचा कार्यक्रम होता. भूप गायचा असे ठरलेले. ताई मिलिंदजींना म्हणाल्या- ‘माझा हात धर बघू.’ रायकरांनी हात धरला तर हात अगदी थंड पडलेला. सरांनी चमकून ताईंकडे बघितलं. ताई म्हणाल्या, ‘बघ इतकी भीती वाटतेय, मला हे जमेल का नाही?याची धास्ती वाटते. मी कशी गाते यापेक्षा मी गाणार आहे तो राग नीट समोर उभा राहणं महत्त्वाचं आहे. त्या रागाचा चेहरा रसिकांना दाखवता आला पाहिजे.’ ताईंना स्वत:ची अनुभूती होती. ती त्यांनी रसिकांपर्यत सातत्याने पोहचवण्याचा प्रयत्न केला.

रायकरांनी हंसध्वनीने सुरुवात केली नंतर ‘भूप’वाजवताना ते म्हणाले- “सहेला रे’....या ताईंच्या अजरामर आलापीत सारं ब्रम्हांड सामावलेलं आहे. मी प्रयत्न करतो ते तुमच्यासमोर सादर करण्याचा.’ त्यानंतर ‘भूप’काय वाजलाय म्हणून सांगू? ताईंचा मागचा मोठ्ठा फोटो, रायकरांचा वेडावणारा ‘भूप’, सारं वातावरण अगदी मंत्रमुग्ध झाल्यासारखे होते. त्याच बंदिशीतली ‘अब के मिले तो बिछुड ना जाये...’ ही ओळ वाजवताना रायकरांचा उर अगदी भरून आला होता. दोन सेकंदाचा विसावा घेऊन ते परत सूरांमध्ये डुंबून गेले.

नंतर यज्ञेश सांगत होता की- मला वाटत राहिलं की साक्षात ताईच गात आहेत आणि मी प्रत्यक्ष त्या सरस्वतीलाच साथ करतोय. माझ्या नेणिवेतून बाबांचं अस्तित्वच मिटून गेलं होतं. आमचा फोटोग्राफर मित्र मला सांगत होता की, त्या वेळी मी इतका भारावलो होतो, एका वेगळ्या ऊर्जेने भारलेला होतो की, मलाच कळत नव्हतं मी काय करतोय. माझ्या प्रत्येक कृतीत नकळत एकलय भरली होती.

तबल्यावर विश्वनाथजी छान खुलले होते. नंतर रायकरांनी बसंती केदार वाजवला. तेव्हा रसिकांना घेता किती घेशील दो करांनी असेच वाटत राहिलं. थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन एकदा एका गणिताच्या प्रयोग शाळेत भेट द्यायला गेला होता. तिथे सर्वजण गणित या विषयावरच संशोधन / प्रयोग / चर्चा करत होते. हे बघून तो थोर शास्त्रज्ञ म्हणाला होता- ‘या वास्तूला गणितानं इतकं भारलंय की सहज जरी हवेत हात फिरवला तरी एखादं सूत्र हातात येईल की काय, असे वाटते.’ रायकरांच्या वादनाने हॉलमध्येही अशाच भारलेल्या सूरांचा प्रत्यय येत होता. आपण सहज जरी हवेत हात फिरवला तरी एखादा सूर चटकन हाताला लागेल की काय असेच वाटत राहिले.

नंतर पं. प्रदीप दीक्षित ‘अवघा रंग एक झाला’ या भजनासाठी साथीला बसले. सरते शेवटी नाना मुळये उत्स्फुर्तपणे तब्ल्यावर बसले. रायकरांनी ‘म्हारो प्रणाम’आणि शेवटी प्रसिद्ध भैरवी ‘बाबूल मोरा’ने कार्यक्रमाची सांगता केली. सारा हॉल त्या भैरवीच्या करुण सूरांवर तरंगत होता. लोकांना कार्यक्रम संपल्याची शुद्धच नव्हती. ताईंचे गाणे रायकरांच्या व्हायोलिनमधून निरागसपणे उमटत होते. तेव्हा त्यातली अनुभूती रसिकांनाही अनुभवता येत होती. रसिकांबरोबर सरांच्या व्हायोलिन वादनाचे एक द्वैत जुळले होते. एक वर्तुळ पूर्ण झाले होते! मैफल संपली तरी रसिक हलेनात. सरांनी हात जोडले. एखाद दोनसेकंदाचा तो सन्नाटा पार आतपर्यंत झिरपत राहिला.

यहुदी मेन्यूहीन म्हणतो- ‘संगीताचा अंतिम प्रवास निश:ब्दाच्या दिशेनेच व्हायला हवा.’ त्याचा प्रत्यय आम्ही सारेच प्रत्यक्ष घेत होतो.

 

magnakul@rediffmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......