अजूनकाही
आज २१ मे २०१७. शर्मिष्ठा भोसले आणि सदानंद घायाळ अशा आम्ही दोघांनी लग्न केलं त्याला एक वर्ष पूर्ण झालंय. दिवस गाफीलपणे उलटतात तसं एक वर्ष होतं. पाच-पंचवीस-तीस-पन्नास वर्षही होतात. समाजशास्त्रीय संदर्भात तर दहा वर्षांसारखा मोठ्ठा काळही अगदीच लहान असतो. मग एक वर्षाचं ते काय कवतिक! पण तरीही हे सगळं समोर ठेवावं वाटलं, एकमेकांच्या आणि तुमच्याही.
आम्हाला लग्न नावाचा प्रयोग करून पहायचा होता. तसा तो केला. आम्ही एकमेकांना पूरक असू अशी बरीच खात्री वाटत होती. तसेच सतत असू याची ग्वाही मात्र एकमेकांना कधी दिली नाही. सात जन्म तसेच असत राहू अशा आणाभाका अजिबातच घेतल्या नाहीत. कारण ‘हाऊ टू गेट एंड स्टे हॅपिली मॅरिड’ टाईपचा कुठलाही एकच एक फॉर्म्युला नसतो असं मला वाटतं. तसा तो असूही नये, तो प्रत्येकानं आपापला शोधावा. सापडला तर खासच. मात्र सापडला नाही तर एकमेकांच्या शोधण्याच्या क्षमतेवर मात्र शंका घेऊ नये.
या वर्षभरात जे काय-काय घडलं त्यातले हे काही मोजके अडखळायला-थबकायला लावणारे क्षण.
सदाच्या तुलनेत मी अधिक ‘सोशल’ आहे. माझे संपर्क, ओळखी जरा जास्त आहेत. अर्थात, आम्ही दोघेही हे समजून-उमजून आहोत. सदा माझ्याइतका ‘सोशल’ नसला तरी माझ्याहून बराच अधिक समंजस नक्की आहे. याचा प्रत्यय मला लग्नाआधी अनेकदा आलाच होता. पण लग्नानंतर गणितं बदलतात, या गृहितकाला छेद देत नंतरही तो येत राहिला. मला आठवतं, आमच्या लग्नाला आठवडाच झाला होता, तेव्हाचा एक संवाद. आम्ही एका सार्वजनिक कार्यक्रमात सोबत गेलो. तिकडं आमचे माध्यमात काम करणारे बरेच मित्र भेटले. मी सध्या मुक्तपत्रकार म्हणून काम करत असल्याने माझे लेख वेगवेगळ्या वृत्तपत्रांत आणि नियतकालिकांतून येत असायचे. एक लेख नुकताच एका रविवार पुरवणीत प्रकाशित झाला होता. त्याचं कौतुक करताकरताच आमचा एक कॉमन मित्र उद्गारला, ‘सदा, आता तुला सगळे ‘शर्मिष्ठाचा नवरा’ म्हणून ओळखणार बघ यापुढं!’ मला हे बरंच खटकलं. पण मी काही म्हणण्याआधीच ‘चालतंय की मग!’ म्हणत सदा मोकळं हसला.
पुढंही एकदा आमचा एक मित्र भेटल्यावर अचानकच बोलून गेला, ‘सदा, शर्मिष्ठा तर काही तुझं नाव लावत नाही. मग आता तुच ‘सदानंद शर्मिष्ठा भोसले’ असं नाव लावत जा!’
दोन्ही प्रसंग तसे अवघड, नाजूकच. पुरुषाच्या ‘इगो’ला दुखावणारे. ‘अभिमान’ सिनेमाची कथा वास्तवात घडण्याचा इशारा देणारे. पण आम्ही दोघं मात्र वापस येताना रस्ताभर या सगळ्याकडं द ग्रेट विजय तेंडुलकर यांनी सांगितल्याप्रमाणं ‘हे सगळं कुठून येतं’ अशा नजरेनं पाहत राहिलो. एक लहानशी ‘केस स्टडी’च केली. निष्कर्ष निघाला की, किमान पातळीवरही समतेची कल्पना मनाशी घेऊन सहजीवन जगू पाहणारे समोरच्या समाज आणि व्यक्तीच्या मनात एक असुरक्षितता जागवतात. नवरा किंवा बायको, अशा कुणा तरी एकाला, बहुतेकदा बायकोलाच कनिष्ठ रूपात प्रेझेंट करून, तिचं अनेकार्थानं शोषण करून बहुतेक विवाह आणि सहजीवनच्या कथा ‘सफळ संपूर्ण’ होतात. अशा वेळी हे डोळसपणे नाकारणाऱ्या दोघांचं काय करायचं, त्यांच्या सहजीवनाला कुठलं लेबल लावायचं याबाबत अनेक जण साहजिकच संभ्रमात पडतात, बावचळून जातात. त्यातून हे सगळं येत असावं.
घरी मित्र-मैत्रिणी, नातेवाईक येतात तेव्हा एका अनावर उत्सुकतेनं विचारून मोकळे होतात,
‘मग, स्वयंपाक कोण करतं तुमच्यात?’,
‘काय गं, सदा लसूण वगैरे सोलून देतो ना तुला?’
‘सदा, शर्मिष्ठा तर तुला खूप घरकाम करायला लावत असेल ना?’
हे प्रश्न अर्थातच आम्हाला ‘ऑड’ वाटतात. कारण कोण कुठलं काम करतं वा करत नाही याहून आमच्या ‘प्रायोरिटीज’ खूप वेगळ्या असतात. ही कामं एका उत्स्फूर्त सामंजस्यानं आम्ही कुणीही करून टाकतो, त्या त्या वेळी. ठरवून काहीच कुणी करत नाही. पण याहून जास्त ‘ऑड’ मला एक न विचारली गेलेली गोष्ट वाटते. ती ही, की ‘तुम्हा दोघांच्यात आर्थिक समन्वय किती आहे? अर्थविषयक समता आहे का?’ हे आम्हाला कुणीच विचारत नाही. ‘घरकाम वाटून घेतलं की आली समता’ असा सोप्पा पण फसवा-दिखावू अर्थ लावतात. बाई कमावती बनलेल्या काळात ‘समता’ या संकल्पनेला मिळालेले गुंतागुंतीचे नवे अदृश्य पदर सहज नजरअंदाज करून टाकतात.
कारण मला वाटतं, आजघडीला इतर बहुतांश प्रकारची समता बाई झगडून किंवा सहज मिळवू शकेल. पण आर्थिक, अर्थविषयक समता म्हणलं की, गोष्टी लगोलग ‘क्रुशियल बनतात.’ माझी एक प्राध्यापक मैत्रीण सांगत होती तिच्या अनेक मैत्रिणींची दु:खं. एकीचा नवरा तिचं एटीएम कायम स्वत:च वापरतो. दुसऱ्या एकीचा नवरा ती मैत्रीण कामावर निघण्याच्या घाईत असली, की तेव्हाच धोरणीपणे महत्त्वाच्या कागदपत्रांवर तिच्या सह्या घेतो. आज समतावादी स्त्री-पुरुषांच्या समोर आव्हान असलेले प्रश्न हे आहेत. ‘कांदा-लसूण’वाल्या समतेचं उदात्तीकरण अजून किती काळ करायचं? मी आजवर आर्थिक बाबतीत सततच वेंधळी राहत आले. माझ्या या अज्ञानात स्वत:चं सुख न मानता सदा मात्र मला अर्थसाक्षरतेचं महत्त्व नीटपणे सांगतो. मलाही आता त्या सगळ्याचं दडपण येत नाही तर कुतूहल वाटतं. उलट, माझ्या निर्णयक्षम आणि मुक्त बनण्याच्या प्रवासातली ही आजवर निसटलेली पायरीच मी त्याच्यासोबतीनं चढते आहे.
एकदा एका कार्यक्रमात एक जुजबी ओळख असलेली एक व्यक्ती भेटली. म्हणाली, ‘मॅडम तुम्ही इतक्या विषयांवर लिहिता, कुठंकुठं फिरता, सर तुम्हाला इतकं स्वातंत्र्य देतात हे खूपच छान!’ मी रिएक्ट होण्याचा मोह टाळत नुसतीच हसले. सदा मात्र उत्स्फूर्तपणे बोलून गेला, ‘तिचं स्वातंत्र्य तिच्याजवळ, आन माझं माझ्याजवळ. आम्ही दोघंही त्याची कुठली देवाणघेवाण करत नाही.’ एरवी सभासंमेलनातल्या सडेतोड वगैरे वक्तृत्वासाठी प्रसिद्ध असलेली ती व्यक्ती गपगार झाली.
मी सतत एका अनामिक अस्वस्थतेने लपेटलेली असते. कधी एकदमच उदास होते, तशी एकाएकी आनंदाने उचंबळूनही जाते. स्वत:विषयी तर सतत असमाधानी असते. मासिक पाळीच्या काळात तर हे ‘मूड स्विंग्ज’ बऱ्याचदा तीव्र बनतात. हे सगळं तो शास्त्रशुद्ध पद्धतीनं जाणून असतो. न समजणाऱ्या गोष्टी स्वत:हून, योग्य तेच संदर्भ तपासून, मिळवून वाचतो. मलाही आवर्जून वाचायला देतो. हे असं कुतूहल जगण्यातल्या इतरही अनेक गोष्टींबाबत त्याच्यात जागतं असतं. त्याची धग माझ्याही आत पोचत राहते.
चकाकत्या मैत्रीचा वर्ख थोडा हटवून पाहिला की दिसतं, आमच्या सहजीवनाचा गाभाच मुळात संवाद आहे. सतत वाहता, निर्हेतुक-सहेतुक, सापेक्ष-निरपेक्ष, विदेह-सदेह असा संवाद. या संवादानंच आमच्यात कधीच नसलेला संकोच, अवघडलेपण आणि औपचारिकता यांना सतत नात्यातून दूर ठेवलंय. आमच्यात एक ‘नवरा-बायको’ असं रजिस्टर लग्नपद्धतीतून अस्तित्वात आणलेलं कायदेशीर नातं असलं तरी एकमेकांकडे केवढ्या तरी तटस्थ, वस्तुनिष्ठपणे आम्ही पाहू शकतो, ते पाहून झाल्यानंतरची ‘अनसेन्सॉर्ड’ निरीक्षणं थेटपणे नोंदवू शकतो. या सगळ्यांतून ‘तो पुरुष आणि मी स्त्री’ या शारीर ओळखीपलीकडे जात आम्ही अधिकाधिक ‘माणूस’ बनत जातो. संवादी असण्याचं प्रतिबिंब अगदी दैनंदिन व्यवहारांपासून ते आर्थिक, शारीर व्यवहारांमध्येही सुरेखपणे उमटत राहतं. मी मग नात्याच्या प्रत्यक्ष प्रतिमेपेक्षा या प्रतिबिंबाच्याच प्रेमात पडत राहते...
पुण्यात साने गुरुजी स्मारकात लग्न केलं तेव्हा मागे पडद्यावर स्वातंत्र्य, समता, सहअनुभूती, सामाजिकता आणि सहजीवन असे पाच शब्द लिहिल्रे होते. आमचे दोस्त अभिषेक भोसले, नम्रता भिंगार्डे, अजय नेत्रगावकर, प्रवीण खुंटे आणि स्नेहा पाटोळे या सगळ्यांनी थर्माकोलची कापाकापी करून रात्रभर ते तयार केले. गेले वर्षभर या शब्दांना व्यवहारात रुजवण्याचे संयुक्त प्रयत्न आम्ही करतानाही हे सगळे दोस्तलोक सोबत असतात.
तर, आम्ही एकमेकांना आणि स्वत:लाही शोधतोय. या शोधात एकमेकांना सोबत देतोय. वाटायलंय, अंतिम सत्य’ सापडत नाही, शोध संपत नाही म्हणूनच आम्ही सोबत आहोत...
आम्हा दोघांचे आई-वडील आणि नातेवाईक यांनीही आम्हाला हे नातं हाताळण्याचा अवकाश पुरेपूर मिळवू दिला. कसलाच अधिकचा हस्तक्षेप न करता शोध घेण्याची मुभा दिली याचंही मोल खूप आहे.
आणि शेवटी हे काल सुचलेलं -
मोहाच्या सगळ्या सुरया
रिकाम्या होतील
तेव्हा काय देणार आहोत आपण एकमेकांना
रक्तातले सगळे शहारे मरून जातील
तेव्हा काय उरेल तुझ्यामाझ्यात
ओले मऊसूत स्त्राव आटून जातील
तेव्हा काय पाझरेल त्वचेबाहेर आणि आत?
येणाऱ्या अपरिहार्य मोसमासाठी
बेगमी करून ठेवायला पाहिजे
सजीव, समंजस स्पर्शांची
लेखिका मुक्त पत्रकार आहेत.
sharmishtha.2011@gmail.com
……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
arun tingote
Sat , 28 July 2018
उत्कट. खूप सुरेख लिहिल आहे. सहजीवन आनंदी बाब आहे, अशी माझी धारण होती. पण सहजीवन त्यापेक्षा अधिक काहीतरी आहे, हे हा लेख वाचताना जाणवत राहत. शुभेच्छा.
arun tingote
Sat , 28 July 2018
उत्कट. खूप सुरेख लिहिल आहे. सहजीवन आनंदी बाब आहे, अशी माझी धारण होती. पण सहजीवन त्यापेक्षा अधिक काहीतरी आहे, हे हा लेख वाचताना जाणवत राहत. शुभेच्छा.
rupali chougule
Fri , 26 May 2017
Apratim lekh........kontyahi savedanshil mansala adhik samruddh karnara.........
Pravin Khunte
Fri , 26 May 2017
खुपच मस्त... आम्हालाही असे अनेक अनूभव येत आहेत.
Pravin Khunte
Fri , 26 May 2017
खुपच मस्त... आम्हालाही असे अनेक अनूभव येत आहेत.
Bhagyashree Bhagwat
Sun , 21 May 2017
लेख छानच पण कविता एक नंबर! शुभेच्छा!