भाऊराव कऱ्हाडे : ‘त्या हॉटेलमधला एकही पदार्थ आम्ही कधी पाहिला नव्हता’
दिवाळी २०१७ - मुलाखत
मुलाखत – प्राजक्ता शेट्टीगर
  • दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे. खालील छायाचित्रे - ‘ख्वाडा’मधील दृश्ये
  • Fri , 28 October 2016
  • भाऊराव कऱ्हाडे ख्वाडा बबन Khwada Bhaurao Karhade

राष्ट्रीय पुरस्कारामुळे तुमची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. पण एका छोट्याशा खेड्यातून चित्रपट दिग्दर्शकापर्यंतचा तुमचा प्रवास कधी आणि कसा सुरू झाला? 

माझा जन्म पुण्याजवळील शिरूर या छोट्याशा गावात झाला. माझ्या घरात कोणीच चौथीच्या पुढं शिकलेलं नव्हतं. त्यामुळे मी पाचवीत गेल्यानंतर माझ्या कुटुंबीयांना प्रचंड आनंद झाला होता. आमच्या गावात गणपतीत, कोणाच्या घरात लग्न असेल तर कॅसेट आणून चित्रपट दाखवला जात असे. मी पाच-सहा वर्षांचा असताना माझ्या आयुष्यातील पहिला चित्रपट पाहिला. ‘मैंने प्यार किया’ हा तो चित्रपट होता. या चित्रपटातील ‘कबूतर जा...’ हे गाणं मला खूप आवडलं होतं. चित्रपट हिंदी असल्यानं तेव्हा त्यातल्या अनेक गोष्टी कळल्या नव्हत्या. केवळ ‘कबूतर जा...’ या गाण्यात अभिनेत्री कबुतराला जायला सांगते एवढंच मला कळलं होतं. पण चित्रपट पाहण्याची आवड या चित्रपटानंतरच निर्माण झाली. त्यावेळी माझ्या गावात एक टीव्ही होता. त्यावर मी दूरदर्शनवरील मालिका, चित्रपट पाहत असे. दूरदर्शनवर लागणारे चित्रपट तर मी कधीच चुकवले नाहीत. पाचवीला जाईपर्यंत गावातल्या शाळेतच जात होतो. त्यानंतर हायस्कूलला शिरूरला जायला लागलो. शिरूरला मिनी थिएटर होतं. तिथं मी शाळा बुडवून चित्रपट पाहत असे. त्यामुळे चित्रपटांविषयीची आवड अधिक वाढत गेली. आठवी-नववीला जाईपर्यंत चित्रपटांसोबतच कादंबऱ्या वाचण्याचा छंद मला लागला. त्यामुळे साहित्याची ओळख झाली. दहावीनंतर आपण दिग्दर्शक व्हायचं असं मी ठरवलं. 

पंधरा-सोळा वर्षाच्या मुलाला अभिनेता व्हावसं वाटतं. तुम्ही त्या मार्गानं न जाता एकदम दिग्दर्शक व्हायचं ठरवलं. ते कसं?

खेडेगावातील मुलगा असल्यानं चित्रपट म्हणजे काय, तो कसा बनवला जातो, याची मला काहीच कल्पना नव्हती. अमिताभ बच्चन, शाहरूख खान, अजय देवगण यांचे चित्रपट पाहत मी लहानाचा मोठा झालो आहे. ते पाहाताना हे चित्रपट हेच अभिनेते बनवतात असंच मला वाटत असे. चित्रपट बनवण्यासाठी काही तांत्रिक गोष्टी गरजेच्या असतात, याची मला तेव्हा कल्पनाच नव्हती. पण दहावी झाल्यानंतर एका वर्तमानपत्रात एक लेख वाचला. चित्रपट कशा प्रकारे बनवला जातो, चित्रपट बनवताना कोण कोण त्यात कसकशा भूमिका साकारतात याची माहिती त्यात दिली होती. ती वाचल्यानंतर चित्रपटात दिग्दर्शक हा सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावतो, हे माझ्या लक्षात आलं. त्यावेळी मी दिग्दर्शक बनण्याचा निर्णय घेतला. त्याच लेखामध्ये दिग्दर्शक बनण्यासाठी एफटीआयमधून शिक्षण घ्यावं लागतं असं म्हटलं होतं, पण हे एफटीआय आहे कुठे आणि त्यात प्रवेश कसा मिळवायचा, याची मला काहीच माहिती नव्हती. कोणाकडे चौकशी करावी तसा कुणी माणूसही माहीत नव्हता. त्यामुळे दहावीनंतर गावाजवळच्या एका कॉलेजमध्ये कला शाखेत प्रवेश घेतला. कॉलेजला जात असलो तरी माझ्या डोक्यातून एफटीआयचं खूळ गेलेलं नव्हते. काही दिवसांनी एफटीआय पुण्यात असल्याचं काहीजणांकडून कळलं. 

मग एफटीआयविषयीची माहिती कशी मिळवली?

आम्ही शेतात कांदा लावत असू. त्याच्या विक्रीसाठी आम्हाला पुण्याच्या बाजारात जावं लागे. बारावीनंतर वर्षभर मी काहीच करत नव्हतो. घरीच बसून होतो. त्यामुळे मी घरातल्यांना कामात मदत करत असे. एके दिवशी पुण्यातील गुलटेकडीला कांदा विकायला गेलो. त्यावेळी घरातल्यांना काहीही न सांगता एफटीआयला जाऊन चौकशी केली. तिथं गेल्यानंतर प्रवेश मिळवण्यासाठी पदवीधारक असणं गरजेचं आहे हे मला कळलं. मग मी लगेचच बी.ए साठी प्रवेश घेतला. यशवंतराव विद्यापीठातून बी.ए. पूर्ण केलं. त्यानंतर मास कम्युनिकेशनला प्रवेश घेतला. खरं तर हे सगळं माझ्या कुटुंबीयांना समजण्याच्या पलीकडचं होतं. पण तरीही त्यांनी मला कधीही विरोध केला नाही. मास कम्युनिकेशन करत असताना समर नखाते सरांशी माझी ओळख झाली. त्यांच्याकडे मी दिग्दर्शनाचे धडे गिरवले. ते मला दिग्दर्शनाबाबत बारीकसारीक गोष्टी सांगत असत. 

मास कम्युनिकेशन केल्यानंतर लगेच ‘ख्वाडा’ बनवायचा निर्णय घेतलात?

नखाते सरांकडून दिग्दर्शनाविषयी अनेक गोष्टी शिकल्यानंतर दिग्दर्शन करण्याचा विचार केला आणि २०११मध्ये ‘ख्वाडा’ या चित्रपटाची पटकथा लिहायला सुरुवात केली. २०१२पर्यंत माझी कथा लिहून झाली. पण चित्रपट बनवायचा तर पैसा हवा. माझ्याकडे तो नव्हता आणि कुणी निर्माताही नव्हता. त्यामुळे मी थोडीशी शेतजमीन विकून चित्रपट बनवायचा ठरवलं. २०१३मध्ये चित्रीकरणाला सुरुवातकेली. या चित्रपटात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिली. पण चित्रीकरण करायला सुरुवात केल्यानंतर चित्रपट बनवणं किती अवघड असतं हे मला कळलं. कारण प्रत्येक टप्प्यावर पैशांची गरज होती. पैशांच्या कमतरतेमुळे २०१३ला चित्रपटाचं अर्धंच चित्रीकरण झालं. सतत पैशांची चणचण भासत होती. त्यावेळी काही मित्रांनी पैशांची मदत केली. अजून थोडी शेतजमीन विकली आणि चित्रीकरण पूर्ण केलं. ‘ख्वाडा’ तयार झाला होता, पण तो लोकांपर्यंत पोहोचवायचा कसा हे कळत नव्हतं. माझ्याकडचे सगळे पैसे संपले होते. चित्रपट प्रदर्शित कसा होणार हा प्रश्न आ वासून उभा होता. हा चित्रपट मी वेगवेगळ्या फेस्टिव्हल्समध्ये पाठवू लागलो. पहिल्यांदा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हमध्ये ‘ख्वाडा’ दाखवण्यात आला. त्यानंतर त्याची पुण्यात बरीच चर्चा झाली. पण पुण्याबाहेर कोणाला या चित्रपटाबाबत माहीत नव्हतं. पण मग ‘ख्वाडा’ राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि एका क्षणात सगळ्या गोष्टी बदलल्या.

या पुरस्काराचा ‘ख्वाडा’च्या प्रदर्शनाला फायदा झाला का?

‘ख्वाडा’ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर झालेला आनंद मी आजही शब्दांत व्यक्त करू शकत नाही. पुरस्कार मिळाल्यानंतर प्रवास सोपा होईल असं वाटलं होतं, पण तो प्रवास तितकास अवघड होता. पुरस्कारानंतर प्रसारमाध्यमांमध्ये ‘ख्वाडा’ची चर्चा झाली. पण त्यावेळी चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी माझ्याकडे पैसा नव्हता. ‘ख्वाडा’चा गाजावाजा खूप झाला. त्यामुळे त्याचवेळी चित्रपट प्रदर्शित करण्याचा माझा विचार होता. राष्ट्रीय पुरस्कारामुळे कोणीतरी निर्माता पुढे येईल असं वाटत होतं, पण तसं काहीही झालं नाही. त्यामुळे ‘ख्वाडा’ प्रदर्शित व्हायला खूप वेळ लागला. परिणामी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचला आलं नाही. पुरस्कारानंतर ‘ख्वाडा’ लगेचच प्रदर्शित झाला असता तर अधिक फायदा झाला असता. पण हेही तितकंच खरं की, राष्ट्रीय पुरस्कार मिळाला म्हणून ‘ख्वाडा’ प्रदर्शित तरी झाला, नाहीतर कदाचित तो कधीच प्रदर्शित झाला नसता.

या पुरस्कारामुळे तुम्ही पहिल्यांदाच दिल्लीपर्यंतचा प्रवास केला ना?

या पुरस्कारानं माझं आयुष्यच बदलून गेलं. पुरस्कार स्वीकारण्यासाठी दिल्लीला आमंत्रित करण्यात आलं होतं. मी आणि माझी आई दिल्लीला गेलो. तेव्हा पहिल्यांदाच आम्ही विमानात बसलो. माझी आई तर कधी शिरुरपासून वीस किलोमीटर दूर अंतरावरही गेली नव्हती. कारण तिला गाडीत बसल्यावर उलटी होते. त्यामुळे ती दिल्लीपर्यंत कशी येईल याची आम्हाला चिंता होती. विमानात बसायला तर ती खूपच घाबरली होती. पण विमानाने टेक ऑफ घेतल्यानंतर तिची भीती क्षणात निघून गेली. ‘मी घरातच बसली आहे असं मला वाटतंय’ असं ती मला म्हणाली. दिल्लीला पोहोचून हॉटेलला गेल्यावर तर आमची चांगलीच तारांबळ उडाली. कारण त्या हॉटेलमध्ये असणारा एकही पदार्थ आम्ही कधीच पाहिला नव्हता. काय खायचं हा आम्हा दोघांना प्रश्नच पडला. तरीही आम्ही लोक काय खातात हे पाहून दिवस घालवला. त्यानंतर पुरस्कार घेण्यासाठी आम्ही राष्ट्रपती भवनात गेलो. इतका मोठा सोहळा तोवर मी कधीच पाहिला नव्हता. देशाचे राष्ट्रपती भेटतील, सन्मान करतील असं कधी वाटलंही नव्हतं.

‘ख्वाडा’नंतर काय? पुढचा चित्रपट कुठला करताय?

 ‘बबन’ हा माझा दुसरा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची कथा तयार असून काहीच दिवसांतच त्याच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल. 

 

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख