लग्नापूर्वीचा मस्त गोंधळ
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
श्रीकांत ना. कुलकर्णी
  • 'चि. आणि चि. सौ. का.' चं एक पोस्टर
  • Sun , 21 May 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा 'चि. आणि चि. सौ. का Chi Ani Chi Sau Ka परेश मोकाशी Paresh Mokashi मृण्मयी गोडबोले Mrinmayee Godbole ललित प्रभाकर Lalit Prabhakar

'विवाह' या संकल्पनेत प्रामुख्याने दोन जीवांचे 'मीलन' असले तरी त्याचबरोबर दोन कुटुंबांचेही 'मीलन' अभिप्रेत असते. बदलत्या काळानुसार विवाहाच्या संकल्पनाही खूप बदलत चालल्या आहेत. तरुण मुलामुलींच्या आपल्या जोडीदाराबाबतच्या अपेक्षा इतक्या वाढल्या आहेत की, 'विवाह' एक प्रमुख सामाजिक समस्या बनली आहे. हल्लीच्या काळातील तरुण मुलामुलींच्या आपल्या जोडीदाराबाबत किती अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत तर लग्नापूर्वीच कसा गोंधळ उडतो हे पाहायचे असेल तर प्रसिद्ध दिग्दर्शक परेश मोकाशी यांचा 'चि. आणि चि. सौ. का.' हा नवा चित्रपट जरूर पाहायला हवा. आपल्या जोडीदाराबाबत आशा-अपेक्षांचे ओझे घेऊन लग्नाच्या बाजारात उतरलेले वधू-वर आणि कधी एकदा यांच्या डोक्यावर अक्षता पडतात याची वाट पाहणारे उभयतांचे आई-वडील आणि इतर आप्तेष्ट मंडळी यांच्या 'लगीनघाई'ला विनोद आणि उपहासाची अशी खमंग फोडणी देण्यात आली आहे की, लग्नापूर्वीचा हा गोंधळ खूपच छान रंगला आहे.

उपवर असलेली सावित्री (सावी) ही 'प्राणीप्रेमी' आहे तर उपवधू असलेला सत्यप्रकाश (सत्या) हा 'पाणीप्रेमी' आहे. शिवाय सौरक्षेत्रात वेगवेगळे उपक्रम करण्याची त्याला आवड आहे. सावी ही 'प्राणीप्रेमी' असल्यामुळे शुद्ध शाकाहारी तर सत्या चक्क मांसाहारी. 'सावी'ला पाहायला म्हणून जेव्हा सत्या येतो तेव्हा एकमेकांच्या आवडी-निवडी कळण्यासाठी लग्नाआधी एक महिनाभर एकत्र राहण्याची विचित्र  अट सावी त्याला घालते. ही अट सत्या मंजूर करतो, मात्र उभयतांच्या आईवडिलांना ही अट मुळीच मंजूर नसते. त्यामुळे हे लग्न जमवण्याऐवजी मोडण्याकडेच त्यांचा कल असतो. त्यामुळे एकत्र राहताना सावी आणि सत्याची कशी धमाल उडते आणि त्यांचे अखेर 'शुभमंगल' होते की नाही हे सारे पडद्यावर पाहणेच अधिक संयुक्तिक ठरेल.

सावी आणि सत्या खेरीज उभयतांच्या घरातील इतर पात्रे अक्षरश: 'वेचून' घेतल्यासारखी घेतली आहेत. त्यामुळे ही 'पात्रे' पडद्यावर मजा आणतात. त्यातही सावीच्या धाकट्या भावाच्या भूमिकेतील पुष्कर लोणारकरने केलेला विनोद हा 'बिलंदर कार्ट्या'ला साजेसा ठरला आहे. याशिवाय सत्याच्या आजीचे प्रेमप्रकरणही कथेत चांगली रंगत आणते. मधुगंधा कुलकर्णी यांचे मार्मिक संवाद हे या चित्रपटाचे मोठे बलस्थान आहे. विवाह, बदलत्या काळातील मुलां-मुलीच्या वाढत्या अपेक्षा आणि परंपरा व रितीभात याविषयीचे 'प्रहसन' त्यांना संवादातून चांगले जमले आहे.

चित्रपटाची कथा 'सूत्रधार' बनलेल्या विवाह नोंदणी निरीक्षकाकडून सांगण्याची कल्पनाही कथेशी सुसंगत वाटते. 'दे. व. ब्रह्मे' नावाची ही भूमिका भारत गणेशपुरे यांनी झोकात रंगवली आहे. सावी झालेल्या मृण्मयी गोडबोले हिचा नायिका म्हणून पहिलाच चित्रपट. तिने सावीची भूमिका खूपच आत्मविश्वासाने रंगवली आहे. त्यामानाने सत्या झालेला ललित प्रभाकर हा विनोदी भूमिकेत कमी पडतो. प्रदीप जोशी, सुप्रिया पाठारे, पौर्णिमा तळवलकर, सुनील अभ्यंकर, शर्मिष्ठा राऊत यांनीही आपापल्या भूमिका छान रंगवल्या आहेत. संगीतकार नरेंद्र भिडे यांची दोन गाणीही श्रवणीय आहेत.
साधारणपणे आपल्याकडे लग्नानंतर गोंधळ घालण्याची परंपरा आहे, मात्र दिग्दर्शक परेश मोकाशी आणि त्यांच्या 'टीम'ने लग्नाच्या आधीच घातलेला हा 'गोंधळ' पडद्यावर छान रंगला आहे.

……………………………………………………………………………………………    
चि. आणि चि. सौ. का.
कथा-पटकथा-संवाद - मधुगंधा कुलकर्णी
दिग्दर्शक - परेश मोकाशी
संगीत - नरेंद्र भिडे
कलाकार - मृण्मयी गोडबोले, ललित प्रभाकर, प्रदीप जोशी, सुप्रिया पाठारे, पौर्णिमा तळवलकर, सुनील अभ्यंकर, शर्मिष्ठा राऊत, ज्योती सुभाष, सतीश आळेकर, पुष्कर लोणारकर आदी.

……………………………………………………………………………………………

लेखक ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Ashutosh

Sun , 21 May 2017

गणेश मतकरी आणि अमोल परचुरे यांच्या समीक्षा याच्या अगदी विरुद्ध, निगेटिव्ह आहेत. अर्थात चित्रपट पाहिल्यावरच खरं काय ते समजेल.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख