पाल्माचं झिंग झिंग झिंगाट
सदर - न-क्लासिक
चिंतामणी भिडे
  • ‘फेमी फटॅल’चं एक पोस्टर
  • Sun , 21 May 2017
  • इंग्रजी सिनेमा न-क्लासिक फेमी फटॅल Femme Fatale ब्रायन ड पाल्मा Brian De Palma रिबेका रोमजिन Rebecca Romijn

ब्रायन ड पाल्माचा ‘फेमी फटॅल’ अदभुत आहे. पाल्माच्या चित्रपटाची सर्व वैशिष्ट्यं त्यात पुरेपूर ठासून भरली आहेत. तो व्हिज्युअली अपिलिंग आहे, अत्यंत स्टायलिश आहे, यातल्या व्यक्तिरेखा संदिग्ध चारित्र्याच्या आहेत. मोह, हिंसा, सेक्स, व्हल्नरेबिलिटी अशा सर्व गुणावगुणांची गोळीबंद बेरीज असलेल्या या व्यक्तिरेखा कमालीच्या रोचक आहेत. पाल्माचा आवडता एरॉटिसिझमही यात आहे. पण त्याही पलिकडे हा चित्रपट एक भलतीच आगळी किक देतो, कारण चित्रपटाच्या अखेरच्या टप्प्यात पाल्मा आपल्याला असा काही गुंगारा देतो की, आपण आपल्याच दोन थोबाडीत मारून घेतो. या शेवटाचं सूचन पाल्मा करत असतो. अगदी उघडपणे तो क्ल्यू देतो आणि नंतर इतके क्ल्यू मिळूनही कसा तुम्हाला मामा बनवला, म्हणून हसत हसत आपल्याला चापटी मारतो… चापटी कसली, चाबकाचा फटकाराचा म्हणायला पाहिजे. पण त्याचं हे मामा बनवणं आपल्याला ज्यामच आवडतं. चित्रपटाच्या प्रेमात पाडतं. पुन्हा पुन्हा या चित्रपटाकडे खेचून घेतं. फसवणुकीतही एक गंमत असते. आपण कसे गंडलो, हे अनुभवण्यासाठी वारंवार चित्रपट बघत राहतो.

‘फेमी फटॅल’ म्हणजे फशी पाडणारी स्त्री... अत्यंत आकर्षक, तारुण्याने रसरसलेली. आपला स्वार्थ साधण्यासाठी पुरुषाचा वापर करून घेणारी, प्रसंगी दोन पुरुषांना परस्परांशी झुंझवणारी. नायकाला वाटत राहतं की, ती आपल्या ताब्यात आहे. प्रत्यक्षात तीच नायकाला आपल्या तालावर नाचवत असते. अर्थात सुटका तिचीही नसते. ज्या नैतिक अधःपतनाच्या वाटेवर ती पुरुषाला नेते, तिथे तिचाही ऱ्हास अटळच असतो.

पण पुढे काय होणार आहे, याचा अंदाज येऊन अत्यंत मोक्याच्या क्षणी आपला निर्णय बदलून वेगळाच निर्णय घेतला असता तर? कदाचित आयुष्य वेगळ्या मार्गानं गेलं असतं. पुढे होणारे अनेक अनर्थ टळले असते आणि आपल्यासकट अनेकांचं आयुष्य बरबाद होण्यापासून वाचलं असतं. तो निर्णायक क्षण पुन्हा जगण्याची संधी मिळाली तर? हा ‘तर’चा टप्पा या सिनेमातला सगळ्यात रोमहर्षक क्षण आहे आणि तो इतक्या अनपेक्षितपणे आपल्यासमोर येतो की, आपण फक्त खुर्चीतून खाली पडायचं बाकी राहतं.

कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने चित्रपटाची सुरुवात होते. महोत्सवाला आलेल्या व्हेरॉनिका या तरुणीच्या अंगावर असलेल्या ब्रेसियरवर एक कोटी डॉलरचे हिरे जडवले आहेत. ती ब्रेसियर पळवण्याचा कट ब्लॅक टाय, रेसिन आणि लॉर अटाय, रेसिन आणि बॅश रचतात. पण लॉर आपल्या दोघा साथीदारांना डबलक्रॉस करून एकटीच लुटीचा माल घेऊन पळ काढते. ब्लॅक टाय पकडला जातो आणि त्याला सात वर्षांची शिक्षा होते.

इकडे लॉर हॉटेलच्या रूमवर परतल्यानंतर तिची रेसिन या आपल्या दुसऱ्या साथीदाराशी झटापट होते. झटापटीत तो तिला रूममधून खाली फेकून देतो.

कट टू

लॉरचे डोळे उघडतात तेव्हा ती एका घरात असते. एक स्त्री आणि पुरुष तिच्याशी काहीबाही बोलत असतात. तिला लिली अशी हाक मारत असतात. तिला स्वतःची काळजी घ्यायला सांगून ते निघून जातात. ती काहीच न कळून आजूबाजूला बघते, तर बाजूच्या भिंतीवर तिच्याच सारख्या दिसणाऱ्या एका तरुणीचा तिच्या नवऱ्यासोबतचा फोटो असतो. ती लिली असते. तिला थोडी थोडी टोटल लागते. बाथ टबमध्ये आंघोळ करत असतानाच अचानक लिली तिथे येते. लॉरच्या अस्तित्वाची तिला जाणीवही नाही. लॉर पडद्याआड लपून लिलीच्या हालचाली बघते. लिली बॅगेतून पिस्तुल काढून आत्महत्या करते. लॉर तिच्याजवळचं अमेरिकेला जाण्याचं विमान तिकीट घेऊन, नवी ओळख धारण करून अमेरिकेला रवाना होते.

कट टू

सात वर्षांनंतर ब्लॅक टाय तुरुंगातून बाहेर येतो आणि लॉरचा शोध घेऊ लागतो. त्याचवेळेस अमेरिकेचा फ्रान्समधील राजदूत म्हणून ब्रुस वॉट्सचं आगमन होतं. त्याच्या बायकोला अद्याप कोणीच बघितलेलं नाही. तिचा एकही फोटो नाही. निकोलस बार्डो या पापाराझी फोटोग्राफरला कोणी एक अज्ञात व्यक्ती वॉट्सच्या या गूढ पत्नीचा फोटो काढण्याची कामगिरी सोपवतो. बार्डो ती कामगिरी फत्ते करतो आणि वॉट्सच्या या गूढ पत्नीचे, लिलीचे फोटो पॅरिसभर झळकतात. ब्लॅक टाय आणि रेसिनची अर्थातच त्यांच्यावर नजर जाते. इकडे बार्डोचं अवतारकार्य केवळ लिलीचे फोटो काढून समाप्त होत नाही. लिली त्याला आपल्या जाळ्यात अडकवते. त्याच्यावर लिलीचं अपहरण केल्याचा ठपका येतो. लिली त्याला तिच्या नवऱ्याकडून एक कोटी डॉलरची खंडणी मागायला भाग पाडते. वॉट्स पैसे घेऊन येतो, पण त्या आधीच बार्डो त्याला सत्य सांगायचा प्रयत्न करतो. लिली आधी वॉट्सला आणि त्यानंतर बार्डोला गोळी घालते. एक कोटी डॉलर घेऊन ती तिथून निघणार इतक्यात ब्लॅक टाय आणि रेसिन तिथे येऊन पोहोचतात आणि तिच्याकडून बॅग हिसकावून घेत तिला पुलावरून खाली नदीत फेकून देतात. त्या क्षणी...

त्याक्षणी पाल्मा आपल्याला जो गुगली टाकतो, तो अद्वितीय आहे. पाल्माच्या व्यक्तिरेखा, त्याच्या चित्रपटाचे आशय यांना फारशी खोली नसते. पण त्याचे सिनेमे झिंगाट असतात. ते पाहताना एक आगळी किक येते. त्याच्या लिखाणातली, दिग्दर्शनातली हुशारी ठायी ठायी दिसत राहते. पाल्माचे चित्रपट पाहाताना तर्काची कसोटी फारशी लावायची नसते, पण तरीही डोक्याची, बुद्धीची आणि मनाची कवाडं सताड उघडी ठेवून त्याचे सिनेमे बघावे लागतात.

‘फेम फटॅल’ही त्याला अपवाद नाही. प्रेक्षकांना गुंगारा देताना त्याने असल्या असल्या जागा पेरल्यात की विचारता सोय नाही. चित्रपटाच्या शेवटाचं सूचन तो अगदी पहिल्याच प्रसंगात करून जातो, पण अर्थात पहिल्यांदा बघताना ते आपल्या लक्षात येण्याची कुठलीच सोय नसते. पुन्हा बघताना मात्र पहिल्याच प्रसंगात पाल्माने आपल्याला वॉर्निंग दिली होती, हे बघून हसायला येतं. त्यानंतरही अनेक ठिकाणी पाल्मा अशी वॉर्निंग पेरत राहतो आणि आपली गंमत बघत राहतो.

स्लो मोशन, एरॉटिझम, क्राइम हे पाल्माच्या चित्रपटातले ओळखीचे पैलू याही चित्रपटात आहेत. पण त्यांचा वापर तो ज्या पद्धतीने करतो, त्यामुळे एक नशिलं कॉकटेल प्यायल्याचा आनंद मिळतो. पाल्माचं लेखन विलक्षण बुद्धिमान आहे. सुरुवातीच्या लुटीच्याच प्रसंगात याची चुणूक मिळते. हॉलिवुडमध्ये लुटीभोवती फिरणारे सिनेमे इतके खोऱ्याने निघतात की, त्यातलं नावीन्य जवळपास संपून गेलंय. ‘फेम फटॅल’मध्ये पाल्माने मुळातच हा प्रसंग भारी लिहिलाय आणि त्यानंतर चित्रिकरणातून त्याने धमाल उडवून दिली आहे. व्हेरॉनिकाच्या अंगावरील ब्रेसियरवर एक कोटी डॉलरचे हिरे डकवलेले असणं, लॉरने फोटोग्राफर बनून कान फेस्टिव्हलला जाणं, फोटो काढता काढता व्हेरॉनिकाचं लक्ष वेधून घेणं, मग बाथरूममध्ये दोघांमधला जबरदस्त एरॉटिक प्रसंग आणि या प्रसंगातच अतिशय हुशारीने तिची ब्रेसियर, कानातले डुल, हातातलं कडं लंपास करणं... जवळपास २० मिनिटांचा हा सुरुवातीचा प्रसंग चित्तथरारक आहे.

पाल्माचे चित्रपट उथळ असतात, मनोरंजनापलिकडे त्यांना फारसं महत्त्व नसतं, तो शैलीच्या अति आहारी जातो, अशी टीका त्याच्यावर नेहमी होते. पण पाल्मा पडद्यावर जो काही परिणाम साधतो, त्याच्या आसपासही कोणी फिरकत नाही. ‘फेम फटॅल’मध्ये वॉट्सची पत्नी बनून आलेली लिली ऊर्फ लॉलचा फोटो ब्लॅक टायला दिसतो, त्या प्रसंगातली नाट्यमयता आणि तोच प्रसंग क्लायमॅक्सला वेगळ्या नजरेनं पुन्हा दिसल्यानंतर त्या मूळ दृष्याचं अवघं परिमाणच बदलून जाणं, ही लिखाणातली गंमत आहे. यापेक्षा जास्त तपशिलात लिहिलं तर कथा उघड होण्याचा धोका आहे. परंतु, मुळात लेखक म्हणून असा काही विचार करणं हेच थक्क करणारं आहे. अर्थात पाल्मा हा स्वतःच दिग्दर्शकही असल्यामुळे प्रसंगाची दृष्यचौकट आणि त्याचा अंतिम परिणाम सुरुवातीपासूनच त्याच्या डोक्यात सुस्पष्ट असल्याचा भरपूर फायदा त्याला होतो.

पाल्मावर कितीही टीका झाली तरी तो त्याची फारशी फिकीर करत नाही आणि पाल्माचे फॅन्सही या टीकेला फारशी किंमत देत नाहीत. त्याच्या चित्रपटांमध्ये क्राफ्टच्या संदर्भात प्रयोगशीलता ठासून भरलेली असते. पाल्माच्या दिग्दर्शनाने किमान दोन पिढ्यांवर आपला प्रभाव टाकलाय. ऑस्करपर्यंत पोहोचलेल्या आपल्या आशुतोष गोवारीकरनेदेखील ‘पहला नशा’ या आपल्या पहिल्या चित्रपटासाठी पाल्माच्याच ‘बॉडी डबल’ या भन्नाट चित्रपटाची निवड केली होती. त्यामुळे पाल्मावर कितीही टीका केली तरी त्याला टाळून पुढे जाताच येणार नाही, अशी परिस्थिती आहे.

पाल्माचा शेवटचा धो धो चाललेला सिनेमा १९९६ साली प्रदर्शित झालेला ‘मिशन इम्पॉसिबल’ होता. त्यानंतर गेल्या २० वर्षांत त्याने यशाचं तोंड पाहिलेलं नाही. २००२ साली प्रदर्शित झालेला ‘फेम फटॅल’देखील बॉक्स ऑफिसवर सडकून आपटला होता. पण पाल्मा कधीच या यशापयशाच्या पलिकडे गेलाय. आज ‘फेम फटॅल’ कल्ट सिनेमा म्हणून ओळखला जातो. या चित्रपटातल्या लॉरला तिच्या आयुष्यातली मोठी चूक एक दुःस्वप्न समजून दुरुस्त करण्याची संधी मिळाली होती. खुद्द पाल्माला आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर यदाकदाचित तशी संधी मिळालीच तर आपल्या चित्रपटांच्या बाबतीत तो काही सुधारणा करेल की नाही, कल्पना नाही. त्याचे चाहते मात्र हा चित्रपट बक्कळ यशस्वी केल्याशिवाय राहणार नाहीत.

लेखक मुक्त पत्रकार आहेत.

chintamani.bhide@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......