१.
भारतीय जनता युवा मोर्चाचा शहराध्यक्ष ते भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता ते पक्षाचा एक प्रमुख राष्ट्रीय नेता, एक आमदार ते केंद्रात प्रभावी मंत्री... असा ज्याचा प्रवास पाहता आला आणि ज्याच्या सळसळत्या तरुण वयापासून असलेलं मैत्र आजही कायम आहे, ते नितीन गडकरी येत्या शनिवारी, २७ मे रोजी वयाच्या साठीत प्रवेश करत आहेत. त्यानिमित एका मोठ्ठा सोहळा नागपुरात शरद पवार, देवेंद्र फडणवीस आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. (नितीन गडकरींची जन्मतारीख २७ मे १९५८. खरं तर वयाच्या साठीत प्रवेश हा काही ‘महा’सोहळ्याचा प्रसंग नसतो, पण राजकारणात सर्वच माफ असतं!) त्याचा हा राजकीय प्रवास मी जसा पाहिला तसाच त्यानं एक नवशिका पत्रकार ते संपादक असा माझा प्रवास पहिला.
महत्त्वाचं म्हणजे, आम्ही एकमेकाच्या राजकीय विचारांचे तीव्र विरोधक आहोत. ‘तुम्ही समतावादी नाहीत, तुमचा हिंदुत्ववाद साफ अमान्य’ हा माझा प्रमुख आक्षेप, तर ‘तुम्ही तीन समाजवादी एकत्र आले की, चार मतं आणि पाच पक्ष,’ ही नितीनची आवडती मांडणी. आमची ही जुगलबंदी अनेकदा जाहीरपणे झालेली. त्यामुळे राजकारण, प्रशासन, पत्रकारिता आणि वृत्तपत्र वाचणाऱ्या मराठी वाचकांत आमच्या मैत्रीचं अप्रुप. इतकं की, त्या संदर्भात अजूनही प्रश्न विचारले जातात. ‘राजकारण कसं करावं हे मी गडकरींना आणि पत्रकारिता कशी करावी हे गडकरी मला सांगत नाहीत,’ हेच आमच्या मैत्रीचं गुपित आहे, हे त्यावरचं नेहमी दिलं जाणारं आमचं उत्तर आहे.
आमचं मैत्र अकृत्रिम, निस्वार्थ आणि निरागस आहे. तो अगदी राष्ट्रीय अध्यक्ष झाला तरी एकमेकाला जाहीर कार्यक्रमातही ‘अरे-तुरे’ असं संबोधत असू, अशी आमची दोस्ती. त्याच्या राजकीय उत्कर्षाचा मला वैपुल्यानं अभिमान तर त्याला माझ्या लेखणीचा. इतका की औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर अशा तीन ठिकाणी नितीन गडकरी नावाच्या या उमद्या मित्रानं ‘प्रवीण इज नॉट मॅनेजेबल जर्नालिस्ट’ असं जाहीर कार्यक्रमात अभिमान आणि कौतुकानं सांगितलेलंय, पण ते असो!
नितीन गडकरी दिल्लीत गेला आणि तिकडेच रमला. त्यानं दुसऱ्यांदा अध्यक्षपद (उद्विग्न होऊन) नाकारल्यानंतर मी राजकीय संपादक म्हणून दिल्लीत उमेदवारी केली. त्या काळात नितीन गडकरी नावाच्या या मित्रानं दिल्लीत भक्कमपणे रोवलेले पाय पाहिले, नितीनच्या नेतृत्वाचा प्रभाव आणि आवाका पहिला; परक्या दिल्लीत विधानसभा निवडणुकीत त्याच्यातल्या संघटकाला जवळून पाहिलं. मग एका क्षणी आम्ही दोघांनीही ठरवून एकमेकांचा उल्लेख जाहीरपणे ‘अहो-जाहो’, करायला सुरुवात केली आणि खाजगीत मात्र एकमेकाला बोलताना लावलेल्या ‘जी’ची भरपूर टिंगलही केली.
२.
नितीन गडकरी ही भाजपला परिवाराची म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची देणगी आहे आणि त्याच्यावर संघाचा (पक्षी : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत) वरदहस्त आहे, असा एक सार्वत्रिक समज आहे. काही अंशी ते खरंही आहे, पण नेतृत्वाचा कस सिद्ध करताना नितीन गडकरी यांना जो काही संघर्ष, विरोध सहन करावा लागलेला आहे, त्यांचं खच्चीकरण करण्याचे जे काही प्रयत्न झाले, त्याबद्दल फारसं लिहिलं गेलेलं नाही. नितीन गडकरी यांच्या राजकीय जीवनाचे तीन टप्पे पाडता येतील. पहिल्यात टप्प्यात कार्यकर्ता ते विधान परिषद सदस्यपद. दुसऱ्या टप्प्यात राज्याच्या युती सरकारातलं मंत्रीपद, विधान परिषदेचं विरोधी पक्ष नेतेपद आणि नंतर प्रदेशाध्यक्ष म्हणून केलेलं काम. तिसरा टप्पा दिल्लीतला म्हणजे, राष्ट्रीय स्तरावरचा आहे. राष्ट्रीय अध्यक्ष, दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचं प्रभारीपद, नरेंद्र मोदी यांची पक्षनेतृत्वाच्या सर्वोच्चपदी नियुक्ती होताना बजावलेली ‘कळी’ची भूमिका आणि आता केंद्रीय मंत्री म्हणून कामाचा उमटवलेला ठसा, हे सर्व या तिसऱ्या टप्प्यात येतं. या तीनही टप्प्यात नितीन गडकरी चांगलेच ‘तावून-सुलाखून’ निघाले आहेत.
राजकीय पार्श्वभूमी नाही, पक्षात कोणीही ‘गॉड फादर’ नाही, त्यातच उमेदवारीच्या काळात पक्षानं भटा-ब्राह्मणांचा पक्ष या प्रतिमेची कात टाकायला केलेली सुरुवात केलेली असतानाच आडनाव ‘गडकरी’ म्हणजे अर्थाच ब्राह्मण, अशी ही अडथळ्याची शर्यत होती. प्रत्येक टप्प्यावर यश संपादन करताना, कामाची मोहोर उमटवताना कोणाही राजकीय नेतृत्वाला अंतर्गत आणि बाह्य अशा दोन विरोधकांशी स्पर्धा आणि सामना करावा लागतो, ते गडकरी यांच्याही वाट्याला आलेलं आहे. हा संघर्ष करताना तर एका क्षणी प्रचंड बदनामी नाहक वाट्याला आल्यावरही न डगमगता नितीन गडकरींनी स्वभावात तसंच कार्यशैलीत केलेली सुधारणा आणि पक्षांतर्गत तसंच पक्षाबाहेरच्या विरोधकांवर केलेली मात नीट समजून घ्यायला हवी.
कुठल्याही राजकीय कार्यकर्त्याच्या जीवनात असते तशी पहिल्या टप्प्यातील गडकरी यांची वाटचाल आहे. गंगाधरराव फडणवीस यांच्या मृत्यूनंतर नंतर विधानपरिषदेची उमेदवारी; मग आमदारपद हा पहिला टप्पा तुलनेत संथ होता. या काळात राज्य संघटनेवर गोपीनाथ मुंडे यांची घट्ट पकड होती आणि केंद्रात राज्याचे सर्वेसर्वा प्रमोद महाजन असल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात गडकरींनी फार काही करावं किंवा महाजन-मुंडे यांनी त्यांना काही करू द्यावं अशी स्थिती नव्हती. या टप्प्यात एक अभ्यासू तरुण आमदार अशी ख्याती संपादन करतानाच अरविंद शहापूरकर आणि त्यांच्यासारख्या अनेक सहकाऱ्यासोबत पक्षाची विदर्भात संघटनात्मक बांधणी करण्यात त्यांचं योगदान ठळक राहिलं. ‘भाजपच्या राजकारणातला एक उभरता सितारा’ अशी या काळातली त्यांची प्रतिमा होती.
दुसऱ्या टप्प्यात नितीन गडकरी राज्यात मंत्री झाले. त्यांची प्रशासनावरची पकड, कामाचा झपाटा, विकासाचं नियोजन व दृष्टी बघून सर्वच मोहित झाले. याच काळात ‘विकासाचं राजकारण’ ही संकल्पना राबवत पक्षात स्वत:ची बावनकशी पाळंमुळं रोवण्यात गडकरी चांगल्यापैकी यशस्वी झाले. विक्रमी कमी वेळेत आणि कमी खर्चात आकारास आलेला पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग, मुंबईत उड्डाण पुलांचं तसंच राज्याच्या ग्रामीण भागात रस्त्यांचं निर्माण केलेलं जाळं आणि त्यासाठी वापरलेला खासगीकरणाचा फंडा यामुळे ‘विकासाचा गडकरी पॅटर्न’ ही संकल्पना रूढ झाली. केंद्रात तेव्हा भाजपप्रणीत सरकार होतं. पंतप्रधानपदी अटलबिहारी वाजपेयी होते. त्यांनी विकासाच्या ‘गडकरी पॅटर्न’चं कौतुक केलं. तो पॅटर्न पुढे सुवर्ण चतुष्कोन म्हणून देशात आकाराला आला. नितीन गडकरी नावाच्या महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडे देशाचं लक्ष वेधलं गेलं, ते असं.
प्रस्तुत लेखकाच्या दोन पुस्तकांच्या प्रकाशन समारंभात डावीकडून पक्षाचे तत्कालिन अध्यक्ष नितीन गडकरी, प्रस्तुत लेखक, राज्याचे तत्कालिन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि भाजप नेते गोपानाथ मुंडे
याच दरम्यान प्रमोद महाजन यांचं दिल्लीच्या आणि गोपीनाथ मुंडे यांचं महाराष्ट्राच्या राजकारणात तसंच सत्ता वर्तुळात वाढलेलं प्रस्थ भाजपातील अनेकांना खटकत होतं. (लालकृष्ण अडवाणी यांच्या ९८६ पानांच्या ‘माय लाईफ माय कंट्री’ या भल्या मोठ्या आत्मचरित्रात त्यांच्या सर्व राजकीय यात्रांचं यशस्वी आयोजन आणि सारथ्य करणाऱ्या प्रमोद महाजन यांचा केवळ एक फोटो आणि २ उल्लेख आहेत!) या ‘खटकबाज’ मंडळींना नितीन गडकरी हा पर्याय दिसू लागला. मित्रपक्ष असलेल्या राज्यातल्या शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे तर गडकरी यांच्यावर जाम खूषच होते. याचा परिपाक म्हणून राज्यातली युतीची सत्ता गेल्यावर अनेक ज्येष्ठांना डावलून नितीन गडकरी यांच्याकडे राज्य विधानपरिषदेचं विरोधी पक्षनेतेपद (२३ ऑक्टोबर १९९९) ‘चालून’ आलं आणि भाजपच्या दिल्लीश्वरांकडून राज्यात एकछत्री अंमल असणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांना पहिला पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी उभा केला गेला. अत्यंत आक्रमकपणे विरोधी पक्षनेतेपद गाजवणाऱ्या नितीन गडकरींचं नाव राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं. स्थानिकांना प्राधान्य देणारा पूर्ती उद्योग उभारणी, वीज आणि इथेनॉल निर्मिती, साखर कारखाना अशी स्वत:च्या साम्राज्याची भक्कम बांधणीही गडकरी यांनी याच काळात केली.
राज्यात गोपीनाथ मुंडे विरुद्ध नितीन गडकरी यांचे गट, असं पक्षांतर्गत राजकारण सुरू होण्याचा आणि नंतर त्या गटांनी ‘बाळसं’ धरलं जाण्याचाही तो काळ होता. त्यातच नंतर लालकृष्ण अडवाणी यांच्या पुढाकारानं नितीन गडकरी यांच्याकडे महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्षपद (डिसेंबर २००४) दिलं गेलं. खरं तर राजकारण म्हणून गोपीनाथ मुंडे यांचे पाय कापण्यात गडकरी यांना रस नव्हता. मुंडे यांचं नेतृत्व व लोकनेतेपद गडकरी यांना मान्यच होतं. पक्षासाठी मुंडे यांनी दिलेल्या योगदानाबद्दल मनात खोल कृतज्ञताच होती, पण मुंडे यांचे सर्व निर्णय प्रदेशाध्यक्ष म्हणून गडकरी यांना मान्य नसत. निर्णय प्रक्रियेत नितीन गडकरी यांनाही सहभाग हवा होता. त्यातून या दोन नेतृत्वात वर्चस्वाची अहमहमिका सुरू झाली.
नितीन गडकरी यांच्या राजकीय आयुष्यातील तिसऱ्या टप्प्याची ही सुरुवात होती. भविष्यात आपल्याला दिल्ली गाजवायची असल्याचा हा प्रारंभ आहे, हे तेव्हा गडकरी यांना ठाऊक होतं की नाही हे कळायला मार्ग नाही. तेव्हा प्रकृती अस्वास्थ्यामुळे अटलबिहारी वाजपेयी बाजूला सरकलेले होते. त्यातच प्रमोद महाजन यांची हत्या (३ मे २००६) झाली. पक्षात गोपीनाथ मुंडे बाजूला पडण्यास म्हणा की, त्यांना डावललं जाण्यास म्हणा, साहजिक सुरुवात झाली. पाकिस्तानात जाऊन केलेल्या जिना कौतुक प्रकरणावरून संघाच्या मनातून उतरलेल्या आणि गों लोकसभा निवडणुकात केंद्रात सत्ता आणण्यात अयशस्वी ठरलेल्या लालकृष्ण अडवाणी यांना भाजपच्या सर्वोच्च वर्तुळातून बाजूला करण्याची योजना एव्हाना परिवारात तयार झालेली होती. ती योजना अंमलात आणण्यासाठी संघाच्या पडद्यावर डॉ. मोहन भागवत यांचं सरसंघचालक म्हणून आगमन (२१ मार्च २००९) झालेलं होतं. भाजपतील ‘अडवाणी युगा’च्या अस्ताचा तो प्रारंभ आहे, याची कल्पना तेव्हा कोणालाच आली नाही. या योजनेचाच एक भाग म्हणून २००९च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लालकृष्ण अडवाणी यांच्याकडून पक्षाचं गटनेतेपद काढून घेण्यात आलं आणि लोकसभेतलं विरोधी पक्षनेतेपद सुषमा स्वराज यांच्याकडे (२१ डिसेंबर २००९) देण्यात आलं.
३.
आणि सुरू झाला नितीन गडकरी यांच्या राजकीय जीवनातला सगळ्यात कठीण तिसरा टप्पा. परिवाराने भाजपच्या अध्यक्षपदी कोणत्याही गटाचा शिक्का नसलेला, ताज्या दमाचा आणि तरुण चेहरा देण्याचा निर्णय घेतला. शोध संपला तेव्हा तीन नावं समोर आली. त्यात नितीन गडकरी, मनोहर पर्रीकर आणि मुरलीधर राव अशा तिघांचा समावेश होता. राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रं हाती घ्यावयाची आहेत, अशी सूचना नितीन गडकरी यांना ऑक्टोबर २००९च्या विजयादशमीला दिली गेली. पक्षीय लोकशाहीचे रीतसर सोपस्कार पार पडून नितीन गडकरी यांनी १ जानेवारी २०१०ला ही सूत्रं स्वीकारली. काळाचा महिमा बघा, महाराष्ट्रात मुंडे आणि महाजन यांच्या विरोधात ज्या लालकृष्ण अडवाणी यांनी नितीन गडकरी नावाची तोफ डागली होती, त्याच तोफेचा रोख आता दिल्लीत लालकृष्ण अडवाणींकडे वळला होता.
अध्यक्षपदाच्या सुरुवातीच्या काळात दिल्लीत पक्षांतर्गत विरोधकांनी नितीन गडकरी यांना ‘उभं पिसं नांदू कसं’ आणि प्रतिस्पर्धी प्रतिस्पर्धी पक्ष विरोधकांनी ‘सळो की पळो’ करून सोडलं. नितीन गडकरी यांचा स्वभाव अस्सल वैदर्भीय अघळपघळ आणि मोकळा-ढाकळा. मनात एक आणि जनात दुसरं असा गडकरी यांचा डीएनए नाही. जे काही बोलाय-करायचं ते उघड आणि समोरच्याला भिडायचं ते थेट. दुसऱ्याची काठी तिसऱ्याच्या हातानं समोरच्याला मारायची ही राजकीय कावेबाज वृत्ती नाही. राजकारण करताना डोक्यावर बर्फाची लादी, तोंडात खडीसाखर आणि चेहऱ्यावरची सुरकुती हलू न देण्याची दिल्लीची पारंपरिक, बेरकी खासियत. दिल्लीच्या वातावरणात दररोज गडकरी अडचणीत येतील अशा खेळी या ‘बेरक्यां’कडून सुरू झाल्या. या खेळी करणारात स्वपक्षीयच जास्त होते; हे लक्षात येईपर्यंत उशीर झालेला होता. कारण अध्यक्ष म्हणून पक्षाच्या बांधणीसाठी दिल्लीत ठिय्या मारण्यापेक्षा बाहेरच गडकरी रमू लागले होते. यूपीए सरकारच्या काळात बोकाळलेला भ्रष्टाचार आणि त्यातून निर्माण झालेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी देशभर झंझावाती दौरे करून संघटनात्मक बांधणी करून नरेंद्र मोदी यांच्यासाठी ‘लॉंचिंग पॅड’ निर्माण केलं. पक्ष निवडणुकीसाठी सज्ज करण्यावर गडकरी यांनी भर दिला. पक्षात चैतन्य निर्माण झालं. सोबतच त्यांनी औद्योगिक व व्यापारी जगतात स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली.
ही कामगिरी बघून नितीन गडकरी यांना पक्षाध्यक्षपदाची दुसरी टर्म मिळणार हे स्पष्ट दिसू लागलं. त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या घटनेत दुरुस्ती करण्यात आली. अडवाणी गट अस्वस्थ झाला आणि गडकरींविरुध्द ‘फटाके’ फोडण्यास सुरुवात झाली. रान जोरदार उठवलं गेलं. एकजात सर्व प्रकाश वृत्तवाहिन्यांनी तर त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यातच उभं केलं. अख्ख्या राजकीय जीवनात जितकं अवमानित व्हावं लागलेलं नव्हतं. त्यापेक्षा शतपट जास्त अवमान आणि आरोपांच्या फैरी नितीन गडकरींवर झाडल्या गेल्या. त्यातलं असलेलं सत्य कोपऱ्यात अंग चोरून उभं राहिलं. त्यावर कोणीच विश्वास ठेवला नाही. चौकशा मागे लागल्या. (दुसऱ्या टर्मसाठी अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवशी आमची भेट झाली तेव्हा गडकरी प्रचंड उद्विग्न झालेले जाणवत होते. मी दुसरी टर्म घेणार नाही, असं ते म्हणाले. मला ते खरं वाटलं होतं.) पण राजकीय कड्यावरून गडकरी यांना ‘कोसळवणं’ अजून बाकी होतं. सकाळी ते विमानाने नागपूरहून दिल्लीला जात असतानाच सीबीआय आणि आयकर खात्याच्या कथित छाप्यांच्या बातम्या आल्या...गडकरींनी अध्यक्षपदासाठी अर्जच दाखल केला नाही...पक्षांतर्गत विरोधकांनाही तेच हवं होतं...राजनाथसिंह अध्यक्ष झाले.
अशी प्रचंड बदनामी आणि अवमान वाट्याला आल्यावर भलेभले खचतात, नाउमेद होतात, लढण्याची जिद्द हरवून बसतात. गडकरी याला अपवाद होते. ते उद्विग्न झालेले होते, निराश नाही. बोलणं कमी करून, अघळपघळपणा बंद करून त्यांनी दिल्लीतच स्वत:चं ‘मेटल’ सिद्ध करण्याचं आव्हान मनोमन ठामपणे स्वीकारलं. दिल्ली विधानसभा निवडणुकीची जबाबदारी स्वीकारली आणि स्वत:ला त्या कामात झोकून दिलं. वॉर्ड पातळीपर्यंत विस्कळीत झालेला पक्ष रात्रंदिवस एक करून पुन्हा बांधला, उमेद हरवलेल्या पक्षात लढण्याची इर्ष्या निर्माण केली. दिल्ली विधानसभा निवडणुकीत पक्ष बहुमताच्या काठावर आणत असतानाच नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे आणण्यातही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. मोदी आणि अडवाणी, अडवाणी आणि संघ, संघ आणि पक्ष यात मध्यस्थ म्हणून स्वत:चं निर्णायक स्थान निर्माण केलं. (ही कळीची कामगिरी गडकरी यांनी दिल्लीतील तीन मूर्ती मार्गावरील बंगल्यात बसून कशी बजावली त्याचा मीही एक पत्रकार म्हणून साक्षीदार आहे.) कालांतरात पूर्ती प्रकरणातील या सर्व चौकशात गडकरी निर्दोष असल्याचं सिद्ध झालं आणि त्यामागे कोण आहे हेही समोर आलं. अर्थात त्याला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. थेट जनतेतून निवडून येत नाही हा शिक्का पुसून टाकत नागपूर लोकसभा मतदार संघातून मोठा विजय संपादन केला आणि आता केंद्रीय मंत्री म्हणून त्यांची कामगिरी जनतेसमोर आहे.
राजकीय आयुष्याच्या या तिसऱ्या टप्प्यात आता गडकरी कडकडीत तावून सुलाखून निघालेले आहेत. राजकारणात आलेल्या ‘अशा’ एकेक अनुभवानंतर गडकरी अधिक प्रगल्भ आणि समंजस झालेले आहेत. नितीन गडकरी हे अपयशाच्या गर्तेत कायम रुतून बसणारं आणि यशाच्या शिखरावर असताना हुरळून जाणारं व्यक्तिमत्त्व आता राहिलेलं नाही. खऱ्या अर्थानं नितीन गडकरी हे आता ‘मॅच्युअर्ड पोलिटिकल स्टफ’ म्हणून आकाराला कसे आलेले आहेत, हे त्यांनी गोव्यात पक्षाचं सरकार स्थापन करताना केलेल्या चतुराईतून दाखवून दिलं आहे. मात्र हे काहीही असलं तरी, नितीन गडकरी यांनी केंद्रात मंत्रीपदाऐवजी पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारायला हवं होतं असं मला अजूनही वाटतं.
कुटुंबियांना राजकारणापासून कटाक्षानं लांबच ठेवणाऱ्या नितीन गडकरींसाठी वयाची साठी हा काही फार मोठा टप्पा नाही. राजकारणात हे वय म्हणजे तारुण्यच! यापुढच्या वयात यापेक्षा मोठी मंजिल त्यांनी गाठावी अशी अनेकांची अपेक्षा आहे. त्यासाठी एक दोस्तयार म्हणून नितीन गडकरी यांना खंडीभर शुभेच्छा!
……………………………………………………………………………………………
नितीन गडकरी यांचं व्यक्तीचित्र असलेलं ‘क्लोज-अप’ हे पुस्तक इ-बुक स्वरूपात बुकगंगाने प्रकाशित केलं असून ते मिळवण्यासाठी लिंक अशी-
http://www.bookganga.com/ebooks/books/Bookapplet?AID=4736828222950359515
……………………………………………………………………………………………
लेखक दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment