‘भीष्मोत्सव’ : पाच उत्कट कथांचा उत्तम आविष्कार
कला-संस्कृती - नौटंकी
प्रा. अविनाश कोल्हे
  • ‘भीष्मोत्सव’मधील एक दृश्य
  • Sat , 20 May 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti नौटंकी Nautanki अविनाश कोल्हे Avinash Kolhe भीष्मोत्सव Bhishmotsav

(कै.) भीष्म साहनी (१९१५-२००३) हे हिंदी साहित्यातील आदरणीय नाव. त्यांच्या ‘तमस’ या कादंबरीला १९७५ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. १९८७साली जेव्हा त्यांच्या ‘तमस’ या कादंबरीवर गोविंद निहलानी यांनी दूरदर्शन मालिका बनवली, तेव्हा भीष्म साहनी हे नाव घराघरात पोहोचलं. तोपर्यंत त्यांची दुसरी एक ओेळख म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत चरित्र अभिनेते बलराज साहनी यांचे धाकटे बंधू. हे दोन बंधू अनेक वर्षे रंगभूमीवर कार्यरत होते. त्यांच्या कार्याची ओळख करून घेण्यासाठी साहनी यांनी लिहिलेले ‘Balraj and Bhisham Sahni : Brothers in Political Theatre’ (प्रकाशक : सहमत, दिल्ली) पुस्तक पाहावं. पण केवळ ‘बलराज साहनींचा धाकटा भाऊ’ ही ओळख भीष्म साहनींवर अन्याय करणारी आहे.

भीषम साहनींचा जन्म रावळपिंडीत ८ ऑगस्ट १९१५ रोजी झाला. त्यांनी एम.ए. (इंग्रजी साहित्य) ही पदवी लाहोरच्या गव्हर्मेंट कॉलेजमध्ये घेतली. त्या काळी पंजाब प्रांतात या महाविद्यालयाचा फार दबदबा होता. पंजाब प्रांतातील जवळपास सर्व नामवंत या महाविद्यालयाचे पदवीधर होते. साहनी यांनी १९५८ साली चंदिगढमधील पंजाब विद्यापीठातून पीएच.डी. मिळवली. ते स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसमध्ये सक्रिय होते. पुढे १९४८ साली कम्युनिस्टांची सांस्कृतिक आघाडी असलेल्या ‘इंडियन पिपल्स थिएटर्स असोसिएशन’मध्ये गेले. ते १९७५ ते ८५ दरम्यान ‘ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशन’चे महासचिव होते. हे तपशील डोळ्यांसमोर ठेवले म्हणजे भीष्म साहनी यांचं साहित्यविश्वातील स्थान काय होतं, त्यांची कलाविषयक भूमिका काय होती वगैरेचा अंदाज येतो.

भीष्म साहनींच्या पिढीने स्वातंत्र्यलढ्यादरम्यान बंगाल व पंजाब प्रांतांत झालेले हिंदू-मुसलमान दंगे बघितले. या घटनेचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. त्यांचं साहित्य वाचताना ते सक्रिय मार्क्सवादी होते हे लक्षात ठेवावं लागतं. साहनी यांनी कादंबऱ्यांप्रमाणे शेकडो कथा लिहिल्या. ‘कोपल थिएटर’ने यातील पाच कथा निवडून मंचित केल्या आहेत. या प्रयोगाचं शीर्षक आहे- ‘भीष्मोत्सव’. २०१५ साली साहनींचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालं, तेव्हा या प्रयोग सादर करण्यात आला होता. अलिकडे पुन्हा ‘भीष्मोत्सव’चे प्रयोग सुरू झाले आहेत.

साहनी यांच्या कथेत एवढं नाट्यं असतं की, त्या मंचित करणं तसं सोपं आहे. पण त्यातील आशयापलिकडे लपलेला आशय समजावा लागतो, तरच त्यांच्या कथांना न्याय देता येतो. ही दुर्मीळ समज ‘भीष्मोत्सव’च्या दिग्दर्शिका श्रीमती सीमा पाहवा यांच्याकडे आहे. यात ‘ऊब’,  ‘सीर का सदका’, ‘ढोलक’, ‘यादे’ आणि ‘समाधी भार्इ रामसिंग’ या पाच कथा आहेत. यातील ‘ऊब’सारखी कथा एकपात्री आहे, तर इतर कथांमध्ये दोन-चार पात्रं येतात, पण ती पुरक म्हणून. मुख्य कथा एक पात्राद्वारेच प्रेक्षकांसमोर मांडली जाते. या पाचही कथांतील अभिनय उत्तम आहे. ‘भीष्मोत्सव’मध्ये सीमा पाहवा, मनोज पाहवा, रत्ना पाठक व नसरुद्दीन शहा यांसारखे ज्येष्ठ कलावंत आहेत. यावरून ‘भीष्मोत्सव’ ही अभिनयाच्या दृष्टीने काय चीज असेल याचा अंदाज यावा.

यातील पहिली कथा आहे ‘ऊब’. ही हिवाळ्यातील ऊब नसून ‘कंटाळा’ या अर्थाने आहे. हा एकपात्री प्रयोग आहे. यात शुक्ला नामक शिक्षकाला परीक्षेच्या दरम्यान वर्गात सुपरव्हिझन करावं लागतं. तीन तासांचा पेपर असतो. विद्यार्थी उत्तरं लिहीत असतात व सुपरव्हिजन करणारा शिक्षक वर्गात फक्त चकरा मारत असतो. एका पातळीवर हे काम अतिशय कंटाळवाणं असतं, वेळ जाता जात नाही. तेव्हा तो हे तीन तास कसे घालवतो व त्या दरम्यान तो कसा कमालीचा ऊबतो याची ही कथा आहे. शुक्ला सुरुवातीला खोलीच्या या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी किती पावलं चालावी लागतात हे मोजून बघतो. नंतर हेच अंतर जर हळूहळू चाललो तर किती वेळ लागतो व जर जोरात चाललो तर किती वेळ लागेल याचे प्रयोग करून बघतो. तरी वेळ जाता जात नाही. नंतर त्याचे लक्ष मुख्याध्यापकांच्या खोलीबाहेरच्या स्टुलावर बसलेल्या चपराशाकडे जातं. त्या चपराशाला शुक़्ला सरांशी काहीतरी बोलायचं असतं. असं त्याने सरांना पेपर सुरू होण्याआधी सांगून ठेवलेलं असतं. मग शुक्ला कल्पना लढवायला लागतात की, त्याला पैसे उधार पाहिजे असतील. आपण उधारी द्यायची की नाही वगैरे विचार त्यांचा मनात यायला लागतात. यात थोडा वेळ जातो. करताकरता तीन तास पूर्ण होतात व शुक्ला निघण्याच्या तयारीत असतात. तेवढ्यात तो चपराशी त्यांना गाठतो व पैशाऐवजी भलतीच मागणी करतो. त्याची इच्छा असते की तो आता लवकरच निवृत्त होणार आहे व त्याच्या जागी त्याच्या मुलाला ही नोकरी मिळावी यासाठी शुक्लांनी मुख्याध्यापकांकडे शब्द टाकावा. येथून कथेतील नाट्य समोर यायला लागतं. शुक्ला सरांच्या लक्षात येते की, या चपराशाचे सर्व आयुष्य या स्टुलावर बसून राहण्यात गेलं. इथं आपल्याला फक्त तीन तास सुपरव्हिजन करावं लागलं तर किती कंटाळा आला. शुक्ला त्या चपराशाच्या चेहऱ्याकडे निरखून बघतात. त्यांना त्यावर तीस वर्षांचा काळ वाचायला मिळतो. अशा एका प्रगल्भ भावनेवर ही वरवर सामान्य वाटणारी कथा संपते.

‘सिर का सदका’ या दुसरी कथा एक स्त्रीच्या नजरेतून कथन केलेली आहे. यात दोन बहिणी आहेत व निवेदक मोठी बहीण आहे जी निपुत्रीक आहे. ठेकेदार नवऱ्याच्या संपत्तीला वारस असावा म्हणून ती स्वतः पुढाकार घेऊन धाकट्या बहिणीला सवत म्हणून आणते. यथावकाश घरात मुलगा होतो. यामुळे घरात आनंद जरी आला तरी दुसरीकडे सवतीमत्सर सुरू होतो. त्यामुळे ठेकेदार धाकट्या पत्नीला व मुलाला घेऊन दुसऱ्या गावी जातो व बघताबघता वर्दळ असलेली ठेकेदाराची हवेली ओस पडायला लागते. ठेकेदार पहिल्या पत्नीकडे साफ दुर्लक्ष करतो. गावातली चार प्रतिष्ठित माणसं एकत्र येऊन यावर काय उपाय करावा याची चर्चा करत असतात. ठेकेदाराने दर महिन्याला ठराविक रक्कम पहिल्या पत्नीला द्यावी अशी मागणी करण्याचे ठरते. तेवढ्यात ठेकेदार पत्नी—मुलासह परत येतो. त्याला मुलाचं बारसं करायचं असतं. मोहल्यातील मंडळी बारशाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकायच्या विचारात असतात, पण जेव्हा थोरली पत्नीच घरोघरी जाऊन कार्यक्रमाचं आमंत्रण देते तेव्हा सर्व जाण्यास तयार होतात. ज्या घरात लहान मुलं वावरत असतं तिथं फार काळ ताणतणाव असू शकत नाही, अशा सकारात्मक भावनेवर कथा संपते.

‘ढोलक’ ही तिसरी कथा प्रातिनिधीक म्हणावी लागेल. यात रामदेव या तरुणाचं लग्न त्याच्या मनाविरुद्ध होत असतं. वाचनाची आवड असलेल्या रामदेवला हा सर्व प्रकारच आवडत नसतो, पण मनाविरुद्ध लग्नासाठी तयार होतो. लग्नाची वेळ जवळ येते. उत्तर भारतातील प्रथेप्रमाणे नवरदेवानं घोडीवर बसून यावं असं अपेक्षित असतं. अचानक रामदेव घोडीवर बसायला नकार देतो. हजार प्रकारे समजून सांगूनही त्याचा नकार कायम असतो. सर्व लग्नघर बेजार होतं. आता ऐनवेळी पर्यायी व्यवस्था काय करायची ही समस्या सुटता सुटत नाही. गावात एक वकील असतो. तो एक युक्ती करतो. गावात एक इतिहासप्रसिद्ध स्थळ असतं जे बघायला अनेक परदेशी पर्यटक येत असतात. वकील त्यातील दोन अमेरिकन स्त्रियांना ‘भारतीय लग्न बघायला मिळेल’ असं म्हणत लग्न घरी आणतो. त्या महिला रामदेवला आपल्या भारतीय लग्नातील असंख्य चालीरीतीबद्दल प्रश्न विचारून भंडावून सोडतात. त्यांना हे समजून सांगतासांगता रामदेवच्या लक्षात येते की, ज्यां चालीरीतींना आपण हास्यास्पद म्हणून धूडकावून लावत होतो, त्यात एक प्रकारचं गांभीर्य आहे व काव्यसुद्धा. मग मात्र रामदेव घोडीवर निमूटपणे बसतो.

‘यांदे’ या चौथ्या कथेत दोन म्हाताऱ्या स्त्रिया आहेत. त्यातील एक खूप आजारी आहे व दुसरी मोठ्या मुष्किलीने तिला शोधत येते. त्या दोघी खूप वर्षांनी भेटतात. ही कदाचित त्यांची शेवटची भेट असते. आजारी म्हातारीचा मध्यमवयीन मुलगा आहे. त्या  दोघी बघताबघता त्यांच्या तरुणपणीच्या आठवणींत शिरतात. मुलाच्या लक्षात येतं की, या दोघींचं असं एक जग आहे जिथं त्याला प्रवेश नाही. हे सर्व त्याचा जन्म होण्याच्या आधीचं जग आहे. त्याला कळतं की आपली आर्इ एकदा भांग पिऊन पडली होती. तो आर्इकडे अविश्वासानं बघायला लागतो. काळ कसा सर्व संदर्भ बदलत जातो, हे सांगत कथा संपते.

शेवटची व पाचवी कथा आहे ‘समाधी भार्इ रामसिंग की’. या कथेत एखाद्या गावात एखादा अवलिया आल्यावर कशी धमाल उडते याचं वर्णन आहे. वरवर साधा वाटणारा रामसिंग बैगारी गावात गेली दहा वर्षं असतो. एके दिवशी भार्इ रामसिंग जाहीर करतो की, तो उद्या सकाळी चार वाजता मरणार आहे. त्याला ‘वरून’ तसा आदेश आला आहे. हे बघायला सर्व गाव गोळा होतो. पण भार्इ रामसिंग मरत नाही. गावकरी चिडतात व रामसिंगला मारहाण करायला लागतात. नंतर रामसिंगला सकाळी सात वाजताच्या आसपास मरण येतं. त्यामुळे चिडलेल्या गावकऱ्यांत परिवर्तन होते. ते सर्व रामसिंगचे गुणगान करायला लागतात. ज्या ठिकाणी त्याचा मृत्यू होतो, तिथं समाधी बांधतात व लवकरच ‘नवसाला पावणारा बाबा’ म्हणून भार्इ रामसिंग प्रसिद्ध होतो.

साहनींच्या या पाच कथा बघितल्या की, त्यांच्या जीवनानुभवाची व्याप्ती किती खोल व विस्तृत आहे याचा अंदाज येतो. त्यांच्या अनेक कथांत गोरगरिबांविषयी, दडपलेल्या स्त्रियांविषयी, सामान्य माणसांविषयी अस्सल कळवळा दिसून येतो.

सर्व कथांसाठी दिग्दर्शिका सीमा पाहवा यांनी रंगमंचावर अतिशय मोजकं नेपथ्य वापरलं आहे. बांद्रयाच्या (प.)  सेंट अँड्रयूज शाळेचा रंगमंच अशा नाटकांसाठी योग्य आहे. ‘ऊब’ कथेत तर रंगमंचावर फक्त पाच-सहा ब्लॉक व शुक्ला सरांना बसायला एक खुर्ची एवढंच नेपथ्य होतं. हाच प्रकार थोड्याफार फरकाने इतर कथांबद्दलही होता. प्रकाशयोजनेद्वारे अनेक वेळा प्रसंग बदलण्याचं सूचित केलं जातं व काही वेळा स्वगतासाठीसुद्धा याचा वापर केला गेला. भीष्मोत्सवात पार्श्वसंगीत महत्त्वाचं ठरतं. कारण ‘सिर का सदका’ व ‘ढोलक’ या कथांत बारशाचं व लग्नाचं वातावरण आहे. अशा प्रसंगी खास प्रकारे संगीत असतं. ही बाजू छान सांभाळली आहे. ‘ऊब’ कथेतील शुक्ला (राकेश चतुर्वेदी), ‘सिर का सदका’ कथेतील स्त्री (हीबा शहा), ‘यादे’मधील दोन म्हाताऱ्या (सीमा पाहवा व रत्ना पाठक), ‘ढोलक’ कथेतील रामदेव (मायंक पाहवा) व महत्त्वाच्या अनेक नातेवार्इकांची भूमिका करणारे (मनोज पाहवा) व अमेरिकन स्त्रीची भूमिकेतील मनू पाहवा व सरतेशेवटी भार्इ रामसिंगच्या भूमिकेतील नसरुद्दिन शहा या सर्वांचा अभिनय एवढा जिवंत होता की, आपण नाटक बघत आहोत याचं प्रेक्षकांना भान राहत नाही.

मनोज-सीमा पाहवा या बुजुर्ग अभिनेत्यांबद्दल काय सांगावं! त्यांचा रंगमंचावरचा वावर एवढा सहज असतो आणि देहबोलीवर त्यांची एवढी हुकमत असते की बस्स. मयांक व मनू पाहवा यांच्या अभिनयात सफार्इ आहे. हीबा शहा ही तरुणी मुंबर्इतील हिंदी रंगभूमीवर नाव कमावताना दिसते. ‘सिर का सदका’तील थोरल्या बहिणीच्या मनातील आंदोलनं हीबाने अटूकपणे व्यक्त केली आहेत. सर्वांत शेवटी नसरुद्दिन शहा. मी आजपर्यंत शहांना चार वेळा रंगभूमीवर बघितलं आहे. १९९०च्या दशकात बेंजामिन गिलानीबरोबर बेकेटचं ‘वेटिंग फॉर गोदो’मध्ये. त्याच्या आसपासच बर्नाड शॉच्या ‘डिअर लायर’मध्ये रत्ना पाठकबरोबर. काही वर्षांपूर्वी ‘आर्इनस्टार्इन’ करताना आणि आता ‘भार्इ रामसिंग’ साकार करताना. या चार प्रसंगी मनं त्यांचा दर्जेदार अभिनय बघून थक्क झालं. शुद्ध उच्चारावर घेतलेली मेहनत, आवाजातील योग्य चढ-उतार, शरीराचा संयतशील वापर वगैरेमुळे शहांना रंगभूमीवर बघणं हा विलक्षण अनुभव असतो!

लेखक मुंबईमध्ये अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत.

nashkohl@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख