राजकुमार संतोषी : एका पिढीच्या नॉस्टॅल्जियातला अमर दिग्दर्शक
सदर - इनसाइडर
अमोल उदगीरकर
  • राजकुमार संतोषी
  • Sat , 20 May 2017
  • इनसायडर Insider अमोल उदगीरकर Amol Udgirkar राजकुमार संतोषी Rajkumar Santoshi

राजकुमार संतोषीला जाणून घ्यायचं तर सुरुवातीला त्याच्या वडलांना पी.एल. संतोषी यांना जाणून घ्यावं लागेल. कारण राज संतोषीवर वडिलांचा प्रचंड प्रभाव आहे. एक कलाकार म्हणून आणि एक माणूस म्हणूनही. पी. एल. संतोषी हे स्वातंत्र्यापूर्वीच्या भारतीय चित्रपटसृष्टीतलं मोठं प्रस्थ. अतिशय प्रतिभावान दिग्दर्शक आणि लेखक.

जेव्हा पी.एल. संतोषी चित्रपट करायचे तेव्हा त्यांचे सहाय्यक दिग्दर्शक होते गुरुदत्त आणि देव आनंद. ओ.पी. नय्यरसारख्या दिग्गजाला प्रकाशझोतात आणायचं श्रेय संतोषीचंच. राज कपूर, मधुबाला यासारख्या कलाकारांनी संतोषींच्या दिग्दर्शनाखाली काम केलं आहे. राज कपूर आदराने त्यांना 'गुरुजी' असं संबोधायचा. पण चित्रपटसृष्टी म्हणजे ऊन-सावल्यांचा खेळ. आज सुपातला माणूस कधी जात्यात जाईल याचा भरवसा नाही. पी.एल. संतोषी दिग्दर्शक म्हणून भारी असले तरी निर्माता म्हणून तितकेच वाईट होते.

या सृजनशील माणसाला चित्रपटसृष्टीच्या आकडेवारीची गणितं जमली नाहीत. आर्थिक गणितं कोसळली आणि आयुष्याचा डोलाराच कोसळायला लागला. स्वतःचं घर सोडून एका भाड्याच्या खोलीत राहायला जावं लागलं. ज्या नय्यरला मोठी संधी मिळवून दिली, त्याच्यापुढेच कामासाठी हात पसरावे लागले. परिवाराची दशा झाली.

खुद्द राजकुमार संतोषीला बारावीनंतर फी भरता येत नाही म्हणून शिक्षण सोडावं लागलं. वडिलांना सहाय्यक ठेवणं परवडत नाही म्हणून राजने ती जबाबदारी सांभाळली. वडिलांच्या शेवटच्या काळातली तगमग, हालअपेष्टा राज संतोषीने खूप जवळून बघितल्या. किडनी खराब होऊन जेव्हा पी.एल. संतोषी गेले, तेव्हा राज संतोषीसमोर अंधार होता. लहान वयात आई, आजी आणि दोन बहिणींची जबाबदारी त्याच्या खांद्यावर येऊन पडली. वडिलांनी कर्जाचा डोंगर उभा करून ठेवला होता. प्रचंड सृजनशीलता आणि संवेदनशीलता हा गुण वडिलांकडून राजमध्ये आला होता. पण वडिलांची शोकांतिका इतक्या जवळून पाहून राज संतोषी काही शिकला का? दुर्दैवानं याचं उत्तर नकारात्मक आहे.

राजकुमार संतोषी हा 'मासेस'चा दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. त्याच्या चित्रपटात  माचो नायक, सुंदर नायिका, टाळ्याखाऊ संवाद, अॅक्शन पॅक्ड सीन्स, (प्रेक्षकांना आवडतील अशी) गाणी, विनोदी प्रसंग असा प्रेक्षकांना आवडेल असा मालमसाला ठासून भरलेला असतो. पण कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल आपल्या वडिलांखालोखाल राज संतोषीवर प्रभाव आहे तो गोविंद निहलानींचा.

राज संतोषीने तब्बल पाच चित्रपटांत निहलानींचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर घर चालवण्याची जबाबदारी अंगावर पडलेल्या राजने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली. काही दिग्दर्शकांचा सहाय्यक म्हणून काम केल्यानंतर राजची नाळ जुळली ती निहलानींसोबत. त्यांच्यासोबत काम करून राज संतोषी फिल्ममेकिंगबद्दल बरंच शिकला. निहलानींची फिल्मोग्राफी ज्यांना माहीत आहे, त्यांना हे माहीत आहे की निहलानी हे त्या काळात भरात असणाऱ्या समांतर चित्रपट चळवळीचे आघाडीचे शिलेदार होते. त्यांच्या 'अर्धसत्य' या हार्ड हिटिंग चित्रपटाचा प्रभाव भल्याभल्यांवर पडला. दस्तुरखुद्द राज संतोषींच्या 'घायल' या पहिल्या चित्रपटामध्ये निहलानींच्या 'अर्धसत्य'च्या छटा दिसतात असं माझं वैयक्तिक मत आहे.

'घायल' कसा बनला याची कहाणी मोठी रोचक आहे. अनेक वर्षं निहलानींचा असिस्टंट म्हणून काम केल्यावर आपण आता स्वतःचा चित्रपट बनवायला पाहिजे असं संतोषीने ठरवलं. त्याने आपल्या हरवलेल्या भावाचा शोध घेणाऱ्या नायकाची कथा लिहिली होती. त्याला नायक म्हणून कमल हसन हवा होता. पण त्याची हिंदीमधली कारकीर्द फारशी काही चांगली चालू नव्हती. त्यामुळे त्या कथेसाठी निर्माते मिळेनात. कमल हसनचं नाव ऐकताच निर्माते नकारघंटा वाजवायचे. राज संतोषीने सनी देओलचे काही चित्रपट बघितले होते. या पोराच्या वरकरणी निर्जीव वाटणाऱ्या डोळ्यांमध्ये एक आग आहे असं राज संतोषीला वाटलं. मग कमल हसनचा पर्याय बाजूला ठेवून राज संतोषीने सनी देओलला ‘माझ्या चित्रपटात काम करशील का?’ अशी विचारणा केली. सनीला स्क्रिप्ट आवडलं. त्याने होकार दिला. एक  निर्माता तयार झाला. चित्रीकरण सुरू करण्याचा दिवस जवळ आला. आता सगळं सुरळीत पार पडणार असं वाटत असतानाच कहानी मे पुन्हा ट्विस्ट आला. प्रोड्युसर एकदम गायबच झाला. चित्रपटाचं चित्रीकरण तर जवळ आलं होतं. आता काय? पण सनी देओलने स्वतःच निर्माता बनण्याचा निर्णय घेतला.

१९९० साली हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि इतिहास घडला. समीक्षक आणि प्रेक्षक या दोघांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढणारा सनी देओलचा अजय मेहरा म्हणजे 'अँग्री यंग मॅन'चा नवीन चेहरा होता. सनी देओलने अजय मेहराच्या भूमिकेला पुरेपूर न्याय दिला असला तरी कमल हसनने हा रोल कसा केला असता याची मी मनात कित्येकदा कल्पना करतो.

राज संतोषीचा बलात्कार या गंभीर सामाजिक मुद्द्यावर बनलेला 'दामिनी' हा दुसरा चित्रपट. चित्रपट सनी देओलचे खटकेदार संवाद, अमरीश पुरीचा उन्मत्त वकील, मीनाक्षी शेषाद्रीचा ऑथर बॅक्ड रोल, ऋषी कपूरचा प्रभावी अंडरप्ले आणि जबरदस्त कोर्टरूम नाट्य यामुळे सुपरहिट झाला. 'घायल' आणि 'दामिनी' नंतर सामाजिक प्रश्नावर प्रभावी भाष्य करणारा दिग्दर्शक अशी राज संतोषीची ओळख प्रस्थापित होऊ लागली होती. पण राज संतोषीने 'अंदाज अपना अपना' बनवून सगळ्यांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला.

'अंदाज अपना अपना' हा भारतीय चित्रपटांच्या इतिहासातला कल्ट असला तरी रिलीज झाला, त्यावेळेस त्या चित्रपटाला प्रेक्षकांनी फारसा प्रतिसाद दिला नव्हता. पण व्हिडीओ कॅसेट्स , केबल टीव्ही, अनधिकृत सीडीज, पायरसी आणि युट्युब या माध्यमांतून या चित्रपटाला रिपीट ऑडियन्स मिळत गेला. तुफान माऊथ पब्लिसिटीवर चित्रपटाचा कल्ट पसरतच गेला. चित्रपटाची दिग्दर्शीय हाताळणी अतिशय नावीन्यपूर्ण होती. चित्रपटातला विनोद प्रसंगांमधून निर्माण होतोच, पण चित्रपटाचा यशात संवादाचा वाटा मोठा आहे. परेश रावल काय ताकदीचा विनोदी अभिनेता आहे हे या चित्रपटातून प्रेक्षकांना कळालं.

'घातक' हा राज संतोषीच्या आयुष्यातला अजून एक माईलस्टोन. त्यात पुन्हा अन्यायकारक 'समांतर' व्यवस्थेविरुद्ध लढणारा सनी होता. चित्रपटातले संवाद अजून लोकांना लक्षात आहेत.

'हिरो वर्शीप' करणाऱ्या समाजात दिग्दर्शक हा तसा दुर्लक्षित प्राणी. पण राज संतोषी याला अपवाद आहे. त्याचं नाव प्रेक्षकांना माहीत आहे. रणबीरचा 'अजब प्रेम की गजब कहानी' हिट होण्यात राज संतोषीचा स्वतःचा असा एक लॉयल प्रेक्षकवर्ग आहे, त्याचा मोठा वाटा आहे.

राज संतोषीचा माझा सगळ्यात जास्त आवडता चित्रपट म्हणजे 'चायना गेट'. हा चित्रपट उघडच 'सेवन समुराई' किंवा 'शोले'वरून प्रभावित आहे. यात एक पण स्टार नाहीये. खूप चांगले अभिनेते आहेत हे नक्की. चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे असं का म्हणतात ते या चित्रपटातल्या राज संतोषीच्या कामगिरीवरून कळतं. चित्रपटात अनेक पात्रांची गर्दी आहे. पण एक-दोन अपवाद वगळता संतोषीने बहुतेक पात्रांना खूप चांगला न्याय दिला आहे.

मध्यंतरी भगतसिंगवरच्या चित्रपटांची लाट आली होती. त्यात संतोषीचा भगतसिंग सगळ्यात सरस होता. मला प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्यांच्या आयुष्यावर आधारीत 'खाकी' जाम आवडला होता. सलमान खानचे किंवा रजनीकांतचे चित्रपट तुम्हाला खऱ्या अर्थाने एन्जॉय करायचे असतील तर तुम्ही ते सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये बघायला हवेत असं म्हटलं जातं. संतोषीच्या चित्रपटांना पण हा नियम लागू पडतो. संतोषी हा असा दिग्दर्शक आहे- जो पिटातल्या प्रेक्षकांपासून ते शेवटच्या ओळीत बसणाऱ्या प्रेक्षकांना खुश करतो. पण संतोषीसारख्या दिग्दर्शकाला मिळायला हवं तितकं यश मिळालं नाही असं एक निरीक्षण आहे.

पी.एल. संतोषीचा अघळपघळपणा आणि अव्यवहारीपणा राज संतोषीमध्ये पण पुरेपूर उतरला आहे. राज संतोषीला चित्रपट रिशूट करण्याची प्रचंड आवड आहे. संतोषीमधला परफेक्शनिस्ट  जे काही शूटिंग झालंय त्यावर कधीच खुश नसतो. आपल्या प्रेक्षकांना सर्वोत्तम तेच देण्याचा त्याचा अट्टाहास असतो. म्हणून अनेक वेळा चित्रपटाचा मोठा भाग तो खूप वेळा पुन्हा शूट करतो. पण हे रिशूट निर्मात्याला झेपत नाही. चित्रपटाची प्रॉडक्शन कॉस्ट भरमसाठ वाढते. चित्रपटावरचा हा अवाढव्य खर्च त्या प्रोजेक्टला आतबट्ट्याचा व्यवहार बनवतो. ही प्रॉडक्शन कॉस्ट तिकीट खिडकीवर वसूल करणं अवघड जातं. संतोषीच्या या रिशूटच्या हौशीमुळे तो अनेक निर्मात्यांच्या काळ्या यादीत जाऊन बसला आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाचा कालावधी खूप वाढतो. गेल्या काही वर्षात संतोषीच्या दोन चित्रपटांमध्ये बरंच अंतर पडताना दिसत आहे, त्याचं कारण हे. शिवाय वेळेवर काम पूर्ण करण्यात दिरंगाई हा खूप मोठा दुर्गुण संतोषीच्या अंगी आहे.

'अंदाज अपना अपना'मध्ये संतोषीसोबत काम केलेला सलमान खान हा संतोषीचा चाहता आहे. संतोषीवरच्या प्रेमापोटी त्याने संतोषीच्या काही चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका केली आहे. सलमानने संतोषीसाठी चित्रपटाची निर्मिती करण्याची तयारी दाखवली होती. पण संतोषीने दिलेल्या वेळात पटकथाच पूर्ण केली नाही. नाईलाजाने सलमानने संतोषीचा नाद सोडला आणि पुढचा प्रोजेक्ट हाती घेतला.

सध्या संतोषी रणवीर हुडाला घेऊन एक चित्रपट करत आहे. तो पण अपूर्ण पटकथा आणि फंडिंगच्या अभावी रखडला आहे. चित्रपटसृष्टीच्या बदलत्या रूपाशी संतोषी जुळवून घेऊ शकत नाहीये की, काय असं कधी कधी वाटतं. असंही 'ओल्ड स्कुल' दिग्दर्शकांपैकी डेव्हिड धवन, सतीश कौशिक, संतोषी असे फार कमी दिग्दर्शक आज तग धरून आहेत. 

नव्वदच्या दशकात वाढलेल्या पिढीतल्या प्रेक्षकांवर त्याच्या चित्रपटांतून सर्वाधिक प्रभाव टाकणारा दिग्दर्शक म्हणजे राज संतोषी असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याच्या 'घायल', 'घातक' , 'दामिनी' आणि 'अंदाज अपना अपना'सारख्या चित्रपटांमुळे तो एका पिढीच्या नॉस्टॅल्जियामध्ये एक कलाकार म्हणून अमर होऊन बसला आहे. राजकुमार संतोषीचं सगळ्यात मोठं यश हेच आहे.

……………………………………………………………………………………………

लेखक फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.

amoludgirkar@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......