अजूनकाही
आपल्या देशात नैतिकतेचा मुद्दा कायम ऐरणीवर असतो. प्रत्येक गोष्टीकडे आपण नैतिक-अनैतिकतेच्या दृष्टिकोनातून बघत असतो. केवळ आपल्याकडेच नाही तर जगभरच्या साहित्यामधून नैतिक-अनैतिकतेचा मुद्दा कायम मांडलेला दिसतो. आपल्या टीव्ही मालिका, नाटकं आणि चित्रपट यातूनही हा मुद्दा वारंवार दिसतो.
मुळात पाप-पुण्य, नैतिक-अनैतिक या गोष्टींना आपल्या समाजामध्ये अति महत्त्व दिलं जातं. मराठी-हिंदी चित्रपटांमधून हा मुद्दा वेगवेगळ्या पद्धतीनं परत परत मांडला गेलेला आहे.
‘आम्ही जातो आमुच्या गावा’ या चित्रपटात तीन चोर एका सधन माणसाच्या घरात चोरीच्या उद्देशानं राहतात आणि नंतर त्या कुटुंबाच्या प्रेमाच्या ओझ्याखाली दबून जातात. ज्या-ज्या वेळी चोरी करायचा विचार करतात, तेव्हा त्यांना नैतिकतेच्या दडपणाखाली तसं करता येत नाही.
‘चित्रलेखा’ या चित्रपटात मीनाकुमारी गणिका आहे आणि अशोककुमार एक साधू. ती गणिका आहे म्हणून तिला हा साधू सतत हिणवतो. तिला सतत नैतिकतेचे धडे देत असतो. ती किती चुकीचं वागते आहे असं वारंवार सांगत राहतो. पण तीही त्याला चांगलं ओळखून आहे. कारण ती बुद्धिमान आहे. ती गणिकेचा व्यवसाय करतेय, पण तिला आयुष्याचं सार कळलेलं आहे. हा साधू नुसता पोथीपंडित आहे, पण ती सारासार विचार करणारी आहे. त्यामुळे ती त्याला म्हणते की, ‘संसार से भागे फिरते हो, भगवान को तुम क्या पाओगे?’
या गाण्यात साहिरनं फार सुंदर लिहिलंय –
ये भोग भी एक तपस्या है,
तुम त्याग के मारे क्या जानो,
हम जनम बीताकर जायेंगे,
तुम जनम गवांकर जाओगे
मद्यपान किंवा दारू पिणं हा जगातल्या बऱ्याचशा खाद्यसंस्कृतींचा अविभाज्य भाग आहे. हवामान असेल किंवा रूढी-परंपरा असतील, बऱ्याच संस्कृतींमध्ये सर्रास मद्यपान केलं जातं आणि मुख्य म्हणजे त्याला नैतिकता जोडली जात नाही. आपल्या देशात मात्र तसं नाहीये. मद्यपान हे अनैतिक आहे, ते चुकीचं आहे हे आपल्या मनावर लहानपणापासून ठसवलं जातं. आपल्या पुराणांपासून ते दंतकथांपर्यंत सगळीकडे दारू पिणं वाईट असतं हेच सांगितलेलं आढळतं.
जसं दारू पिणं अनैतिक आहे तसंच खरं बोलणं नैतिक आहे. ख्रिश्चन धर्मात जेव्हा तुम्हाला आपल्या पापाची कबुली द्यायची असते तेव्हा सोपा मार्ग आहे. चर्चमध्ये जायचं, कन्फेशन बॉक्ससमोर बसायचं आणि धर्मोपदेशकासमोर आपल्या पापाची कबुली द्यायची.
आपल्या धर्मात असा काही मार्ग नाही. मग त्या पापाच्या ओझ्याखाली कुढत राहायचं. जेव्हा काही खरं बोलायची वेळ येईल, तेव्हा काय करायचं? आपल्या सिनेमा आणि मालिकांनी यावर फार सोपा मार्ग काढलेला आहे. नायकाला दारू प्यायला लावलं की, तो घडाघडा आपल्या मनातलं बोलतो! आता खरं तर आपल्याकडे दारू पिणं अनैतिक मानलं आहे, पण खरं बोलण्यासारखी नैतिक गोष्ट करण्यासाठी आपल्या चित्रपट-मालिकांनी या मार्गाचा सर्रास अवलंब केलेला आहे. मला ही फार मजेची गोष्ट वाटते. म्हणजे विरोधाभास असलेल्या गोष्टींना एकत्र करून आपल्याला हवा तो निष्कर्ष काढणं मला फार मजेचं वाटतं.
‘गाईड’ या चित्रपटातला नायक अर्थातच गाईड आहे. रोझी ही एक मनस्वी स्त्री. जिच्याकडे तिच्या नवऱ्याचं लक्ष नाहीये. ती नर्तिका आहे. ती या गाईडच्या प्रेमात पडते. तोही तिला आधार देतो. ती परत आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीतून बघायला लागते. राजू गाईड तिला घरी आणतो. पण ती एका वेश्येची मुलगी आहे म्हणून त्याची आई तिला घरात घ्यायला नकार देते. त्याचे साथीदार त्याला सोडून जातात. शेवटी उदरनिर्वाहासाठी रोझी परत नाचायला लागते. त्यांचे दिवस पालटतात. तिला खूप नावलौकिक मिळतो. तिला मिळालेल्या नावलौकिकामुळे तिचा नवरा परत तिचं मन जिंकायचा प्रयत्न करतो. तो तिच्यासाठी फुलं पाठवतो, निरोप पाठवतो, पण तोपर्यंत तिच्या प्रेमात आकंठ बुडालेला राजू त्याचा निरोप तिच्यापर्यंत पोचू देत नाही. पुढे राजू पैशांची अफरातफर करतो. त्याला तुरुंगवास होतो. राजूच्या पैशांच्या हव्यासामुळे त्यांच्या दोघांमध्ये दुरावा येतो. अशा वेळी जेव्हा राजूला तिला आपल्या मनातलं सांगायचं असतं, तेव्हा राजू दारूचा आसरा घेतो.
‘गाईड’ हा चित्रपट म्हटलं तर नैतिक-अनैतिकतेचा ऊहापोह करतो. कारण तुरुंगातून सुटल्यावर राजूला आपल्या कर्माचा पश्चाताप होतो आणि तो संन्यास घेतो. त्याआधीच्या आयुष्यात तो अगदीच रंगेल, छानछोकी करणारा असतो (यात चूक नाही, फक्त आपल्याकडे छानछोकी करणं चुकीचं समजलं जातं म्हणून उल्लेख केला आहे इतकंच!).
‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात एक फार छान दृश्य आहे. या चित्रपटात दोन नायक आहेत, दोघेही अर्थातच नायिकेवर जीवापाड प्रेम करणारे. नायिका ज्याच्यावर प्रेम करते आहे त्याच्याशी तिचं लग्न होऊ शकत नाही आणि तिचं ज्याच्याशी लग्न होतं तो तिला तिच्या प्रियकराला भेटवण्यासाठी घेऊन जातो. तिनं त्याच्याबरोबर आपलं आयुष्य घालवावं यासाठी तो तिला लग्नबंधनातून मुक्त करणार असतो. पण प्रियकराला शोधता शोधता, जो काळ ते बरोबर घालवतात त्यात हा नायक तिच्यावर अजूनच प्रेम करायला लागतो आणि नायिकेलाही तो कळायला लागतो. त्यामुळे नकळत तीही त्याच्या प्रेमात पडत चाललेली आहे.
नवऱ्याला सोडून प्रियकराकडे जाणं हे आपल्या संस्कृतीत अनैतिकच. लग्नाच्या गाठी या आयुष्यभरासाठी बांधलेल्या असतात वगैरे शिकवणारी आपली संस्कृती. नायिका तरी त्याला कशी अपवाद असेल? ती कायम गळ्यात मंगळसूत्र घालून वावरतेय. नवऱ्याच्या प्रेमात पडत चालली आहे. एकदा ते दोघे फिरायला बाहेर जातात. तिथे मजा करतात, नाचतात. नवरा दारू पितो आणि अर्थातच त्याच्या मनातलं बाहेर येतं. इथेही दारूचा आधार खरं बोलण्यासाठी घेतलेलाच आहे. तो तिला सांगतो की, तिचा प्रियकर तिला आनंदात ठेवेल, मी तुला भेटायला येईन. पण हे प्रत्येक वाक्य सांगताना तो म्हणतो – ‘मैं तुमसे एक बात कहूँ?’ आणि पुढे म्हणतो – ‘कुछ नहीं’. अजय देवगणनं या प्रसंगात चांगला अभिनय केला आहे.
‘साहिब, बीवी और गुलाम’ हा एक अभिजात हिंदी चित्रपट. बंगालमधल्या जमीनदारांच्या पोकळ प्रतिष्ठेचं यथार्थ वर्णन करणारा. यातली छोटी बहू ही तिच्या इतर जावांपेक्षा वेगळी आहे. नवरा आपल्याकडे दुर्लक्ष करून बाहेर नायकिणींकडे जातोय हे तिला सहन होत नाही. तिला ते मान्यच नाहीये, ती ते स्वीकारायला तयार नाहीये. ती नवऱ्याला त्याबद्दल जाब विचारते, तेव्हा तो म्हणतो, ‘त्या माझ्याबरोबर दारू पितात, मला रिझवतात.’ तेव्हा छोटी बहू आपल्या मनाविरुद्ध दारू प्यायला लागते. या आशेवर की आता तरी नवरा आपल्याकडे बघेल, आपल्याजवळ थांबेल.
ही छोटी बहू दारू पिण्याचा अनैतिक निर्णय घेते तो नवऱ्याचं प्रेम मिळवण्यासाठी. म्हटलं तर नवरा-बायकोचं नातं तथाकथित पवित्र नातं. पण त्या पवित्र बंधनासाठी छोटी बहू अनैतिक गोष्ट करते. नुसती करतच नाही तर इतकं करूनही जेव्हा तिचा नवरा परत नायकिणीकडे जायला निघतो, तेव्हा त्याला जाब विचारते.
सोनी टीव्हीवर सध्या सुरू असलेल्या ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ या मालिकतेला नायक उद्योजक आहे. खूप हलाखीच्या परिस्थितीतून वर येऊन त्यानं आपलं साम्राज्य उभं केलं आहे. हे करताना त्याची आई त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. नायकाला त्याची जाणीव आहे आणि म्हणून आई हे त्याचं दैवत आहे. आई म्हणेल ती पूर्वदिशा असं तो मानतो. तो प्रेमात पडतो आणि मग संघर्ष सुरू होतो. नायिका स्वतंत्र वृत्तीची आहे, आपल्या पायावर उभी आहे, आपले निर्णय आपण घेते आहे. तिला नायकाचं हे आईवेड अति वाटतं आणि जे खरंच आहे. नायक अतिशय हळवा आहे. दोघींपैकी कुणाची बाजू घ्यायची हे त्याला कळत नाहीये आणि या दोन्ही बाजूंमध्ये सुवर्णमध्य कसा साधायचा हे उमगतही नाहीये. त्यामुळे तो अनेकदा चुकीचे निर्णय घेतो. नायिकेला अनेकदा दुखावतो. बरं हे करताना तो नायिकेला विश्वासात घेत नाही, फक्त तिला आपले निर्णय सांगून मोकळा होतो. अर्थातच दोघं एकत्र राहू शकत नाहीत. पण जेव्हा जेव्हा नायकाला नायिकेकडे आपलं मन मोकळं करायचं आहे, तेव्हा तेव्हा तो दारूचा आधार घेतो.
नैतिक-अनैतिक या फार सापेक्ष कल्पना आहेत. एखाद्यासाठी नैतिक असणारी गोष्ट दुसऱ्यासाठी अनैतिक असू शकते. पण जेव्हा नैतिकतेचे काही ढोबळ निकष असतात – उदाहरणार्थ, खरं बोलणं, प्रामाणिकपणे वागणं - तेव्हा ते सगळ्यांकरता सारखे असतात. आपल्यासारख्या समाजांमध्ये या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत. पण चित्रपट आणि मालिकांमधून नैतिक गोष्टी करण्यासाठी त्याची ज्या अनैतिक गोष्टींशी सांगड घातली गेली आहे, हे बघणं नुसतं मनोरंजकच नाही तर विचार करायला लावणारं आहे.
लेखिका ‘डिटीजल कट्टा’ या ऑनलाइन नियतकालिकाच्या संस्थापक संपादक आहेत.
sayali.rajadhyaksha@gmail.com
……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment