पं. शरच्चंद्र आरोलकर : हे तो प्रचीतीचे बोलणे
सदर - चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
केशव परांजपे
  • पं. शरच्चंद्र आरोलकर
  • Sat , 20 May 2017
  • शास्त्रीय संगीत Classical music केशव परांजपे Keshav Paranjpe पं. शरच्चंद्र आरोलकर Pandit Sharatchandra Arolkar

संगीतविषयक पुस्तकांत खूप विविधता आहे. मोठ्या कलाकारांची चरित्रं किंवा आत्मचरित्रं ही संगीतात अनभिज्ञ असणाऱ्या उत्सूक वाचकाला आवडेल अशी पुस्तकश्रेणी आहे. अर्थात याबाबतीतही एक प्रश्न आहेच. शास्त्रीय संगीत परंपरेतले अगदीच थोडे कलाकार सर्वसामान्यांना ठाऊक आहेत. जिथं कलाकारांची नावंसुद्धा नीट माहिती नाहीत, तिथं त्यांच्या चारित्र्याबद्दल उत्सूकता कुठून असणार? त्यांच्या चरित्रात येणारे संदर्भ कसे लागणार? तरीही ही चरित्रं वाचनीय आहेत. ती वाचून कलाकाराचा परिचय होईल, तसा संगीत परंपरेचाही परिचय होईल. आज एका किंचित चरित्र प्रकारातील लक्षणीय पुस्तकाचा परिचय करून देतो. ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका नीला भागवत यांनी लिहिलेलं व संपादित केलेलं पुस्तक- ‘शरच्चंद्र आरोलकर : लेणे प्रतिभेचे’. आरोलकरबुवा हे अतिशय गुणी गायक. त्यांचं गाणं खास ठेवणीतलं. तसे ते अलीकडच्या काळातले. खूप लोकप्रिय वगैरे झाले नाहीत, पण गाण्याच्या संपर्कात असणाऱ्या दर्दी रसिकांच्या आणि कलाकारांच्या मनात आरोलकरबुवांच्या नावाचा एक सुगंधी कप्पा नक्की असतो.

एकोणिसाव्या-विसाव्या शतकातील शास्त्रीय संगीत कलाकारांची चरित्रं हा सांस्कृतिक क्षेत्राविषयी आस्था असणाऱ्यांसाठी महत्त्वाचा प्रेरणास्रोत आहे. पुष्कळदा हा स्रोत भावविवशता, दुराग्रह, अतिशयोक्ती आणि अगदी बुवाबाजी अशा अनिष्टांनी गढूळलेला असतो. नीला भागवत यांचं आरोलकरबुवांवरील लेखन-संपादन अशा सर्व दूषणांपासून मुक्त आणि म्हणूनच हृद्य व उदबोधक आहे.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत या सांस्कृतिक संचिताचं कोंदण हे सरंजामशाही परंपरेचं आहे. म्हणूनच या परंपरेच्या विरोधात स्पष्ट भूमिका घेणाऱ्या, स्पष्टपणे बोलायचं तर साम्यवादी विचारसरणीच्या लोकांच्या शास्त्रीय संगीतविषयक दृष्टिकोनाविषयी साहजिकच कुतूहल वाटतं. ही मंडळी संगीतावर आणि संगीतकारांवर मनापासून प्रेम करताना दिसतात आणि सांस्कृतिक विद्रोहासाठी त्यांनी दंडही थोपटलेले असतात. अशा कलाकार, समीक्षक आणि रसिकांचा दृष्टिकोन हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत समजून घ्यायलाच नव्हे तर ते काळाबरोबर पुढे नेण्यासाठीही महत्त्वाचा ठरू शकतो. त्यांच्या दृष्टिकोनातून उतरलेलं प्रस्थापित कलाकारांचं मूल्यमापन संगीत समीक्षेची वेगळी मिती पुढे आणू शकतं.

अस्सलपणाचा संदर्भ होऊन जगणं हीदेखील एक फार मोठी कामगिरी आहे, असं म्हणून नीलाबाईंना पं. आरोलकर यांच्या चरित्राचा व्याप करावासा वाटला. स्वातंत्र्योत्तर काळात बदलत जाणाऱ्या वास्तवाच्या संदर्भात कलाकारांची आत्मनिष्ठ आणि लोकाभिमुख अशी वर्गवारी करून नीलाबाई आरोलकरबुवांना समजून घेतात आणि समजावून देतात.

‘आलेख जीवनाचा’ या प्रकरणात नीलाबाईंनी आरोलकर बुवांच्या चरित्राचे ठळक आणि महत्त्वाचे तेवढेच तपशील, तेही त्रोटकपणे नमूद केले आहेत. चरित्र म्हणून हे तपशील फारच त्रोटक असले तरी नीलाबाईंना जे विधान करायचं आहे, त्याची पुष्टी ते करतात. आरोलकरबुवांचं संगतवार, सविस्तर चरित्र हा वेगळा लेखनविषय होऊ शकेल असं मात्र जरूर वाटत राहतं. या चरित्रात घटितं नाहीत. म्हणून ते चितारणं अवघडही झालं आहे.

‘नोंदवही’ या शीर्षकाने एकोणीस पानांचा मजकूर ‘मला उमगलेले बुवांचे संगीतविचार’ अशा प्रकारचा आहे. बुवांकडे शिकताना फार काही विचारण्याची-प्रश्नोत्तरं करण्याची सोय होती, असं चित्र दिसत नाही. तेव्हा बुवांनी जे म्हटलं, सांगितलं, बुवांची जी ठाम मतं जाणवली त्याचं मनन करणं, त्यांचा अन्वय लावणं, हा उद्योग नीलाबाईंना ‘आपुलाचि वाद आपणासि’ या बाण्याने करावा लागला असणार. या संवादाचीच टिपणं-टाचणं या प्रकरणात येतात, पण ती टाचण स्वरूपात नसून निबंध स्वरूपात आहेत. बुवांनी ख्यालाला जे ‘फ्ल्युइड स्कल्पचर’ म्हटलं ते नेमकं काय, याचा उलगडा करण्याचा संगतवार प्रयत्न या केला आहे. काही बंदिशी आणि सुरावटीचे दाखले देणं या संदर्भात अपरिहार्यच होतं. सामान्य वाचकालाच काय, पण थोडंबहुत संगीत शिकलेल्या विद्यार्थ्यालाही हा भाग अवघड जाईल. पण जरी हे स्वरलेखन पूर्णत: वगळून बाजूला काढलं तरी बुवांचं म्हणणं काय होतं हे लक्षात यावं एवढी सुस्पष्टता या लेखनात आहे. ख्याल गायकीची अतिशय मौलिक तत्त्वं या प्रकरणात सूचित झाली आहेत. प्रयोगशील कलाकारांना करून दाखवण्यात रस असतो, बोलण्यात नसतो. ते बोलतात, ते उदगार असतात. गृहीत-साध्य-सिद्धान्त अशी प्राध्यापकी मांडणी करणं हा त्यांचा पिंड नसतो. त्यांच्या उदगारांचा अन्वय लावण्याचं काम टीकाकारांचं असतं. नीलाबाईंनी ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडली आहे.

‘गुरूंचे गुरू- एक अशांत कलाकार’ हे प्रकरण फारच सुंदर उतरलं आहे. बुवांच्या व्यक्तिमत्त्वातले अंतर्विरोध, त्यांच्या वेदनेचे स्रोत नीलाबाईंनी फार नेमकपणाने अधोरेखित केले आहेत. बुवांची बाजू घेण्याचा प्रकार त्यात बिलकूल नाही. अकृत्रिम आत्मीयतेच्या पार्श्वभूमीवर केलेली तटस्थ कार्यकारणमीमांसा असं या लेखनाचं स्वरूप आहे आणि ते हृद्य आहे. संगीताच्या क्षेत्रात मनस्वी गुरूंचा सहवास करणं, त्यांचं शिष्यत्व निभावणं हे किती दिव्य असतं याची कल्पना या क्षेत्राबाहेरील लोकांनासुद्धा असेल!

बुवा आणि नीलाबाई या गुरुशिष्यांतला विसंवाद या नात्याच्या सशक्त होण्यातले अडसर नीलाबाईंनी स्पष्टपणे मांडले आहेत. तरीही त्यात कुठे तक्रारीचा सूर येऊ दिलेला नाही. खरं तर त्यांच्या मनातच कुठे तो तरळलेला नाही. आपल्या मर्यादा, आपल्या नात्याच्या मर्यादा म्हटल्या की, त्याला दोन्ही बाजू आल्याच यांची समंजस जाणीव आणि अंतर्यामीचा काहीसा विषाद या लेखनात कुठेतरी जाणवत राहतो. या विषादाचं कारण जिव्हाळा, आपुलकी- ती या लेखनाला विलोभनीय करून जाते.

ख्याल गायकी आणि टप्पा गायन या विषयांवरची बुवांची आकाशवाणीवरची दोन भाषणं ‘संगीतकला विहार’ या मासिकात प्रसिद्ध झाली होती. कोलकात्याच्या संगीत रीसर्च अ‍ॅकॅडमीसाठी पं. के. जी. गिंडे आणि मोहन नाडकर्णी यांनी बुवांची मुलाखत घेतली होती. बुवांचे विचार त्यांच्याच शब्दांत यातून समोर येतात. बुवांच्या नेमस्त पण नेमक्या बोलण्याचा प्रत्यय या भाषण-संभाषणातून येतो. त्याचं आकलन वाचकाला होतं, ते मात्र या पुस्तकातील आधी वाचलेल्या पासष्ट-सत्तर पानांमुळेच. बुवांच्या विचारांचा परिचय वाचकाला अगोदरच मिळालेला असल्यामुळे हे संभाषण अधिक नेमकेपणाने कळू शकतं.

यानंतर अरुण खोपकर, दिलीप चित्रे, सुरेश तळवळकर, मोहन नाडकर्णी, रामकृष्ण दास, अरविंद मुळगावकर, पं. शरद, सुमित्रा-समीर साठे आणि अमरेंद्र धनेश्वर यांचे लेख आहेत. हे सर्व लेख बुवांचं गाणं आणि त्यांना बुवा कसे दिसले-भावले हे सांगतातच, शिवाय या प्रत्येक लेखकाची ओझरती ओळखही या लेखांतून होते. रामकृष्ण दासांच्या अगदी छोट्या लेखाच्या उत्तरार्धात बुवांच्या चरित्राचा काही तपशील पुढे येतो, तो वेधक आहे. ‘ग्वाल्हेर गायकी अंतर्मुख होऊन गाणारे म्हणजे आरोलकरच’ असा निर्वाळा पं. तळवळकरांनी दिला आहे. बुवांच्या रागाचं स्वरूप आपल्याला शंभर-दीडशे वर्षं मागे घेऊन जात असे, ही तळवळकरांची टिप्पणी बुवांना जे अभिप्रेत होतं, ते रसिकांपर्यंत पोहोचत होतं, या गोष्टीची पावतीच आहे. ज्यांच्यामुळे बुवांची प्रतिभा रसिकांपर्यंत पोहोचली असं बिरुद नीलाबाईंनी सुप्रसिद्ध संगीत समीक्षक मोहन नाडकर्णी (जोशी कुटुंबीय) यांना दिलं आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या शब्दमर्यादेत नेमका बसणारा नाडकर्णी यांचा लेख अतिशय संपृक्त आहे. मुळगावकरांनी बुवांच्या साक्षेपी, अभ्यासू वृत्तीचा दाखला दिला आहे. त्यांचे गाते शिष्य शरद साठे आणि बुवांचे प्रशिष्य अमरेंद्र धनेश्वर यांचे अधिक विस्तृत लेख या पुस्तकासाठी मोलाचे ठरले असते.

आपल्या गुरूचे देव्हारे न माजवता वस्तुनिष्ठपणे, विश्लेषणात्मक आणि काळाचं भान ठेवून लिहिलेलं हे पुस्तक त्यातील अभिनिवेशरहित आत्मीयतेमुळे वाचनीय आणि मननीय झालं आहे.

‘शरच्चंद्र आरोलकर : लेणे प्रतिभेचे’ – लेखन-संपादन – नीला भागवत, लोकवाङमय गृह, पाने – १४३, मूल्य – २०० रुपये.

लेखक अभिनव पदवी महाविद्यालयाचे (भाईंदर, मुंबई) प्राचार्य आहेत.

kdparanjape@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......