अजूनकाही
अतिशय थोड्या चित्रपटांसाठी त्यांनी गीतं लिहिली. अतिशय थोड्या चित्रपटांसाठी संवाद लिहिले, पटकथा लिहिल्या. पण त्यांचं नाव फार आदरानं घेतलं जातं. अनेक मानसन्मान त्यांना प्राप्त झाले. साहित्यिक म्हणून त्यांचं नाव मोठं होतंच. ते गीतकार-कवी म्हणजे कैफी आझमी. १० मे हा त्यांचा स्मृतीदिन. १४ जानेवारी १९१९ हा आझमी यांचा जन्मदिवस. म्हणजे त्यांचं जन्मशताब्दी वर्ष लवकरच सुरू होईल. कैफी आझमींची प्रतिभा जाणून घ्यायला प्रातिनिधिक म्हणून त्यांचे तीन चित्रपट पुरेसे आहेत.
पहिला आहे अर्थातच गुरुदत्तचा अतिशय महत्त्वाकांक्षी चित्रपट ‘कागज के फुल’ (१९५९). या चित्रपटाच्या प्रत्येक बाबीची चर्चा झाली आहे. चित्रपटाच्या अपयशाने गुरुदत्त कसा खचला आणि त्यातच त्याच्या आयुष्याचा अंत कसा झाला या दंतकथा अजूनही रंगवून सांगितल्या जातात. या चित्रपटाचं व्यावसायिक अपयश त्या काळात पैशात मोजलं गेलं असलं तरी याची गाणी मात्र आजही रसिकांच्या मनात ताजी आहेत.
‘प्यासा’च्या यशानंतर सचिनदेव बर्मन आणि साहिर यांचे संबंध तणावाचे बनले. परिणामी या पुढच्या चित्रपटासाठी गुरुदत्तला नवा गीतकार शोधावा लागला. खरं तर मजरूह (मि. अँड मिसेस ५५, आरपार, बाज, सी.आय.डी.), साहिर (प्यासा, जाल, बाजी), शकिल (चौदहवी का चांद, साहब बिबी और गुलाम), शैलेंद्र (सैलाब) अशा प्रतिभावंत गीतकारांनी गुरुदत्तच्या चित्रपटांसाठी गीतं लिहिली. पण ‘कागज के फुल’ मात्र कैफी आझमींच्या वाट्याला आला. (पुढे गुरुदत्तच्या निधनानंतर ‘बहारे फिर भी आयेंगी’ हा चित्रपट पूर्ण झाला. त्याचं शीर्षक गीतही कैफी आझमी यांचंच आहे.) कैफी आझमी यांची गीतकार म्हणून निवड किती सार्थ होती, ते यातील गाण्यांनीच सिद्ध केलं.
तरुण-तरुणींची टोळी मस्त सहलीला निघाली आहे.
अहा सन सन सन जो चली हवा
रूक रूक कान में कुछ कहा
नये आरमान जागे नये तुफान जागे
झोके पे झोका खाये जिया
आशा-सुधा मल्होत्रा-रफी यांच्या आवाजातील हे गाणं तारुण्याचा जोश पडद्यावर जिवंत करणारं आहे. खरं तर आशा भोसले इतकाच या गाण्यात गीताचाही आवाज शोभला असता. पण गीता-गुरुदत्त या जोडप्याच्या कौटुंबिक कलहाची छाया चित्रपटाच्या गाण्यावरही पडली. परिणामी गीताची केवळ दोनच गाणी या चित्रपटात आली आहे. या गाण्यात कोरसचा वापर सुंदरच केला आहे. सचिनदेव बर्मनच्या गाण्यात तसा कोरस इतका ठळक फार कमी वेळा आलाय.
जॉनी वॉकरचं एक मजेशीर गाणं हे गुरुदत्तच्या चित्रपटांचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. हे पथ्य याही चित्रपटात पाळलं गेलंय. ‘हम तुम जिसे कहते है शादी’ हे जॉनी वॉकरने त्याच्या खास स्टाईलमध्ये सादर केलंय आणि रफीनेही तसंच गायलंय.
गीता दत्तचं सदाबहार गाणं ज्यानं कैफी आझमी यांचं नाव नेहमीसाठी स्मरणात राहिल ते म्हणजे -
वक्त ने किया क्या हसी सितम,
हम रहे ना हम, तूम रहे ना तू
पुढे गुलज़ार यांच्यावर ज्यांचा प्रभाव पडला त्या ओळी याच गाण्यात आहेत, ‘जायेंगे कहा सुझता नहीं, चल पडे मगर रास्ता नहीं, क्या तलाश है कुछ पता नहीं, बुन रहे है दिल ख्वाब दम-ब-दम’. खरं तर गुरुदत्तचा कॅमेरा, वहिदा रेहमानचा विलक्षण भावदर्शी चेहरा आणि पार्श्वभूमीवर गीताचे स्वर हे काहीतरी विलक्षण असं रसायन आहे. वहिदाच्या जागी गुरुदत्तच्या इतरही नायिका मधुबाला, माला सिन्हा, शकिला, मीना कुमारी यांचेही चेहरे आठवून पहा. हा कॅमेरा काहीतरी वेगळं शोधून काढतो. त्याला गीताचा स्वर एक विलक्षण परिमाण देऊन जातो.
रफीचं यातील गाणंही खूप गाजलं. वाक्प्रचार म्हणून आजही या ओळी वापरल्या जातात-
देखी जमाने की यारी, बिछडे सभी बारी बारी
ही गाणी तशी परिचयाची आहेत. लोकप्रिय आहेत, पण यातील गीताचं एक गाणं मात्र काहीसं दबून गेलं. लहान मुलांसाठीचं असल्यामुळे त्याची कुणाला फारशी दखल घ्यावी वाटली नसावी. ते गाणे म्हणजे-
एक दोन तीन, चार और पाच
छे और सात, आठ और नौ
एक जगा पर रेहते थे
झगडे थे पर उनमे सौ
गाणं लहान मुलांचं जरी असलं तरी कैफी आझमी यांनी त्यात मोठ्या माणसांसाठीचा आशय ठासून भरला आहे. शिवाय गीताचा अवखळ सूर असा काही लागतो की, ‘वक्त ने किया’मधली दु:खी आर्त गीता ती हीच का अशी शंका यावी. एक ते नऊ आकड्यांची छोटी गोष्ट सांगता सांगता कैफी आझमी सनातन मानवी वृत्तीशी जाऊन भिडतात. ‘एक’ हा सगळ्यात लहान आकडा. तो एकटेपणात फिरत असताना त्याला किंमत नसलेला शुन्य (सिफर) भेटतो. दोघेही एकमेकांच्या जवळ येतात आणि दहा हा सगळ्यात मोठा आकडा तयार होतो. हे पाहून मग इतर आकड्यांची वृत्ती कशी बदलती. ते सगळे आपसात कट करतात आणि या दोघांची जोडी फोडतात. अशी मार्मिक गोष्ट या गाण्यात सांगितली आहे, पण हे गाणं काहीसं दुर्लक्षित राहिलं आहे.
कैफी आझमी यांचा दुसरा चित्रपट ज्याचा विचार केला पाहिजे, तो म्हणजे ‘अनुपमा’ (१९६६). हेमंतकुमार यांचं अतिशय मधुर असं संगीत या चित्रपटाला लाभलं आहे. हृषिकेश मुखर्जी यांचा हा चित्रपट धर्मेंद्र-शर्मिला टागोर यांच्यावर चित्रित आहे. लताचे यातील गाणं-
कुछ दिल ने कहा कुछ भी नही
कुछ दिल ने सुना कुछ भी नही
हे गाणं म्हणजे एक वेगळाच सांगितीक अनुभव आहे. अतिशय संयत अशा अभिनयाने शर्मिलाने पडद्यावर हे सादर केलं आहे. कैफी आझमी हे मूलत: कवी आहेत याचा अनुभव या गाण्याच्या शब्दांमध्ये येत राहतो.
लेता है दिल अंगडाईयां, इस दिल को समझाये कोई
आरमान न आंखे खोल दे, रूसवा ना हो जाये कोई
पलकों की ठंडी सेज पर सपनों की परिया सोती है
कुछ ऐसी ही बाते होती है
या ओळी परत गुलज़ार यांच्यावर असलेल्या कैफी आझमींच्या प्रभावाची आठवण करून देतात. या ओळी ऐकल्या की जाणवतं या केवळ चित्रपटासाठी लिहिलेल्या ओळी नाहीत, हे काहीतरी वेगळंच रसायन आहे.
लताचा स्वर आणि हेमंत कुमार यांचं संगीत यांनीही या शब्दांना पुरेपूर न्याय दिला आहे. केवळ हेच नाही तर या चित्रपटातील इतरही गाणी अतिशय गोड आहेत. लताचंच ‘धीरे धीरे मचल ए दिले बेकरार, कोई आता है’ किंवा स्वत: हेमंतकुमारच्या आवाजातील ‘या दिल की सुनो दुनियावालो’, आशा भोसलेची दोन अवखळ गाणी, ‘भिगी भिगी फिजा’ व ‘क्यु मुझे इतनी खुशी मिली’ अतिशय गोड आहेत.
कैफी आझमी यांचा तिसरा प्रातिनिधिक चित्रपट म्हणजे ‘हकिकत’ (१९६४). भारत-चीन युद्धावरचा लडाखची पार्श्वभूमी असलेला हा चेतन आनंदने दिग्दर्शित चित्रपट. गुरुदत्त, हृषिकेश मुखर्जी यांच्यासारख्या महान दिग्दर्शकांसोबतच कैफी आझमी यांना चेतन आनंदसारख्या अजून एका मोठ्या दिग्दर्शकासाठी गीतं लिहिण्याची संधी मिळाली.
देशभक्तीपर गाण्यांची एक चांगली सशक्त परंपरा हिंदीत होती. जी आता जवळपास लुप्त झाली. प्रदीप (ऐ मेरे वतन के लोगो, संगीत- सी.रामचंद्र- हे चित्रपटातील गाणं नाही), शकील (अपनी आझादी को हम हरगीज मिटा सकते नही, संगीत- नौशाद), साहिर (मेरे देश की धरती, संगीत- ओ.पी.नय्यर), प्रेम धवन (छोडो कल की बाते, संगीत- उषा खन्ना) या मालिकेत कैफी आझमी जावून बसतात. या चित्रपटातील देशक्तीपर गाणं आहे-
कर चले हम फिदा जान-ओ-तन साथियों
अब तुम्हारे हवाले वतन साथियों
रफीच्या आवाजाने गाण्याला चार चांद लावले आहेत हे वेगळं सांगायची गरजच नाही. कैफी आझमी यांचं वैशिष्ट्य म्हणजे केवळ चित्रपटाच्या एका प्रसंगासाठी ते लिहीत नाहीत. स्वतंत्रपणे त्यांच्या ओळी कविता म्हणून शिल्लक राहतात. या गाण्यातील ही ओळ त्याची साक्ष आहे
जिंदा रहने के मौसम बहोत है मगर
जान देने की रूत रोज आती नही
हुस्न और इश्क दोनो को रूसवा करे
वो जवानी जो खून में नहाती नही
बांध लो अपने सर पे कफन साथियों
मदन मोहनच्या संगीतावर प्रेमाच्या दु:खाच्या गीतांची एक छाप पडलेली असताना त्यांनी या चित्रपटासाठी वेगळं संगीत देऊन आपली प्रतिभा लखलखीत असल्याचं सिद्ध केलं.
दुसरं गाणं सैनिकांच्या कोमल भावनांचे दर्शन घडवणारं आहे. अशी गाणी हिंदी चित्रपटात फार कमी आहेत. या गाण्यात तलत, मन्ना डे, रफी आणि भुपेंद्र (त्यानं कामही केलं आहे चित्रपटात) असे चार आवाज वापरले आहेत.
होके मजबूर मुझे उसने भुलाया होगा
जहर चुपकेसे दवा जानके खाया होगा
आपली प्रेयसी/पत्नी आपल्याला कसं विसरू पाहत असेल अशी एक विलक्षण भावना या गाण्यात आली आहे. बर्याचदा सिनेमातील गाणी कृत्रिम असतात. या गाण्याचं तसं नाही. अतिशय स्वाभाविक अशी भावना गाण्यात आली आहे. मदन मोहनचं यासाठी विशेष कौतुक करावं लागेल की, त्याने तलत, मन्नादा, रफी, भुपेंद्र हे चार आवाज यात वापरले, पण किशोर कुमारसारखा यात न बसणारा आवाज वापरला नाही. या चारही आवाजांची जातकुळी वेगळी आहे, पण मदनमोहनने त्यांना एकत्र गुंफून कमाल केली आहे.
लताचं अप्रतिम ‘जरासी आहट होती है तो दिल सोचता है’ किंवा ‘खेलो ना मेरे दिल से’ तसंच रफीचे मस्तीखोर ‘मस्ती में छेडके तराना कोई दिल का’ ही याच चित्रपटातील गाणीही कैफी आझमी यांनीच लिहिली आहेत.
कैफी आझमी यांचे हे तीन वेगवेगळ्या विषयांवरचे तीन मोठ्या दिग्दर्शकांसोबतचे चित्रपट. सचिनदा, हेमंतकुमार व मदनमोहनसारखे अतिशय प्रतिभावंत संगीतकार या चित्रपटांना लाभले. कैफी यांची गाणी ऐकताना लक्षात जास्त येतं ते त्यांचं कवीत्व. आपल्यातल्या कवीवर कुठेच गीतकाराला ते स्वार होऊ देत नाहीत. शिवाय कुठेही त्यांची लेखणी साचेबद्ध होत नाही. ‘वक्त ने किया क्या हसी सितम’ किंवा ‘बिछडे सभी बारी बारी’मधील वेदना, ‘कुछ दिल ने कहा’मधील कोमल भावना असो की, ‘कर चले हम फिदा जान-ओ-तन साथियों’मधील देशभक्ती असो, कैफी आझमी यांची लेखणी आपली विविधरंगी प्रतिभा सिद्ध करत जाते.
‘उमराव जान’चे गीतकार ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त उर्दू कवी शहरयार यांना पत्रकार अंबरिश मिश्र यांनी मुलाखतीत विचारलं होतं की, तुमचा चित्रपट इतका गाजला, त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला मग निर्मात्यांची रांग लागली असेल तुमच्या दारात चित्रपटांसाठी गीतं लिहावीत म्हणून. त्याला उत्तर म्हणून शहरयार हलकेच हसून म्हणाले, ‘पता नही. मगर किसीने भी पुछा नही अभी तक.’ कैफी आझमी यांच्याबाबतही असंच काहीतरी झालं असावं. इतकी चांगली गाणी देऊनही त्यांच्याकडून अजून लिहून घ्यावं असं नंतरच्या निर्मात्यांना/संगीतकारांना वाटलं नाही, हे आपणा रसिकांचेच दुर्दैव. नसता अजून सुंदर गाणी आपल्या पदरात पडली असती.
या चित्रपटांशिवाय इतरही चित्रपटांतील कैफी आझमींच्या गाण्यांना रसिकांनी भरभरून दाद दिली.
कैफी आझमी यांची काही संस्मरणीय गाणी (एका चित्रपटातील एकच गाणं नमुना म्हणून घेतलं आहे.)
१. जीत ही लेंगे बाजी हम तुम- रफी/लता (शोला और शबनम, १९६२, सं. खय्याम)
२. ये नयन डरे डरे - हेमंतकुमार (कोहरा, १९६४, सं. हेमंतकुमार)
३. बहारे फिर भी आयी है-महेंद्र कपुर (बहारे फिरी आयेंगी, १९६६, सं. ओ.पी.नय्यर)
४. आज की काली घटा-गीता (उसकी कहानी, १९६६, सं. कन्नु रॉय)
५. बहारो मेरा जीवन ही संभालो-लता (आखरी खत 1967, सं. खय्याम)
६. मेरी आवाज सुनो-रफी (नौनिहाल, १९६७, सं. मदन मोहन)
(पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अंत्यविधीच्या पार्श्वभूमीवर हे गाणं या चित्रपटात घेतलं आहे.)
७. ये दुनिया ये मेहफिल मेरे काम की नही- रफी (हिर रांझा, १९७०, सं. मदन मोहन)
८. सिमटीसी शर्मायीसी किसी दुनिया से तुम आयी हो- किशोर (परवाना, १९७१, सं. मदन मोहन)
९. चलते चलते मुझे कोई मिल गया था - लता (पाकिजा, १९७२, संगीत- गुलाम मोहम्मद)
१०. तुम बीन जीवन कैसे बीता - मन्ना डे (बावर्ची, १९७२, संगीत- मदन मोहन)
११. तुम जो मिल गये हो - रफी/लता (हसते जख्म, १९७३, संगीत- मदन मोहन)
१२. माना हो तुम हो बेहद हसीन - येसूदास (तुटे खिलोने, १९७८, संगीत- बप्पी लहरी)
१३. शीशा हो या दिल हो, आखिर तूट जाता है - लता (आशा, १९८०, संगीत- लक्ष्मीकांत प्यारेलाल)
१४. तुम इतना जो मुस्कूरा रही हो - जगजीतसिंग (अर्थ, १९८३, संगीत- जगजीत सिंग)
१५. जलता है बदन- लता (रझिया सुलतान, १९८३, संगीत- खय्याम)
लेखक हिंदी चित्रपट संगीताचे अभ्यासक आहेत.
a.parbhanvi@gmail.com
……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment