गुलज़ार बोलतात त्याचं गाणं होतं…
दिवाळी २०१७ - लेख
रजनीकांत सोनार
  • गुलज़ार एका निवांत क्षणी
  • Thu , 27 October 2016
  • गुलज़ार रजनीकांत सोनार Gulzar Rajnikant Sonar

अनादी काळापासून गाणी मानवी मनाला भुरळ घालत आलेली आहेत... माणसांची गाणी माणसांसारखी! त्यांच्यासारखं रूप ल्यालेली, त्यांच्यासारखी मूड्स असलेली. त्यांचे रंग अन गंध नेहमीच अवीट. दिवसातील प्रत्येक प्रहरात, वर्षातील प्रत्येक ऋतूत गाणी सोबत असतात. मनाच्या प्रत्येक भाव अवस्थेत गाणी संगत करतात. जीवनातील प्रत्येक प्रसंगात गाणं आपल्या भोवती असतं. गाणं नेमकं कुठून येतं? त्याची भुरळ का पडते? केवळ शब्दांचा खेळ म्हणावा तर गाणी एवढी चिरंतर टिकली तरी कशी? शब्द, सूर अन भाव या तिघांच्या भावनिक एकरूपतेतून गाणं प्रकट होतं अन मग निरंतर वाहत राहतं नदीसारखं!

भारतीय चित्रपटांचं वेगळेपण त्यामधील गाण्यांमुळे आहे. रात्रंदिवस ट्रक चालवणारा ट्रक ड्रायवर असो की, दुपारच्या वेळी घरामध्ये आपल्या संसाराला आखीव-रेखीव करणारी गृहिणी असो; एखादा बेघर असो की, विद्यापीठात शिकवणारा प्राध्यापक असो, साऱ्यांना चित्रपटातील गाण्यांची भुरळ पडतेच. ती दमलेल्या-भागलेल्यांना रिझवतात. दु:खी माणसांच्या वेदना हलक्या करतात. एकाकीपणात सोबत करतात. प्रेमात पडलेल्यांचा आनंद, विरह शब्दांतून व्यक्त करतात. देशभावना, सामाजिक सहवेदना यांची रुजवणही गाणी सहज करतात. कवी प्रदीप, साहिर लुधियानवी, शैलेंद्र, भरत व्यास, मजरूह सुलतानपुरी, कैफ़ी आज़मी, जाँ निसार अख्तर, योगेश, नीरज, आनंद बक्षी, गुलशन बावरा, ज़ावेद अख़्तर आणि असे कितीतरी गीतकार आपल्या गाण्यांनी भारतीय समाजमनाचं रंजन करत आले आहेत. या साऱ्यांमध्ये गीतकार-कवी गुलज़ार वेगळे आणि विलक्षण ठरतात!

त्यांना आवडणाऱ्या पाऊसाइतकाच विलोभनीय आणि तितकाच नित-नूतन असलेला हा कवी. रावी पार करून आलेल्या, उर्दूसारख्या भाषेत लिहिणाऱ्या या कवीनं गीतकार, कथालेखक, चित्रपटनिर्माता-दिग्दर्शक, पटकथा आणि संवाद लेखक म्हणून भारतीय मनावर एक अमिट अशी छाप सोडलीय. हा कवी साऱ्यांना, विशेषत: मराठी मनाला नेहमीच साद देत आलाय. सर्वसाधारण चित्रपटातील गाणी संगीत-काव्याचा आनंद देत असतात, पण गुलज़ार आपल्या गाण्यात एक पलीकडला अनुभव देतात. हृदयाला हात घालणारे गुलज़ारांचे शब्द सूक्ष्मातिसूक्ष्म अनुभूती सहज व्यक्त करतात. त्यांचं आनंदाचा ठेवा ठरणारं गाणं एक विलक्षण अस्वस्थता देऊन जातं.

काव्यातील तरलता व संवेदनशीलता गाण्यात, संवाद लेखनात आणि चित्रपटात आणणारे गुलज़ार कदाचित एकमेव ठरावेत. नेमके शब्द आणि मोजक्या प्रतिमा यांचा वापर करून त्यांचा काव्य-संसार उभा राहतो...एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या संसारासारखा. त्यातील भावभावनाही तशाच सर्वसामान्यांच्या भावभावनेप्रमाणे. विषय तसेच भोवतीच्या माणसांच्या जीवनातले… तेच अन तसंच प्रेम, विरह, उदासपणा, एकाकीपणा अन ती आणि तशीच अनामिक अनुभूतीची तीव्र इच्छा. त्यांच्या गीतातील प्रतिमा रोजच्या जगण्यातील-अंगण, घर, झाड, चंद्र, नदी, रात्र... प्रतीकंही म्हटली तर पारंपरिक. पण या साऱ्यातून जी कविता उमटते, जे गाणं झुळझुळतं ते साऱ्यांना भुरळ घालतं. गुलज़ारांची प्रतिभा प्रेम, विरह, नातं, एकाकीपणा, भूतकाळातील आठवणी, बालपण, माणूसपण, निसर्ग, समाज, राजकीय व्यंग, जगणं, अशा अनेक विषयांना यथोचित न्याय देते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

...............................................................................................................................................................

गुलज़ार गीतांचा सिलसिला सुरू झाला तो ‘मोरा गोरा अंग लई ले/ मोहे श्याम रंग दई दे /छुप जाऊंगी रात ही में/ मोहे पी का संग दई दे’ने(चित्रपट-बंदिनी). या पहिल्यावहिल्या गाण्यातच त्यांची अतीव संवेदनशीलता, निसर्ग प्रतिमा आणि प्रतीकांचं दर्शन घडतं. स्त्री अन तिचं भावविश्व हे त्यांच्या गाण्यांचं एक अनोखं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. स्त्री भावविश्वाचं प्रतिबिंब त्यांच्या गाण्यात जागोजागी सापडतं. ‘लेकीन’मधील ‘यारा सीली सीली / बिऱहा की आग में जलना’ हे एक वेगळंच गाणं आहे. आपलं घरदार, माणसं यांना पारखी झालेल्या, संसार मोडलेल्या अन वहिवाट सोडलेल्या स्त्रीचं हे स्पंदन आहे.

ती आपल्या उद्ध्वस्ततेला शब्दांत मांडताना म्हणते : ‘टूटी हुई चूड़ियों से / जोडू ये कलाई मै/ पिछली गली में जाने /क्या छोड़ आई में’. त्याच आठवणी पुन्हा जगताना ती म्हणते : ‘बीती हुई गलियोंसे फिरसे गुजरना’. तिचं एकाकीपण ‘पैरो में ना साया कोई/ सर पे ना साईं रे / मेरे साथ जाए ना / मेरी परछाई रे’ या शब्दांत व्यक्त होतं. जीवनसाथी मिळाल्यानंतर झालेला आनंद व्यक्त करताना गुलाज़ारांच्या गाण्यातील स्त्री आनंदून गाते, ‘आजकल पाँव जमीं पर नहीं पड़ते मेरे/ बोलो, देखा है कभी तुमने मुझे उड़ाते हुए’ (घर) . दुसरीकडे पतीचं मनानं पारखं होणं व्यक्त करताना गुलज़ार लिहून जातात : ‘खाली हाथ शाम आई है /खाली हाथ जाएगी/ आज भी न आया कोई/ खाली लौट जाएगी’ (इजाजत). ‘मौसम’मधील नायिकेची एकटेपणाची भावना मांडताना ते लिहितात : ‘रुके रुके से कदम रुक के बार बार चले/ करार लेके तेरे दर से बेकरार चले..... सुबह न आई कई बार नींद से जागे / थी एक रात की यह जिंदगी, गुजार चले’ (मौसम). स्त्रीचं एकाकीपण अन त्याच्या वेदना गुलज़ार फार अलवारपणे आणि अतीव संवेदनेनं व्यक्त करतात... ‘आनंद’मधील नायिका तिच्या प्रियकराची वाट पाहताना गुणगुणते : ‘ना जिया लगे ना/ तेरे बिन मेरा कही जिया लागे ना.... जीना भूले थे कहा याद/ नहीं तुझको पाया है जहा/ सांस फिर आई वही’.

एकीकडे, स्त्री सुलभ भावभावना व्यक्त करताना पुरुष मनाची स्पंदनंही गुलज़ार तितक्याच नेमकेपणानं मांडतात. ‘आँधी’ या त्यांच्या आगळ्या वेगळ्या चित्रपटात पती-पत्नीतील स्वभाव अधोरेखित करणारं एक सुंदर गाणं आहे. ‘आरती’ या चित्रपटातील नायिका तिच्या महत्त्वाकांक्षी स्वभावानुसार म्हणते : ‘आँधी की तरह उड़कर / इक राह गुजरती है/ शरमाती हुई कोई / कदमों से उतरती है...’ आणि जे.के. आपल्या मध्यमवर्गीय स्वभावानुसार म्हणतोय : ‘इक दूर से आती है/ पास आके पलटती है/ इक राह अकेली सी / रुकती है न चलती है’. तसं पाहिलं तर पती-पत्नीतील नातं हा गुलज़ारांना पुन:पुन्हा खुणावणारा विषय आहे.

‘आँधी’तील पती-पत्नीतील अहं-संघर्ष आणि परस्परांबद्दल असलेलं प्रेम ‘तेरे बिना जिन्दगी से शिकवा तो नहीं / तेरे बिना जिंदगी भी लेकिन जिंदगी तो नहीं’ या त्यांच्या गाण्यातून व्यक्त होतं. गुलज़ार नात्याचं विश्लेषण करत जातात. त्या नात्याचं असणं, मिटणं किंवा त्याचे रूप-रंग विरणं याचाही लेखाजोखा ते मांडतात. ‘गहराई’ या चित्रपटात त्यांचं एक विषण्ण करणारं गाणं आहे : ‘रिश्ते बस रिश्ते होते है/ कुछ इक पल के / कुछ दो पल के / कुछ परों से हलके होते है / बरसों के टेल चलते चलते / भारी- भरकम हो जाते है/ कुछ भरी-भरकम बर्फ के से /बरसों के तले गलते गलते / हलके-फुलके हो जाते है/ नाम होते है कुछ रिश्तों के/कुछ रिश्ते नाम के होते है/ रिश्ते अगर मर जाए भी/ बस नाम से जीना होता है’. अर्थात नातं–संसाराचं केवळ करडं रूपच गुलज़ार मांडतात असं नाही. ‘थोडा है, थोड़े की जरूरत है,’ असं म्हणत ‘ये जीना है अंगूर का दाना... कुछ खट्टा है, कुछ मीठा है / अरे जितना खाया मीठा था / जो हाथ न आया खट्टा था’( खट्टा मीठा) असं सत्यदेखील सांगतात.

गुलज़ार पुरुषातील जिप्सीपणही तितक्याच तरलपणे मांडतात… ‘मुसाफिर हूं यारों / न घर है न ठिकाना/ मुझे चलते जाना है…बस  चलते जाना…’(परिचय). हे जिप्सीपण त्यांच्या ‘राहगीर’ या चित्रपटामध्येदेखील दिसतं : ‘जनम से बंजारा हूं बंधु, जनम -जनम बंजारा/ कहीं कोई घर न घाट न अंगयारा’. एकाकीपणा नोंदवताना गुलज़ार लिहितात...‘कोई होता जिसको अपना, हम अपना कहते यारो’(मेरे अपने). गुलज़ारांच्या गाण्यांचा (आणि कवितांचा) अभ्यास करताना एक गोष्ट सहज जाणवते. ती म्हणजे त्यांच्यात भरून-पुरून असलेलं एकाकीपण, एकटेपण आणि उदासपण. हे एकाकीपण वेगळ्यावेगळ्या रूपात व्यक्त होत असतं. त्याचं एकाकीपण सांगताना ते लिहितात ‘एक अकेला इस शहर में/रात में या दोपहर में/आब-ओ-दाना ढूँढता है’(घरौंदा) आणि तिचा एकाकीपणा सांगताना लिहितात... ‘पानी पानी रे, खारे पानी रे/ नयनों में भर जा, नींदेखाली कर जा......’(माचिस).

गुलज़ारांनी आयुष्याला उद्देशून अनेक गाणी लिहिली आहेत. आयुष्य त्यांना मित्रासारखं वाटतं. जगण्यावरील प्रेम हा तसा गुलज़ारांचा स्थायीभाव आहे. आयुष्याला उद्देशून ते म्हणतात…‘ऐ जिंदगी गले लगा ले/ हमने भी तेरे हर इक गम को गलेसे लगाया है’ (सदमा). दुसऱ्या एका गाण्यात ते आयुष्याला त्याचीच कैफियत ऐकवतात… ‘तुझसे नाराज नही जिंदगी, हैरान हूं मैं’(मासूम). गुलज़ार जीवनाविषयी लिहिताना एक अप्रतिम गाणं लिहून जातात.

‘नाम गुम जाए गा’ या ‘किनारा’ या चित्रपटातील गाण्यात ते लिहितात… ‘दिन ढले जहाँ रात पास हो/ जिंदगी की लौ ऊँची कर चलो/ याद आए गर कभी जी उदास हो/ मेरी आवाज ही पहचान है, गर याद रहें’ (किनारा). क्षणाक्षणांत अन कणाकणांत जीवन कसं जगावं हे सांगताना ते लिहितात… ‘आनेवाला पल जानेवाला है/ हो सके तो इसमें जिंदगी बीता दो/ पल ये जो जाने वाला है’(गोलमाल). अशीच भावना ते ‘इज़ाजत’ या चित्रपटातील एका गाण्यात व्यक्त करतात… ‘कतरा कतारा मिलाती है/ कतरा कतरा जीने दो/ जिंदगी है बहाने दो / प्यासी हूं मै, प्यासी रहने दो’.

प्रेमाची काही विलक्षण गाणी त्यांनी लिहिली आहेत. प्रेमात पडलेले त्यांचे नायक- नायिका कधी गुणगुणत असतात…‘आपकी आँखों में कुछ महके हुए से राज है/ आपसे भी खुबसूरत आपके अंदाज है’; तर कधी ‘तुम आ गए हो, नूर आ गया है / नहीं तो चिरागोसे लौ जा रही थी’(आँधी). त्यांच्यासाठी ‘अजीब है दिल के दर्द यारों /न हो तो मुश्किल है जीना इसका / जो हो तो हर दर्द हीरा हर इक गम है नगीना इसका’(गुलामी). प्रेमाच्या वेगवेगळ्या छटा आपल्या गाण्यात रंगवणारे गुलज़ार प्रौढ वयातील प्रेमालादेखील शब्दबद्ध करतात… ‘ऐसी उलझी नजर उनसे हटती नहीं/ दांत से रेशमी डोर कटती नहीं/ उम्र कबसे बरस के सुफेद हो गयी/ कारी बदरी जवानी की छटती नहीं/वल्ला ये धड़कन बढ़ने लगी है/चेहरे की रंगत उड़ने लगी है/डर लगता है तनहा सोने में जी.....दिल तो बच्चा जी’(इश्किया).

प्रेमाचं हे रूप खरोखर अनोखं आहे. त्यांचा प्रियकर म्हणतो- ‘तावीज बना के पहनु उसे/आयत की तरह मिल जाए कही’(दिलसे.) कुराणातील आयत या प्रतीकाचा गुलज़ार खूप ठिकाणी प्रयोग करतात. प्रेमगीतांचा विचार केला तर गुलज़ारांचं एक विलक्षण सुंदर गाणं अगदी सहज आठवतं... ते गाणं ऐकताना त्यांच्यावरील रवींद्रनाथ ठाकुरांचा प्रभावदेखील स्पष्ट जाणवतो. प्रेमाची एवढी सुंदर व्याख्या आजवर क्वचितच कोणी केलेली असावी. ते गाणं म्हणजे- ‘हमने देखी उन आँखों की महकती खुशबू / हाथ से छू के इसे रिश्तों का इल्जाम न दो/  सिर्फ अहसास है रूहसे महसूस करो/ प्यार को प्यार ही रहने दो, कोई नाम न दो....प्यार कोई बोल नहीं, प्यार आवाज़ नहीं/ एक ख़ामोशी है, सुनती है, कहा करती है / न यह बुझती है, न रूकती है , न ठहरी है कहीं/ नूर की बूंद है, सदियों से बहा कराती है’ (ख़ामोशी).

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

मानवी भावभावना आपल्या गाण्यामध्ये व्यक्त करणाऱ्या गुलज़ारांचं सामाजिक-राजकीय भान कुठंही सुटत नाही. ‘आरती मन मालती/ कहना क्यों नहीं मानती’सारखं राजकीय भाष्य करणारं गाणं असो वा ‘डाकिया डाक लाया’ (पलकों की छाँव में), ‘हाल चाल ठीक है’(मेरे अपने) सारखी सामाजिक जाणीव असलेली गाणी असोत, ती गुलज़ारांची समाजाशी जुळलेली नाळ दाखवतात. ग्रामीण भागातील लोकांचं पावसाशिवायचं जगणं किती वेदनामयी असतं याचं दर्शन ते ‘अल्लाह मेघ दे, पानी दे / पानी दे गुड़धानी दे, अल्लाह मेघ दे’ (पलकों की छाँव में) या गाण्यामध्ये करतात. या गाण्यात एक कडवं आहे- ‘अबके जो सावन न आवन होए तो/ गजुआ बेचारा रे, असुंवन बोए हो/ छल-छल पानी के छीटें उड़ेंगे/ सावन के भूले भादों मुड़ेंगे/ अरे पड़ेगा सुखा/ मरेगा भूखा/ मरेगा भूखा…बदरी काका/ बदरी काका...गाव से भागा/ नौकरी करने...शहर में मरने.’ अजूनही या वास्तवातून आपली सुटका झालेली नाहीच. कल्पनेची भरारी घेणारे रोमँटिक गुलज़ार असं वास्तववादीही लिहून जातात.

गुलज़ार कुठल्याशा अव्यक्त अन निराकार अनुभूती गाण्यांमधून व्यक्त करताना दिसतात. अरूपाचं रूप दाखवणं हा खरं तर कुठल्याही कवीचा धर्म म्हणावा… पण प्रत्येकाला ते साध्य होतंच असं नव्हे. गुलज़ार निराकार अनुभूती व्यक्त करताना कधी लिहितात… ‘वादीमें गूंजती हुई खामोशिया सुने’...(मौसम) गुलज़ार ही निरवतेची भाषा जाणतात अन शब्दांत मांडतातदेखील. दुसऱ्या एका गाण्यात जवळ नसलेल्या जीवलगाच्या अस्तित्वाची जाणीव ते व्यक्त करताना लिहितात, ‘जब भीं ये दिल उदास होता है, जाने कौन आस पास होता है’(सीमा).

अशाच अनुभव ते दुसऱ्या एका गाण्यात मांडतात… ‘भोले भाले, भोले भाले दिल को बहालाते रहे/ तनहाई में, तेरे खयालों को सजाते रहे/ कभी कभी तो आवाज देकर मुझको जगाया ख्वाबों ने’(आनंद). याच गाण्याच्या अखेरच्या कडव्यात ते म्हणतात, ‘रुठी रातें, रूठी हुई रातों को मनाया कभी/ तेरे लिए मीठी सुबह को बुलाया कभी/ तेरे बिना ही तेरे लिए ही दिए जलाये राहों में’. इथं एखाद्याचं नसणंही असण्याइतकंच आहे. ही शांततेची भाषा, नसण्यातही असण्याचा अनुभव आणि पारलौकिक अनुभूती या सर्व गोष्टी गुलजा़रांच्या काव्याचं वेगळेपण दर्शवतात. त्यांच्यातील दार्शनिक नेहमीच चिंतन करताना दिसतो, त्यालाही प्रश्न पडलेला असतो, ‘गंगा आए कहा से गंगा जाए कहा रे / लहराए पानी में जैसे, धूप छाँव रे.’ आणि आपल्याच प्रश्नाला ते उत्तर देतात… ‘रात कारी दिन उजियारा/ मिल गए दोनों साए / साँझ ने देखो रंग रूप के / कैसे भेद मिटाए रे’(काबुलीवाला).

असे हे गुलज़ार! दूर कुठल्याशा दीना नावाच्या गावातून फाळणीच्या अश्वत्थामी वेदना लेवून, वाटेला आलेल्या आयुष्यावर प्रेम करत लिहितात. त्यांच्या गाण्यातील शब्दछटा, त्यांची संवेदनशीलता, निसर्ग प्रतिमा अन रोमँटिक नॉस्टेल्जिया रसिकांच्या मन अन बुद्धीला रिझवत राहतो. गाण्यातून पैसानुभव देतो!

.................................................................................................................................................................

लेखक शिरपूर (जि. धुळे) इथं अध्यापनक्षेत्रात कार्यरत आहेत.

rjnkntsnr@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख