सत्यपाल महाराजांवरचा हल्ला पाच दिवस कुणी लपवला?
सदर - सत्तावर्तन
राजा कांदळकर
  • सत्यपाल महाराज
  • Fri , 19 May 2017
  • सत्तावर्तन राजा कांदळकर सत्यपाल महाराज Satyapal Maharaj

सप्त खंजिरीवादक, अनिष्ठ-वंगाळ रूढीबाजीवर घणाघाती प्रहार करणारे कीर्तनकार सत्यपाल महाराज चिंचोळकर यांच्यावरच्या प्राणघातक हल्ल्याने आपलं राज्य किती भयंकराच्या दरवाजात उभं आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे. सत्यपाल हे काही साधेसुधे कीर्तनकार नव्हेत. विदर्भातल्या छोट्याशा खेड्यातल्या या माणसाची कीर्तनं आणि खंजिरीकला ऐकायला लाखोंच्या संख्येनं लोक जमा होतात. त्यांच्या खंजिरींच्या तालावर माना डोलावतात, जीव ओवाळून टाकतात. अशा माणसावर प्राणघातक हल्ला होतो, मुंबईच्या पोटात असलेल्या नायगाव दादरमध्ये तो होतो, जाहीर कार्यक्रमात होतो आणि १२ मे २०१७ रोजी हल्ला झाला तरी त्यानंतर तब्बल पाच दिवस प्रसारमाध्यमांना थांगपत्ता नसतो. बातमी लपून राहते की लपवली जाते?

हे सारंच संतापजनक, चिंताजनक नाही काय? सत्यपाल महाराजांवरचा प्राणघातक हल्ला सरकारने का नाही पाहिला? प्रसारमाध्यमांना का नाही कळला? पोलिसांनी का जनतेपासून दडवला? परळच्या केईएम या सरकारी हॉस्पिटलात उपचार सुरू असतानाही हा हल्ला पाच दिवस लपवला गेलाच कसा?

मनात विचार येतो हिंदी चित्रपटसृष्टीतल्या आलिया भट, दिपिका पदुकोन, प्रियंका चोप्रा, रणबीर कपूर, रणबीर सिंग, सोनू निगम यांच्या कुण्या माथेफिरूने नुसती मुस्काटत भडकावली असती तरी प्रसारमाध्यमं किती भयंकरपणे सक्रिय झाली असती! किती पूर आला असता ब्रेकिंग न्यूजला! त्या ब्रेकिंग न्यूजवर किती महान, महान लोकांनी टिवटिव केली असती!! थोरथोर लोकांनी बाईटस दिले असते!!! आणि इथं त्यांच्या इतक्याच लोकप्रिय असलेल्या आणि त्यांच्याहून मोलाचं काम करणाऱ्या सत्यपाल महाराजांवरच्या हल्ल्याची बातमी कुणालाच कळली नाही? की कळू दिली नाही? बरं हा हल्ला खुलेआम झाला होता. नायगावमध्ये बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमात महाराजांचं कीर्तन पार पडलं. त्यानंतर मंचावर चाहत्यांच्यासोबत ते छायाचित्रं काढत होते. या गर्दीतून तोंडाला कापड बांधून कुणी किशोर जाधव हा तरुण महाराजाजवळ पोचला. त्याने महाराजांच्या खांद्यावर हात ठेवण्याचं नाटक केलं आणि चाकूने त्यांच्या पोटावर वार केले. महाराजांनी लगेच स्वत:ला सावरून हल्ला चुकवण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोर पळून जायला लागला. जागरूक नागरिकांनी त्याला पकडला. आता पोलीस त्याची चौकशी करत आहेत.

हा हल्लेखोर कोण? त्याचा हेतू काय? त्याच्यामागचा मास्टरमाइंड कोण हे पोलीस शोधून काढतील अशी आशा आहे. सत्यपाल महाराज सुखरूप आहेत. हल्ल्यानंतर उपचार घेताना ते म्हणाले, “मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचा माणूस आहे. संत तुकडोजी महाराज, संत गाडगेमहाराज यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार राज्यभर करतोय. समाजातील अंधश्रद्धा दूर होण्यासाठी समाजप्रबोधन करतोय. अंधश्रद्धेला विरोध करणाऱ्या नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांच्या हत्या करण्यात आल्या. शुक्रवारी, १२ मे रोजी माझ्यावरही हल्ला झाला. जीव घेण्याचा प्रयत्न होता तो. या हल्ल्याने मी विचलित होणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत महाराष्ट्रभर फिरून मी प्रबोधनपर कीर्तन करत राहणार, हरणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत जनजागृती हाच माझा ध्यास आहे.”

सत्यपाल महाराजांवरचा हल्ला कुणी केला, हे कळायला वेळ लागेल. पण हे उघड झालं आहे की, त्यांचे विचार न पटणाऱ्या वृत्ती यामागे असू शकतील. याबद्दल काही निष्कर्ष काढणं घाईचं असलं तरी सत्यपाल कुणाला शत्रू वाटू शकतात याचा अंदाज बांधणं फार अवघड नाही.

या घटनेतलं सत्य बाहेर येईलच कधी तरी. हल्लेखोर आणि त्याच्या सूत्रधारापर्यंत पोलीस पोचतील. कायद्यानुसार सगळं होईल, अशी आशा सगळेच करतील.

सत्यपाल महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि लोकसंत गाडगेमहाराज यांच्या विचारांचा प्रभाव असलेले कीर्तनकार आहेत, ही त्यांची अपूर्ण ओळख झाली. सत्यपाल खेड्यात जन्मले. गरिबीत वाढले. सगळ्या ‘नाही रे’ वातावरणात त्यांनी खंजिरी वादनकलेचा ध्यास घेतला. सप्तखंजिरी वादन आणि त्यातून विविध आवाज काढत ते आपल्याला मनोरंजनाच्या अनोख्या दुनियेत घेऊन जातात. खंजिरीच्या नादात ते जनमाणसावर पकड घेत जनसमुदायाला देखण्या प्रबोधन दुनियेत नेतात. तिथं ते महात्मा गांधींचे विचार उलगडवून दाखवतात, डॉ. आंबेडकरांचे संविधान खेड्यातल्या माणसाला सोपं करून दाखवतात. जातीअंताचा लढा रंजक प्रसंगातून मांडतात. गाडगेमहाराजांचा अंधश्रद्धेविरुद्धचा एल्गार भेदक भजनातून गातात. तुकडोजी महाराजांची गाव उन्नतीची विचारपरंपरा स्पष्ट करतात. संतांचे अभंग ऐकवत ऐकवत नवं जग कसं असावं, त्यात माणसांचं गीत कसं गावं हे हा कीर्तनकार कथन करत जातो, तेव्हा श्रोते अक्षरक्ष: नवे होऊन जातात. त्यामुळेच लाखो लोक त्यांच्या कीर्तनात सहभागी होतात.

सध्या महाराष्ट्रात सत्यपाल महाराजांएवढा मोठा गर्दी खेचणारा कीर्तनकार नाही. आजच्या प्रसारमाध्यमांच्या भाषेत ते ‘स्टार कीर्तनकार’ आहेत. परत त्यांची कीर्तन करण्याची स्वत:ची खास शैली आहे. ते कीर्तनात उपदेश करत नाहीत, तर थेट संवाद साधतात. विदर्भातल्या बोली भाषेत लोकांना ते मायबापहो, भावाहो, बहिणी ग, असं जेव्हा संबोधतात तेव्हा ते काळजाला भिडत जातं.

गेली किमान ३० ‌वर्षं सत्यपाल महाराजांचं कीर्तन महाराष्ट्र ऐकतोय. करोडो लोक त्यांच्या कीर्तनाचा आस्वाद घेऊन विचारमग्न झाली. अशा मोठ्या कीर्तनकारावर हल्ला होतो आणि त्याने ना सत्तेच्या अंगावर काटा उभा राहतो, ना पोलीस यंत्रणेला पत्रकार परिषद घेऊन लोकांना माहिती द्यावीशी वाटते, ना केईएम हॉस्पिटलच्या प्रमुखांना मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध करावंसं वाटतं, ना राज्याच्या गृहखात्याच्या प्रमुखांना प्रसारमाध्यमांशी या विषयावर बोलावंसं वाटतं. आहे ना सारं मस्त भयानक!

एरवी प्रसारमाध्यमं किती डंका पिटत असतात की, आम्ही २४ तास डोळे उघडे ठेवतो, नीट बघतो, जग जिंकायला निघालोय, एक पाऊल पुढे आहोत, रोखठोक, सडेतोड, २४ घंटे वार्ताहर काम करतात वगैरे. त्या कुणाला एवढ्या मोठ्या सेलिब्रेटी कीर्तनकाराच्या जीवावर बेतलं याचा ओ की ठो पत्ता नाही. माहितीच्या विस्फोटाच्या जगात राहतो याची किती गुर्मी आहे नाही आपल्याला? फेसबुक, ट्विटर, सोशल मीडिया, वृत्तवाहिन्या यांना एवढ्या मोठ्या बातमीचा सुगावा लागला नाही, पण विदर्भातल्या अकोटच्या पत्रकारांनी बातम्या दिल्या तेव्हा कुठं मुंबईत कळलं हे सगळं घडल्याचं. मग सुरू झालं निषेधसत्र आणि चर्चा. सत्ता, प्रसारमाध्यमं आणि सत्ताधाऱ्यांच्या हातातल्या साऱ्या यंत्रणा यांचं वागणं, स्वभाव अशा वेळी अचानक जगजाहीर होतो. त्यांचा खरा चेहरा नागडा होऊन पुढे येतो.

……………………………………………………………………………………………

गिरते को उठाना स्वर्ग मेरा!

१० वर्षांचे वय होते तेव्हापासून मी राष्ट्रसंत तुकडोजींच्या गुरुदेव खंजेरी भजन मंडळात जात असे. त्यांचे भजन सिनेमा चालीवर असल्यामुळे मला आनंद वाटायचा. मातीच्या घागरीला फोडून त्याच्यावरच्या काठावर कागद लावून त्याला गरम करून अशी खंजेरी वाजवत होतो. मग काही दिवसांनंतर वडिलांनी लाकडाची खंजेरी आणून दिली आणि तेव्हापासून हा छंद जडला. आता मी एकूण ९ खंजेऱ्या एका वेळी वाजवून ११ प्रकारचे वेगवेगळे आवाज काढतो. मी अशा प्रकारच्या उलट्या खंजेऱ्या वाजवणारी जगातील पहिली व्यक्ती झालो. शाळेतून सांस्कृतिक कार्यक्रमांतून तयारी होत गेली. तसेच नाटकात लहानपणी काम केल्याने स्टेज डेअरिंग आले. माझ्यावर राष्ट्रसंत तुकडोजीच्या ग्रामगीतेचा, गाडगेबाबांचा, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा परिणाम झाला. मनोरंजनातून समाज प्रबोधन करताना मला सोबत माझा भाऊ गजानन जगन्नाथ चिंचोळकर याची ३० वर्षांपासून हार्मोनियम व आवाजाची साथ मिळाली. माझ्यासोबत तीन सहकलाकार असतात. माझा कार्यक्रम राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेवर आधारित असतो. ही ग्रामगीता राष्ट्रसंतांनी शेतकरी, शेतमजुरांच्या जीवनाला अर्पण केली असून, त्यात एकूण ४१ अध्याय आहेत.

तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो।

सकळाचे लक्ष तुझकडे वळो।

मानवतेचे तेज झळझळो।

विश्वामाझीया। (ग्रामगीता)

गाडगेबाबांचे चरित्र मी वाचले, त्यांचे कीर्तनाने हजारो लोक जागृत झाले. देव दगडात नसून माणसात आहे, अंधश्रद्धानिर्मूलनाद्वारे शिक्षणालापण प्रोत्साहन दिले आणि याच प्रकारच्या विचाराने प्रेरित होऊन मी गेल्या ४० वर्षांपासून हे कार्य अहोरात्र करत आहे. त्याच प्रकारे तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांनी एक क्रांतिकारी परिवर्तन केले. अशाच प्रकारे फुले, शाहू, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा प्रचार मी कित्येक वर्षापासून करत आहे.

कीर्तनाच्या माध्यमातून एका महिन्यात अंदाजे २२ ते २५ दिवस माझे कार्यक्रम चालतात. त्यामधून दारूबंदी, व्यसनमुक्ती अंधश्रद्धा निर्मूलन, राष्ट्रीय एकात्मता, निर्मलग्राम, हुंडाबळी अशा प्रकारच्या सामाजिक विषयांवर प्रबोधन करतो. तसेच तंटामुक्त गाव व स्त्री-पुरुष समानता, सामूहिक विवाह यावर आधारित आतापर्यंत १२ हजार कार्यक्रमांचे प्रयोग झाले. त्याचबरोबर माझ्या वाढदिवसाला आतापर्यंत एक हजार जोडप्यांचे सामूहिक विवाह लावले. माझा स्वत:चा विवाह, माझ्या भावाचा, पुतण्याचा, मुलीचा, भावाच्या दोन्ही मुलींचा, तसेच माझ्या ड्रायव्हरचासुद्धा विवाह मी सामूहिक पद्धतीनेच लावला. रंगपंचमीच्या दिवशी ग्रामसफाई करून कचरा पेटवून त्याची होळी केली. विधवा महिलांना कपडे वाटप, गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप अशा प्रकारचे कार्य केले.

उत्सवाचा व्हावा परिणाम।

म्हणून ठेवावे प्रभावी कार्यक्रम। (ग्रामगीता)

अपुल्या कष्टावरी जगावे कुणाचे उपकार अंगी न घ्यावे।

कमी खर्चाने राहावे साध्या घरी॥

या ओवीप्रमाणे अतिशय साध्या पद्धतीने मी माझे जीवन जगत आहे.

त्यामध्ये

सकाळी थंड पाण्याने आंघोळ करणे,

आपले काम आपण करणे,

सरळ मार्गाने जगणे आणि उणे दिसे ते पूर्ण करी,

जगाचा तोल बोध सावरी।

आणि गिरते को उठाना स्वर्ग मेरा,

सबकी भलाई धर्म मेरा याप्रमाणे माझे जीवन आहे.

उद्योगीजन सर्व पुजारी पूजा तयाची ईमानदारी। याक्रमाणे सामान्य जनतेसारखे जगणे आवडते.

सध्या समाजामधे तरुण पिढी अतिशय चमकबाज जीवनजगून मौजमस्ती करण्यामध्ये वेळ घालवत आहे. कमी श्रमात झटपट श्रीमंती मिळवण्यासाठी चुकीच्या मार्गाने अर्थार्जन करत आहे. त्यासाठी दरोडे, चोरी, लूटमार आणि वेळ आल्यास खून करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. अपघातांचे प्रमाण खूप वाढले आहे. अविचारी प्रवृत्ती तसेच देशहिताचा विचार न करता स्वहिताचा विचार करून फक्त स्वार्थीप्रवृत्तीने समाज घडत आहे. हे सर्व थांबवण्यासाठी समाजाच्या विचारांना संत चरित्राची माहिती असणे आवश्यक आहे आणि याचेच वर्णन ग्रामगीतेसारख्या ग्रंथामधून आपल्याला शिकायला मिळते.

ग्रामगीता नव्हे पारायणासी। वाचता वाट दावी जनासी॥

म्हणून अशा प्रकारच्या सत्यशोधक विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी मी माझ्या गावी ‘गुरुवंदन सत्यशोधक संस्था’ स्थापन केली आहे, आणि ही संस्था नोंदणीकृत असून त्याद्वारे रुग्णवाहिका सेवा गेल्या पाच वर्षांपासून सुरू केली आहे. २७ डिसेंबर २०१२ पासून येथे मनुष्य जागृतीचा उपक्रम सुरू होणार आहे. माझ्यासारखे सप्तखंजेरी वादक तयार करण्याचा मी निश्चय केला असून, आतापर्यंत १० ते १२ तरुणांनी या कार्याला प्रारंभ केला आहे.

- सत्यपाल महाराज

(२०११ सालचा महाराष्ट्र फाउंडेशनचा ‘प्रबोधन : कार्यकर्ता पुरस्कार’ सत्यपाल महाराज यांना देण्यात आला होता. त्यानिमित्ताने प्रकाशित झालेल्या साधना साप्ताहिकाच्या विशेषांकात त्यांनी व्यक्त केलेलं मनोगत.)

……………………………………………………………………………………………

ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी म्हटलंय की, ‘सध्या माध्यमांची निवडक बातम्यांकडे पाठ करणं ही संस्थात्मक गरज बनली आहे. आणि या कलेत माध्यमं सर्व आयुधांना आत्मसात करत निपुण बनली आहेत.’ आपल्याला हव्या त्या बातम्यांचा पाठलाग आणि नकोशा बातम्यांकडे ढुंकून बघायचं नाही, अशा कौशल्यपूर्ण वर्तनातून सत्यपाल महाराजांची बातमी सुटली की, ती दाबली गेली की तिथपर्यंत माध्यमं पोचण्यात कमी पडली? या प्रश्नाचं उत्तर माध्यमांना द्यावं लागेल. हा कीर्तनकार प्रवाहविरोधी बोलतो, खेड्यातला आहे म्हणून तर त्याची अशी घोर उपेक्षा केली नाही ना, हा प्रश्न पुढे येणारच.

जॉर्ज ऑर्वेलने म्हटलंय, ‘ज्यावेळी चारी बाजूंना धोकाधडीचे साम्राज्य असेल तेव्हा सत्य सांगणं हे फार महान क्रांतिकारी कर्म असतं.’ हे क्रांतिकर्म माध्यमांनी पार पाडलं नाही. सत्ताव्यवहारातले इतर घटकही गप्प राहिले.

सत्यपाल महाराजांच्या चाहत्यांमध्ये या महान शांततेबद्दल खूप अस्वस्थता असेल. सत्यपाल यांच्या जीवाचं काही बरं-वाईट झालं असतं तर… या केवळ विचारानं अस्वस्थ व्हायला होतं. आता सरकारला उशिरा जाग येईल. सत्यपाल यांना कदाचित संरक्षणही दिलं जाईल. पण निवडक बातम्या दडवणं, काहींची ठरवून उपेक्षा करणं हे सत्तेचं वागणं पुन्हा निवडक काहींच्या बाबतीत घडणारच नाही याची खात्री काय?

……………………………………………………………………………………………

लेखक ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.

rajak2008@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Ramesh Das

Sat , 20 May 2017

संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, महात्मा ज्योतिराव फुले, महात्मा गांधी,डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी या पुरोगामी विचारसरणीच्या समाज सुधारकांचा प्रतिगामी विचारसरणीने खून केला. त्याच वृत्तीने पुरोगामी विचारपेरणारे किर्तनकार सत्यपाल महाराजांवर हल्ला केला आहे. हे स्पष्ट आहे. पण हा हल्ला पाच दिवस का ? कसा ? कोणी?कशासाठी ?लपवला हे न उलगडणारे कोडे आहे. स्वतः विदेशी दारू पिऊन आणि एकाकिर्तनाला चाळीस, पन्नास आणि लाखात किर्तन करणाऱ्या किर्तनकारांवर कधी हल्ला झाल्याचे ऐकीवात नाही. एखाद्या सलिब्रेटीची, क्रिकेटरची बायको गरोदर राहिली. ही बातमी ब्रेकींग न्यूज होते. मात्र सत्यपाल महाराजांवरील हल्ल्याची बातमी चोवीस तास एरांडाचं गुऱ्हाळ चघळणाऱ्यांना ही बातमी सापडली नाही हे आश्चर्य आहे. एक गोष्ट महत्त्वाची आहे. देशात सत्तांतर झाल्यापासून ' भगवे सरकार 'आल्यापासून विचारवंतावरचे खून पडत आहेत. हल्ले वाढत आहेत. याबाबत सामान्य जनतेने, मतदारांनी विचार करायला हवा.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......