अजूनकाही
गेल्या वर्षी मी लोकांच्या टीकेचा इतका धनी झालो होतो की, माझा भाचा म्हणाला, "तुमच्या ऑनलाइन टीकेची एक गाथाच बनू शकेल". मी अशा जगात वावरताय की, जिथं तुम्हाला ट्रोलांचा कायम सामना करावा लागतो. (शहरी शब्दकोशानुसार ट्रोल म्हणजे- तुम्हाला आंतरजालावर चिमटे काढू शकतात म्हणून तशी संधी घेत राहणारे महाभाग!). मी लिहिलेला एक लेख अनेकांना दुखावून गेला. मी गेल्या अठरा वर्षांपासून लिहीत आहे. त्यावर टीकाही होत आली आहेच. मला लिहिण्याचा हक्क आहे, तुम्हाला दुखावण्याचा हक्क आहे आणि त्याची तमा न बाळगण्याचादेखील हक्क मला आहे. तर मग मी या नुकत्याच झालेल्या ट्रोलहल्ल्यांत माझ्या कामाच्या पद्धतीत काय बदल घडवले? त्याचीच ही पंचसूत्री. म्हणजेच मी घेतलेले काही धडे...
धडा क्र १. - एखादा मित्र किंवा वाचक सभ्यपणे तुमच्या लिखाणाबद्दल प्रश्न विचारत असेल तरच उत्तर द्या. ट्रोलला उत्तर देणं- जे मी पूर्वी करत होतो- म्हणजे अशा एका बिळात घुसणं आहे जिथं जाऊन तुम्हाला दैवी साक्षात्कार होतो की तुम्ही आता संपलात! तुम्हाला माहीत नसलेल्या लोकांना प्रतिसाद देऊन तुमचं डोकं फिरलं कि तुम्ही मेलात! तरीही प्रतिसाद न देणं म्हणजे पालीची ती शेपटी कापण्यासासारखं आहे, जी तुटून पडल्यावर थयथयाट करतेच. पालीची शेपटी पुन्हा वाढते, तुम्हीही पुन्हा सांधले जाल.
धडा क्र. २ - अवलोकन करा. लोक काय म्हणतायेत? म्हणणारे कोण आहेत? शांतपणे बसून विचार कराल तर काहीतरी नवीन शिकू शकाल. तुम्हाला टोचून बोलणाऱ्यांच्या काळ्या जिभा छाटून त्यांच्या सुबक थैल्या बनवण्यासारखंच हे आहे. अशा खूप साऱ्या थैल्या बनवा. आणखी ज्ञान मिळवून, उत्क्रांत होऊन, स्वतःला दुरुस्त करत जमवलेलं संचित या थैल्यांमध्ये जमा करत चला!
धडा क्र ३. - समाजमाध्यमांपासून सुट्टी घ्या. मजा करा!
समाजमाध्यमांपासून फारकत घेण्याचे व सुट्टी साजरी करण्याचे दोन फायदे असतात. एक म्हणजे, कुणीतरी पोस्ट केलेले छोट्या बाळांचे फोटो, मांजरीच्या पिल्लांचे फोटो, प्रमिला काकींचे दांडिया करत असलेले फोटो तुम्हाला like करत बसावं लागत नाही. आणि दुसरं, तुमचे टीकाकार तुमचा तिरस्कार आणखी एका कारणासाठी करत असलेले तुमच्या लक्षात येईल. ते कारण हे की, इतकी विखारी टीका झाल्यावरसुद्धा तुम्ही उष्ण कटिबंधातल्या समुद्र किनाऱ्यावरचं निळे पाणी, नारळाची झाडं या सर्वांचा आस्वाद घेऊ शकता. तुमच्या टीकाकरांना तुमच्या आनंद घेण्याची ही क्षमता फार झोंबत असते.
आपला तिरस्कार करणाऱ्यांना पुरून उरण्याचा सर्वांत चांगला मार्ग म्हणजे, जगण्याचा उत्सव साजरा करत राहणं. तुम्ही बाहेर फिरायला जाऊन सुट्टी साजरी करू शकत नसाल तर किमान रात्रीचं जेवण तरी बाहेर घ्या. तुमच्यावरच्या छद्मी टीकास्त्राला तुमच्या जगण्याच्या आनंदात विरजण घालू न देण्याचे हजारो उपाय तुमच्याकडे असू शकतात. पण ज्या मित्रांसोबत आनंद साजरा करणार त्यांची निवडही योग्य असावी. तुमच्या अंगावर कुणी धावून आलं, तेव्हा ज्यांना आनंद झाला होता, त्यांना पुन्हा जवळ फिरकू देऊ नका. अशांच्या सोबत मौजमजेपुरते असणारे, बघ्याची भूमिका घेणारे तुमचे तथाकथित मित्रसुद्धा दूरच राहू द्या. जे मित्र व्यक्तिगत आणि समाजात तुमची बाजू घेतात, त्यांना मात्र कधीच सोडू नका. ते सोन्याहूनही किमती आहेत.
धडा क्र.४ - आंतरजालावरची नैतिक समीक्षा ही आर्थिक मक्तेदारीसारखी असते. त्याला महत्त्व तेव्हाच देता येऊ शकतं, जेव्हा तुम्ही अननुभवी असता किंवा अगदी कंटाळलेले. माझ्या एका लेखावर एका मित्राने टीका केली, तेव्हा अशा एका ओळखीच्या बाईंनी त्याची बाजू घेतली, ज्यांचं स्वतःचं कुटुंब स्विस बँकेत काळा पैसा असणाऱ्यांच्या यादीत होतं. म्हणजे टीकाकार आरशात स्वतःचं थोबाड बघतच नाहीत तर!
धडा क्र. ५ - नील गायमन (Gaiman) ने आपल्या तिरस्कर्त्यांचा सामना कसा करायचा याबद्दलही उत्तम मार्गदर्शन केलं आहे. तो म्हणतो अप्रतिम अभिव्यक्त व्हा! अडचणीच्या वेळी कामी येईल अशी तीच एक गोष्ट आहे. तुमच्या हृदयभंगातून उत्तमच कला निपजली पाहिजे. कारण मेरील स्ट्रीप म्हणते, ‘तुम्हाला वाटतं की, जे लोक तुमच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या बाजूने उभे राहतील, मतं मांडण्याच्या तुमच्या हक्काच्या बाजूने उभे राहतील, ते तुमची मतं त्यांच्या विरोधात जाताच तुमच्याकडे पाठ फिरवतील.’ हा माझ्यासाठी खूपच महत्त्वाचा धडा होता. तुम्ही खुल्या विचारांचे आहात याचा अर्थ हा नाही की, खोलवर दडून बसलेले पूर्वग्रह अथवा संकुचित विचार करणारे तुम्हाला त्रास देणार नाहीत. उजव्या राष्ट्रभक्तिपर उघड हेतू असलेल्या ट्रोल्सपेक्षा हे असले ट्रोल आतल्यागाठीचे आणि अधिक सुशिक्षित/उच्च अभिरुचीवाले असतात. हे असे स्त्री-पुरुष असतात जे तुम्हाला प्रथितयशांकडे भेटतील, प्रस्थापित वर्तमानपत्रांमध्ये लिहितील, त्यांच्या टी शर्टवर ‘मी स्त्रीवादी आहे’ असे लिहिलेले असेल, मात्र त्यांच्याकडल्या मोलकरणीला न्यूनतम वेतनही देणार नाहीत.
तर मी लिहिलेलं काहीतरी तुम्हाला आवडलेलं नाही...? वाचू नका! पटतंय का? मिशेल ओबामा म्हणते, ‘जेव्हा ते खालची पातळी गाठतात तेव्हा तुम्ही वरून विहार करत असता.’ बेकेटने म्हटल्याप्रमाणे, 'मी जाऊ शकत नाही, पण मी गेलंच पाहिजे' (I can't go on, I must go on).
तुम्ही, मी, आपण सर्व पुढे गेलंच पाहिजे. विसरता येत असेल तर विसरून, नाही तर लक्षात ठेवून. आपण सर्व हुशार नसू एखादवेळ, पण मोठ्या मनाचे, दयाळू तरी होऊच शकतो!
……………………………………………………………………………………………
अनुवाद - प्रज्वला तट्टे
prajwalat2@rediffmail.com
……………………………………………………………………………………………
हा मूळ इंग्रजी लेख दै. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या ७ मे २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेला आहे. मूळ इंग्रजी लेखासाठी पहा -
……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Nivedita Deo
Wed , 17 May 2017
लेख चांगला आहे, पण मुद्दे कॉमनसेन्स असलेलेच आहेत. पण तरीही लेख वाचनीय आहे.