शोध शरद जोशींचा, शेतकरी संघटनेचा आणि अंगारवाटांचाही
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
राहुल माने
  • अंगारवाटा…शोध शरद जोशींचा
  • Sun , 14 May 2017
  • ग्रंथनामा Booksnama अंगारवाटा…शोध शरद जोशींचा Angarwata भानू काळे Bhanu Kale उर्मी प्रकाशन Urmi Prakashan

शेतकरी संघटनेची ऐतिहासिक, तात्त्विक, आर्थिक व सामाजिक न्यायाच्या संघर्षाची एक भूमिका होती. तिच्या जडणघडणीची जोखणी एक सामूहिक संघटना, राजकीय पक्ष किंवा संस्थात्मक पातळीवरील कामाचे मूल्यमापन करणाऱ्या केवळ व्यवस्थापनाच्या मापदंड (benchmarks) किंवा अवलोकन-चौकट (Review-Framework) मध्ये करता येणार नाही. कारण शेतकरी संघटना ही केवळ शेतीचा प्रश्न राजकीय ऐरणीवर आणून ठेवणारी प्रचार यंत्रणा नव्हती. ती संघटना प्रचलित भारतीय-महाराष्ट्रीय राजकारणाच्या-समाजकारणाच्या अनेक प्रस्थापित समजुतींना-समीकरणांना तडा देऊन उभा राहिलेला आणि “आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान-शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण...” असा उद्घोष करणारा एक जळजळीत पोवाडा होता.

भानू काळे यांनी लिहिलेल्या शरद जोशी यांच्या ‘अंगारवाटा…शोध शरद जोशींचा’ या चरित्राचे पारायण करावे सर्व महाराष्ट्राने. हे केवळ व्यक्ती-चरित्र नसून ते एक ‘संघटन-आंदोलन-संघर्ष’ चित्र आहे. होय तो ओनामाच आहे- आपल्या जीवनाला तारणाऱ्या शेतीचा, तिच्या संस्कृतीचा आणि त्या संस्कृतीचा एल्गार पेटत ठेवणाऱ्या कष्टकरी गड्यांच्या आणि बायांचा. हा एल्गार आहे—कारण शेतकऱ्यांना धान्य पिकवण्यासाठी दररोज कोणाविरुद्ध तरी संघर्ष करावाच लागतो.

शेती हे आपल्या ग्रामीण आणि शहरी संस्कृतीच्या गाड्याचे इंधन-वाहक तर आहेच, पण त्याहीपेक्षा शेती ही आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतीकडे एक व्यवसाय म्हणून पाहिले पाहिजे, शेतीच्या प्रश्नांकडे केवळ ‘बळीराजाचा धर्म’ म्हणून न पाहता अर्थशास्त्राच्या दृष्टीकोनातून त्याचा अभ्यास करावा व त्यानुसार उपाययोजना नेमाव्यात याची तीव्र जाणीव या माणसाने खूप आधी संपूर्ण भारतात भ्रमण करून लोकांना पटवून दिली. पंचायत-विधानसभा-लोकसभेची राजकीय रणधुमाळी, धोरण-लेखनाचे कायदेशीर-नोकरशाही पटल व प्रसारमाध्यमे-साहित्य-कला क्षेत्र या सर्वांचे लक्ष जोशी यांनी शेतीच्या आर्थिक नष्ट्चर्येबद्दल जीव जाईपर्यंत वेधून घेण्याचा प्रयत्न केला. भानू काळे एके ठिकाणी (पान क्र.२२२) म्हणतात,

“शेकडो पुस्तके वाचून जे कधी समजले नसते ते (शरद)जोशींना अनुभव शिकवत गेला. शेती करता करता आणि येत असलेल्या अनुभवांची छाननी करता करता त्यांची अशी खात्री पटली की, आपल्या अर्थव्यवस्थेच्या प्रतीमानात शेतीमालाची किंमत अतिशय कमी ठेवली आहे. बियाणे-खते-औषधे-वीज-पाणी-वाहतूक-मजुरी असे अगणित आणि सतत वाढवणारे खर्च भागवता भागवता शेतकरी कायम तोट्यातच राहतो. शेतीमालाच्या अपुऱ्या किमती हेच आपले खरे दुखणे आहे. शेतकऱ्याला त्याच्या श्रमांचे उचित दाम मिळाले तर त्याला अन्य कुठल्याही धर्मादायाची वा अनुदानाची भविष्यात गरज राहणार नाही. त्याचे आजचे लाचारीचे जिणे संपेल. त्यातूनच ‘शेतमालाला रास्त दाम’ हा एककलमी कार्यक्रम त्यांच्या मनात तयार झाला.”

Journey of thousand miles begins with first step या म्हणीप्रमाणेच शरद जोशी चाकण-पुण्याजवळील आंबेठाणमध्ये येऊन शेती करू लागले तिथपासून भारतीय संघराज्याचे सर्वोच्च प्रतिनिधिगृह असलेल्या संसदेचे ते सदस्य बनले इथपर्यंत त्यांची कहाणी आहे भानू काळे यांनी अतिशय सोप्या शब्दात मांडली आहे. काळे यांनी जोशी यांच्या जीवन-संघर्षाचे बरेच दुर्लक्षित पैलू समोर आणले आहेत. जोशी-एक लेखक, जोशी-एक तत्त्वज्ञ-विचारवंत, तर्कनिष्ठ जोशी, ते आयुष्याच्या शेवटी कदाचित एक प्रयोग म्हणून अध्यात्म-अभ्यासाकडे कसे वळले...जोशी यांची काही—विक्षिप्त नाही म्हणता येणार पण काही- हट्टी मते व वेळोवेळी घेतलेले काही टोकाचे निर्णय...त्यांची राजकारणाबद्दल सतत बदललेली पण शेतकऱ्यांचे हित समोर ठेवून घेतलेली निश्चित अशी एक भूमिका. शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीचे ऐतिहासिक काम—ज्याचा कदाचित इतका अचूक आणि मनोवेधक आढावा अलीकडच्या काळात काही दुर्मिळ छायाचित्रांसह कुणीच घेतला नसेल. शरद जोशी यांचे सुरुवातीपासूनचे सहकारी-सवंगडी, त्यांचे सार्वजनिक-वैयक्तिक टीकाकार, त्यांचे देशभरात पसरलेले असंख्य कार्यकर्ते-मित्र यांच्या दुर्मिळ आठवणी आणि त्यांचे जोशींबरोबर असलेले ऋणानुबंध, भारतीय टपाल खाते व स्वीटझरर्लंडमधील युनिव्हर्सल पोस्टल युनिअनमध्ये त्यांचे काम, नाशिक-मुंबई-कोल्हापूर-नवी दिल्ली-पुणे यासह अनेक भारतीय शहरांमध्ये त्यांचे गेलेले आयुष्य—त्या प्रवासामध्ये आणि वेळोवेळी आलेल्या अनुभवांमुळे त्यांची वैचारिक जडणघडण कशी झाली त्याचा एक रम्य आलेख भानू काळे यांनी मांडला आहे.

हे चरित्र शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेला वाहिलेल्या आयुष्याचे ढोबळमानाने तीन विभागात मांडणी करते. हे तीन टप्पे आहेत-

१. १९७७ ते १९९० हा शेतीतील प्रत्यक्ष अनुभव घेण्याच्या, शेतकरी संघटना उभारण्याचा, वेळोवेळी आंदोलन करण्याचा, राजकारणात सहभाग घेण्याचा टप्पा.

२. उदारीकरणाचे धोरण सरकारने स्वीकारले, संघटनेच्या कामाला वेगळे आयाम देण्याची गरज निर्माण झाली, खुल्या अर्थव्यवस्थेचे त्यांनी हिरीरीने समर्थन केले, स्वतंत्र भारत पक्षाची निर्मिती केली तो सगळा १९९१ ते २००० पर्यंतचा टप्पा.

३. २००१ ते २०१६ मध्ये हे जग सोडून जाण्याच्या कालखंड; ज्या काळात आंदोलनाचा व एकूणच जीवनाचा वेग मंदावला होता, ज्याला आपण सांजपर्व म्हणू शकू असा टप्पा.

या चरित्रामध्ये जोशींच्या बालपणापासून आणि त्यांच्या राजकारणातील लढाऊ कारकीर्दीपर्यंतच्या आयुष्यातील अनेक प्रसंग आणि वळणे सांगितली आहेत. त्यामुळे जोशी यांच्या निर्भीड पण विवेकी निर्णय घेण्याच्या स्वभावाचा आपल्याला परिचय होतो. महाविद्यालामध्ये संस्कृत हा प्रिय विषय असताना केवळ मित्राच्या अप्रत्यक्ष आव्हानाला प्रतिसाद म्हणून वाणिज्य (कॉमर्स) या विषयामध्ये शिक्षण घेण्याचा निर्णय, मुंबई विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून निवड झाली असतानासुद्धा गुरू-प्रेमापोटी कोल्हापूर येथेच शिक्षक म्हणून सुरू ठेवलेले काम, अतिशय मानाची, पैशाची आणि आरामाची अशी संयुक्त राष्ट्रसंघातील नोकरी सोडून पुण्याजवळ शेती करायला येणे, मतांसाठी याचना करायला लावणाऱ्या राजकारणात न जाण्याची आपली भूमिका बदलून पक्ष स्थापन करणे आणि  त्यासाठी वेगवेगळ्या राजकीय तडजोडी करणे, आंदोलनाच्या मोक्याच्या वेळी शेतकऱ्यांच्या आर्थिक-सांस्कृतिक गरजा लक्षात घेऊन काही वेळा आंदोलनाला स्थगिती देण्याचा त्यांचा निर्णय, असे कितीतरी प्रसंग त्या त्या वर्णनासकट या चरित्रात आले आहेत. 

शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या निमित्ताने बऱ्याच घोषणा, शेतकऱ्यांबरोबरची संवाद पद्धत्ती व आंदोलनाचे प्रकारही लोकप्रिय झाले. कदाचित या प्रकारच्या घोषणा, शेतकऱ्यांच्या सांस्कृतिक संवेदना व भौतिक गरजांच्या संवेदनांशी जोशी यांनी सरळ घातलेला साष्टांग दंडवत, त्यामुळे शेतकऱ्यांशी जोशी यांचे जोडले गेलेले थेट नाते-नेतृत्त्व हे खऱ्या अर्थाने सामूहिक होण्याची प्रक्रिया वेगवान झाली असावी. अशा बऱ्याच मुद्द्यांमुळे आंदोलनाची ही व्यापक प्रक्रिया अधिक निर्णायक झाली आणि नंतर या आंदोलनाला ना भूतो ना भविष्यति असा प्रतिसाद मिळाला.

२००८ मध्ये National Institute of Advaanced Studies, बेंगळूरू इथे जोशी यांनी Metaphysics Of Leadership (नेतृत्त्वाचे अध्यात्म) या विषयावर एक भाषण दिले होते. त्यामध्ये ते म्हणतात, “मी ज्या आर्थिकवर्गात, जातीमध्ये जन्मलो नाही किंवा ज्या गट-समूहांमध्ये वाढलो नाही, त्या शेतकरी समाजासाठीच मी माझे संपूर्ण आयुष्य वेचायचा निर्णय घेतला. हे नेत्तृत्वक्षमतेचे, नेत्तृत्वगुणांचे आणखी एक व्यक्त रूपक आहे.”

राजकीय पक्षांच्या अस्तित्वाला आव्हान देणारा वेगळा कार्यक्रम देण्यामध्ये त्यांनी आपले बौद्धिक व वक्तृत्व गुंतवले होते हा त्यांच्या नेतृत्वाचा आणखी एक प्रमोख गुण होता. पंजाब, उत्तरप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र या राज्यांमधील ढवळून निघालेलं राजकारण, संपूर्ण भारतीय इतिहासामध्ये शेतकरी इतिहासाचे व पर्यायाने शेतीच्या संघर्षाचे पाईक होण्याचे त्यांना भाग्य लाभले, हा पण एक नेतृत्त्व-योग. उस-कापूस-तंबाखू ही श्रीमंत पिके व कांदा आंदोलनाच्या केंद्रस्थानी होती बरीच वर्षे—हा एक महत्त्वाचा नेत्तृत्व पराक्रम. या श्रीमंत पिकांचा फायदा खूप कमी शेतकऱ्यांना होतो असा आरोप झाला असला तरी आपले बरेचशे अल्प-भूधारक शेतकरी या पिकांच्या देखभालीमध्ये कर्जबाजारी झाल्यामुळे याही पिकांना योग्य तो हमी-भाव मिळाला पाहिजे, यासाठी त्यांनी सुरू केलेला संघर्ष त्यांच्या व्यापक संवेदनशीलतेचे दर्शन घडवतो.

या सर्वांपेक्षा त्यांनी शेतकरी महिला आघाडी उभी करून जे काम केले, त्याला महाराष्ट्राच्या व भारताच्या इतिहासात तोड नाही. कोणत्याच राजकीय पक्षाने तोपर्यंत महिला-शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले नव्हते. ‘किसानांच्या बाया आम्ही’ या प्रकरणामध्ये काळे यांनी शेतकरी महिला आघाडीच्या कामाची विस्तृत चर्चा केली आहे. जोशींच्या आंदोलनाला महिलांची प्रचंड संख्या समजली तर त्यांच्या कामाचा वणवा किती पेटला होता हे समजते. उदारीकरणाची प्रक्रिया सुरू होण्याआधी पारंपरिकरीत्या ग्रामीण भागात चूल-मूलच्या पलीकडे जोशी यांनी महिलांना शेती आंदोलनामध्ये झोकून देण्याची प्रेरणा दिली. महिलांचा सहभाग असलेली आणि महिला आघाडीची काही आंदोलने खरीच अभूतपूर्व होती.

भानू काळे यांनी शरद जोशी यांच्या राजकीय प्रवासाविषयी अतिशय मूल्यवान निरीक्षणे नोंदवली आहेत. जोशींच्या राजकीय मतांबद्दल, त्यांच्या सैद्धांतिक भूमिकेबद्दल, त्यांनी लढलेल्या विविध राजकीय आघाड्यांबद्दल आणि त्यांनी केलेल्या विविध राजकीय प्रयोगांबद्दल  काळे यांचे एकच स्पष्टीकरण आहे- “शेतमालाला योग्य तो हमीभाव-बाजारभाव मिळावा यासाठी त्यांनी केलेल्या प्रत्येक राजकीय कृतीकडे पाहावे लागेल.” या चष्म्यातून जरी पाहिले तरी त्यांची वाटचाल सुस्पष्ट होते. इतर राजकीय पक्षांबद्दल त्यांची नेमकी विशिष्ट मते काय होती याचे विस्तृत विश्लेषण त्यांनी केले नाही. परंतु सत्तेत असणारे सर्वच शेतकऱ्यांचे शोषण करतात यावर दृढ विश्वास असल्याने आणि तशी परिस्थितीही बऱ्याच दशकांपासून असल्यामुळे ते नेहमी सत्ताधीश पक्षाच्या विरोधात भूमिका घेत. अपवाद होता फक्त शेतकरी कामगार पक्षाचा. या पक्षाबाद्दल जोशी यांच्या सांगताना काळे लिहितात-

“या पक्षाचे कार्यकर्ते तळमळीचे आहेत असे त्यांचे मत होते. या पक्षावर त्यांनी एक ३३ पानांची पुस्तिकाही लिहिली. असे विस्तृत लिखाण जोशी यांनी अन्य कुठल्याच पक्षाबद्दल केलेले नाही. जोशींच्या विश्लेषणानुसार फुलेवादापेक्षा त्या पक्षाने मार्क्सवाद अधिक जवळचा मानला. शेतकऱ्यांपेक्षा कामगारांशी अधिक जवळीक साधायचा प्रयत्न केला व ती त्यांची घोडचूक ठरली, कारण त्यातूनच त्यांना दुभंगलेले व्यक्तिमत्त्व प्राप्त झाले. पुढे त्यांचे अनेक मोहरे यशवंतराव चव्हाणांनी काँग्रेसमध्ये खेचल्यामुळे, पण मुख्यता: वैचारिक परभृततेमुळे, तो पक्ष प्रभावहीन झाला.” (पान क्र. ३१४)   

या पलीकडे जाऊन शेतकरी संघटनेच्या कारकिर्दीचे अनेक महत्त्वाचे पैलू आहेत. या संघटनेने लढाऊ कार्यकर्त्यांचे एक मोहोळ आणि वावटळ उभी केली, सेवाभावाने राजकारण करणारी तीन पिढ्या घडवल्या आणि त्याचबरोबर समकालीन राजकारणाच्या फडामध्ये विकास-सकारात्मकता-तर्कनिष्ठ आर्थिक भान याचे सिंचन केले त्याचे फायदे इतर राजकीय पक्षांनाच मिळाले याकडे काळे आवर्जून लक्ष वेधतात. तरीही संघटनेने हि जोपासणी कशी केली यासंबंधी ते म्हणतात-

“शेतकरी संघटनेच्या एका महत्त्वाच्या राजकीय प्रभावाची इथे नोंद घ्यायला हवी, कारण राजकीय विश्लेषक सहसा त्याचा उल्लेख करत नाहीत. १९८० ते १९९५ या पंधरा वर्षात शेतकरी संघटनेने ग्रामीण महाराष्ट्रात उग्र चळवळ उभारली. रास्ता रोको, मोर्चे, मंत्र्यांना गावबंदी वैगेरे अनेक उपक्रम राबवले. महिलांना रस्त्यावर उतरवले तरुण कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर संघटनेकडे वळले. त्या काळात विदर्भ व मराठवाड्यात कॉंग्रेसचा पारंपारिक प्रभाव कमी झाला याचे सर्वाधिक श्रेय शेतकरी संघटनेला द्यावे लागेल.” (पान क्र.३३७)

काळे यांच्या पुस्तकाचे महत्त्व यासाठी आणखी मोठे आहे की, त्यांनी शरद जोशी यांच्या संघर्षपूर्ण आयुष्याची वस्तुनिष्ठ मांडणी करण्याचा अतिशय संतुलित प्रयत्न केला आहे. शेतकरी संघटनेच्या बऱ्याच मोहिमांशी त्यांचा या ना त्या कारणाने अप्रत्यक्षरीत्या संबंध आला असल्याचे जोशींच्या आयुष्यातील पानापानावर चितारलेले बरेच प्रसंग वाचताना जाणवते. विविध सामाजिक विषयांवरील आपल्या भूमिकेचे मूल्यमापन त्यांनी कोरड्या अर्थशास्त्राने, शेतीच्या प्रगतीच्या ध्येयवादाने आणि कठोर व्यावहारिक तर्काने केलेले असल्याचे बऱ्याच ठिकाणी काळे नोंदवतात. त्यामुळे त्यांना भावनेचे, खोट्या आश्वासनांचे व फसव्या घोषणांचे राजकारण करता आले नाही. शेतकरी संघटना राजकारणात-समाजकारणात मागे पडल्याच्या कारणांचे ते जिथे विश्लेषण करतात, ती त्यांची सर्वांत जास्त नोंद घ्यावी अशी मांडणी आहे (पान क्र. ३४२). त्यांपैकी काही कारणे अशी आहेत : साधने व पैसा यांची उणीव, निवडणुकीचे तंत्र अवगत नसणे, प्रस्थापित सत्तेला व पक्षांना समर्थ पर्याय म्हणून उभे राहण्यात प्रतिमा-निर्मिती करण्यात अपयश, लोकांना पक्षाच्या आर्थिक कार्यक्रमाचे महत्त्व पटवून देण्यात कमी पडणे, पक्षाचा कार्यक्रम फक्त शेतकऱ्यांचा आहे हा लोकांचा समाज झाला, आंदोलनामुळे धान्य महाग होऊ शकते हा पसरलेला गैरसमज व त्यामुळे भूमिहीन मजुरांचा दुरावा, नंतरच्या काळात अधिक तरुणांना या आंदोलनाकडे आकर्षित करून घेण्यामध्ये आलेले अपयश.

एकूणात संपूर्ण समाजाच्या व्यापक हितासाठी शेतकरी संघटना लढत नसल्याचे जे चित्र निर्माण झाले ते तिच्या वाढीसाठी मारक ठरल्याचे या चरित्रावरून जाणवते. अर्थातच ही प्रतिमा चुकीच्या गृहीतकांवर आधारित असल्याचे आज आपल्याला दिसून येईल. ज्या ज्या वेळी शेतीमधील विकासदर वाढला आहे, त्या त्या वेळी भारतीय अर्थव्यवस्थेने झेप घेतली आहे. शरद जोशी 'कट्टर शेतकरी हितवादी होते', असे बोलण्याचे मी धाडस करेन. जीवनाबद्दल, शेतीबद्दल आणि एकूणच आपल्या आजूबाजूच्या समस्यांबद्दल त्यांची एक संवेदनशील भूमिका होती, हे आपण समजून घेतले, तर त्यांच्या तथाकथित ‘आडमुठे’ असण्याचा केला गेलेला प्रचार धादान्त खोटा असल्याचे आपल्याला कळून येईल.

काळे एका ठिकाणी जोशींचे म्हणणे मांडतात -  'बहुजन समाजातील बेकाराच्या पोटातील भूक ही काही दलित समाजाच्या पोटातील भुकेपेक्षा वेगळी नसते. हिंदूंच्या पोटातील भूक मुसलमानाच्या भुकेपेक्षा वेगळी नसते. भुकेला जात नसते, भाषा नसते आणि धर्मही नसतो ” (पान क्र. ३३९).

जोशी यांचे हे विधान जरी आरक्षणाच्या संदर्भात आणि त्या ओघाने येणाऱ्या रोजगाराच्या संदर्भात आले असले, तरी त्यांची ही संवेदना शेतकरी संघटनेच्या त्यांच्या घोषित भूमिकेशी सुसंगतच आहे. जे शेतकरी समाजाला अन्न पुरवतात, त्यांच्या जीवन-अस्तित्त्वाचा प्रश्न जेव्हा निर्माण होतो तेव्हा कोणतीही तडजोड का म्हणून का करायची, हाच त्यांचा प्रश्न होता, आणि शेवटपर्यंत त्यांनी हा प्रश्न लावून धरला. पत्रकार-लेखक-‘अंतर्नाद’चे संपादक भानू काळे यांनी जोशींचा हा निर्धार या प्रश्नाच्या मार्फत आपल्यापर्यंत अतिशय थेट आणि कळकळीने पोचवला आहे.

……………………………………………………………………………………………

अंगारवाटा…शोध शरद जोशींचा - भानू काळे,  उर्मी प्रकाशन, पुणे

पाने - ५३४, मूल्य - ५०० रुपये.

हे पुस्तक ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3480

……………………………………………………………………………………………

लेखक राहुल माने मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्स, अहमदाबाद इथे रिसर्च असोसिएट म्हणून कार्यरत आहेत.

creativityindian@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......