‘तरीही शेषप्रश्न’ : दस्तावेज स्त्रीमुक्तीचा
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
वासंती दामले
  • ‘तरीही शेषप्रश्न’चं मुखपृष्ठ
  • Sun , 14 May 2017
  • ग्रंथनामा Booksnama तरीही शेषप्रश्न Tarihi Sheshprashna छाया दातार Chhaya Datar ग्रंथाली Granthali

डॉ. छाया दातार या स्त्रीमुक्ती चळवळीतील एक आघाडीच्या कार्यकर्त्या! महाराष्ट्रात, १९७५ पासून सुरू झालेल्या, स्त्रीमुक्ती चळवळीच्या प्रथमपासूनच्या साक्षीदार. त्यामुळे स्त्रीप्रश्नाच्या, ज्या ज्या पैलूंची चर्चा या प्रवासादरम्यान झाली, त्याची त्यांना उत्तम जाण आहे आणि ते पुस्तकात दिसूनही येते. ‘तरीही शेषप्रश्न’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून कळते की, तरीही अनेक प्रश्न अजून सुटलेले नाहीत. पुस्तकाची रचना ‘डॉक्युनॉवेल’ अशी आहे- म्हणजे शुद्ध दस्तावेजही नाहीत व सर्वस्वी काल्पनिकही नाही. काही घडलेल्या घटना, किंचित वेगळे रूप दिलेल्या खऱ्या व्यक्ती, काही खऱ्या व्यक्ती, काही स्वत:चे आयुष्य, काही मैत्रिणींचे आयुष्य अशी सरमिसळ या पुस्तकात आहे. सगळे वेगवेगळे प्रश्न उपस्थित करताना या कथा, या घटना येतात. चळवळीतील सदस्यांनी, स्वत:ची भूमिका स्पष्ट करताना कुठल्या कुठल्या प्रश्नांची चर्चा केली, त्यात कुठले मुद्दे चर्चिले गेले, याच्या समर्थनार्थ कुठल्या घटनांचा उल्लेख आहे, हे सर्व यात आले आहे. अनेक प्रश्नांवर चळवळीची भूमिका काय होती व आहे, ती तशी का आहे, हे यातील चर्चेवरून समजून येईल. ज्याला स्त्रीप्रश्न जाणून घेण्याची इच्छा आहे त्याच्यासाठी हे पुस्तक आवश्यक व वाचनीय आहे.  पुस्तक परिचयाच्या लिखाणाच्या मर्यादेत मात्र यातील काही प्रश्नांविषयीच चर्चा करणे शक्य आहे.

हे पुस्तक, थोडक्यात सांगायचे तर, छायाच्या नजरेतून घेतलेला स्त्री चळवळीचा इतिहास आहे. इतिहासाचा अभ्यास करताना, ऐतिहासिक साधनांबरोबरच म्हणजे कागदपत्रे, दस्तावेज यांच्या बरोबरच, इतिहास घडताना त्यात असणाऱ्या माणसांच्या आठवणींना, दुय्यम साधने म्हणून महत्त्व असते. पुरावा म्हणून ग्राह्य धरता येत नसल्याने, इतिहासाच्या दृष्टीने या डॉक्यु-कादंबरीला तेवढे महत्त्व नसले तरी, दस्तावेज व गेल्या चाळीस वर्षांचा स्त्री लढ्यातील प्रश्न समजून घेण्यासाठी याचा नक्कीच उपयोग होईल. काही गोष्टी जशाच्या तशा वा काही भर घातलेल्या, बदललेल्या असल्या तरी ८० टक्के खऱ्या आहेत. त्या चळवळीचे मानस, अंतर्गत प्रवाह समजायला उपयोगी आहेत. शहरी, सुशिक्षित स्त्रियांची चळवळ म्हणून वेळोवेळी या चळवळीला बदनाम केले गेले. पश्चिमेतून आलेला विचार म्हणून ही चळवळ सुरू झाली नाही. पश्चिमेतून आलेली लोकशाही अजून आपल्याकडे म्हणावी तशी रुजली नाही. पण स्त्रीमुक्तीला शक्ती म्हणून का होईना, परंपरावादी पक्षाने स्विकारली. ती का? याचे उत्तर कदाचित या पुस्तकात मिळू शकेल.

पुरुषांपेक्षा बुद्धिमान व शिक्षित स्त्रियांनी दुय्यमत्व का स्वीकारावे? पन्नास वर्षांपूर्वी स्त्रियांना पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर ‘पुरुषप्रधान संस्कृतीच्या’ विश्लेषणात त्यांना सापडले असू दे किंवा हे विश्लेषण पश्चिमेतील स्त्रियांनी आधी केलेले असू दे, पुढची वाटचाल तर येथील स्त्रियांनी, या समाजाच्या संदर्भात, इथेच करायची होती. त्याची सुरुवात स्वानुभव कथनाने झाली. आपले संस्कार सांगतात की, घरातील दु:खं बाहेर सांगायची नाहीत. मैत्रिणींच्या गटात येऊन आपली साधी सल ऐकून घेतली जाते व इतरांची ऐकल्यावर हे जाणवते की फारसे वेगळे असे, गुप्त ठेवावे असे, काही नसते. अशा एकत्र येण्यातून काही समविचारी स्त्रिया भेटत राहिल्या व त्यांनी काही प्रकल्प आखले, पुस्तक लिहिले, मासिक काढले. हा सुधा व मैत्रिणींचा गट यांनी अनेक प्रश्नांवर चर्चा केली. या गटाला लेखिकेने नाव दिले आहे- ‘शेषप्रश्न’.

चळवळीत सुरुवातीला आलेल्या स्त्रिया बहुतांशी डाव्या चळवळीतून आलेल्या होत्या. क्रांती झाल्यावर सर्व काही ठीक होईल, स्त्री-पुरुष समानता येईल यावरील विश्वास गमावलेल्या, पण डाव्या मूल्यांवर ठाम विश्वास असणाऱ्या होत्या. त्यामुळे सुरुवातीला, आधी क्रांती की आधी स्त्रीमुक्ती, हा प्रश्न आधी स्वातंत्र्य की आधी समाजसुधारणा, या प्रश्ना इतक्याच हिरीरीने चर्चिला गेला. समानतेवर विश्वास असल्याने, क्रांतिकार्यात फूट पाडत असल्याचा आरोप करणारे कॉम्रेड, एखाद्या स्त्रीला अत्याचारातून सोडवायला मदतही करायला यायचे. पण प्रथम पासूनच संघटनेच्या  रोजच्या कामापासून पुरुषांना लांबच ठेवण्यात आले होते.

……………………………………………………………………………………………

तरीही शेषप्रश्न  - ले. छाया दातार   

ग्रंथाली, मुंबई

पाने - ३१९, मूल्य - ३०० रुपये.       

हे पुस्तक ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3478

……………………………………………………………………………………………

स्त्री चळवळीच्या मते, समाजसुधारणा व राजकीय कार्य यात द्वैत नव्हतेच. उलट ‘जे वैयक्तिक ते राजकीय’ हेच सर्व स्त्री चळवळीचे बोधवाक्य होते. धर्म, परंपरा यावर विश्वास नसल्याने मंगळसूत्र का घालत नाही? कुंकू का लावत नाही? काहींनी आडनावे बदलली नाहीत तर का नाही? या प्रश्नांना चळवळीतील स्त्रियांना तेव्हा वारंवार तोंड द्यावे लागले. हळूहळू पुरुषप्रधानतेची मांडणी पटून अनेक राजकीय विचारसरणींच्या स्त्रिया अथवा राजकीय विचारसरणींविषयी विचार न केलेल्या, तसेच दलित स्त्रिया चळवळीकडे येऊ लागल्या. यातील निवेदनकर्ती ‘सुधा’ हिचा प्रवास एका गृहिणीपासून चळवळीतील कार्यकर्तीपर्यंत कसा झाला, पुढे त्यात आलेली वळणे, घडलेल्या घटना हे आत्मकथन मधून मधून येत राहते. स्त्रीमुक्ती यात्रेत तिच्या हातून अजाणतेपणी घडलेल्या चुकीची कबुलीही आहे. तसेच यातील निर्मला, ललिता, चारू, साधना या प्रातिनिधिक स्त्रियांचे आयुष्यही यात येते.

गेल्या चाळीस वर्षांच्या प्रवासात अनेक प्रश्नांची चर्चा, चळवळीत म्हणजे फक्त शेषप्रश्नात नाही, तर देशातील सर्व स्त्रीमुक्ती मानणाऱ्या गटांमधून झाली. ते प्रश्न लेखिकेनी दिले आहेत ते म्हणजे ‘समलिंगी संवेदना’, ‘विवाहसंस्था’, ‘सेक्स वर्कर्स’, ‘रतीप्रेरणा’ वगैरे. या चर्चा होत्या घटीत घटनांवर, आपली भूमिका निश्चित करण्यासाठी केलेल्या चर्चा! समलिंगी संवेदना या निवड म्हणून चळवळ स्वीकारत होतीच, पण इतक्या वर्षांच्या वाटचालीत, वैज्ञानिक संशोधनाच्या साह्याने, या संवेदना नैसर्गिक आहेत ही चळवळीची आजची भूमिका आहे हे लेखिका स्पष्ट करते.

लग्नसंस्थेची चर्चा सविस्तर आहे. त्यात घडलेले बदल आपण आज प्रत्यक्ष समाजात बघत आहोत. अगदी महाराष्ट्रापुरते म्हणायचे झाल्यास हेही सर्वजागी सर्वसमाजात सारखे नाहीत हे ग्रामीण भागावरील प्रकरणात आपल्याला कळते. पण ग्रामीण भागही बदलतो आहे हेही आपल्याला कळते. लग्न व घटस्फोटाच्या कारणांची मांडणी उत्तम झाली आहे. चळवळीत वेश्यांसाठी ‘सेक्स वर्कर्स’ हा शब्द रूढ झाला आहे ज्याच्याशी सहमत होणे कठीण आहे. कारण गरिबी हेच या व्यवसायामागचे कारण आहे, हे इतिहासात अनेकदा दिसून आले आहे. गोंडस शब्द दिल्याने व्यवसायाचे उदात्तीकरण होण्याचा धोका वाढतो. यात अडकलेल्या स्त्रियांविषयी सहानुभूती बाळगूनही, छाया, सेक्स वर्कर या मांडणीविषयी मनापासून सहमत आहे असे वाटत नाही. अर्थात कुठल्याही भूमिकेत अंतिम वाक्य असूच शकत नाही. ‘रतीप्रेरणा’ या प्रकरणात काही अनुभव व काही कल्पनेच्या सहाय्याने, स्त्रियांमधील रतीप्रेरणेचा शोध घेतला आहे. गटाने या चर्चेला सुरुवात केली तेव्हा या विषयी उघड बोलले जायचे नाही. पुरुषांनी समाजात या विषयी अनेक भ्रम पैदा करून ठेवले होते. आज परिस्थिती बरीच बदलली आहे.  

या वाटचालीत समाजात अनेक घटना घडल्या. हुंडाबळीच्या, बलात्काराच्या या खास भारतीय घटना! यांना सामोरे जाताना अननुभावामुळे चुका घडल्या, यातून संघटना शिकत गेल्या. संसारात सुखी नसलेल्या बायका संघटनेकडे मदतीसाठी येऊ लागल्या. निर्मला वकील असल्याने तिचा या घटनांशी रोजचा संबंध यायचा. तसेच संघटनेतील प्रत्येक स्त्री वेगवेगळ्या कामांशी जोडली गेलेली होती व मिटींगच्या दिवशी अनुभवांची देवाणघेवाण व्हायचीच. काम करताना पडलेले प्रश्नही चर्चिले जायचे. चळवळ यामुळे अनुभवाने व विचारांनी समृद्ध होत गेली. निर्भया बलात्कार केसचा अनुभव, त्यामुळे घडलेले विचारमंथन हेही यात आहे. गेल्या पन्नास वर्षातील स्त्रीचे बदलते रूप यात आपल्याला बघायला मिळते. मग स्त्री-चळवळ यशस्वी झाली असे म्हणता येईल का?

‘तरीही शेषप्रश्न’ या शीर्षकामुळे आपण म्हणू शकतो की, लेखिकेला म्हणायचे आहे की तरीही प्रश्न शिल्लक आहेतच. कुठलेही सामाजिक बदल हे टप्प्या टप्प्यानेच होत असतात. शिवाय भारतासारख्या खंडप्राय देशात ते समान नसणार. पण म्हणूनच शेवटल्या प्रकरणात तरुण मुलींनी संघटना, ‘आता आम्ही चालवतो. तुम्ही आम्हाला सल्ले द्या’ म्हणून सुधा व तिच्या मैत्रिणींना सन्मानपूर्वक निवृत्त केलेले दाखवले आहे. या प्रकरणाची भाषा सकारात्मक आहे, हे आवडले.

आधी म्हटल्याप्रमाणे पुस्तक जास्त दस्तावेजी व कादंबरी कमी असे झाले आहे. काही प्रकरणे, स्त्रीमुक्ती चळवळीविषयी फारशी माहिती नसणाऱ्यास, रुक्ष वाटू शकतील. पण ज्याला माहिती करून घ्यायची आहे, चळवळ समजून घ्यायची आहे, त्याच्या साठी हे उपयुक्त पुस्तक आहे.

लेखिका निवृत्त प्राध्यापिका आहेत.

vasdamle@gmail.com                                                

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......