अजूनकाही
१. तूरखरेदीवरून शेतकऱ्यांविषयी असभ्य भाषेचा वापर करणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले आहे. शेतकऱ्यांना मानवाकडून अपेक्षा असून भाजपच्या दानवाकडून त्यांना अपेक्षा नाही, अशा शेलक्या शब्दात राज ठाकरेंनी रावसाहेब दानवेंचा समाचार घेतला आहे.
टेररिझम हवा की टुरिझम, आयटी आणि आयटी यांचा समन्वयच देशाला आघाडीवर नेईल, अशा कोणत्याही गंभीर प्रश्नावर फुटकळ कोट्या करण्याचा विद्यमान पंतप्रधानांचा छंद पाहता भारताचे पहिले मराठी पंतप्रधान बनण्याची पात्रता राज ठाकरे यांच्यात आहे, असं म्हणायला हरकत नाही.
..........................................................................................
२. ठाणे महापालिकेचे उपायुक्त, कवी संदीप माळवींना फेरीवाल्यांकडून मारहाण झाल्याची घटना घडल्यानंतर ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गावदेवी परिसरातील फेरीवाल्यांवर धडक कारवाई सुरू केली. कारवाईच्या दरम्यान त्यांनी एकदम दबंग स्टाइलमध्ये रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केली. ठाणे रेल्वे स्टेशनचा परिसर १०० टक्के फेरीवालामुक्त करण्याचा निर्धारही महापालिकेने केला आहे. ज्या दुकानात माळवी यांना मारहाण करण्यात आली त्या एकविरा पोळीभाजी केंद्रासह आजूबाजूच्या सात दुकानांना पालिकेने सील ठोकले असून त्यांच्या शेड पाडण्यात आल्या आहेत. स्टेशन परिसरात रस्ते अडवून थांबलेले रिक्षाचालक, रस्त्यावर अतिक्रमण करणारे गाळेधारक आणि काही खासगी वाहनचालकांना आयुक्त आणि त्यांच्या अंगरक्षकांनी मारहाण केली. त्यामुळे स्टेशन परिसरातील वातावरण प्रचंड तापले होते.
वरवर पाहता ही एकदम फिल्मी कौतुकास्पद बातमी वाटते. जरा विचार करा, एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याने अशाच प्रकारचा आक्षेप घेतला असता आणि त्याला फेरीवाल्यांनी मारहाण केली असती, तर त्याची प्रतिक्रिया म्हणून साक्षात आयुक्त अजय देवगण बनून बाहेर पडले असते का? स्टेशन परिसराला वेढा घातलेल्या फेरीवाल्यांचा हप्ता कोणाकोणाला जातो? स्टेशन परिसर १०० टक्के फेरीवालामुक्त होईल, यावर एका तरी ठाणेकराचा विश्वास बसेल का? आणि तो का बसेल?
..........................................................................................
३. भारतात झाडांची पानं खाल्ली तर म्हशीवर गुन्हा दाखल होऊ शकतो. उत्तर प्रदेशमध्ये चक्क एका म्हशीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या म्हशीने चारा समजून रोपटी खाल्ली, हा तिचा गुन्हा असून पोलीस फक्त गुन्हा दाखल करण्यावर थांबले नाहीत, तर त्यांनी त्या म्हशीला चक्क अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील खिरी जिल्ह्यात बलदेव कॉलेज परिसरात वनविभागाने लावलेली रोपटी एका म्हशीने फस्त करून टाकली.
ज्या देशात गाय ही माता असते आणि उंदीर दारू पिऊन लास होतात, तिथे म्हशीवर गुन्हा दाखल होण्यात काय अडचण आहे. आता हे पोलिस बैल (खरेखुरे, शिंगंवाले, उगाच गैरसमज नकोत) होते का, असा प्रश्न कोणाला पडला असेल, तर त्यातही गैर काहीच नाही.
..........................................................................................
४. भ्रष्टाचाराबाबत भाजपची भूमिका ही नेहमीच दुटप्पी राहिली असल्याची टीका पक्षाचे माजी खासदार कीर्ती आझाद यांनी केली आहे. भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचाराचा विषय येतो, तेव्हा पक्ष सोयीस्कर मौन पाळतो, असं ते म्हणाले. मी जेव्हा दिल्ली क्रिकेट असोसिएशनचा (डीडीसीए) ४०० कोटींचा भ्रष्टाचार उघडकीस आणला, तेव्हा त्यात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचा सहभाग होता. मात्र, पक्षाने जेटलींचा बचावच केला नाही, तर मला पक्षातून निलंबित केले. आता तोच भाजप पक्ष भ्रष्टाचारांच्या आरोपांवरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. त्यांना केजरीवालांचा राजीनामा मागण्याचा हक्क नाही, असं आझाद म्हणाले.
आझाद भाऊ, सध्याचा काळ वेगळा आहे. ज्या लोकांना २००० रुपयांच्या नोटेत अत्याधुनिक चिप बसवलेली असते आणि तिच्या साह्याने काळा पैसा नष्ट केला जाणार आहे, हे तंतोतंत पटलं होतं, त्यांना ईव्हीएममध्ये फेरफार केले जाऊ शकतात, यावर विश्वास बसणं कठीण जातं. अरविंद केजरीवालांनी लाल दिव्याचा त्याग केला की, मोठी नौटंकी ठरते आणि तीच आयडिया ढापून केंद्राने प्रसृत केली की, पंतप्रधान व्हीआयपी कल्चरचे कर्दनकाळ ठरतात... गावोगावचे वाल्या जिथे वाल्मिकी बनतात, अशा थोर पक्षाचा साक्षात अध्यक्षापासून जपलेला वारसा नाकारण्याची बुद्धी तुम्हाला कशी झाली आझाद भाऊ?
..........................................................................................
५. गेली १५ वर्षे आपण सत्तेत होतो. मात्र सरकार जाऊन अडीच वर्षे झाली तरी आपण सत्तेत असल्यासारखेच वागत आहोत. या मानसिकतेतून आपल्याला आता बाहेर यावं लागेल. लोकांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या.
पवारांनी बहुधा त्यांच्याही नकळत १५ वर्षांची सत्ता कशी निघून गेली आणि वारंवार नादानी दाखवणाऱ्या, शेतकऱ्याला डिवचणाऱ्या, त्याचा अपमान करणाऱ्या भाजपसारख्या शहरी तोंडवळ्याच्या आणि व्यापारी वृत्तीच्या पक्षाला मतदार तरीही का निवडून देतायत, याचंही विश्लेषण करून टाकलं. जनतेसाठी रस्त्यावर उतरून लढायचं ते फक्त विरोधी पक्षात असताना? सत्तेत असताना ‘सत्तेत असल्याची’ गुर्मी दाखवायची, यानेच सत्ता जाते, हे तेही शिकले नाहीत आणि विद्यमान भाजपवालेही शिकायला तयार नाहीत. जनता गुर्मीलाच मत देते, असा त्यांचा होरा जनतेनेच खरा ठरवला असावा.
editor@aksharnama.com
……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment