चित्रपटगृहातली बदलती खाद्यसंस्कृती
सदर - इनसाइडर
अमोल उदगीरकर
  • पीव्हीआर मल्टिप्लेक्स
  • Sat , 13 May 2017
  • इनसायडर Insider अमोल उदगीरकर Amol Udgirkar मल्टिप्लेक्स Multiplex

सिनेमावर आणि सिनेमा बघण्यावर प्रेम करावं ते भारतीयांनीच. आपल्यासाठी सिनेमा केवळ मनोरंजनाचं अजून एक साधन नाहीये. सिनेमा आपल्यासाठी अनेक कवाडं उघडतो. आयुष्यात आ वासून उभ्या ठाकलेल्या अनेक प्रश्नांपासून काही तासापुरतं का होईना पलायन करण्याची संधी देतो. आपल्याकडे फॅशनचे ट्रेंड सिनेमा ठरवतो. 'लगे रहो मुन्नाभाई'सारखा एखादा सिनेमा जवळपास विस्मृतीत गेलेल्या गांधीजींचं लोकांच्या मनात पुनरुज्जीवन करतो. 'एक दुजे के लिये' बघून अनेक प्रेमी युगुलांनी आत्महत्या केल्या होत्या. सिनेमाचा एवढा सर्वांगीण प्रभाव असणारा समाज विरळाच. एकाच वेळेस आपल्या संवेदनशीलतेवर आणि सामाजिक भाबडेपणावर शिक्कोमार्तब करणारा.

आपल्याकडे काही वर्षांपूर्वी सिनेमा बघायला जाणं हा प्रकार कुठल्याही सोहळ्यापेक्षा वेगळा नसायचा. आजही त्यात फारसा फरक पडलेला नाही. सिनेमाइतकंच भारतीयांचं प्रेम खाण्यावर आहे. सिनेमा हा खऱ्या अर्थाने एन्जॉय करायचा असतो, तो काहीतरी खात खात, अशी लाखो -करोडो भारतीयांची श्रद्धा होती आणि आहे. आपल्या चित्रपटगृहांची स्वतःची अशी एक खाद्य संस्कृती आहे. रेल्वेची खाद्यसंस्कृती असते, सरकारी ऑफिसच्या कँटीनची खाद्यसंस्कृती असते तशीच ही चित्रपटगृहांची खाद्यसंस्कृती. भारतात सतत होणाऱ्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक बदलांचं प्रतिबिंब या खाद्यसंस्कृतीमध्ये पडत असतं. त्या अर्थाने ही खाद्यसंस्कृती स्थितीस्थापकतावादी नाही तर अतिशय प्रवाही आहे. सिनेमागृहातल्या या खाद्यसंस्कृतीचा आढावा घेणं हे एखादा ब्लॉकबस्टर सिनेमा बघण्याइतकंच मनोरंजक आहे. 

ऐंशी किंवा नव्वदच्या दशकात जन्म घेतलेली पिढी चित्रपटगृहांचं बदलतं स्वरूप आणि पर्यायाने त्यातल्या बदलत्या खाद्यसंस्कृतीची साक्षीदार आहे. मीही त्याच पिढीचा प्रतिनिधी. माझ्या आयुष्यातली सुरुवातीची बरीच वर्षं परभणीमध्ये गेली. परभणी हे जिल्ह्याचं ठिकाण असलं तरी ना ते धड शहर आहे, ना धड ग्रामीण भाग. परभणीला निमशहर म्हणणं अधिक योग्य ठरेल. परभणी हा जुन्या हैद्राबाद संस्थानाचा भाग होतं. तिथं मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे . याशिवाय प्रत्येक जातीचे लोक परभणीत गेल्या अनेक वर्षांपासून गुण्यागोविंदाने राहत आहेत. परभणीची सामाजिक पार्श्वभूमी सांगायचं कारण की, आमच्याकडच्या सिनेमागृहांमधल्या खाद्य संस्कृतीमध्ये याचं ठळक प्रतिबिंब पडलं आहे. त्या काळी मल्टिप्लेक्स नावाचा प्रकार अस्तित्वात आलेला नव्हत्या. थिएटरमध्ये जे खाद्यपदार्थ मिळायचे, त्यांच्यात फारसं वैविध्य नसायचं. समोसे, मुंगफली (आमच्या भाषेत फल्ली), गुळपापडी, खारे दाणे, सोडा, थम्स अप  असे मोजके पर्याय असायचे. अर्थात मी तुलना आजच्या काळाशी करत आहे म्हणून मोजके पर्याय असा शब्दप्रयोग करत आहे. त्यावेळेस हे पदार्थ बघूनही हरखून जायला व्हायचं. शिवाय हे पदार्थ त्यावेळेसच रूपयाचं 'मूल्य' लक्षात घेऊनही बरेच स्वस्त होते. पण सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे त्यावेळेस 'बाहेरून खाद्यपदार्थ आणण्याची परवानगी नाही' अशी उद्धट वाटणारी पाटी चित्रपटगृहाच्या बाहेर लावलेली नसायची. लोक खुशाल घरून डब्बे घेऊन जायचे. मध्यांतर झालं की एकाच वेळेस चित्रपटगृहात अनेक डब्बे उघडले जायचे. प्रत्येक जातीची आणि धर्माची खाद्यसंस्कृती त्या डब्ब्यांमध्ये बंद असायची. ते डब्बे उघडले की, घमघमाटाच्या स्वरूपात ती खाद्यसंस्कृती फसफसून बाहेर पडायची. या सगळ्या पदार्थांचा मिळून एक गंध विशिष्ट तयार व्हायचा. माझ्या सुरुवातीच्या चित्रपटांविषयीच्या आठवणी या गंधाशी निगडित आहेत. मी आजही मल्टिप्लेक्समध्ये हा नाव नसणारा गंध मिस करतो. 

मी पुण्यात जेव्हा शिक्षणासाठी आलो तेव्हा मल्टिप्लेक्स संस्कृती नुकतीच रांगायला लागली होती. मी मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा बघण्याच्या अनुभवावर बेहद खुश होतो. मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा बघणं हा माझ्यासाठी सांस्कृतिक धक्का होता. मोठा पडदा, मध्येच विजेचं गायब न होणं, स्वच्छ प्रसाधनगृह, अतिशय स्पष्ट ऐकू येणारा साउंड या गोष्टी छोट्या शहरातून आलेल्या माझ्यासाठी नवीन होत्या. माझ्यावर सिंगल स्क्रीन थिएटर्सचं बरंच ऋण आहे हे मान्य आहे, पण आज वयाची तिशी ओलांडल्यावर मल्टिप्लेक्स किंवा सिंगल स्क्रीन असा पर्याय दिला तर मी मल्टिप्लेक्स चित्रपटगृह निवडेल हे नक्की. मल्टिप्लेक्स चित्रपटगृह ही मला चित्रपट बघण्याचा परिपूर्ण अनुभव देतात. पण सध्याच्या मल्टिप्लेक्स चित्रपटगृहातल्या खाद्यसंस्कृतीशी मी जुळवून घेऊ शकत नाही हेही खरं. सर्वप्रथम म्हणजे याला माझा मध्यमवर्गीय स्वभाव (आर्थिकदृष्ट्या) कारणीभूत असावा. ऐंशी रुपयाचे समोसे, दोनशे रुपयाचे पॉपकॉर्न, सत्तर रुपयाचे कोल्ड्रिंक घेताना डावा मेंदू सतत कुरकुरत असतो.

मला मल्टिप्लेक्समध्ये मिळणारे पदार्थ बेचव वाटतात हे पण कबूल करायला हवं. अर्थात ही माझी वैयक्तिक आवड आहे. अजून कुणाला हे पदार्थ आवडू शकतात हे मान्यच आहे. हल्ली तर चित्रपटगृहात मिळणाऱ्या पदार्थांमध्ये कसलं वैविध्य असतं! अगदी पिझ्झा-बर्गरपासून ते फुल मिलही चित्रपटगृहांमध्ये उपलब्ध असतं. मेक्सिकन, थाई, लेबनीज पदार्थही मिळतात. नक्की आठवत नाही, पण काही चित्रपटगृहांमध्ये मद्यही मिळत असल्याचं कुठेतरी वाचलं होतं. १९९१ ला देशात आलेलं जागतिकीकरण आपण खाद्यसंस्कृतीच्या बाबतीतही सहजपणे अंगीकारलं आहे. मुख्य म्हणजे भरपूर पैसे देऊन हे पदार्थ मागवून खाणारा एक सुखवस्तू वर्ग तयार झाला  आहे. माझ्या वैयक्तिक आवडीनिवडींमुळे मी या वर्गात मोडत नाही. मी स्वतः मल्टिप्लेक्समध्ये काहीही विकत घेऊन खात नाही. पण हल्ली मल्टिप्लेक्समध्ये चित्रविचित्र आवाजात विविध खाद्यपदार्थ खाणारे लोक मला सिनेमा बघण्यातले अडथळे वाटतात. विशेषतः बाजूला कोणी पॉपकॉर्न खाणारा आला की, मी चित्रपटगृहात अजून कुठे रिकामी सीट आहे का हे शोधायला लागतो.

हल्ली तुमची ऑर्डर तुमच्या जागेवर आणून दिली जाते. ती ऑर्डर आणून देणारे लोक सतत ये-जा करत असतात आणि बाकीच्या लोकांना डिस्टर्ब् करत असतात असं वाटतं. मल्टिप्लेक्सच्या मालकांना या महागड्या खाद्यविक्रीच्या विक्रीमधून भरपूर उत्पन्न असतं. अनेक मल्टिप्लेक्सच्या स्टाफमध्ये हॉस्पॅलिटी इंडस्ट्रीचा पूर्वानुभव असणाऱ्या लोकांचा भरणा असतो. ‘बुक माय शो’वर तिकीट बुक करत असतानाच तुम्हाला अनेक खाद्यपदार्थांची कुपन खुणावायला लागतात. तिकीट खिडकीवर तिकीट देणारा तुम्हाला कुपन ऑफर करत असतो. अशा प्रकारे सतत त्यांच्या मार्केटिंगचा भडिमार तुमच्यावर होत असतो. 

माझं वैयक्तिक निरीक्षण आहे की, जशी प्रत्येक मंदिराच्या किंवा धार्मिक स्थळाच्या बाजूला त्यांची स्वतःची अशी एक अर्थव्यवस्था तयार होते, तसंच प्रत्येक चित्रपटगृहाचीही एक स्वतंत्र अर्थव्यवस्था तयार होत असते. त्या अर्थव्यवस्थेत चित्रपटगृहाच्या आजूबाजूला असणाऱ्या चहाच्या टपऱ्या, मिसळ, वडापाव सारखे पदार्थ मिळणारे छोटी हॉटेल्स, पानटपऱ्या यांचा समावेश असतो. मल्टिप्लेक्सच्या फूडकोर्ट्सपेक्षा या छोट्या-मोठ्या टपऱ्यांवरच जास्त गर्दी असते. या टपऱ्यांवर वाजवी किमतीत चविष्ट पदार्थ मिळतात. बहुतेक पब्लिक माझ्यासारखंच डाव्या मेंदूची कुरकुर ऐकणारं असावं. 

सध्याची कॉलेज गोइंग पिढी मात्र मस्त या इटालियन-थाई-लेबनीज पदार्थांचा आस्वाद घेत चित्रपट बघते तेव्हा मनात थोडी मत्सराची भावना जागृत होते, हे मला कबूल करावे लागेल. लहानपणी थिएटरमध्ये सिनेमा बघायला जाताना आई-बाबा काहीतरी खायला घेऊन देतील हे आकर्षण असायचं. मी जरी अट्टल खवय्या असलो तरी सध्या मात्र मी चित्रपटगृहात खाण्यापेक्षा चित्रपट बघायला जातो. वयानुसार प्राथमिकता बदलतात त्या अशा. उद्या जर मल्टिप्लेक्समधल्या खाद्यपदार्थांच्या किमती कमी झाल्या तर मी ते पदार्थ मी खायला लागेल का? बहुतेक नाही. हे पदार्थ खाणं सुरू करण्यापूर्वी मला त्या आमच्या परभणीमधल्या थिएटरमध्ये मध्यंतरात दरवाळणाऱ्या अनाम सुगंधातून बाहेर पडावं लागेल. आणि सतत कुरकुरणारा डावा मेंदू असेपर्यंत ते शक्य नाही. 

लेखक फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.

amoludgirkar@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......