अजूनकाही
बऱ्याच पुस्तकप्रेमी लोकांप्रमाणे मलाही पुस्तक विकत न घेता पुस्तकांच्या दुकानाबाहेर पडणं रुचत नाही. हल्लीच अमेरिकेत मी ‘इलियट बे बुक्स’ या उत्तम आणि स्वतंत्र अशा पुस्तकांच्या दुकानात गेलो होतो. तिथं बरीच उत्तमोत्तम पुस्तकं चाळण्यात कित्येक तास घालवूनही एकही पुस्तक माझ्या मनाजोगतं मिळेना. मग मी पुन्हा एकदा पाहिलं तेव्हा धार्मिक विभागात एक पुस्तक मला मिळालं आणि ते घेऊन दुकानाबाहेर पडताना (म्हणजे पैसे देऊन हं) मला समाधान वाटलं. त्या पुस्तकाचं नाव होतं, ‘बुद्धिझम इन अ डार्क एज : कंबोडियन मॉन्क्स अंडर पॉल पॉट’. त्या पुस्तकाचे लेखक इयान हॅरिस नामक एक ब्रिटिश अभ्यासक होते.
जगभरातील साम्यवादी सत्तांनी केवळ प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांचंच दमन करण्याचा प्रयत्न केला नाही तर त्यांनी धार्मिक संस्थांवरही घाव घातले. १९१७ साली बोल्शेविक क्रांती झाली. त्यानंतर लेनिन आणि स्टॅलिन यांनी, त्यांचे देशबांधव ज्या ऑर्थोडॉक्स चर्चला मानत होते, त्या चर्चचं महत्त्व कमी करण्याचा सातत्यानं प्रयत्न केला. हजारो धर्मोपदेशकांची हत्या करण्यात आली आणि चर्चच्या शेकडो मालमत्तांवर जप्ती आणण्यात आली. तथापि, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मन घुसखोरांपासून मातृभूमी रशियाचं संरक्षण करण्यासाठी ऑर्थोडॉक्स चर्चने योगदान द्यावं असं आवाहन करण्यात आलं, तेव्हा हे धोरण अंशतः उलटं फिरवण्यात आलं. परंतु युद्ध संपल्यावर मात्र पुन्हा एकदा संशय आणि शत्रुत्वाची प्रवृत्ती उफाळून आलीच.
चीनमध्ये १९४९ मध्ये साम्यवादी सत्तेत आले तेव्हा धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिकच शत्रुत्वाचा होता. माओ झेडोंगने हजारो चर्चेस, मंदिरं आणि मशिदी जाळण्यास आणि लुटण्यास परवानगी दिली. तिबेटमध्ये तर हे क्रौर्य अधिकच उफाळून आलं आणि तिथले कित्येक पुरातन, सुंदर मठ पाडून जमीनदोस्त करण्यात आले. संपूर्ण चीनमधील धर्मोपदेशकांना आणि भिक्षूंना जबरदस्तीने आपली धार्मिक वस्त्रं त्यागावी लागली आणि ब्रह्मचर्य सोडून विवाह करावे लागले. काही धर्मोपदेशकांचं तर चर्चमध्ये उभारलेल्या पिंजऱ्यांतून प्रदर्शन मांडलं गेलं. जिथं हे साम्यवादी नेते आणि त्यांचे हाताबाहेर गेलेले अनुयायी या धर्मोपदेशकांची छी:थू करायचे आणि टिंगल उडवायचे.
नागरिकांच्या विचारांवर आणि वर्तनावर आपलीच एकाधिकारशाही असली पाहिजे, त्यांनी आपण म्हणू तेच केलं पाहिजे या साम्यवादी इच्छेशी स्टॅलीन आणि माओ यांच्या या कृती सुसंगतच होत्या.
परंतु साम्यवादी निकष लावूनही कंबोडियातील ख्मेर रोश राजवटीचं वर्तन अमानुषच म्हणावं लागेल असं होतं. या देशातील बहुसंख्य नागरिक बौद्धधर्मीय होते. ख्मेर रोश राजवटीने १९७५ साली सत्ता हाती घेतल्यावर काही महिन्यातच कंबोडियातील जवळ जवळ सर्वच्या सर्व बौद्धमठ बंद पाडले, तिथले लोक एक तर ते मठ सोडून गेले किंवा मग ते नष्ट तरी केले गेले. पक्षाच्या एका दस्तावेजात त्याबद्दल बढाई मारलेली दिसते की, ‘९० ते ९५ टक्के भिक्षू गायबच झाले, याचा अर्थ त्यांनी धर्म सोडून दिला आहे. या भिक्षूंच्या दृष्टीने त्यांचे मठ हे मोठेच आधारस्तंभच होते. त्या मठांचाही लोकांनी त्याग केला आहे. अशा तऱ्हेने बौद्धधर्माच्या पायाभूत स्तभांचाच परित्याग झाला असल्यामुळे भविष्यात ते आणखी आणखी ढासळतील.’
१९७८ मध्ये पॉल पॉटच्या राजवटीतील ‘संस्कृती, माहिती आणि प्रचार’ मंत्र्यांनी भेटीला आलेल्या एका युगोस्लाव्ह पत्रकाराला मोठ्या गौरवानं सांगितलं होतं की, ‘बौद्ध धर्म मृत झाला आहे आणि नव्या क्रांतिकारक संस्कृतीचा पाया घालण्यासाठी त्यानं जागा करून दिली आहे.’
इयान हॅरिस यांच्या पुस्तकातून एका पुरातन धर्माचं आणि त्याच्या पारंपरिक प्रतिनिधींच्या झालेल्या दमनाचं दस्तावेजीकरण झालेलं आहे. अशा तऱ्हेनं बौद्ध भिक्षूंच्या अंगावरील वस्त्रं जबरदस्तीनं उतरवली गेली. त्यातील काही लोकांनी तीस-चाळीस वर्षं ती संन्याशाची वस्त्रं परिधान केली होती, त्या वस्त्रांशिवायच्या जीवनाची कल्पनाही ते सहन करू शकत नव्हते. त्यांना आणखी अवमानित करण्यासाठी साम्यवादी पक्षाचे अनुयायी आपल्या पक्षाच्या या ‘दुष्मनांच्या’ कपड्यांचा जमिनीवर ढीग करायचे आणि त्यावर मूत्रविसर्जन करायचे. ज्या भिक्षूंनी वस्त्रं उतरवायला नकार दिला त्यांना मृत्युदंड देण्यात आला.
संन्याशाची वस्त्रं उतरवून घेतल्यावर कंबोडियातील या माजी भिक्षूंना जबरदस्तीनं शेतमजुरी करण्यास जुंपण्यात आलं. अभ्यास, ध्यानधारणा आणि उपदेशन यांची सवय असलेल्या आणि त्यातलंच प्रशिक्षण मिळालेल्या या भिक्षूंना भाताची शेतं नांगरायला आणि गुरं हाकायला लावण्यात आलं. बौद्ध परंपरांनुसार भिक्षूंनी पशुहत्या करायची नसते, परंतु त्यांचा अवमान आणि छळ करण्यासाठीच कंबोडियन साम्यवाद्यांनी त्यांना गाई आणि कोंबड्या मारण्याचा हुकुम दिला. म्हाताऱ्या भिक्षूंना टोपल्या विणण्याच्या किंवा शेतातून पाखरांना हाकलण्याच्या कामी लावण्यात आलं. काही भागांत तर भिक्षूंपुढे दोनच पर्याय ठेवण्यात आले. ते दोन्ही पर्याय त्यांच्यासाठी सारखेच नवे होते आणि त्यांच्या भिक्षूपणाचा अवमान करणारे होते. एक पर्याय होता- सैन्यात भरती व्हा आणि दुसरा पर्याय होता- लग्न करा.
ज्या ठिकाणी हे भिक्षू जुन्या काळापासून राहात आले होते आणि जपजाप्य करत आले होते, त्या ठिकाणांचीही त्याच निष्ठूरपणे वाताहत केली गेली. काही पॅगोडांचं रूपांतर कचेऱ्यांत आणि गोदामांत करण्यात आलं, तर काहींना जमीनदोस्त केलं गेलं. जे पॅगोडा साम्यवाद्यांनी तोडले त्यांच्या विटा वापरून घरं, पूल आणि तत्सम बांधकाम करण्यात आलं. हॅरिसनं एका माजी साम्यवाद्याची मुलाखत घेतली. त्यात त्यानं सांगितलं की, ‘बौद्ध धर्मस्थळं आणि मठांचा विध्वंस करण्यामागे दोन मुख्य उद्देश होते, ते म्हणजे नव्या बांधकामासाठी साहित्य मिळवणं आणि दुसरं म्हणजे बौद्ध धर्माची एके काळी कंबोडियामध्ये भरभराट झाली होती हे भावी पिढ्यांना कळता कामा नये असा बंदोबस्त करणे.’
अशा तऱ्हेची पद्धतशीर गांजणुक होऊनही बऱ्याच भिक्षूंनी आपल्या धर्माचं पालन करणं सोडलं नाही. लपूनछपून ध्यानधारणा करून ज्या समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी एवढी वर्षं प्रार्थना केली, ते कार्य ते करतच राहिले. अनेक खेडुतांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना मदत केली. हॅरिस यांनी एक असामान्य घटनाही नोंदून ठेवली आहे. ती म्हणजे एक भिक्षू एका शवपेटिकेतच लपून राहिला होता. गावकरी त्याच्यासाठी रात्रीच्या वेळेस अन्नपाणी घेऊन यायचे आणि हलक्या हाताने शवपेटीवर थाप मारायचे.
स्टॅलीन आणि माओ हे आधुनिक इतिहासातील तीन सर्वांत मोठ्या नरसंहारकांपैकी दोन आहेत. (या गटातला हिटलर तिसरा) तथापि, खेम रोश राजवटीचा नेता पॉल पॉट यानं ज्या क्रूरतेनं धर्मस्थळं उद्ध्वस्त केली आणि धर्मोपदेशकांना हाल हाल करून ठार मारले ते पाहता त्याने हिंस्त्रपणात या तीन नरराक्षसांनाही मागं टाकलं असंच म्हणावं लागेल. झाल्या प्रकारात एक म्हणजे त्याच्या स्वतःच्या भ्रमिष्ट व्यक्तित्वाचा हात होता. दुसरं म्हणजे क्रांतीपूर्व रशियात ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन धर्माचा किंवा क्रांतीपूर्व चीनमध्ये बौद्ध धर्म/ ताओ धर्म यांचा एवढा पगडा नव्हता. परंतु साम्यवादपूर्व कंबोडियात मात्र समाज, राजकारण आणि संस्कृती या तिन्ही क्षेत्रांत बौद्ध धर्म अधिक महत्त्वाची भूमिका बजावत होता.
१९७९ साली पॉल पॉटची राजवट कोसळली आणि जी राजवट तिच्या बदली आली ती हुकूमशाही असली तरी धर्माच्या एवढी विरोधात नव्हती. या नव्या मंडळींनी बौद्धधर्माची मार्क्सवादाशी सांगड घालण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ भिक्षूंना पुन्हा आपली आध्यात्मिक शिस्त पाळता येणार होती, त्यांचे मठ आणि मंदिरं चालवता येणार होती, पुन्हा बांधताही येणार होती आणि सामान्य लोकांना धर्मोपदेश करता येणार होता. मात्र राजकीय विषयांवर बोलण्याची त्यांना बंदी होती. त्या नंतरच्या दशकांत कंबोडियातील बौद्ध धर्माची समूळ उच्चाटनापासून ते थोड्याबहुत मूळ स्वरूपापर्यंत येण्याची प्रगती झाली.
इयान हॅरिस लिखित कंबोडियातील बौद्ध धर्माच्या विनाशावरचं हे पुस्तक माहितीपूर्ण असलं तरी अंगावर शहारे आणणारे आहे. धार्मिक छळणूक ही सर्वसाधारणपणे धार्मिक लोकांचंच कृत्य असते. प्रोटेस्टंट लोकांनी कॅथलिक लोकांचा किंवा त्यांनी यांचा छळ करणं, मुसलमानांनी ख्रिश्चनांचा किंवा त्यांनी यांचा छळ करणं असं घडतं. परंतु ‘नास्तिक’ साम्यवाद्यांनीही अन्य लोकांप्रमाणे हा छळवाद पूर्णत्वाने तडीस नेलेला दिसतो. विरुद्ध विचारसरणीच्या लोकांना कसं वागवायचं हा प्रश्न आला की, धार्मिक मूलतत्ववाद्यांएवढेच साम्यवादीही क्रूर आणि निर्दय होतात.
हे चांगलं पण अस्वस्थ करणारं पुस्तक वाचल्यावर भांडवलवाद आणि साम्यवाद यातील महत्त्वाचा फरक काय याविषयी शीतयुद्धाच्या सुरुवातीला निर्माण झालेल्या या विनोदाची मला आठवण झाली, “भांडवलवादात माणूस माणसाचं शोषण करतो आणि साम्यवादात याच्या बरोब्बर उलटं घडतं.’’
मराठी अनुवाद - सविता दामले
savitadamle@rediffmail.com
……………………………………………………………………………………………
हा मूळ लेख ‘हिंदुस्थान टाइम्स’ या इंग्रजी दैनिकात ६ मे २०१७ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पुढील लिंकवर क्लिक करा -
……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment