सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात, ११ एप्रिल २०१७ रोजी म.फुले यांच्या जयंतीनिमित्त केलेले भाषण ...
……………………………………………………………………………………………
म.फुले यांच्या विचारांविषयी व कार्याविषयी इतके काही लिहिले-बोलले गेले आहे की, कोणत्याही वक्त्यासमोर ‘आता नव्याने काय सांगायचे’ असा प्रश्न असतोच, तसा तो माझ्यासमोरही होता. म्हणून मी या कार्यक्रमासाठी येण्याचे निमंत्रण स्वीकारल्यावर विद्यापीठाशी संबंधित दोन मित्रांना विचारले होते की, या भाषणात काय बोलावे? त्यापैकी किशोर (रक्ताटे) हा आमचा तरुण मित्र म्हणाला की, कार्यक्रम म.फुले यांच्या जयंतीचा असला तरी त्यांच्याविषयीच बोलले पाहिजे असे नाही, म.फुले यांना अभिप्रेत असलेल्या कोणत्याही विषयावर बोलले तरी चालू शकेल. या विद्यापीठातच प्राध्यापक असलेले आमचे ज्येष्ठ मित्र डॉ. मनोहर जाधव यांना विचारले तर ते म्हणाले, म. फुले यांच्या विचारांचा व कार्याचा आजच्या काळाशी संबंध काय आहे हे सांगता आले तर श्रोत्यांना ते आवडेल. आणि काही वेळापूर्वी इथे आल्यावर संयोजकांपैकी दोन मान्यवरांना विचारले तर त्यांनी सांगितले, शिक्षण आणि स्त्रियांशी संबंधित सुधारणा या विषयावर बोललात तर बरे होईल.
मित्रहो, वरील तिन्ही प्रतिक्रिया लक्षात घेऊन, त्यांचे मिश्रण नाही तर संयुग करून छोटेसे भाषण मी करणार आहे. या भाषणात दोन इतिहासकारांना म.फुले कसे दिसले, याबाबत बोलणार आहे. त्यातून म.फुले यांच्या कार्याचे महत्त्व आणि कठीणत्व लक्षात येईल असे मला वाटते. त्यातील एक इतिहासकार म.फुले यांचा समकालीन म्हणावा असा आहे. आणि दुसरा इतिहासकार आपला (तुमचा माझा) समकालीन आहे. दोनही इतिहासकार महनीय आणि नामवंत आहेत. एक वि.का.राजवाडे आणि दुसरे रामचंद्र गुहा. या दोन इतिहासकारांनी विचारपूर्वक केलेल्या दोन याद्यांविषयी मी इथे थोड्या तपशीलांसह सांगणार आहे.
प्रथम राजवाडे यांच्याविषयी. वि.का.राजवाडे यांनी ‘महाराष्ट्रातील बुद्धिवान, प्रतिभावान व कर्त्या व्यक्तींची मोजदाद’ या शीर्षकाचा निबंध १९१३ मध्ये लिहिला होता. त्या निबंधात त्याआधीच्या शंभर वर्षांतील बुद्धिवान, प्रतिभावान व कर्त्या महाराष्ट्रीय लोकांची मोजदाद केलेली होती. केवळ बुद्धिवान व प्रतिभावान नाही तर तो माणूस कर्ताही असला पाहिजे, म्हणजे त्याच्या विचारांचा प्रभाव व परिणाम समाजावर झालेला असला पाहिजे. आणि केवळ कर्तबगार नाही तर त्याचे विचारही समाजमनाला कलाटणी देणारे, नवी दृष्टी देणारे असले पाहिजेत, असा दुहेरी निकष लावून राजवाड्यांनी त्याआधीच्या शंभर वर्षांतील महाराष्ट्रीय लोकांच्या कामगिरीचा विचार केला होता. त्यातून त्यांनी १५० लोकांची यादी तयार केली होती. राजकारण, समाजकारण, साहित्य, संस्कृती या क्षेत्रांतील ते लोक होते. त्या १५० च्या यादीला गाळणी लावून राजवाड्यांनी ४३ व्यक्तींची यादी केली होती आणि त्यांना ‘सार्वकालीन श्रेष्ठ’ असे संबोधले होते. आणि अखेरीस त्या ४३ मधूनही सात व्यक्तींची एक यादी केली होती, त्याला त्यांनी ‘कालातित’ संबोधले होते. त्या १५० व ४३ लोकांच्या याद्या मी इथे वाचून दाखवणार नाही, त्या याद्या तुम्ही त्या निबंधातून पाहू शकता. पण शेवटची सात लोकांची जी यादी आहे त्यातील नावे सांगतो : न्यायमूर्ती रानडे, सयाजीराव गायकवाड, विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले, शं.बा.दीक्षित आणि अण्णासाहेब किर्लोस्कर. या सात जणांच्या यादीपैकी पाच नावे आजही आपणाला महत्त्वाचीच वाटतात, पण दीक्षित हे ज्योतिर्विद्या क्षेत्रातील आणि किर्लोस्कर हे नाटकाच्या क्षेत्रातील त्या काळचे दिग्गज आता बऱ्यापैकी विस्मरणात गेलेले आहेत.
तर मित्रांनो, राजवाड्यांचा तो निबंध व १५० व्यक्तींची ती यादी समोर ठेवून सात-आठ वर्षांपूर्वी पुण्यातील श्री गंधर्ववेद प्रकाशन संस्थेने एक प्रकल्प हाती घेतला होता. इ.स.२०१० मध्ये संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापनेला ५० वर्षे पूर्ण होणार होती, म्हणून ५० व्यक्तींचे चारित्रग्रंथ लिहिण्याचा तो प्रकल्प होता. त्यासाठी, राजवाड्यांच्या यादीतून आजही महत्त्वाचे ठरतात अशा एकोणिसाव्या शतकातील २५ व्यक्ती आणि राजवाड्यांचे निकष वापरून विसाव्या शतकातील २५ व्यक्ती निवडायच्या होत्या. याचाच अर्थ, पेशवाईची अखेर झाली व मराठी राज्य संपुष्टात आले ते १८१८ हे वर्ष ते संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापनेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष (२०१०) असा तो जवळपास दोनशे वर्षांचा कालखंड. म्हणजे १८१८१ ते १९१३ हे पहिले शतक आणि दुसरे जागतिक महायुद्ध सुरू झाल्यानंतरचे १९१४ ते २०१० हे दुसरे शतक.
तर पहिल्या शतकातील बुद्धिवान, प्रतिभावान व कर्त्या व्यक्तींची जी यादी राजवाड्यांनी केली होती, त्यातून चरित्रग्रंथ संच प्रकल्पासाठी २५ व्यक्तींची निवड करण्यासाठी, त्या प्रकाशनसंस्थेने दहा-बारा लोकांचे संपादक मंडळ नियुक्त केले होते. आणि त्याच संपादक मंडळाने विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी बोलून दुसऱ्या शतकातील २५ व्यक्तींची निवड चरित्रग्रंथ संच प्रकल्पासाठी करावयाची, असे ठरले होते. तो प्रकल्प अरुण टिकेकर, द.ना.धनागरे व प्र.ना.परांजपे या तीन अभ्यासकांच्या संपादकत्वाखाली मार्गी लागणार होता, त्यांना तीन-चार सल्लागार संपादक व तीन-चार सहाय्यक संपादक अशी ती रचना होती. (त्या प्रकल्पात काही काळ सहाय्यक संपादक म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली होती.)
त्या प्रकल्पासाठी संपादक मंडळाच्या ज्या काही बैठका झाल्या, त्यातून सुरुवातीलाच हे स्पष्ट झाले की, राजवाड्यांनी केलेल्या १५० व्यक्तींच्या यादीमध्ये अशी काही नावे आहेत, जी आजच्या काळात फारशी माहीत नाहीत किंवा काळाच्या कसोटीवर त्यांच्या कार्याचे व विचारांचे महत्त्व कमी झालेले आहे. परंतु एक प्रश्न असा उपस्थित झाला की, एकोणिसाव्या शतकातील अशी एखादी व्यक्ती आहे का, जिचे आज विशेष महत्त्व आहे, पण राजवाड्यांच्या त्या यादीत नाव नाही? आणि काय आश्चर्य आहे पहा, असे एक नाव सापडले- महात्मा जोतिबा फुले.
मित्रांनो, आजच्या काळात कोणालाही धक्का बसावा असाच हा प्रकार आहे. राजवाड्यांच्या यादीतून हे नाव सुटलेच कसे, असा प्रश्न पडतो. याची तीन संभाव्य कारणे पुढे येतात. एक- ही चूक अनवधानाने झाली, दोन- ही चूक आकसातून झाली, तीन- ही चूक आकलनाच्या अभावातून झाली. या तीनपैकी कोणती शक्यता खरी मानायची?
राजवाड्यांनी तो निबंध १९१३ मध्ये लिहिला. राजवाड्यांचा जन्म १८६३ चा आणि मृत्यू १९२६ मध्ये झाला. म्हणजे तो निबंध लिहिला तेव्हा राजवाड्यांचे वय ५० वर्षे होते आणि निबंध लिहिल्यानंतर १३ वर्षे ते जिवंत होते. म्हणजेच प्रौढ व प्रगल्भ अवस्थेत ती यादी त्यांनी केलेली होती आणि नंतरच्या १३ वर्षांतही त्या यादीत बदल केलेला दिसत नाही, याचाच अर्थ राजवाड्यांकडून ती चूक अनवधानाने झालेली नाही.
आता दुसरी शक्यता- आकस. हे खरे आहे की, राजवाड्यांचे काही अभिमानबिंदू अहंकार म्हणावे असे होते, ज्ञानाचा जास्तीच ताठा त्यांच्याकडे होता, भाषिक अस्मितेचा अतिरिक्त बाणाही त्यांच्याकडे होता. आणखीही इतर काय काय आक्षेप घेता येतील. परंतु राजवाड्यांसारखा इतिहासकार केवळ अभिमान वा अहंकाराला बळी पडून ज्योतिबांचे नाव त्या यादीतून वगळेल असे अनेकांप्रमाणे मलाही वाटत नाही. कारण राजवाड्यांमध्ये तो निबंध लिहिण्याची व ती यादी तयार करण्याची ऊर्मी, त्यापूर्वी ब्रिटनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका सर्वेक्षणावरून आलेली होती. त्यामुळे ज्ञानाचा ताठा असलेला तो माणूस इतरांच्या गुणवत्तेचे मोजमाप करताना क्षुद्रपणा दाखवून स्वत:ची विश्वासार्हता पणाला लावण्याची शक्यता कमी आहे. शिवाय, भावी इतिहासकार आपली गणना कशात करतील, याचे पुरेपूर भान त्या इतिहासाचार्याला असणारच. त्यामुळे आकसातून ती चूक घडलेली नाही, असा निष्कर्ष मी काढतो. अर्थातच हा निष्कर्ष अनेक थोरा-मोठ्यांना मान्य होणार नाही, म्हणून पुरावासदृश्य काही तपशीलांकडे लक्ष वेधतो.
म.फुले यांचा मृत्यू १८९० मध्ये झाला. म्हणजे राजवाड्यांनी ती यादी तयार केली तेव्हा ज्योतिबांचा मृत्यू होऊन २३ वर्षे झाली होती आणि त्यानंतर १३ वर्षांनी राजवाड्यांचा मृत्यू झाला. म्हणजे ज्योतिबांच्या मृत्यूनंतर ३६ वर्षे राजवाड्यांच्या मनातील आकस टिकला असे क्षणभर मान्य करू या. पण ज्योतिबांची ओळख त्यांच्या मृत्यूनंतर पन्नास-साठ वर्षे महाराष्ट्रातील एका छोट्या प्रवाहाचे सुधारक अशीच होती, हे तर सर्वांनाच माहीत आहे. १९५० च्या दरम्यान धनंजय कीर व स.गं. मालशे या अभ्यासक-संशोधकांनी म.फुले यांची पुस्तके व अन्य लेखन प्रयत्नपूर्वक मिळवून, समग्र म.फुले वाङ्मय प्रकाशित केले. दरम्यान, स्वातंत्र्यानंतर बहुजन समाजातील तळागाळातील जनतेपर्यंत शिक्षणप्रसार होऊ लागला आणि राजकीय सत्तेतही बहुजन समाजाचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढत गेला. नंतर बहुजन समाजाकडून आपले आयकॉन्स किंवा आयडॉल्स शोधणे साहजिकपणे घडून आले. आणि मग ज्योतिबांच्या विचारांचे व कार्याचे महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवू लागले. मग त्या काळाचे अधिक उत्खनन होत राहिले, परिणामी ज्योतिबांचे खरे मोठेपण प्रतिबिंबित होऊ लागले. त्यानंतर १९९० मध्ये ज्योतिबांची मृत्यूशताब्दी व १९९१ मध्ये आंबेडकरांची जन्मशताब्दी असा योग जुळून आला. त्यामुळे या दोघांचेही समग्र लेखन इंग्रजी भाषेतही मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होऊ लागले. त्याचदरम्यान आरक्षण पर्व आणि उदारीकरण पर्व अवतरले. आणि मग पुढील २५ वर्षांत म.फुले हे राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासकांपर्यंत पोहोचले.
म्हणजे १८९० मध्ये मृत्यू झालेल्या म.फुले यांचे खरे स्थान आपल्या देशाने आणि अर्थातच महाराष्ट्रानेही १९९० नंतर म्हणजे शंभर वर्षांनी दिले. याचाच अर्थ, फुले यांच्या कामाचे महत्त्व किंवा त्यांचे द्रष्टेपण त्यांच्या समकालीनांना आणि त्यांच्यानंतरच्या पन्नास-साठ वर्षांतील पिढ्यांनाही पुरेसे कळलेले नव्हते. आणि म्हणूनच, राजवाड्यांचेही आकलन त्या बाबतीत कमी पडले हा निष्कर्ष रॅशनल म्हणावा लागतो.
मित्रहो, आता रामचंद्र गुहा या इतिहासकाराच्या एका प्रकल्पाबाबत सांगतो. भारतीय प्रजासत्ताकाला ६० वर्षे पूर्ण झाली तेव्हा म्हणजे २०१० मध्ये गुहा यांचे ‘मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया’ हे संपादित इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध झाले. ‘आधुनिक भारत’ म्हणताना गुहांच्या मनात एकोणिसाव्या व विसाव्या याच दोन शतकांतील आपला देश आहे. आणि या दोनशे वर्षातील राजकीय व सामाजिक क्षेत्रांतील १९ व्यक्तींचा समावेश त्यांनी त्या पुस्तकात केला आहे. त्यासाठी त्यांनी दोन प्रमुख निकष लावले आहेत. एक ज्यांच्या विचारांचे प्रतिबिंब भारताच्या संविधानात दिसते. दोन- ज्यांचे विचार आजच्या भारतालाही पुढे घेऊन जाण्यासाठी उपयुक्त आहेत. अर्थातच या दोन निकषांवरही बरीच नावे पुढे येतात. परंतु आणखी काही निकषांची गाळणी लावून गुहा यांनी तीच १९ नावे का निवडली याचे स्पष्टीकरण, त्या पुस्तकाच्या दीर्घ प्रस्तावनेत आले आहे.
गुहा यांनी त्या प्रस्तावनेत असेही म्हटले आहे की, सामाजिक व राजकीय सुधारणांचे सर्वांत जास्त व सर्वाधिक बळकट प्रवाह बंगाल व महाराष्ट्र या दोन प्रांतामध्ये वाहत राहिले आहेत. त्यामुळे त्या १९ व्यक्तींमध्ये सहा व्यक्ती महाराष्ट्रातील आल्या आहेत : म.फुले, लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ताराबाई शिंदे आणि हमीद दलवाई. या सहापैकी चार नावे निर्विवाद मान्य आहेत असेच सर्व लोक म्हणतील, पण ताराबाई व हमीदभाई या दोन नावांच्या बाबतीत मात्र अनेकांच्या भुवया उंचावतील. आणखी विशेष हे आहे की, ताराबाईंचा समावेश त्यांच्या ‘स्त्रीपुरुषतुलना’ या एकमेव पुस्तकाच्या किंवा खरे तर एका दीर्घ निबंधाच्या बळावर केलेला आहे. आणि दलवाईंचा समावेश त्यांच्या ‘मुस्लिम पॉलिटिक्स इन इंडिया’ या एका पुस्तकाच्या बळावर केला गेला आहे. (अर्थात, ही दोनही पुस्तके इंग्रजीत अनुवादित झाली नसती तर हे घडून आलेच नसते हे उघड आहे, म्हणजे उपलब्ध असणे हा घटक इतिहास लेखनात किती महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो, हे यावरून लक्षात येईल.) गुहा यांनी त्या पुस्तकात कालानुक्रमानुसार पहिल्या क्रमांकावर राजा राममोहन रॉय यांना घेतले आहे, प्रबोधनयुगाचा प्रवर्तक म्हणून. तर शेवटच्या (१९ व्या) क्रमांकावर हमीद दलवाई यांना घेतले आहे, द लास्ट मॉडर्निस्ट म्हणून.
त्या पुस्तकातील अधिक तपशील इथे सांगण्याचे कारण नाही. पण त्या १९ व्यक्तींमध्ये सहा महाराष्ट्रातील आहेत. त्या सहाजणांचे दोन प्रवाहात विभाजन करता येईल. टिळक व गोखले हा एक प्रवाह. आणि म.फुले, डॉ. आंबेडकर, ताराबाई शिंदे व हमीद दलवाई हा दुसरा प्रवाह (मर्यादित अर्थाने आपण पहिल्याला राजकीय तर दुसऱ्याला सामाजिक प्रवाह म्हणू शकतो). खरी गंमत पुढे आहे. डॉ. आंबेडकरांचे पूर्वसुरी म्हणून म.फुले यांचे स्थान सर्वांनी मान्य केलेले आहे. ताराबाई शिंदे यांचा ‘तो’ निबंध व त्यांचे विचार यांच्यावर म.फुले यांचाच प्रभाव होता, हेही आता सर्वांना माहीत झाले आहे. आणि हमीद दलवाई यांनी ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळ’ या नावातूनच ज्योतिबांशी असलले नाते सांगितले आहे. हे पक्के धागे लक्षात घेतले तर गुहा यांच्या पुस्तकातील १९ जणांच्या यादीत, एकाच प्रवाहातील चार जण असे केवळ एकदाच घडले आहे. आणि त्यातही उल्लेखनीय हे आहे की, ज्योतिबा, डॉ.आंबेडकर, ताराबाई व दलवाई या चौघांनीही हाती घेतलेले कार्य मूलभूत आहे. त्यातील ताराबाई व दलवाई यांना अभिप्रेत असलेल्या अनुक्रमे स्त्री-पुरुष समता व मुस्लिम समाज सुधारणा या मार्गावरील खूप लांबचा प्रवास बाकी आहे.
या पार्श्वभूमीवर म.फुले यांच्याकडे पाहायला हवे. लक्षात घ्या, म.फुले यांचा जन्म १८२७ मध्ये झाला तेव्हा पेशवाईची अखेर होऊन जेमतेम आठ वर्षे झाली होती. इंग्रजी राजवट नीट स्थिरावली नव्हती. ज्योतिबांनी १८४८ मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली तेव्हा त्यांचे वय होते २१ वर्षे आणि सावित्रीबाईंचे वय होते १७ वर्षे. (त्याच वर्षी कार्ल-मार्क्सचा कम्युनिस्ट जाहीरनामा प्रसिद्ध झाला.) त्यानंतर ज्योतिबांनी १८५३ मध्ये अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केली, तेव्हा त्यांनी वयाची जेमतेम पंचविशी ओलांडली होती. (भारतात मुंबई-पुणे रेल्वे पहिल्यांदा त्या वर्षी धावली.) इ.स. १८५७ मध्ये राष्ट्रीय उठाव झाला आणि मग ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य संपुष्टात येऊन अधिकृतपणे ब्रिटनचे सरकार भारताचा राज्यकारभार पाहू लागले. त्याचवर्षी राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आणि त्यानुसार कलकत्ता, मुंबई व मद्रास या तीन ठिकाणी (अनुक्रमे १८५७, ५८, ५९ या तीन वर्षी) तीन विद्यापीठे स्थापन झाली. पण १८८३ पर्यंत मुंबई विद्यापीठात मुलींना ग्रॅज्युएट होता येईल की नाही, हा प्रश्नच चर्चेला आलेला नव्हता. १८८८ मध्ये कॉर्नेलिया सोराबजी नावाची पहिली महिला ग्रॅज्युएट मुंबई विद्यापीठातून बाहेर पडली. दरम्यान भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना १८८५ मध्ये झाली. म्हणजे देशाच्या संदर्भातील या सर्व महत्त्वाच्या प्रारंभघटनांच्या आधी दहा ते वीस वर्षे ज्योतिबांनी मुलींसाठी आणि अस्पृश्यांसाठी शाळा सुरू करण्याचे धाडस करून, दूरदृष्टीची चुणूक दाखवली होती.
एवढेच कशाला, टिळक-आगरकरांचा जन्म १८५६ मध्ये झाला, त्याच्या आठ वर्षे आधी मुलींच्या शिक्षणाची आणि तीन वर्षे आधी अस्पृश्यांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्योतिबांनी रोवली होती. आणि त्याहीपुढे जाऊन ज्योतिबांचे अलौकित्व आपल्या मनावर ठसवायचे असेल तर, हे लक्षात घेतले पाहिजे की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला त्याच्या एक वर्ष आधीच ज्योतिबांनी (अनेक सुमाजसुधारणांची पायाभरणी करून) आपली इहलोकीची यात्रा संपवली होती. हे इतके काळाचे तपशील देण्याचे कारण, कोणत्याही व्यक्तीचे मूल्यमापन अंतिमत: काळाच्या कसोटीवरच करावे लागते.
मित्रहो, ज्योतिबांची वैचारिक झेप किती मोठी होती, हे सांगण्यासाठी आणखी काही तपशीलांकडे आपले लक्ष वेधतो. लक्षात घ्या, १७८९ मध्ये झालेल्या फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये दिली. त्या फ्रेंच राज्यक्रांतीच्या प्रणेत्यांपैकी एक असलेल्या थॉमस पेन यांचा ज्योतिबांवर प्रभाव होता. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकनने काळ्या माणसांच्या हक्कांसाठी जो लढा दिला, त्या अब्राहम लिंकनला व त्या लढ्याला ज्योतिबांनी १८७३ मध्ये लिहिलेले ‘गुलामगिरी’ हे पुस्तक अर्पण केले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली त्या वर्षी (१८८५) ज्योतिबांनी ‘शेतकऱ्यांचा आसूड’ हे पुस्तक लिहिले आणि मृत्यूपूर्वी सार्वजनिक सत्यधर्माची मांडणी केली. स्त्रियांच्या संदर्भातील किती सुधारणांना (विधवा वा कुमारी मातांना आश्रय देण्यापासून नाभिकांचा संप घडवून आणण्यापर्यंत) त्यांनी हात घातला, हे आपल्याला बऱ्यापैकी माहीत आहे. आणि नारायण मेघाजी लोखंडे या कामगारनेत्याला ज्योतिबांपासून प्रेरणा मिळाली, हेही आपल्याला उशिरा का होईना माहीत झाले आहे. तळागाळातल्यांच्या शिक्षणाची हंटर कमिशनसमोर मांडलेली कैफियत असो किंवा ग्रंथकारांच्या संमेलनाकडे पाठ का फिरवतो आहे हे सांगणारे खणखणीत पत्र असो, अनेक सुधारणांचे उद्गाते म्हणून ज्योतिबांकडे पाहता येते. त्यामुळे, आजच्या सर्व पुरोगामी सामाजिक संस्थासंघटना, चळवळी-आंदोलने यांना ज्योतिबांचे विचार व त्यांचे नाव घेतल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. आणि म्हणूनच कदाचित, डॉ.नरेंद्र दाभोलकर त्यांच्या अनेक भाषणांत म.फुले यांचा उल्लेख ‘सुधारकांच्या विद्यापीठांचे कुलपती’ असा करीत असत. अशा या कुलपतीला विनम्र अभिवादन.
……………………………………………………………………………………………
लेखक विनोद शिरसाठ ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक आहेत.
vinod.shirsath@gmail.com
……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
rakesh shirole
Wed , 17 May 2017
राजवाड्यांचा जातीय अहंकार पुरेसा कुप्रसिद्ध आहे. शिरसाठ यांनी राजवाड्यांबद्दल 'रॅशनल' निष्कर्ष काढण्याचा आटापिटा करण्याच्या नादात काही किमान ऐतिहासिक संदर्भ लक्षात घेतलेले नाहीत, एवढे जाणवते आहे. राजवाड्यांची इतिहासकार म्हणून महत्ता मान्य करूनही त्यांच्यातील जातीय आकसाविषयी अनेकांनी लिहिलेले आहे. ते किमान चाळून मग बोलावे ही विनंती. फुले हे त्या काळी छोट्या प्रवाहाचे सुधारक होते, हाही अनैतिहासिक निष्कर्ष आहे. शिरसाठ यांना 'आश्चर्य वाटणे', 'धक्का बसणे' असे शब्दप्रयोग करून स्वतःच्या अपुऱ्या आकलनाला आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु असे अनैतिहासिक आकलन घातक आहे. असो.
shirish shitole
Fri , 12 May 2017
Vinodji balanced article. Putting truth in perspective. You have avoided temptation to move into any camp.