काश्मीर समजून घेताना... (भाग ३)
पडघम - देशकारण
राजा शिरगुप्पे
  • लेखक राजा शिरगुप्पे आणि काश्मीरचा नकाशा
  • Fri , 12 May 2017
  • पडघम देशकारण काश्मीर Kashmir काश्मिरी जनता Kashmiris राजा शिरगुप्पे Raja Shirguppe

लेखक राजा शिरगुप्पे यांनी तीन वर्षांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये फिरून, तेथील सर्वसामान्य माणसांशी बोलून लिहिलेल्या दीर्घ रिपोर्ताजचा हा तिसरा आणि शेवटचा भाग. या रिपोर्ताजमधून आपण ऐकून असलेल्या काश्मीरविषयीची बरीचशी नवी माहिती मिळेल...खऱ्याखुऱ्या काश्मीरला जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ताज मदत करू शकतो...

……………………………………………………………………………………………

सहा फुटांपेक्षा जास्त उंची असलेल्या शिडशिडीत बिलालने पठाणी पोशाखावर थंडीपासून बचाव करण्यासाठी काश्मिरी पेहरन घातली होती. आपण आता साठीच्या पुढे आहोत हे त्यानंच सांगितल्यामुळे विश्वास ठेवावा लागला, इतका तो ३०-४०च्या मधला वाटत होता. ती म्हातारी स्त्री म्हणजे त्याची आई. सगळ्याच नागरी समाजाने -अगदी त्याच्या सख्या नातेवाईकांनीही कायदा व सुव्यवस्थेला घाबरून या बहिष्कृत झालेल्या आणि विजनवासात ढकलल्या गेल्या मुलाला घेऊन राहत होती. बिलालच्या बैठकीच्या खोलीत, पूर्ण खोली भरून असलेल्या देखण्या, पण स्वस्त गालीच्यावर (बहुतेक काश्मीर घरात हा असा बैठकीची खोली भरून गालीचा असतोच. त्याच्या दर्जावरून घराची श्रीमंती समजून घ्यायची.) बसतोय न बसतोय तोच त्याच्या आईनं मग भरून ‘कावा’ आणि दोन उंच काचेचे ग्लास आणून ठेवले. माझ्यासमोर उकीडवा बसलेल्या बिलालने दोन्ही ग्लास भरले. तोवर मी साऱ्या खोलीभर नजर फिरवून घेतली. फर्निचर जवळपास नव्हतंच. फक्त एका कोपऱ्यात टीव्ही. मी बसलेल्या उजव्या बाजूला उंच काचेच्या तावदानाची अर्धी भिंतच फ्रेंच विंडो. चिनारचे एकदोन पानगळलेले वृक्ष आणि अर्धीअधिक पाण्याविना उघडीबोडकी वाटणारी पलीकडे झेलम. एकूण ‘उजडा हुआ चमन’चा फिल देणारं वातावरण.

 “खूप लौकर आलो नाही ना बिलालभाई?” संभाषणाला कुठून तरी सुरुवात करायची म्हणून माझा प्रश्न.

 “अरे भाई, सच बोलू तो मेरीही गलती है. मैं तुझे और जरा जल्दी बुलाता तो साथ खाना खाते. क्या माँ को बोलू लगाने?” मी कुठल्या आश्रमात आलोय की भयंकर मानल्या गेलेल्या एका दहशतवाद्याच्या घरी? चिमटा वगैरे नाही काढला मी स्वतःला पण हे सारंच मला अनपेक्षित.

 “नाही. माझं झालंय जेवण.” मी ‘कावा’चा ग्लास हातात घेतला. “काश्मीरमध्ये साधारण केव्हापासून सुरू झाली मिलिटन्सी.”

बिलालने आपले निळेशार शांत डोळे माझ्यावर रोखले. ‘कावा’चा एक घोट घेतला. मला आणखी साखर हवीय का विचारून मी नको म्हटल्यावर त्यानं आपली दृष्टी स्वतःच्या मेंदूत काहीतरी पहात असल्यासारखं एकाग्र केली. “साधारण १९८७ नंतरच म्हण ना. म्हणजे तोवर आमच्या मागण्यांसाठी आमची आंदोलनं, लढे तुम्ही म्हणता त्या संविधानिक, अहिंसात्मक पद्धतीने चाललेले होतेच. मीही एका कॉलेज विद्यार्थ्यांच्या युनियनमध्ये नेता म्हणून सक्रिय होतो. त्यामुळे अटक, तुरुंगवास, लाठीमार या साऱ्यांचा पुरेपूर अनुभव होताच. ८७ साली निवडणूक लागल्या असेंब्लीच्या. मग काश्मीरबरोबर केलेल्या कराराची दिल्लीनं पूर्तता करावी या मागण्या घेऊन काही गट निवडणुकीला उभे राहिले. त्यात आम्हीही होतो. पण हेच पक्ष मेजॉरिटीनं निवडून येणार हे लक्षात येताच दिल्लीच्या मदतीनं मतदान झालेलं असतानाही निवडणूका फ्रॉड ठरवल्या. रद्द केल्या. मग आमचा तुमच्या मतपेटीवरचा आणि तुमच्या लोकशाहीवरचा विश्वासही उडाला.” बिलालच्या सुंदर चेहऱ्यावर एक खंतरेषा अस्पष्ट उमटली.

 “पण तुम्ही तर थेट फुटीरतेच्याच मागण्या करत होता.”

 “मला नाही तसं वाटत राजाभाई! आम्ही आमच्या प्रश्नांसाठी चर्चा करू इच्छित होतो. आणि सत्तेत आलो असतो तर कदाचित मागण्यांची तीव्रता आणि क्रमही बदलला असता. पण तुम्ही तुमच्या निवडणूकाच आमच्या दृष्टीनं कुचकामी ठरवल्यावर शस्त्र हातात घेण्याशिवाय आमच्याकडे पर्यायच उरला नाही. लाल चौकातून निवडून आल्यात जमा असलेला सलाउद्दीन हिजबूल मुजाहिद्दीन का झाला? मग शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. पाकिस्तानच्या कब्जात असलेलं काश्मीर आमचा सहारा झाला.”

 “पाकिस्तान त्याला ‘आझाद काश्मीर’ म्हणतं.”

 “जसे तुम्ही, तसेच ते. लोण्याच्या गोळ्यावर टपलेले दोन बोके.” मला बिलालचा मघापासून मधाळ वाटणारा स्वर एकदम तिखट झाल्यासारखा वाटला उगाचच.

 “पण तुमच्या या आक्रमकतेत सामान्य जनता पोळली.”

 “हा एक तुमच्या लष्करानं आणि राजकारण्यांनी मीडियाच्या मदतीनं खास भारतीय जनतेसाठी पोसलेला भ्रम. मी स्वतः माझ्या संघटनेचं नेतृत्व केलंय. भारतीय पोलीस आणि लष्कराशी युद्ध केलंय. एक-दोन नव्हे, तब्बल अठरा वर्षं तुरुंगात सडलोय. गुरासारखा अमानुष मार खाल्लाय. आजही त्याचे परिणाम भोगतोय. पण माझ्या किंवा आमच्या कुणाच्याही बंदुकीतली एकही गोळी सामान्य माणसासाठी सुटलेली नाही हे अगदी अल्लाची शपथ घेऊन सांगतो. आमचं भांडण तुमच्या शासनाशी होतं आणि आहे. शासनाचं प्रतिनिधीत्व करत ज्या व्यक्ती आमच्यावर चालून आल्या, तेवढ्यांनाच आम्ही मारलं. एरवी जो काही सामान्य माणसांचा बळी गेला असं तुम्हाला सांगण्यात येतं, तो तुमच्या शासनाचाच कांगावा आहे. अशा फेक घटना घडवण्यासाठी त्यांचाच वाटा आहे, याचे पुरावे आहेत माझ्याकडे.” बिलालच्या आवाजातला त्वेष बहुधा वाढतोय.

 “पण आता म्हणजे दहा वर्षांपूर्वीच तुम्ही मिलिटन्सी सोडली आणि अहिंसक सत्याग्रही आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय.”

 “खरंय. म्हणजे पूर्वीही आम्ही हिंसाचाराचे समर्थक नव्हतो. १९७९ साली आम्ही, म्हणजे अमानुल्ला खान, मकबूल बट्ट माझ्या नेतृत्वाखाली जम्मू -काश्मीर लिबरेशन फ्रंटची लंडनमध्ये स्थापना केली ती आझाद काश्मीरसाठी. पास्किस्तान आणि भारत या दोघांपासून आम्ही स्वतंत्र आहोत आणि आजही तीच भूमिका आहे आमची.”

 “तुमच्या भूमिकेचा पाया धर्म होता की....”

 “कधीच नाही. आजही नाही. इस्लामिक स्टेट ही भूमिका घेऊन काही मिलिटंट संघटना उभ्या राहिल्या नंतर. त्यांना पुरस्कारायला मध्य आशियातील अमेरिकाविरोधी इस्लामिक संघटना म्हणजे तालिबानी, लष्कर-ए-तोयबा सारख्या अनेक संघटना सरसावल्या. पण आमचा या भूमिकेला कधीच पाठिंबा नव्हता. काश्मीरवर इथल्या मूलनिवासी मुसलमानांइतकाच हिंदू वा शीखांचाही हक्क आहे. यासीन मलिक आजही आमच्या पंडित भावा-बहिणींना आवाहन करतोय की, काश्मीर तुमचं आहे, काश्मीरमध्ये परत या. स्वातंत्र्याच्या आमच्या लढाईत सामील व्हा. खरं तर पंडितांनी काश्मीर सोडलं नसतं तर आज हा झालाय तेवढा गुंता झालाच नसता.”

मला एकदम आठवलं, हजरतबालला घेऊन जाणाऱ्या त्या तरुण टॅक्सी ड्रायव्हरच्या बोलण्यातही अगदी हेच शब्द होते.

 “अठरा वर्षांनी तुरुंगातून बाहेर पडल्यावर मी जी संघटना उभी केली, तिचं उद्दिष्टच मुळी शांततापूर्ण लढ्यानं स्वातंत्र्यप्राप्ती.”

 “पण मग पंडित तुमच्यात का सामील झाले नाहीत?”

 “धर्म ही अफूची गोळी आहे, असं तुमचा मार्क्स म्हणतो ना. भारत स्वतःला ‘सेक्युलर’ म्हणवत असला तरी तिथं ‘हिंदुझम’च प्रभावी आहे. जसं आमच्यातल्या काही वेडपट मुसलमानांना केवळ धर्मामुळे पाकिस्तान जवळचा वाटतो तसंच. शिवाय पंडितांचे जातीय-वर्गीय हितसंबंध हिंदुस्थानशीच जुळलेत असं त्यांना वाटत असावं.”

बिलाल आता वर्गीय भाषेत बोलत होता. राबियादेखील परवा प्रवासात हेच सांगत होती. पंडित हे काश्मीरमधले बडे जमीनदार. त्यांच्या शेतांवर राबणारी रयत म्हणजे मुस्लीम कष्टकरी. सांस्कृतिक आणि राजदरबारीही पंडितांचंच वजन. सत्ता आणि संपत्तीतून सहज येणारी मग्रुरी आणि सुखलोलुपता मग या उच्चवर्णीय-उच्चवर्गात येणं स्वाभाविक. त्यातून निर्माण होणाऱ्या छळ-छळणुकीतूनही वर्गीय दरी आणखी रूंदावत जाते. विकासाच्या साऱ्या संधी शोषक वर्गाच्या हातात तर दैन्याचे अबोल मानकरी वंचित जनताच. पूर्वाश्रमीचा कष्टकरी वर्ग केवळ सामाजिक समतेच्या आशेनं धर्मांतरित होणं सहजसाध्य. जे अवघ्या भारतभर घडलं, तेच काश्मीरमध्येही. अगदी बौद्ध धर्मात तयार झालेल्या काही विकृत परंपराही त्यातल्या वंचित वर्गाला मुसलमान व्हायला कारणीभूत झाल्या. कारण सुफी संतांनी या गांजलेल्यांना एक समतेचं आभासी का होईना स्वप्न दाखवलं.

“बिलालभाई, जरा उन दिनों के बारे में बताओ ना, जब तुम ‘टेररिष्ट’ थे और ‘अंडरग्राऊंड’ भी...” मी जरा हेतूतःच  टोकलं.

बिलालची नजर एकदम विझून शून्यात गेल्यासारखी झाली. ‘कावा’च्या ग्लासात खोलवर पाहत म्हणाला, “कशाला त्या भयानक दिवसांची आठवण काढायला लागतोस? जाऊ दे ना. पण एक सांगतो, उन दिनों आझाद काश्मीर जितना सच्चा सपना लगता था, उतना अब नही.” बिलाल खूपच खूप गंभीर झालाय आणि किंचित निराशही, असं वाटलं.

“मला एक सांग, एवढी शस्त्रं, दारूगोळा, बॉम्ब वगैरेसाठी तुम्ही पैसे कुठनं आणायचा? महत्त्वाचं म्हणजे भारतीय लष्कराला चुकवून ते तिकडून सीमापार कसं करायचा?” माझं सामान्य भारतीय नागरिक म्हणूना कुतूहल शमन सुरू झालं.

बिलालच्या समाधीस्थ गंभीर चेहऱ्यावर एकदम खट्याळ हसू पसरलं. “सारी पाकिस्तानी आणि भारतीय लष्कराची कृपा.”

“म्हणजे?” सामान्य माणसातलं नेहमीचं माझं बाळबोधपण.

“म्हणजे आम्हाला हवी असलेली सामग्री आम्हाला मिळायची. अगदी बिनबोभाट. मग ते आरएसआय देतंय की, थेट पाकिस्तान लष्कर की अमेरिका, याच्याशी आम्हांला काय देणं-घेणं? सीमेवर भारतीय लष्कराच्या चौकीवर ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांपैकी बरेच जण आमचे शत्रूमित्र झालेले. म्हणजे त्यांच्यासमोर थैल्या मोकळ्या केल्या की, आम्हाला रस्ता खुला. मी ‘शत्रूमित्र’ एवढ्यासाठीच म्हणतोय की, आम्हाला कधी मदत करायची आणि कधी खलास करायचं याचं बरोबर गणित असतं त्यांच्या डोक्यात. कदाचित आम्ही ज्याला ‘क्रांतिकारी’कृत्य समजायचो, तो त्यांच्या दृष्टीनं उंदीर-मांजरांचा खेळ असावा. अर्थात हे आता कळतंय.”

बिलालनं एका दमात एवढं सांगून कावाचा दीर्घ घोट घेतला. मग मगातला कावा पुन्हा आम्हा दोघांच्या ग्लासात काठोकाठ भरला. त्याच्या अम्माने थालीपीठाच्या आकाराची घरात बनवलेली काश्मिरी बिस्किटं भरलेली थाळी आणून ठेवली. ती घेण्याचा हातानंच इशारा करत म्हणाला, “आता स्वतंत्र काश्मीरवादी म्हणून जवळपास सव्वीस संघटना एकत्र येऊन आम्ही ‘हुरियत कॉन्फरन्स’ स्थापन केलीय, तुला माहीतच आहे. मौलाना मीरवाईज अध्यक्ष आहेत. जिलानी, यासीन मलिक इ. मंडळी त्याचं नेतृत्व करताहेत. अर्थात आमच्यातही मतभेद आहेतच. धर्मवादी आहेत, निधर्मी आहेत, पण काश्मीरच्या स्वातंत्र्याबद्दल एकमत. निवडणुकांवर बहिष्कार आणि अहिंसक सत्याग्रह हा कॉमन अजेंडा. तरीही दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणारे काही छुपे गटही आहेतच.”

मी बिस्कीट घेतलेलं नाही हे पाहून बिलालनं स्वतःच थाळीतलं एक बिस्कीट उचलून माझ्या हातात ठेवलं. बाहेरून सायंकाळच्या नमाजची बांग ऐकू आली. बिलालही माझ्याकडे पाहत म्हणाला, “माझी नमाजची वेळ झालीय राजा. अजून काही तुझे प्रश्न आहेत?” मी हसलो. मनात तर अजून खूप प्रश्न होते. पण वेळ बराच झाला होता. आणि बिलालही नमाजच्या तयारीत होता. बिलालकडे हसत पाहत म्हणालो, “भाई एक निजी सवाल पुछूँ?” बिलालने कुतूहलभरल्या गंभीर चेहऱ्यानं माझ्याकडे पाहत मानेनंच होकार दिला.

“भैया, आपने शादी की है की नहीं?”

“नहीं.”

“क्यू नहीं की?”

“जब लडकियाँ हमसे शादी करना चाहती थी, उस वक्त हमे वक्त नही, था. आणि आता खूप वेळ आहे माझ्याकडे, लेकिन अब कोई लडकीही नहीं?” बिलाल खो खो हसला. माझ्या खांद्यावर थोपटत म्हणाला, “राजा, ज्याचं लग्न ध्येयाशी होतं त्याला आणखी कुठल्या लग्नाची आवश्यकता असते का? आणि मी तर माझं लग्न त्या वयात बंदुकीशी लावलं होतं.”

मी जिना उतरून फाटकातून बाहेर पडेपर्यंत बिलाल दरवाजातून मला निरोपाचा हात हलवत होता. गुरूद्वारात आलो, तेव्हा रवी आणि त्याचा सगळा सहलीचा ग्रुप सोनमर्गहून परत आला होता. मी जेव्हा बिलालबरोबरच्या माझ्या बैठकीचा वृतान्त त्यांना सांगितला, तेव्हा महेश आणि रोहन माझ्यावर मनःपूर्वक खट्टू झाले. त्यांना एका अतिरेक्याला पाहण्याची, भेटण्याची संधी माझ्यामुळे गमवावी लागली या भावनेनं.

संध्याकाळी दालसरोवरावर सगळ्यांसमवेत फिरायला गेलो. महेश, रवी त्या नवपरिणीत जोडप्याबरोबर एका शिकाऱ्यात दालसरोवरांतून फिरण्यासाठी बसले. मी आणि रोहन दुसऱ्या एका छोट्या शिकाऱ्यात. भलं प्रचंड सरोवर. नावाड्यानं शिकारा वल्हवत सरोवरातून बराच आतवर नेल्यावर एका बाजूला पुन्हा एकदा शिकारावाल्यांची शिकाऱ्यांची झोपडपट्टी पाहायला मिळाली. म्हणजे अगदी दर्शनी भागात श्रीमंती शिकारे पर्यटकांना फिरण्यासाठी आणि राहण्यासाठी आकृष्ट करणारे तर आतल्या बाजूला गरीब पर्यटकांसाठी स्वस्तातली शिकारा चाळ. पाण्यावरच तरंगणारी शेती. रात्रीतल्या रात्रीत ही शेती कशी चोरीला जाते हेही तो शिकारावाला अनेक किस्से सांगत आमची करमणूक करत होता. शेजारून काश्मिरी कपडे घालून ‘फोटो काढून घ्या’ म्हणून आग्रह करणारे छायाचित्रकारांचे छोटे शिकारेही आमच्या शिकाऱ्यांना सोबत करत होते. मध्येच एका शिकारेवाल्यानं शिकाऱ्यात अंथरलेली चादर हळूच वर उचलून दाखवली. आत दारूच्या बाटल्यांचा ढीग. आमचा शिकारेवाला गालात हसत म्हणाला, “साहेब, श्रीनगरमध्ये आणि काश्मीरमध्येही दारू के लिए कानूनी पाबंदी नहीं है. लेकिन टेररिस्ट ऑर्गनायझेशन्स ने इस्लाम के खिलाफ है, इसलिए दारू के खिलाफ पाबंदी लगाई है. तो ऐसे चोरी से बिकते है लोग.” अर्थात आम्हाला त्या बाटल्यांशी काही कर्तव्य नसल्यामुळे बिचारा तो दारूचं दुकान असलेला शिकारा दुसऱ्या हौशी गिऱ्हाईकांकडे वळला. तलावात अशा वेगवेगळ्या वस्तू विकणारी फिरती दुकानं तर खूपच होती. एका नावेत दुकानदार तर दुसऱ्या नावेत गिऱ्हाईक. असं छान एरवी पाहायला न मिळणारं दृश्र अनुभवायला मिळत होतं.

सरोवराचा फेरफटका मारून आल्यावर सरोवराच्या कठड्यावर मी आणि रोहन भेळ खात बसलो. बाकीचे बाजारात काहीबाही खरेदी करण्यासाठी गेले. दोन सतरा-अठरा वर्षांची काश्मिरी मुलं माझ्याकडे कुतूहलानं पाहत उभी आहेत हे माझ्या लक्षात आलं. मीही त्यांना जवळ बोलावलं. नाव विचारलं. त्यातला एकजण मेडिकलच्या पहिल्या वर्षाला होता, तर दुसरा मेडिकलला जाण्यासाठी बारावीमध्ये शिकत होता. थोडं एकमेकांबद्दल माहितीची देवाणघेवाण झाल्यावर दोघेही खूप मोकळेपणानं बोलायला लागले. काश्मीरमधल्या तंग परिस्थितीचा आपल्या शिक्षणावर परिणाम होतोय. सततचे विविध संघटनांचे जाहीर होणारे बंद आणि उसळणारा हिंसाचार सदृश ‘पथराव’ या साऱ्यानेच आपण बेजारलोय, अशी त्यांची भावना होती. पथराव म्हणजे बंदच्या काळात होणारी सार्वजनिक मालमत्तेवर विशेषतः बस गाड्यांवर होणारी दगडफेक. बहुतेक वेळा ही दगडफेक करणारे १५-२० वयोगटांतील मुलंच असतात. आणि त्यांना दगडफेकीसाठी काही मेहनतानाही मिळतो, असं तो मेडिकलचा मुलगा सांगत होता. कधी काळी तोही अशा उत्साही मुलांच्या टोळक्यात सापडला होता. पण घरच्यांनी वेळीच त्याला त्यांच्या पद्धतीने सावध केल्यामुळे तो आता नीट मार्गाला लागलाय असंही त्यानं अभिमानानं सांगितलं.

“तुम्ही आता काश्मीरमधलं सगळ्यात तरुण जनरेशन आहात. आझाद काश्मीरपासून पाकिस्तानात विलिनीकरणापर्रंत अनेक प्रकारच्या भूमिका घेऊन इथं तुम्ही काश्मिरी लढता आहात. तुम्हाला काय वाटतं?” मी या कोवळ्या तरुणांचं मनोगत जाणून घेण्याच्या दृष्टीनं विचारलं.

“खरं सांगू सर, हम जो पाकिस्तान के बारे मे सुनते है, देखते है, आम्हांला पक्की खात्री झालीय की, यांचंच काही नीट नाही. आम्ही जर भारतापासून फुटून त्यांच्यात जाऊन मिसळायचं ठरवलं तर आगीतून उठून वणव्यात अशीच स्थिती होणार याबद्दल आमच्या पिढीला अगदीच खात्री झालीय. भारत आज आशियातलं महासत्ता म्हणण्याइतकं मोठं राष्ट्र आहे. आमची स्वायत्तता म्हणजे काश्मिरीयत कायम जर भारत ठेवणार असेल तर फेडरेशन म्हणून भारताबरोबर राहण्यास मला तरी काही प्रत्यवाय दिसत नाही. उलट चिनी ड्रॅगन आता आम्हाला गिळायच्या तयारीत आहे. याची चिन्हं दिसायला लागलीयत. खरी भीती आहे ती या चिनी सत्तेचीच. आणि आमचे आम्हीच केवळ चीनपासून स्वतःचा बचाव करण्याइतके नक्कीच सक्षम नाही.”

मीर मोकळेपणानं आपली समज माझ्यासमोर मांडत होता. तेवढ्यात आणखी दोन तरुण काहीसे रागानेच त्याच्याकडे बघत आणि काश्मिरी भाषेत जोरजोरात दरडावत आमच्याकडे आले. माझ्याकडे बोट दाखवत, काश्मिरी भाषेत मीरशी आणि हुसेनशी तंडू लागले. ५-१० मिनिटं त्यांची बाचाबाची अशी चालू राहिली मग दोघेही आले तसेच रागानं निघून गेले. मी मीरकडं काय चाललं होतं या प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. मीर मला खुलासा करत म्हणाला, “तुमच्याशी आम्ही का बोलतोय? या इंडियन लोकांशी तुम्ही कशाला संवाद करताय? म्हणून ते दोघं आमच्यावर चिडले होते. पण आम्हाही त्यांना सांगितलं, आम्ही काश्मिरी आहोत. आणि काश्मिरी हा कुणाशीही सभ्यतेनं आणि बंधूभावानंच वागतो. कुराण में भी यही सिख है. मग गेले. ”

मीर आणि हुसेन आम्हांला ‘खुदा हाफिज’ म्हणत निघून गेले. रोहनच्या चेहऱ्यावर थोडासा गोंधळ आणि तणाव दिसत होता. मी त्याच्या खांद्यावर थोपटत म्हटलं, “ही पिढी संतप्त आहे. आपल्या काश्मीरबाबतच्या आपमतलबी धोरणामुळे जर आपले राज्यकर्ते वेळीच सुधारले नाहीत तर हा संताप महास्फोट व्हायला कधीही वेळ लागणार नाही.” नंतर गुरुद्वाराकडे येईपर्यंत आम्ही कुणीच एक शब्दही आपापसातही बोललो नाही.

राबियाचा फोन आला. तौसिफ भेटायला येऊन थांबलाय. कालच तिनं सांगितलं होतं, हा बारामुल्लाचा तरुण आहे. सध्या श्रीनगरमध्येच राहतोय. पण खूप हुशार आणि विवेकी विचारांचा आहे. त्याने काश्मीर प्रश्नावर एवढ्या लहान वयात खूपच अभ्यास केलेला आहे. शिवाय बिजिंगपासून न्यूयॉर्कपर्यंत अत्यंत जबाबदारीनं व्याख्यानंही दिलेली आहेत. तुला नक्कीच आवडेल तो.

ऑफिसवर पोहचलो. राबियाच्या ऑफिसमध्ये एक छान देखणा, नुकतीच कोवळी दाढी फुटू लागलेला पण मोठ्या फ्रेमचा चष्मा घातल्यामुळे प्रौढ वाटणारा एक रुबाबदार तरुण बसला होता. बहुतेक राबियानं एकूण माझा हुलीया त्याला सांगून ठेवला असावा. कारण मला बघितल्या बघितल्या तो उठला. माझ्याशी हस्तांदोलन करत म्हणाला, “हाय राजा, मी तौसिफ. काश्मीरसाठीच्या तुझ्या अभ्यासदौऱ्याचं मी स्वागत करतो. बोल, काय हवीय माहिती तुला? मी माझ्या वकुबानं तुझ्या शंकांचं निरसन करायचा प्रयत्न करेन.” अर्थात हे सारं अतिशय सफाईदार आणि ओघवत्या इंग्रजीमध्ये.

राबिया समोरच होती म्हणून मी थेटच एक प्रश्न विचारला. “इथं येण्यापूर्वी अनेकांकडून ऐकत होतो की, पंडितांसाठी काश्मीरमध्ये खूपच दहशतीचं वातावरण आहे. हजारो पंडित मारले गेले.” तौसिफ आपल्या भल्या मोठा चष्म्यातून पटकन् माझ्याकडे डोळे टवकारून माझं बोलणं तोडत म्हणाला, “वेट राजा, किती म्हणालास? हजारो? सरकारी आकडा आहे- २७९. संशयासाठी आपण ३०० म्हणू. हे मारले गेलेले पंडित केवळ पंडित होते म्हणून मारले गेले की, आणखी काही कारणांमुळे? हेही तपासून घे. हे मारले गेलेले सारे पंडित सरकारी महत्त्वाचे अधिकारी, किंवा सरकारची दलाली करणारेच फक्त लोक होते. आणि काश्मीरमध्ये उभ्या राहिलेल्या सगळ्या मिलिटन्सी संघटनांचं शत्रूत्व भारत सरकारशी आणि त्यांचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या इथल्या शासनाशी आहे. मी मिलिटन्सीचं समर्थन करत नाही. हिंसाचार मलाही मान्य नाही. पण या बदल्यात कश्मिरी सामान्य माणूस जो बहुसंख्येनं मुस्लीम आहे. तो किती मारला गेला आहे याची कल्पना आहे तुला? लक्षात घे, हा आकडा जवळपास ८०,०००च्या वर आहे. शासनाचा दावा आहे की ४३,००० मेले. आणि त्यामध्ये २२,००० हे केवळ अतिरेकीच आहेत. एवढ्या संख्येनं जर अतिरेक्यांची संख्या असेल तर कश्मीर कधीच स्वतंत्र व्हायला हवा होता, पण ते जाऊ देत. नागरिक म्हणून जवळपास ११,००० लोक मेल्याचं ते सांगतात. आणि पोलीस दलातले व आर्मीतले मिळून दहा-बारा हजारांची संख्या सांगतात. मानवाधिकार आयोगानं या सगळ्याची पाहणी केली आहे. तपासणी केली आहे. आणि हे शासन सांगत असलेले आकडे किती खोटारडे आहेत हेही जाहीर केलं आहे. अफसाना नावाची माझी एक पत्रकार मैत्रीण आहे. तिने ‘हाफ विडोज्’ म्हणजे ज्यांचा पती जिवंत आहे की नाही, याची कल्पना नाही पण त्यांच्या नशिबी कायमचं विधवापण आलेलं आहे, अशा स्त्रियांचा अभ्यास केला आहे. एकट्या श्रीनगरमध्ये अशा २०,००० स्त्रिया आहेत, तर पुऱ्या काश्मीरमध्ये ही संख्या ७०,००० च्या पुढे जाते. म्हणजे लष्कराच्या गोळीला बळी पडलेल्या, पोलिसांनी उचलून नेलेल्या अशा पुरुषांच्या या विधवा आहेत. बारामुल्लामध्ये एक खेडं आहे, तुला दाखवतो चल. जिथं प्रत्येक घरातल्या स्त्रीवर तुमच्या सैनिकांनी अत्याचार केलेला आहे.” तौसिफच्या नाकपुड्या थरथरू लागल्या होत्या. एका दमात आकडेवारीसह तो माझ्यापुढे मला पुढचे प्रश्न विचारू न देताच सगळं सांगत सुटला.

“शांत हो तौसिफ मला तुझ्या भावना कळतात. पण म्हणून आपण अधिक शांतपणे या सगळ्याचा विचार केला पाहिजे. तू सांगितलेली आकडेवारी ही भारत सरकारनंच दिलेली आहे. त्यामुळे तिला खोटी म्हणण्यात काही अर्थच नाही. पण तरीही पंडितांच्या हत्येचं प्रमाण आणि सामान्य काश्मिरी जनतेची हत्या यांच्यातली ही तफावत फारच भयानक आहे हे नक्कीच. मी हे सगळं समजून घेण्यासाठीच सगळं काश्मीर फिरणार आहे, त्यासाठी तुही मला मदत करणार आहेस, हे ही नक्की. पण माझ्या या प्रवासाला आणि काश्मीरच्या आतल्या भागात जाऊन तिथला मानस समजून घेण्यापूर्वी या जटील वाटणाऱ्या काश्मीर प्रश्नाची सोडवणूक काय असू शकते असं तुला वाटतं हे मला समजून घ्यायचं आहे.” 

तौसिफ थोडासा शांत झाला. त्याच्या चेहऱ्यावर अकाली आलेला गंभीरपणा त्यानं पुन्हा एकदा धारण केला. माझा हात हातात घेत म्हणाला, “सॉरी राजा, पण काळजातल्या जखमा काय असतात हे तुझ्यासारख्याला सांगायला नको. इथं तो जगमोहन नावाचा गव्हर्नर होता ना, त्यानं केवळ मुस्लिमांची कत्तल करण्यासाठी एका रात्रीत वातावरण तयार करून सरकारी मदतीनं त्यांचं स्थलांतर घडवलं. दहशतीचं खोटं खोटं वातावरण तयार केलं. वस्तुस्थितीपेक्षा भ्रम पसरवला जातो आणि सत्याबद्दल गैरसमज तयार केले जातात हे जास्त वाईट. तू काश्मीर फिरणारच आहेस. मी काय म्हणतोय. माझ्यावर या क्षणी विश्वास ठेवू नकोस. तुझा अभ्यास संपला की मग सांग. पण एक सांगतो की, आम्ही काश्मिरी आहोत. काश्मिरीयत ही आमची स्वतंत्र ओळख आहे. ही स्वतंत्र ओळख म्हणजेच आमचं स्वातंत्र्य. आम्ही कुणाच्या छत्राखाली राहू इच्छित नाही. थेटच बोलायचं तर आम्हाला कुणाला गुलाम करायचं नाही आणि आम्हाला कुणी गुलाम करू नये. आमची थोर कवयित्री लालदेन तिच्या एका कवितेत म्हणते की, ‘माझं स्वातंत्र्य हे फक्त माझ्या शरीराचं नाही तर मनाचंही आहे. आणि मी जिथं राहते त्या घराचंही आहे.’ हीच आम्हा सर्व काश्मिरींची भावना आहे.  काश्मीर, भारत, पाकिस्तान, चीन, अफगानिस्तान या सगळ्याच आजूबाजूच्या राष्ट्रांसाठी आम्ही बफर राष्ट्र होऊ शकतो. कारण आम्ही हिंदूही नाही आणि मुसलमानही नाही. काश्मिरी हीच आमची एकमेव ओळख आहे. आणि भारताने १९४७ साली आमच्याशी जो करार केलाय, त्याची पूर्तता करावी एवढीच आमची प्रामाणिक मागणी आहे.”

मी तौफिकच्या खांद्यावर थोपटलं. राबिया आम्हां दोघांकडेही गंभीरपणे पाहत होती. माझ्या मनात एक भारतीय म्हणून आणि एक माणूस म्हणून काश्मीरच्या संदर्भात अनेक प्रश्नांचा डोंब आणि गोंधळ उसळला आहे. एका भेटीत काश्मीर समजून घेणं सोपं नाही. पुन्हा पुन्हा इथं यायला हवं. पुन्हा पुन्हा इथल्या माणसांना भिडायला हवं… त्या स्तब्ध शांततेत फक्त मला एवढंच कळत होतं.

समाप्त

(‘सत्याग्रही विचारधारा’च्या २०१४च्या दिवाळी अंकातून लेखकाच्या पूर्वपरवानगीने साभार)

लेखक इंग्रजीचे निवृत्त प्राध्यापक आणि प्रवासी लेखक आहेत.

rajashirguppe712@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......