हा लेख ‘Buddhism and the contemporary world : an Ambedkarian perspective’ या डॉ. भालचंद्र मुणगेकर व आकाश सिंग राठोड यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील ‘Buddhism in the 21st Century : Three Challenges’ या लेखाचा अंशत: संपादित भाग आहे. २००५ साली मुंबईमध्ये झालेल्या ‘पहिल्या इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फरन्स’मध्ये सादर केल्या गेलेल्या शोधनिबंधांचा समावेश या संग्रहात केला असून हे पुस्तक नवी दिल्लीतील Bookwell या प्रकाशनसंस्थेने २००७मध्ये प्रकाशित केले आहे.
प्रस्तुत लेखाचा अनुवाद - कुमुद करकरे
..................................................................................................................................................................
आज अनेक जन जन्मत: बौद्ध असतात, पण सुरुवातीला बौद्ध धर्म हा हिंदू किंवा ज्यूंप्रमाणे जन्मत: मिळणारा धर्म नव्हता. एक श्रद्धाविषय म्हणून या धर्माची उत्पत्ती झाली. त्याचाच अर्थ जन्मत:च कोणी बौद्ध मानला जात नसे. निवड करूनच एखादी व्यक्ती बौद्धधर्माचा स्वीकार करत असे. जाती-पंथामुळे कोणी बौद्ध म्हणून ओळखला जात नसे. विचारपूर्वक निवड करूनच व्यक्ती बौद्ध धर्माचा स्वीकार करीत.
असे असल्यामुळेच ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मांप्रमाणे जागतिक दृष्टीने बौद्धधर्मही परिवर्तनीयच ठरला. हे तीनही धर्म असे मानतात की, मानवाने एकूण परिस्थितीचा त्याच्या जीवनावर होणाऱ्या परिणामांचे मूल्यमापन करूनच दुसरा मार्ग निवडण्याचा बदल स्वीकारावा. म्हणून या एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकामध्ये जगातील बौद्ध धर्मीयांपुढे अनेक प्रकारची आव्हाने उभी असलेली मला दिसतात. ही प्रश्नचिन्हे उभी करताना माझ्या बौद्ध मित्रांना त्यांची उत्तरे मिळवून द्यावीत हा माझा हेतू नाही. पण एक मित्र आणि अंधार, विकृती व निराशा यांच्या विरोधी संघर्षातील एक साथी म्हणून गौतम बुद्धाच्या मार्गावरून ज्यांना पावले टाकायची आहेत, त्यांच्यासाठी विचारार्थ मी काही मुद्दे समोर ठेवीत आहे.
या संघर्षमय जगात अनेक प्रकारच्या सांस्कृतिक दृष्टिकोनांची परस्परांशी जी टक्कर चालू आहे, ती अनुभवली तर जगातल्या इतिहासातील कोणत्याच कालखंडात आजच्या इतकी शांततेची निकड लागलेली दिसत नाही. डॉ. आंबेडकर नवबौद्धवादाचे (नवायन) प्रतिनिधी मानले, तर उर्वरित आशिया खंड जुन्याच पारंपरिक बौद्ध धार्मिक कल्पना आणि आचार यांच्या आधारे वाटचाल करताना दिसतो. आंबेडकरांचा नव बौद्धवाद हा अल्पसंख्य बौद्धांचा लक्षणीय उदगार असला तरी वास्तवात परंपरागत बौद्ध धर्म हा एकंदरितच प्रखर आवाज घुमवताना दिसतो.
आगामी काळात बौद्ध चळवळीला अनेक नव्या आणि अनपेक्षित तडजोडींना समोरे जावे लागणार आहे. भूतकाळात जिची बीजे रुजली आहेत. अशी चळवळ परंपरागत बौद्ध संकल्पना आणि आचार यांचा आधार घेणार आहे. इतर नवीन अल्पसंख्याच्या आविष्काराची जुळवाजुळव करताना दिसत आहेत. मी या ठिकाणी ऐतिहासिक आणि समकालीन वास्तवाचे भान करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. माझे असे मत आहे की, एकविसाव्या शतकातील बौद्धवाद हा समोर तीन एकत्रित जागतिक आव्हाने घेऊन उभा आहे.
पहिले आव्हान
ऐतिहासिक दृष्टिकोनातून बौद्धधर्म हा जुनाट सामाजिक रक्तक्षयाने ग्रासलेला आहे असे म्हटले जाते, ही अवस्था तो पार करू शकेल काय? जर आधुनिक किंवा आधुनिकोत्तर जगाला निसर्गावरचे आपले भावनिक अवलंबित्व किंवा आकर्षण तोडून आपल्या भविष्याला आकार देता आला असेल तर मग असा प्रश्न उदभवतो की, चिरकाल टिकलेल्या बौद्ध धर्माने आग्नेय व पूर्व आशियातील संस्कृतीचे संवर्धन निसर्गाबद्दलची ओढ जोपासून आपला भूतकाळ आणखीनच लांबवला आहे का?
हा प्रश्न नवीन नाही. शंभर वर्षांपूर्वी स्कॉटलंडमधील ग्लासगो विद्यापीठातील धर्मशास्त्राचे प्राध्यापक ए.बी. ब्रूस यांनी या प्रश्नाच्या संदर्बात अतिशय समर्पक उदगार काढले होते. ते म्हणाले होते, “बुद्धाने उभारलेल्या धार्मिक चळवळीत (बौद्धधर्मात) कितीही सैद्धांतिक आणि व्यावहारिक पातळीवरील दोष दिसत असेल, तरी त्या चळवळीतून ज्या शक्ती मुक्त झालेल्या आहेत, त्यांनी जगातील नैतिक सुधारणेला दिलेले योगदान डोळ्यात भरण्याजोगे आहे.” शंभर वर्षांपूर्वी जगाच्या नैतिक उत्थानाचे श्रेय बौद्ध धर्माला देत असतानाच ब्रूस यांनी तीन मुद्द्यांचा उल्लेख केला आहे.
‘बौद्धधर्माची नैतिक भूमिका शुद्ध आणि उन्नत आहे’ हा पहिला मुद्दा; ‘बौद्धधर्माने जगातील व्यवहारांतून निवृत्त झालेल्या लाखो नागरिकांना मधुर आणि शांतिपूर्ण जीवन प्रदान केले’ हा दुसरा मुद्दा आणि ‘निराशेतून उदभवणाऱ्या मानसिक वेदना या धर्मातील उपदेशामुळे सौम्य झाल्या’ हा तिसरा मुद्दा.
या ब्रूस यांच्या विधानांतून एक महत्त्वाचा मुद्दा पुढे येतो. एकीकडे तत्कालीन ब्राह्मणी पंथवादाला पदभ्रष्ट करण्यासाठी बौद्धवाद ही गुणात्मक पण नास्तिक प्रतिक्रिया आहे. बुद्धाच्या शिकवणीनुसार आयुष्य हे मूलत:च दु:खमय आहे. म्हणून प्रज्ञावंतांनी त्याचा मोह सोडावा आणि पुढील जन्माची तयारी म्हणून हाती घेतलेली कर्मकांडे थांबवावीत, हा गौतम बुद्धांचा संदेश होता.
पण इथे आणखी एक अडचण उभी राहते. ब्रूसच्या प्रतिपादनाप्रमाणे दुसऱ्या बाजूला नैतिक आदर्श शुद्ध आणि उन्नत असले तरी ऐतिहासिक बौद्धवाद एकांगी आहे. कारण बौद्धवादाचा स्वीकार केल्यामुळे लाखो लोकांना जागतिक व्यवहारातून निवृत्त होताना सुख-शांती लाभलेली असेल, परंतु जगामध्ये नेतृत्व करण्याची प्रेरणा हा धर्म देऊ शकला नाही, असे मत तो मांडतो. शिवाय ऐतिहासिक बौद्धधर्माच्या अनुयायित्वातून निराशेच्या वेदना सौम्य होत असल्या तरी त्यातून नव्या आशा पल्लवित करण्याचे सामर्थ्य दिसत नाही, असाही ब्रूस यांचा आक्षेप आहे. त्यांच्या मार्क्सवादी भूमिकेचा आविष्कार करताना बुन्सेन या दुसऱ्या अभ्यासकाबरोबर असे मत व्यक्त केले आहे की, आशियातील रोगट हृदयाच्या लोकांना बौद्धधर्माने आपल्या शिकवणुकीद्वारे अफूचा सौम्य घोट पाजला आहे.
जर्मनीतील हायडेलबर्ग विद्यापीठातील प्रा. मॅक्स वेबर हे आधुनिक समाजशास्त्राच्या जगातील प्रसिद्ध चार उदबोधकांपैकी एक मानले जातात. पण त्यांचे ‘रिलिजन ऑफ इंडिया’ (भारताचा धर्म) हे अनेक तपशिलांच्या संदर्भात चुकीचे ठरले आहे आणि ब्राह्मणवादाविषयीच्या विचारात तर वेबरने बौद्ध धर्माच्या अनुयायांना थोडे चुकीचेच मार्गदर्शन केले आहे.
ऐतिहासिक बौद्धधर्म हा “केंद्रित उपासना आणि ध्यानधारणेचे पावित्र्य” यांची शुद्ध बौद्धिक पायावरील संरचना करम्यामध्ये सामर्थ्यवान सिद्ध झालेला आहे, पण इतिहासाचा आढावा घेतला, तर वेबरच्या मूल्यमापनानुसार सर्व क्षेत्रांतील जीवनाला विवेकवादाचा आधार किंवा प्रेरणा देण्यामध्ये बौद्धधर्म मागे राहिलेला दिसतो.
एकंदरीतच इतिहासात बौद्धधर्माने बजावलेली भूमिका उपशामक आहे असे आशियातील सांस्कृतिक जीवनात सिद्ध झाले आहे. उपशामक हे दु:ख किंवा वेदनेची तीव्रता कमी करण्यासाठी वापरतात. कोणतेही उपशामक शारीरिक किंवा भावनिक वेदना सुसह्य करण्यासाठी वापरतात. बौद्धधर्माने क्रिया-प्रतिक्रियांवर मर्यादा घालण्यात किंवा त्या सौम्य करम्यात यश मिळवले हे खरे, पण कोणत्याही कृतीला प्रेरणा देणारा धर्म किंवा मुक्तीचा मार्ग दाखवणारा धर्म तो ठरला नाही.
सुरुवातीपासूनच बौद्धधर्माच्या वाटचालीची दिशा वेगळीच राहिली. “नागरी समाजातील त्याचा उगम, मध्यमवर्गाला भावलेले त्याचे आवाहन, त्याची वैश्विकता आणि समानतेची त्याला चढलेली झिंग, मुक्तीसाठी कोणत्याही चमत्काराला किंवा तशा साधनांना त्याने दिलेला नकार आणि काळजीपूर्वक कार्य करण्यावर त्याचा असलेला नैतिक भर या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून बौद्ध धर्म हा दक्षिण आशियातील प्रॉटेस्टंटवाद आहे असे कोणालाही वाटणे स्वाभाविक आहे,” असे डेव्हिड गेल्नर यांनी नमूद केले आहे. पण तशी वस्तुस्थिती नाही.
त्याऐवजी दक्षिण, दक्षिणपूर्व आणि पूर्व आशिया या प्रदेशातील जनतेला आणि बौद्ध धर्माबद्दल कुतूहल असणाऱ्या सामान्य नागरिकांना एक निश्चित श्रद्धातत्त्व वा दैवत उपासनेसाठी उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे बौद्ध धर्माचा सामान्य उपासक कोणत्याही विशिष्ट पंथला जोडला न गेल्यामुळे प्राचीन काळचे ग्रीक किंवा आधुनिक जगातले चिनी यांच्याप्रमाणेच बौद्ध मठ किंवा मंदिरे यांच्यामध्ये चाललेल्या कर्मकांडाकडे ओढले गेले.
सर्वच सामाजिक जीवन हे एक प्रकारच्या अपरिहार्य अशा जादुई पगड्याखाली होते असे म्हणता येईल. काही सामाजिक घटक ईश्वर किंवा दैत्य (राक्षस) यांना अनेक प्रकारच्या भेटी देऊन खूश करण्याच्या प्रयत्नांत असत. आणि अशा कोणत्याही साधनांच्या आधारे केवळ गरीब आणि निरक्षरांच्या झुंडीच नव्हे तर आशियातले अनेक शिक्षित समूहही दररोजची जीवनसाधना चालवीत असत. “जागतिक चमत्काराच्या पगड्याखाली चाललेले या अविवेकी जगातल्या व्यवहारांनी दररोजच्या आर्थिक उलाढालींवरही मोठा परिणाम होत होता. त्यामधून विवेकी आणि इहवादी व्यवहारांसाठी जागाच उरली नव्हती.” असा या संबंधात वेबरने सूचक निष्कर्ष काढला आहे.
अशा तऱ्हेने बौद्धधर्म हा कोणत्याही मदतीशिवाय आणि बाह्य हस्तक्षेपाशिवाय बराच काळपर्यंत जागतिक दृष्टिकोनातून एका सामाजिक उपशामकाचे कार्य करीत राहिला. ऐतिहासिकदृष्ट्या पाहायचे तर सामाजिक पातळीवर हानिकारक किंवा वेदनाजनक ठरणाऱ्या कृतींना प्रेरणा देण्यात अगर त्या मुक्त करण्यात या धर्माने स्वारस्य दाखवले नाही.
ही मांडणी लक्षात घेण्यासाठी दोन प्रकारच्या परस्परविरोधी गोष्टींचा विचार केला पाहिजे. भिक्षूंसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी जी सामाजिक कर्तव्ये नेमून दिली आहेत, त्यांतला पहिला फरक आहे.
भिक्षूंसाठी स्पष्ट आणि तपशीलवार आदेश दिलेले आहेत. “बौद्ध धर्माचे अंतिम उद्दिष्ट ज्ञानप्राप्ती करून घेऊन मृत्यूवर विजय मिळविणे हे आहे.” गौतम बुद्धाने नैतिक संयम, एकांतातील ध्यानधारणा आणि तत्त्व विचार ही आचरणातील त्रिसूत्री आपल्या शिष्यांकडे सोपवून त्यांना प्रशिक्षण दिले. त्यातून निघालेल्या निष्कर्षांवर त्यांचा भर राहिला. संघामध्ये (भिक्षू समूहात) प्रवेश करू इच्छिणाऱ्यांसाठी व्यवस्थेतील २२७ नियमांचे पालन करण्याची शपथ घेण्यात आली. संयम, ध्यानधारणा व तत्त्वविचार आणि शिस्तबद्ध नियमन यांचा चांगला परिणाम समाजातील नकारात्मक वर्तनात घट होताना दिसले. पण जे भिक्षू नव्हते त्या उपासकांसाठी काय होते? भिक्षूंच्या ध्यानधारणेचा आणि अस्तित्वाचा आधार असलेल्या सामान्य जनांची या सर्व संरचनेमध्ये कोणी जागा होती?
सर्वसामान्य नागरिकांसाठी, जे आपल्या घराशी बांधलेले आहेत, आणि संघाच्या गृहहीन जीवनात जे प्रवेश करू शकत नव्हते, त्यांना या जीवनात मुक्तीच नसल्यामुळे जगत असताना त्यांच्यासाठी खास असे कोणतेच मार्गदर्शन नव्हते. त्याला काही अपवाद होते. पण थोड्याच अशा काही व्यक्तींचे ज्या संघजीवनात प्रवेश न करताही मृत्युंजय झाल्या होत्या. बौद्ध तत्त्वज्ञानाचे आकर्षण असणाऱ्या सांसारिक व्यक्तीसाठी आपल्या कर्माने आयुष्यात पुण्य जमवत राहणे हा एकच पर्याय होता. त्यावरच त्याचे भवितव्य अवलंबून होते. त्याचे एकमेव धार्मिक कर्तव्य या जीवनचक्रात पुण्यसंग्रह करणे हेच होते.
सर्वसाधारण माणसांसाठी बौद्ध आशियाच्या इतिहासामध्ये चारच मार्ग खुले असलेले दिसतात.
१. प्रतिबंध – हत्या, चौर्यकर्म, अनैतिक लैंगिक संबंध, असत्यर्णन आणि मादक पदार्थ या सर्वांना प्रतिबंध. यांना पंचप्रतिबंध तत्त्व असे म्हटले आहे.
२. भक्ती – बुद्ध, धर्म, संघ या तीन ज्ञानरत्नांवर पूर्ण भक्ती व घरगुती पंथपरंपरा (स्थानिक देवता आणि त्यांच्यावरील श्रद्धा) यांचा श्रद्धेने पाठपुरावा
३. औदार्य – भिक्षू व त्यांची सेवा याद्वारे पुण्यसंचय शिवाय धार्मिक स्थळे आणि अनिवासी इमारती यांची देखभाल
४. निष्ठा – बुद्धाचे अवशेष – (त्याचे दात, हाडे आणि इतर वस्तू) यांची जपणूक आणि मूर्तिपूजा. बुद्ध मूर्तीच्या मंदिरांची निर्मिती आणि अनेक पवित्रस्थले आणि स्तुप यांची बांधणी.
या सर्वांतून बौद्ध धर्माने क्रमाक्रमाने वेदनाशामक उपचार सुरू केले असेच म्हणावे लागेल. या वाटचालीचा अगदी प्रथमपासून आढावा घेतला तर बौद्ध धर्माने जी संस्कृती सांभाळली आणि वाढवली, त्यातून समाजाला अफूचा एक सौम्य घुटका पाजला हे ब्रूस यांचे ऐतिहासिक मत मान्य करावे लागेल.
आव्हान दुसरे
बौद्ध धर्माच्या प्रवासात सर्वभूतांना आणि चराचराला आत्मा असतो या स्थानिक विश्वासाची आणि त्यावर आधारलेल्या कर्मकांडाची सतत जोड त्या धर्मवादाला देण्यात आलेली आहे. या घटनेचे आध्यात्मिक परिणाम काय दिसतात?
थेरवादी बौद्धवादाचा मुख्य केंद्रबिंदू गौतम बुद्ध आणि भावी बुद्ध समजला जाणारा मैत्रेय बुद्ध हेच कायम राहिले आहेत. मूलत: हिंदू धर्मपद्धतींचा एक पर्यायी आविष्कार म्हणून बौद्ध धर्माचा उदय झाला. गौतम बुद्धाने मुक्त उपभोग आणि इंद्रिय दमन या दोन्ही गोष्टी नाकारून मधल्या मार्गाचा पुरस्कार केला. या मार्गावरील जागतिक दृष्टिकोनातून विचार करमारा सुधारक म्हणून त्याने वेदांची शिकवण नाकारली. ब्राह्मणांच्या पशुहत्येला किंवा बली देण्याच्या पद्धतीला विरोध केला. ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल बोलणे किंवा विचार व्यक्त करणे नाकारले आणि आत्मा या तात्त्विक कल्पनेचे अस्तित्वही साफ नाकारले. पण जन्म, मृत्यू आणि पुनर्जन्म हे चक्र भेदणाऱ्या पाच सूत्रसमूहाच्या ‘अनात्मनं’ या अवस्थेत लोक राहतात हे त्याने प्रतिपादन केल, हे सर्वांनाच ठाऊक आहे. तथापि जेथे जेथे बौद्धधर्म पोहोचला, तेथे तेथे बुद्धावरील निष्ठा ही स्थानिक परंपरांशी जोडली गेली. ठिकठिकाणी बुद्धाने दिलेल्या भेटींची चर्चा चालू झाली. स्थानिक पातळीवरील विशेष स्थळांना आणि उपचारांना अवशेष आणि प्रतिमा यांच्याशी संबंध जोडला गेला. अशा प्रकारच्या स्थानिक प्रतीकांची उदाहरणे म्हणून श्रीलंकेमधील एका पवित्र पर्वतावर बुद्धाच्या उमटलेल्या पाऊलखुणा, कँडी येथील बुद्ध दाताचे देवालय म्यानमारमधील महामुनीची प्रतिमा आणि लाओसमधील राजधानीच्या शहराला ‘लुआंग प्रभंग’ असे नाव जिच्यावरून मिळाले ती प्रभंग मूर्ती, यांची नावे घेता येतील.
जेथे जेथे थेरवाद किंवा महायान पसरला तिथे तिथे हिंदूंशी संबंधित अगर स्थानिक पातळीवरील दैवतांची प्रस्थापना गौतम बुद्धाच्या बाजूला अगर खालच्या पायरीवर झालेली आहे. पूर्व आशिया, आग्नेय आणि दक्षिण आशिया या सर्व प्रदेशात या स्थानिक देवतांचा समाजाच्या रूढी कल्पनांवर पगडा आहे.
ब्रह्मदेशात (म्यानमार) वेदातील देवांचा राजा इन्द्र याला प्रबल स्थानिक दैवताचे महत्त्व प्राप्त झाले. कारण एका प्रसिद्ध पर्वतावरील सर्व लोकदेवतांचा तो प्रमुख मानला गेला होता. अशा प्रकारे पारंपरिक थेरवादाच्या विश्वोत्पत्ती आणि विश्वसंचालनाच्या तत्त्वज्ञानात इंद्राला महत्त्वाची जागा मिळाली.
लाओसमध्ये थेरवाद बौद्धधर्मीय पवित्र विधी जुनी राजधानी, लुआंग प्रभंग या शहरातील भव्य स्तुपाजवळ केले जातात. त्यामध्ये लाओसमधील प्राचीन दैवतांची पूजा समाविष्ट असते. लाओशियन लोकांच्या नैसर्गिक आणि सामाजिक जीवन व्यवस्था या दैवी शक्तींमुळे निर्माण झाल्या असे म्हटले जाते. त्याचा परिणाम असा झाला आहे की, थेरवादी धर्मकृत्यांमधील वैश्विक आणि सांस्कृतिक रिवाजांमध्ये लाओशियन धर्मोपदेशक या देवतांचीही गणना करतात.
चीनमध्ये बौद्ध धर्माचा प्रवेश राजाश्रयातून झाला. काही काळ तो दरबाराचा धर्म झाला, पण नंतर राजदरबारातून बाहेर पडला. आणि देशात सर्वत्र पसरला. ग्रामीण भागात बुद्ध भिक्षूंनी बौद्ध धर्मतत्त्वांचे शिक्षण देत असताना चमत्कारही करून दाखवले. बौद्धमठांची स्थापना झाली, पॅगोडा म्हणजे चिनी स्तुप बांधले गेले आणि लोकांमध्ये भक्तिभाव पसरत गेला.
ख्रिस्त सन ५८९ ते ८४५ या सुमारे २५० वर्षांच्या काळाला बौद्ध धर्माचे सुवर्मयुग मानले जाते. या कालखंडात बौद्ध धर्माला भरपूर राजाश्रय मिळाला. त्याचबरोबर शासक वर्गातही त्याचा भरपूर प्रसार झाला. सर्वसामान्यांच्या जीवनात हा धर्म चांगल्याच रीतीने मिसळून गेला. बौद्ध संस्थांना उत्तेजन देण्यात आले. उपासनेच्या विविध पद्धती निर्माण केल्या गेल्या. बौद्ध सूत्रांचे आणि स्तोत्रांचे पठण आणि पुण्य संपादन करण्यासाठी करावयाची कृत्ये राजवाड्यांत, राजदरबारांत आणि सर्वसामान्य जनतेत सर्वत्र केली जाऊ लागली. गौतम बुद्ध आणि बोधीसत्व यांच्याशी संबंधित अशा पवित्र पर्वतांवरील धर्मस्थळांच्या यात्रा मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्या.
तिबेटमध्ये बौद्ध धर्माची सांगड स्थानिक धर्माचरमाबरोबर घातली गेली. ज्यामध्ये राक्षसासारख्या प्राण्यांची पूजाअर्चा अंतर्भूत होती. शिकागो विद्यापीठातील रेनॉल्डस आणि कार्बाइन या अभ्यासकांनी या संबंधात असे नमूद करून ठेवले आहे की, भारतीय बौद्धधर्माच्या तिसऱ्या महत्त्वाच्या शाखेमध्ये असलेले काही हे मूलभूत घटक आणि प्रवृत्ती, काही विशिष्ट संघटित गटांची आचार परंपरा बौद्ध इतिहासाच्या आरंभ कालापासून नमूद केल्या गेल्या आहेत.
थेरवाद आणि महायान परंपरांमध्ये आढळणाऱ्या काही गोष्टी तंत्रायनमध्ये अधिक ठळक केलेल्या आहेत. ही महत्त्वाची घटना एकविसाव्या शतकातल्या बौद्धवादासमोर असलेल्या दुसऱ्या आव्हानाच्या गाभ्याशी आपल्याला पोहोचवते.
एडवर्ड कॉन्झे यांनी या संघटित गुप्त आचार परंपरांना भारतातील बौद्ध धर्माच्या तिसऱ्या कालखंडातील (म्हणजे ख्रिस्तोफर ५०० ते १००० साल या कालखंडातील) महत्त्वाच्या घटना असे म्हटले आहे. कारण त्यातूनच या काळात तंत्राचा उगम झाला. भारतातील बौद्ध विचाराची तंत्र ही तिसरी आणि शेवटची विधायक उपलब्धी आहे. बौद्धधर्माच्या पहिल्या मंत्रायन अवस्थेत चमत्कारांची परंपरा विकसित करून त्याद्वारे मानसिक शांतीचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. या मार्गात अनेक मंत्र, मुद्रा, मंडले आणि काही नवी दैवते यांची हळूहळू पद्धतशीरपणे बौद्ध धर्मात स्थापना झाली. वज्रायन या दुसऱ्या अवस्थेत आधीची सर्व शिकवण किंवा प्रबोधन पाच तथागतांकडून त्यांच्या ठळक शिक्षणपद्धतींमधून काही कूटप्रश्न, विरोधाभास आणि सघन प्रतिमा यांचा वापर करून ध्यानधारणेच्या द्वारे ठसविण्यात आली. कालचक्र ही त्यातील शेवटची अवस्था.
भारत, चीन, मध्य आशिया आणि वनवासी यांच्याकडून मिळवलेल्या अनेक संस्कारांतून ही तंत्रपद्धती लोकमानसात कायम वास्तव्य करून राहिलेल्या भूते-खेते, यक्ष, किन्नर, पऱ्या, सैतान, राक्षस, नरभक्षक इत्यादी कल्पनांना दुय्यम पण आदराचे निश्चित स्थान मिळवून देण्याच्या कार्यात यशस्वी झाली. भटक्या आणि शेतीवर विसंबून राहणाऱ्या समाजात लोकप्रिय असणाऱ्या चमत्कारविषयक कुतूहलालाही तिने शांत केले. हे सर्व करताना जुन्या महायान पंथ व आचार यांपासून त्याचे उद्दिष्ट, आदर्श, शिक्षणपद्धती आणि गौतम बुद्धांची भूमिका या सर्वांपासून तंत्रायन बरेच दूर गेले.
या सर्व प्रयत्नात, तांत्रिक बौद्धधर्माचे उद्दिष्ट याच देहात विनाविलंब बुद्धपणाची जाणीव भरून घेणे हे ठरले. आदर्श पुरुषांचा प्रवास बोधिसत्त्वापासून सिद्ध पुरुषापर्यंत –ऐहिक व पारलौकिक चमत्कारांवर नियंत्रण ठेवणाऱ्या शक्ती हस्तगत केलेल्या बुद्ध व्यक्तीपर्यंत होऊ लागला. याचाच अर्थ असा की, शिक्षण पद्धती बदलल्या. सर्वसामान्य लोकांना सहज उपलब्ध होणारी आणि त्यांच्या जाणीवेपर्यंत पोहोचणारी सूत्रे आणि शास्त्रे यांचे शिक्षण थांबले. त्याची जागा एखाद्या गुरूने अगर लामाने काही संपन्न समाजातील व्यक्ती निवडून त्यांना पवित्र समजल्या जाणाऱ्या गुप्त कागदपत्रांवरून धार्मिक शिकवण देणे, या प्रक्रियेने घेतली. अशा प्रकारे ऐतिहासिक गौतम बुद्धाच्या प्रबोधनाची जागा त्या काळात लोकमानसावर लवकर प्रभाव पाडणाऱ्या फसव्या आणि बनावट बुद्धांच्या चमत्कारांनी घेतली.
अशा तऱ्हेने या सर्व गुप्त आणि काही जणांसाठीच तथाकथित धर्मोपदेशकांनी राखून ठेवलेल्या तंत्रायनाचा कल, बुद्धापासून परंपरेने चालत आलेली सूत्रे बाजूला सारून गुरूद्वारे संघावर ताबा मिळवण्याचा राहिला. चमत्कार, प्रार्थनाचक्रे, पारलौकिक शक्ती आणि अनेक भेसूर वाटणारी कर्मकांडे यांच्यावर राहिला. बौद्धधर्माच्या संरक्षणाच्या दृष्टीने हे सर्व आवश्यकच आहे असे वादविवाद आणि प्रवचने यांच्या व्यासपीठावरून सांगितले जात होते. लहान मुलाच्या जन्मापासून ते त्याला देवीच्या रोगापासून आणि इतर संकटांपासून दूर ठेवण्यासाठी अनेक देवतांची निर्मिती करून त्यांची उपासनाही सुरू झाली. लोकांमध्ये त्यांचा प्रचार करण्यात आला. पण दूरवर पसरत गेलेला हा तांत्रिक बौद्धधर्म जसजसा स्थिर होत गेला तसतसा त्याच्यामधील लैंगिक अनाचार आणि इतर बिभत्स वर्तुणकीला उत येत गेला. त्या नाकारण्याचा किंवा त्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्नही फारच कमी झाला.
पारलौकिक शक्ती, जादूटोणा आणि सिद्धपुरुषांनी केलेल्या चमत्कारांवर दृढ विश्वास हे बौद्धधर्माचे यानंतर अतूट अंग बनले. तिबेटातील संकुचित होत गेलेल्या बौद्ध परंपरांनी तर यासाठी कर्मकांडे, जादूची चक्रे आणि आकृत्या यांची जोड देऊन त्यांना कायद्याच्या कक्षेत ओढण्याचाही प्रयत्न केला. समाजातील संपन्न वर्गाच्या आध्यात्मिक जीवनाचे रक्षण आणि अध्यात्मापासून दूर असलेल्या जनसमूहाला जे हवे असेल ते देण्याची यांच्याद्वारे हमी दिली गेली. मुद्रा किंवा कर्मकांड यामुळे चिंतनाची किंवा समाधी अवस्थेची गूढता किंवा खोली वाढत गेली. मंडळांची रचना आणि रेखाटने, देवांना आवाहन आणि पुराणातील देवतांचा परिचय करून देण्यासाठी कडक नियम आणि कर्मकांडांचे अटोकाट पालन आवश्यक झाले होते. या प्रकारच्या संदर्भात चालविलेला जादूटोणा, निसर्गातील अदभुततेचे स्तवन यांच्यामुळे चमत्कारांचे संस्थाकरण होते.
याच संदर्भात आणखी एक मुद्दा मांडता येतो तो असा की, जागतिक चर्चेमध्ये बौद्धधर्मातील हा तांत्रिक बौद्धवादाचाच चेहरा समोर येतो. दलाई लामा, रिचर्ड गेरे अथवा ब्रॅड पिट यांना ओळखणारा किंवा त्यांच्याबद्दल माहिती असणारा कोणीही, आर. यामामोरो यांनी या विषयाच्या काढलेल्या तात्पर्याशी सहमत होईल. त्यानुसार तिबेटी बौद्धांना त्यांच्या मातृभूमीतून घालवून देण्यात आले आहे. पण पाश्चात्य जगतात त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळली जात आहेत, अशा प्रकारचा हा कालखंड आहे. बौद्ध वादाच्या प्रभावामुळे पाश्चात्य सांस्कृतिक जीवनाच्या पाच प्रकारच्या क्षेत्रात झालेल्या परिणामांची नोंद जर्मन अभ्यासक झर्न्स्ट बेंझ याने पंचवीस वर्षांपूर्वी केलेली आहे. ते आजही दिसतात. मानसशास्त्र, मानसोपचार, ख्रिश्चन धर्मातल्या प्रार्थना व ध्यानधारणा, माध्यमे आणि शिक्षण यांच्याद्वारे येणारे सामाजिक भान, बौद्धांचा सेवाभावी ‘इव्हेंजेलिझम’ आणि पाश्चात्य देशांतील अत्याधुनिक निधर्मी विचारवंतांसमोर खडा असलेला बौद्धिक पेच हे ते विषय आहेत.
आव्हान तिसरे
एकविसाव्या शतकात बौद्ध धर्मासमोरील आणखी एक आव्हान असे आहे की, बौद्धधर्माचा जो जागतिक दृष्टिकोन आहे त्याला अभिप्रेत असलेल्या गतिमान आणि चिरकाल टिकून राहील अशा आदर्श समाजाला कोणत्या आर्थिक-सामाजिक परिसराचा आधार घ्यावा लागेल?
बौद्धधर्माच्या इतिहासात, ज्या ठिकाणी तो एक चळवळ म्हणून रूपांतरित झाला आहे, त्या ठिकाणी त्याला सरकारी आश्रय नसेल तर तो निष्प्रभ ठरला आहे हे आतापर्यंत अनेक ठिकाणी नमूद झाले आहे. “बौद्धधर्म हा राजांच्या आश्रयावरच अवलंबून राहिला आहे आणि ज्यावेळी तशा आश्रयाचा अभाव होता त्यावेळी तो बहुधा फारच अडचणीत येत गेला,” असे एडवर्ड कोन्झे या अभ्यासकाने लिहिले आहे.
नेदर्लंडमधील हेग शहरातील इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये ‘स्त्रिया आणि विकास’ या विषयाचे ज्येष्ठ प्राध्यापक थान-दम-त्राँग यांनी म्हटले आहे, की, आजच्या (आधुनिक) राजकीय संस्था समजावून घेण्यासाठी लागणारी नजर किंवा अंतर्दृष्टी बौद्धधर्म पुरवू शकत नाही आणि त्याचे कारण त्या धर्माचा इतिहास आणि काही गोष्टींवर या धर्मात दिलेला अतिरिक्त भर यांच्यामध्ये आहे. त्राँग यांच्या मते, ऐतिहासिकदृष्ट्या बौद्धधर्माला दोन महत्त्वाच्या गुणांमुळे मर्यादा पडलेल्या आहेत. त्यांपैकी एक आहे सांस्कृतिक विविधता आणि जागतिक तर्कविचारामधील सहभागाचा अभाव.
बौद्धधर्माचा जो जागतिक दृष्टिकोन आहे त्याला अभिप्रेत असलेल्या गतिमान आणि चिरकाल टिकून राहील अशा आदर्श समाजाच्या उभारणीसाठी कोणत्या आर्थिक-सामाजिक परिसराचा आधार घ्यावा लागेल?
भारतातील बौद्ध धर्मियांची वस्ती अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मिझोराम, त्रिपुरा, महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेश या राज्यांत विशेषत्वाने आहे. भारतातील बौद्ध धर्मियांची एकूण संख्या सुमारे ६५ लाख असून भारतीयांच्या एकूण लोकसंख्येशी तिचे प्रमाण ०.७६ टक्के आहे. भारताबाहेरील भूतान, म्यानमार, थायलंड, व्हिएतनाम, लाओस, नेपाळ काही प्रमाणात तिबेट आणि उत्तर कोरिया या देशांत बौद्ध धर्मियांच्या अभ्यासासाठी तौलनिक मुद्दे मिळू शकतात.
निष्कर्ष
अधिक शांतीपूर्ण आणि करुणामय अशा विश्वाच्या शोधात असताना आपल्यासमोर या शतकातील बौद्ध धर्मासमोरची तीन आव्हाने आली आहेत. ही आव्हाने फक्त बौद्ध धर्मासमोरच आहेत असे नाही. एकविसाव्या शतकात जग जसजसे अधिक प्रगल्भ होत जाईल तसतशी या तीन कसोट्यांमागील संदर्भात बौद्ध धर्माची भूमिका आणि आवश्यकता अधिक स्पष्ट होत जाईल असे मला वाटते.
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment