लेखक राजा शिरगुप्पे यांनी तीन वर्षांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये फिरून, तेथील सर्वसामान्य माणसांशी बोलून लिहिलेल्या दीर्घ रिपोर्ताजचा हा पहिला भाग. याचा उद्या दुसरा आणि परवा तिसरा भाग प्रकाशित होईल. या रिपोर्ताजमधून आपण ऐकून असलेल्या काश्मीरविषयीची बरीचशी नवी माहिती मिळेल...खऱ्याखुऱ्या काश्मीरला जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ताज मदत करू शकतो...
……………………………………………………………………………………………
माझं बालपण काश्मीरमध्ये गेलंय, असं मी जर म्हटलं, तर तुम्हीच काय, माझे कुटुंबीयही भलत्याच काळजीत पडतील. परिसरातला चांगला मानसरोगतज्ज्ञ कोण याचा शोध घेऊ लागतील. पण खरंच सांगतो, अगदी माझा ‘होशोहवास’ सलामत ठेवून सांगतो की, वरील विधान मी अगदी गंभीरपणे करतोय. भारतीय हिंदी सिनेमावर, माझ्या त्या वयात मी पाहिलेल्या, भरोसा ठेवून अगदी शपथपूर्वक सांगतोय. कारण हिंदी सिनेमानं जो निसर्ग त्या वयात दाखवला आणि प्रेम करायला एकमेव जागा माझ्या त्या पिढीच्या मनात ठसवली ती फक्त काश्मीर आणि काश्मीरच. काश्मीर आणि सौंदर्य हे एकमेकांचे पर्यायवाचक शब्द आहेत अशी माझी त्या बालकुमार वयात जी समजून होती, तिला आजतागायत कधी तडा गेला नाही, उलट जेवढा देश फिरलो, त्या पुराव्यावर उत्तरोत्तर घट्टच होत गेली.
थोर पर्शियन कवी फिरदौसनं जेव्हा प्रथम काश्मीरच दर्शन घेतलं तेव्हा तो उस्फूर्तपणे ‘अगर कहीं जमींपर जन्नत हो तो हमीनस्तू! हमीनस्तू!! हमीनस्तू!!!’ (म्हणजे ‘इथंच आहे’) असं त्रिवार घोषत म्हणाला होता म्हणे. खुद्द काश्मीर याबाबतीत संशयाला जागाच ठेवत नाही. भारतातल्या कुठल्याही प्रांतातील लहान मुलाला कदाचित आपल्या राज्याचं नाव पटकन सांगता येणार नाही, पण काश्मीर निश्चितच माहीत असतं. कारण काश्मीर या नावातच एका अनाहत संगीत भरून आहे!
दहा एक वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा काश्मीरला गेलो असेन. काश्मीरला म्हणून नव्हे, अमरनाथ यात्रेला. शपथ सांगतो, अमरनाथ काश्मीरमध्ये आहे हे माहीतच नव्हतं मला, इतकं भौगोलिक ‘ज्ञान’ आमचं घोर होतं. अर्थात हिमालयात कुठेसे आहे हे अमरनाथचे बर्फाच्छादित चित्र पाहून आणि आमचा भगवान शंकर हिमालयात राहतो या पाळण्यातच मिळणाऱ्या माहितीमुळे पक्के माहीत होते. सोबत सहा-सात जण साथी होते. पण ते पर्यटक नव्हते, यात्रेकरू होते. अपवाद फक्त मी आणि माझा धाकटा भाऊ. हिमालर पाहायला मिळतोय, आणि आतापर्यंत सह्याद्रीतलं ट्रेकिंग खूप झालं होतं. हिमालयीन ट्रेंकिंगचा अनुभव घ्यायचा होता. तो या निमित्ताने पूर्ण होईल एवढीच त्यामागची भूमिका होती. आग्रा, मथुरा, दिल्ली करत आम्ही जम्मूमध्ये पोहचलो. तोवर काश्मीर म्हणजे केवळ कुडकुडवणारी थंडी असाच पुस्तकी भाबडा समज. जम्मूत जेव्हा घामाच्या धारा आणि माश्रांचे थैमान तिथल्या गुजराती धर्मशाळेत पुढच्या प्रवासाची वाट पाहत अनुभवलं; तेव्हा ऐकतो तसं नसतं याचा पहिला साक्षात्कार झाला. त्या वर्षी म्हणे काश्मीरमध्ये साठ-सत्तर वर्षांच्या कालावधीनंतर असा उकाडा सुरू झाला होता. लोक घराच्या गच्चीवर थंड हवेसाठी झोपत होते.
जम्मू हा काश्मीरचाच भाग असूनही काश्मीरबद्दल खूप काही ऐकले होते ते जम्मू दर्शनाने भ्रम ठरतो की काय, अशा मनःस्थितीत पहेलगामला जाणाऱ्या खाजगी बसमध्ये बसलो. त्याच्या आधी बसची वाट पाहत एका पोलीस स्टेशनजवळ थांबलो होतो. स्टेशनमधून कुणाला तरी बेदम मारहाण होऊन त्याच्या जिवघेण्या किंकाळ्या बाहेरपर्यंत ऐकायला येत होत्या. खिडकीतून डोकावून पाहिले तर खरोखरीच दोन हवालदार आणि एक इन्स्पेक्टर एका इसमाला उघडाबंब करून लाथा बुक्क्यांनी तुडवत होते. बाहेर उभा असलेला हवालदार हळूच आमच्या कानात कुजबुजला, “गरिबों का कोई दाता होता नहीं. अगर इसके पास पैसे होते तो इतना मार क्यों खाता?” एकूण कुठलाही प्रांत असो, पोलिसांची कार्यपद्धती तिच. बस निघाली. आणि दोन-चार मिनिटांतच शेजारून मोटरसारकलवरून दोघे कुणीतरी बसला समांतर आले. मागे बसलेल्या एका तरुणाने बसच्या दर्शनी काचेवर जोरदार आपल्या हातातल्या लाठीने प्रहार केला. खळकन् काच फुटली, तशी आमच्याही काळजात धडकी भरली. क्षणभर वाटले, ‘अतिरेक्यांनीच आपल्या बसवर हल्ला केलाय की काय?’ कारण त्या काळात चाललेल्या काश्मीरमधल्या हिंसाचाराबद्दल आणि त्यामागे असलेल्या फुटीरतावादी अतिरेक्यांबद्दल वाचून, ऐकून आणि टीव्हीवर पाहून होतो. नंतर बसवाल्यांनीच उलगडा केला की, त्यांच्या धंद्यातल्या प्रतिस्पर्ध्यांनीच केलेला तो हल्ला होता. अतिरेक्यांशी त्यांचा काही संबंध नाही. अतिरेकी असे प्रवासी बसवर हल्ले करतही नाहीत. बसवाल्याचं ते सांगणं आम्ही प्रवाशांची समजूत काढण्यासाठी असेल असंच गृहीत धरलं. कारण वृत्तपत्रांत वाचलं होतं की, लष्कर-ए-तोयबाने अमरनाथ यात्रेकरूंच्यावर हल्ला करण्याची धमकी दिली होती.
पहेलगाममध्ये भल्या पहाटे पोहचलो. अमरनाथ यात्रेकरूंच्या व्यवस्थेसाठी असलेल्या लष्करी कॅम्पमध्ये प्रवासी म्हणून नावे नोंदवण्यासाठी गेलो. दुसऱ्या दिवशी प्रवासाला निघण्याची परवानगी मिळाली. सांगितलेली फी भरून आम्ही लष्करांनीच उभ्या केलेल्या तंबू निवासाकडे आलो. तर तिथे कर्नाटकी जवान भेटला. आमच्यातले निम्मे कर्नाटकचे असल्याने त्याला खूपच आनंद झाला. आम्हाला म्हणाला, ‘जर आधी भेटला असतात तर तुम्हाला फी भरावी लागली नसती.’ त्याच्या या सांगण्यामुळे आम्हालाही मग तो आधी न भेटल्याची विनाकारण हळहळ लागून राहिली. अमरनाथचा पहिला टप्पा चालताना देशभरातून आलेले विशेषतः महाराष्ट्र आणि गुजरात इथले यात्रेकरू भेटत होते, दिसत होते. घोडेवाले-जे आपल्या घोड्यांवरून यात्रेकरू आणि त्यांचे सामानही वाहून नेत होते. पिठ्ठू- जे आपल्या पाठीवरून यात्रेकरूंचे सामान वाहून नेत होते. माझ्या मागेही एक बारा-चौदा वर्षांचा मुलगा सरजीऽ.. सरजीऽऽ म्हणत माझे सामान म्हणजे माझी हॅवर सॅक वाहून नेतो म्हणून विनवत होता. मीही सुरुवातीला पहाड चढण्याच्या उमेदित होतो. पण दोनशे फूट चढल्यावर माझा सगळा उत्साह संपून गेला. मी माझी हॅवर सॅक त्या मुलाकडं, जावेदकडं दिली. माझ्या नेहमीच्या सवयीनं मग त्याच्या कुलाशिलाची मी चौकशी सुरू केली. त्यानेही मोठ्या कौतुकाने सांगितले. तो आठवीत शिकतोय. त्याला कलेक्टर व्हायचंय. त्याचा भाऊ भारतीय लष्करात आहे. बहिणीचं एका प्राध्यापकाबरोबर लग्न ठरलंय. बापाचं पहेलगाममध्ये भाजीपाल्याचं दुकान आहे वगैरे, वगैरे. पहाडाच्या माथ्यावर गेल्यावर पहिला टप्पा संपला. मी त्याला ठरल्याप्रमाणे ५० रुपये दिले. मुलगा निघून गेला. त्याच्या सोबत असलेला आणखी एक मुलगा तिथं रेंगाळत होता. तो हसत हसत मला म्हणाला, “सरजी, बहुत बाते बनाता था जावेद.” मग त्याने खुलासा केला, ‘जावेद तुमच्याशी खोटं बोलत होता. त्यानं कधीच शाळा सोडलीय. त्याचा भाऊ ‘विद्रोही’ म्हणून अतिरेक्यांमध्ये सामील झाला आहे. कदाचित इंडियन लष्कराने त्याला मारलंही असेल. त्याची बहीण अजून घरात लग्नाची आहे. आणि त्याचा बाप याच मार्गावर घोडेवाल्याचं काम करतोय.’
जावेद माझ्याशी का खोटं बोलला असेल या विचारात मी पडलो होता. एवढ्यात खुद्द जावेदच पळत आला. माझ्या हातात पन्नासची नोट ठेवत म्हणाला, “सरजी, आपने गलतीसे पचास रुपये जादा दिए थे.” मी एकाच वेळी थक्क झालो आणि गोंधळलोही. विचार करत होतो, हा मुलगा खोटारडा की प्रामाणिक? त्या क्षणी मला माझ्या प्रश्नाचं नीटसं आकलन झालं नव्हतं. पण आज जेव्हा मी एकूण काश्मीर भटकल्यानंतर काश्मिरी माणसाचा ‘मानस’ समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहे. तेव्हा लक्षात येतं की, जावेद हा मला भेटलेला पहिला काश्मिरी माणसाच्या दुभंग जीवनाचा पहिला प्रतिनिधी होता.
पुढं तीन-चार दिवस तो अमरनाथचा रस्ता चढताना घोडेवाले आणि पिठ्ठू दोघांचही निरीक्षण करत होतो. त्यांच्याशी बोलतही होतो. एक गोष्ट लक्षात आली की, हे सगळे मुसलमान आहेत. औषधालाही हिंदू मजूर शोधावा लागत होता. दुसरी गोष्ट अशी की स्वतःच्या आणि कुटुंबाच्या जगण्यापलीकडे त्यांना इतर बाबींवर विचार करायलाही त्यांच्या दारिद्रयाने सवड दिलेली नाही. एके ठिकाणी एक तरुण घोडेवाला वाटेत चाललेल्या यात्रेकरूंच्या अनैतिक वाटलेल्या दंगामस्तीकडे पाहून मला म्हणाला, “सरजी, देखो अल्लाह ताला के रास्तें पर रे सब लोग जा रहे है, और कैसा बरताव कर रहे है. इससे शिवजी प्रसन्न हो सकते है क्या?” त्याच्या या केवळ श्रद्धाळू प्रश्नाला या श्रद्धेचा आव आणून आलेल्या यात्रेकरूंच्या वतीनं मी काय उत्तर देणार?
यात्रेच्या वाटेवर यात्रेकरूंसाठी शेकडो लंगर लागलेले. लंगर म्हणजे यात्रेकरूंसाठी धर्मादाय मोफत भोजनाची व्यवस्था. अक्षरशः तेला-तुपातले मस्त अस्सल पदार्थ. यात्रेकरू यथेच्छ आस्वाद घेत होते. शिवार जास्त झाले म्हणून काही अन्न फेकूनही देत होते. वाटभर अशी नासाडी खूपच दिसायची. पण या लंगरमध्ये जेवण्याची वा भूक लागले म्हणून एखादा पदार्थ मागून घेण्याची सुद्धा परवानगी आणि परंपरा पिठ्ठू आणि घोडेवाल्यांसाठी नव्हती. वाटेत त्यांनी स्वतःचे खास वसती आणि जेवण्यासाठी स्वतःचे तंबू उभारून सोय केलेली. वाटेत एके ठिकाणी एक पिठ्ठूला एका लंगरमधले स्वयंसेवक यथेच्छ कुचलत होते. चौकशी केल्यावर कळले की, लंगरमधले प्रसादाचे जेवण जेवण्याचे महापाप त्याच्या हातून घडले होते. अमरनाथच्या गुंफेत बसलेले शिवजींचा शोध कुणा एका मुसलमान धनगरानेच लावला होता, अशी अमरनाथ गुंफेची शोधाची कहाणी सांगितली जाते. अलीकडेच जगमोहन नावाच्या काश्मीरच्या राज्यपालांनी, हिंदू प्रेमापोटी अमरनाथ देवस्थानाचे स्वतंत्र बोर्ड निर्माण केले आहे. परंतु तत्पूर्वी कित्तेक वर्षे या रस्त्याची आणि यात्रेकरूंची काळजी मलिक नावाचे एक मुस्लीम कुटुंबच घेत होते, असाही अमरनाथचा इतिहास सांगितला जातो. तरीही भोलेनाथाच्या नावावर दिला जाणारा प्रसाद मुसलमानाला दिले तर पुण्य लाभणार नाही अशी या पुण्याची साठवणूक करणाऱ्या लंगरवाल्या हिंदू सावकारांना केवढी खात्री!
तिथून श्रीनगरमध्ये आलो. सोबतच्या पर्यटक यात्रेकरूंना काश्मीरच्या आठवणी विकत घेऊन आपल्या घरी न्यायचे असल्यामुळे काश्मिरी शाली मिळणाऱ्या एका दुकानात गेलो. दुकानाचे मालक दोघे बंधू होते. काश्मिरी मुस्लीम. अब्दुल आणि अल्ताफ. आठवणींचा खूप मोठा साठा सोबत पाहिजे असल्यामुळे खरेदीला रात्रीचा एक वाजला. त्याकाळी काश्मीरची परिस्थिती अतिरेक्यांच्यामुळे खूपच तंग केली किंवा भासवली जात होती. आता आमच्या निवासी हॉटेलपर्यंत कसे जायचे? याची आम्हांला चिंता पडली होती. दोघांही बंधूंनी आम्हाला आश्वस्त करत सांगितले, “अजिबात काळजी करू नका. इथल्या अतिरेक्यांपेक्षा पोलिसांचीच जास्त भीती. तरीही आम्ही तुम्हांला सुरक्षित तुमच्या निवासस्थानी पोहचवतो. फक्त तुम्ही आमच्यासाठी एक करा. आमच्यासाठीच नव्हे, अख्खया काश्मीरसाठी. इंडियातून तुमच्यासारखे खूप पर्यटक पहिल्यासारखे इथं यायला हवेत. काश्मीर असुरक्षित नाहीय. इथली सामान्य जनता तुम्हा इंडियन लोकांवरच अवलंबून आहे याचं भान ठेवा.”
काश्मीरची ही मला झालेली त्या भेटीतली दुसरी ओळख! त्याचा नेमका अर्थ कळायला पुढे बराच काळ जावा लागला. जेव्हा मी मागील वर्षी दुसऱ्यांदा काश्मीरला गेलो, त्यावेळी मात्र काश्मीर समजून घेणे हाच एकमेव मुख्य हेतू होता.
गोव्याच्या राजधानीत पणजीत आशियाई पत्रकार संमेलनात राबिया प्रथम भेटली. चहा पिण्यासाठी हॉटेलच्या रेस्टारंटमध्ये शिरत होतो. त्यावेळी आपणच सहज पुढे येत म्हणाली, “मी राबिया. श्रीनगरहून आलेय.” श्रीनगर म्हटल्याबरोबर मी खूपच अॅलर्ट झालो. काश्मीरमध्ये मला कुणीतरी संपर्क हवाच होता. मी तिच्याकडे नीट निरखून पाहिलं. अगदी काश्मिरी सफरचंदासारखी लालबुंद आणि देखणी, पण ते सफरचंद फुगून भोपळ्याएवढं झाल्यासारखी गरगरीत. डोक्याभोवती काश्मिरी मुलीसारखाच स्कार्फ बांधलेला. मी तिच्या हातात हात मिळवत म्हटलं, “बरं झालं. मला काश्मीरला यायचंच आहे. तिथल्या पंडितांचा नेमका प्रश्न समजून घ्यायचा आहे.” ती माझ्याकडे डोळे बारीक करून पाहत म्हणाली, “हरकत नाही. माझा तुला नक्कीच उपयोग होईल. कारण आता जरी मी मुस्लीमधर्मी असले तरी मूळची मी पंडितच आहे.”
“ग्रेट. म्हणजे तू मला दोन्ही बाजू एकाच वेळी आणि तटस्थतेने दाखवू शकशील.”
“तू ये तर खरा. मग पाहू.”
चहाचा कप तोंडाला लावत आधीच हसऱ्या असलेल्या आपल्या चेहऱ्यावर तिनं हास्य आणत निमंत्रण देऊन टाकलं.
काश्मीरबद्दल आकर्षण होतंच. आता काश्मीरबद्दल कळत असलेल्या बातम्यांमुळे चांगलंच कुतूहलही तयार झालेलं. काश्मिरी जनतेला भारतात राहायचं नाहीय. पाकिस्तानबद्दल काश्मिरी जनता मुस्लीम असल्याने त्यांना सुप्त आकर्षण आहे. इथं हिंदूंचे जीवित व वित्त खूपच असुरक्षित झाले आहे. हजारो पंडितांची हत्या होते आहे. पाकिस्तानी अतिरेकी काश्मीरमध्ये धुमाकूळ घालताहेत. आता तिथे अफगानिस्तानमधल्या आणि मध्य आशियातल्या अनेक मुस्लीम अतिरेकी संघटना आपल्या कारवायांसाठी घुसलेले आहेत वगैरे वगैरे ऐकून होतो. माझे हिंदुत्वाचा अभिमान धरणारे आणि तो अभिमान बालपणापासून पोसणारे संघवाले मित्र तर यावर शपथपूर्वक बोलायचे. तिथल्या हिंदूच्या भवितव्याबद्दल अस्वस्थ होऊन गदगदायचे. पण माझ्या बिहार आणि ईशान्य भारताच्या प्रवासातून एवढं शिकलो होतो, “केवल सुनना बेकार चीज है. केवल देखना फसानेवाली बात है. आँख, कान और मन मस्तिष्क साथ मिलाकर देखें, तो कुछ समझ सकते हैं.” काश्मीरला या माझ्या कुतुहलापायी जाणं आता माझी गरजेची बाब झाली आहे. माझ्या प्रवास लेखनामुळे खूप चाहते मित्र मला मिळाले आहेत.
माझे तरुण वाचक मित्रही माझ्याबरोबर प्रवासाला यायला इच्छुक असतात. त्यांना उगीचच वाटते की राजाभाऊबरोबर फिरलो की आपल्यालाही अधिक काही वेगळे पाहायला मिळेल. हे जे त्यांना माझे वेगळे पाहणे वाटते ते मला गौतम बुद्ध, ह्युआन श्राँग, नामदेव, फुले, आंबेडकर यांच्यामुळे लाभले आहे. हे मी त्यांना अनेक वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. तरीही त्यांचा माझ्याबरोबर फिरण्याचा हट्ट असतोच. यावेळीही महेश करपे या माझ्या तरुण मित्राने माझ्याबरोबर रेण्याचा अगदीच हट्ट धरला. तेव्हा त्याच्यासह मी माझ्या मुलाला, रोहनला, जो चित्रकार आहे, काश्मीरचा कॅनव्हास त्याला आणखी चित्रसंपन्न करेल असे वाटून बरोबर घेतले.
डॉ. अभिजित वैद्यांची आरोग्यसेना अख्ख्या भारतभर कार्यरत आहे. नैसर्गिक आपत्ती असो वा माणसाचे प्रताप असो. डॉक्टरसाहेब आपल्या सेनेसहीत त्या त्या प्रांतात मदतीला धावतातच. त्यामुळे भारतभर त्यांचे सेनेचे मोठे जाळे तयार झाले आहे. काश्मीरमध्येसुद्धा त्यांचे असे जाळे असणार या खात्रीने डॉक्टरसाहेबांकडे त्यांचे काही काश्मिरी संपर्क मागितले. डॉक्टरांनीही अगदी तत्परतेने ते मला दिले. त्या काश्मीरमधल्या त्यांच्या मित्र कार्यकर्त्यांना, जे भविष्यातही आता माझेही मित्र होणार होते, त्यांच्याशी संपर्क केला. अगदी काश्मिरी गुलाबासारखे खुशमिजाज पद्धतीने त्यांनी मला काश्मीरमध्ये निमंत्रित केले. मी जाईपर्यंत मी कुठे राहायचे याची त्यांनी आधीच तयारी करून ठेवली असावी. जेव्हा श्रीनगरमध्ये पोहोचलो तेव्हा त्यांनी माझी ओळखदेख नसतानाही केवळ डॉक्टरसाहेबांच्यावर विश्वासून माझ्यासाठी केवढे कष्ट घेतले आहेत हे लक्षात आले.
रेल्वेने दिल्लीत पोहोचलो आणि रात्री खाजगी बसने जम्मूचा रस्ता धरला. पहाटे पहाटे जाग आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला अखंड मैदानी शेते. थोडीफार भाताची आणि गव्हाची पिके डोलताना दिसत होती. कुणीतरी शेजारी पुटपुटला, ‘जम्मू आलं.’ मागील वेळी जम्मूला आलो होतो, पण जम्मूचा हा मैदानी नजारा लक्षात आला नव्हता. नंतर मनातल्या मनात शाळेत शिकलेल्या भूगोलाची उजळणी करत बसलो.
सुरुवातीला कुठल्याशा छोट्याशा शहरात चाललोय, असं वाटणाऱ्या जम्मूत जेव्हा आत शिरलो तेव्हा गाव बरेच मोठे असल्याचे लक्षात आले. प्रत्येक गल्लीच्या तोंडावर एखादे लहान-मोठे मंदिर. जम्मू हे मंदिरांचे शहर आहे असे टुरिस्ट गाईडमध्ये वाचले होते. त्याचा नेमका अन्वयार्थ पावला पावलावर आपल्यावर नजर ठेवून असलेल्या मंदिरातल्या देवापेक्षा पुजाऱ्यांमुळे जास्त लक्षात आले. आपण नास्तिक आहोत आणि मराठी लेखक आहोत. त्यामुळे खिशात फारच कमी असलेल्या पैशाचे काही वैषम्य वाटले नाही. श्रीनगरच्या डॉक्टर गुरूचरणसिंहचे कुणी पाहुणे इथं जम्मूत राहत होते. आणि आमच्या स्वागताची व्यवस्था गुरूचरणनी त्यांना करायला सांगितली होती. त्यांनी मोठ्या कौतुकाने एका मोठ्या वाटणाऱ्या चांगल्याशा हॉटेलमध्ये आमची व्यवस्था केली होती. कॉऊंटरवरच्या रिसेप्शनिस्टला हळूच विचारून घेतले खोलीचे भाडे. आपल्या आवाक्यातले आहे म्हटल्यावर थोडासा सुटकेचा निःश्वास सोडून रूममध्ये फॅन सुरू करून गादीवर पडलो. तो थेट गुरूचरणसिंहचे पाहुणे आम्हाला भेटायला आल्यावरच उठलो.
सरदार बलवीरसिंग आपल्या सरदारी बाण्याने थेट मुद्द्यालाच हात घालून त्याचा निकालही लावून टाकतात लगेच. “तुम्ही काश्मीरचा अभ्यास करायला आलाय, असे आमचे साले म्हणाले.” इथं ‘साले’ म्हणजे मेहुणे असं आदरार्थी घ्यायचं. “कसला अभ्यास करताय हो? आतापर्यंत खूप अभ्यास झालाय काश्मीरचा. आता कृती हवी कृती. सगळा राजकारण्यांचा आणि पंडितांचा खेळ.”
“पंडितांचा?” मी दचकलोच. कारण काश्मीर म्हटल्यावर पंडितांची अवस्था हिटलरच्या नाझी राजवटीतल्या ‘ज्यूं’सारखी झालीय असंच आजपर्यंत ऐकून होतो. अनाहूत विचारलं, “ते कसं काय?” बलवीरसिंग आपल्या भरघोस दाढीमिशांतून हसताहेत हे त्याच्या भुरभुरत्या केसांवरून कळलं.
“ते आता तुम्हांला काश्मीर भटकताना कळेलच.” खरं तर काश्मीरसाठी सर्वांत जास्त रक्त सांडलंय आम्ही शिखांनीच. जरा नेहरूंनी दम धरला असता तर लाहोर भारतव्याप्त म्हणून ओळखलं गेलं असतं.” बलवीरसिंग स्वतःच्या वक्तव्यावर स्वतःच खुश होत हसतात.
“जम्मूमध्ये मुस्लीम लोकसंख्या किती असेल?” माझा बलवीरसिंगांचा बदलू पाहणारा ट्रॅक सावरण्याचा प्ररत्न.
“असेल की ३५-४० टक्के.” त्याचं किंचित बेफिकीर, किंचित अनुभवात्मक उत्तर.
“बाकी सगळे पंडित?” बलवीरसिंगांना माझी बाळबोध शंका. सरदारजी माझ्याकडे निरखून पाहतात. मग माझा गोंधळ आणि घोर अज्ञान लक्षात आल्यासारखं मला समजावून सांगू लागतात, “जम्मू आणि काश्मीरचे तसे तीन भौगोलिक विभाग पडतात. तुम्ही आता जिथे आहात ते जम्मू मैदानी प्रदेश आहे हा. पंजाबलगत. इथून पुढे हिमालयाच्या पर्वतरांगा लागतात. आता इथून दक्षिणेत्तर जाणाऱ्या ‘पीर पांजाल’ या पर्वत रांगा लागतात. त्याला खेटून पलीकडे व्हॅली किंवा दरी, जिला तुम्ही काश्मीर म्हणून ओळखता आणि मग पुन्हा हिमालयाच्या पर्वतरांगा जिथे लेह, लडाख हा पर्वतीय भाग आहे. जम्मू काश्मीर ब्राह्मण म्हणजे पंडित, म्हणजे व्हॅलीतले मूळ निवासी. अर्थात तिथेही पूर्वीपासून धर्मांतर होत असल्याने त्यांच्यातूनही मुस्लीम झालेले पंडित आहेत. म्हणजे आता जे बट्ट म्हणून मुस्लीम आहेत ते पूर्वीचे ‘भट्ट’च. बाकी सगळे हिंदू म्हणजे डोगरी. म्हणजे मूळचे राजपूत. काश्मीरचं राजघराणं डोगरीच. राजा हरिसिंग काश्मीर विलीनीकरणावेळी इथल्या राजगादीवर होता. मग आम्ही शीख, ख्रिश्चन पोटासाठी आलेलो.” आपल्या गरगरीत पोटावर आपला भलामोठा पंजा ठेवून खोली व्यापून हसतात. इतरांचे हसण्याचे क्षीण आवाज पार्श्वभूमीवर ऐकू येतात.
तेवढ्यात अजितसिंग, सरदारजींचा तरुण वारस थोडासा खवळल्यासारखाच बलवीरसिंगसाहेबांच्यावर ओरडला, “नही... नही... चाचा! आप आये होंगे पेट के लिए, लेकिन पहले ये कश्मीर सीखों के परवरीश मे था. राजा रणजितसिंह यहाँ के राजा थे. जब 1846 मे ब्रिटिशोंसे रणजितसिंहजी ने मात खाई तो ये सारा प्रदेश उनकी हिरासतमे चला गया. फिर यहाँ के डोगरी राजा को 75 लाख की किमत लेकर सालाना 12 घोडे, 12 पस्मीन शाल की लीज पर दिया गया. ये सिलसिला भारत स्वतंत्र होनेतक चलता रहा. लेकिन हम ही पहले इस मुल्क के शासक थे.” पुतण्याच्या या खुलाशावर सरदारसाहेब गंभीर झाले. आणि मग खुशही झाले.
“पण पंडित....” माझा पुन्हा पुन्हा गाडी रूळावर आणण्याचा प्रयत्न.
“पंडित मूळ काश्मीर खोऱ्यातलेच. पण १९९० सालानंतरच्या बदलत्या परिस्थितीनं ते भारतात ठिकठिकाणी स्थलांतरित होऊ लागले आहेत. मोठ्या संख्येने जम्मूमध्ये. मग दिल्ली, हरियाणा, मुंबई अशा प्रांतात. इथे जम्मूमध्ये सरकारने त्यांच्यासाठी मोठी पुनर्वसन कॉलनी बांधली आहे.” बलवीरसिंग.
“एकूण लोकसंख्येत किती टक्केवारी असेल त्यांची?” माझा प्रश्न.
“असेल की तीन चार टक्के.” बलवीरसिंगांचे मघासारखे तेवढ्याच बेफिकीरीने अनुमान उत्तर.
मग आपल्या व्यवसायाची म्हणजे दुकानाची आठवण आल्यावर नंतर भेटू म्हणून चाचा-भतिजा निघून गेले. सकाळ फौंडेशनच्या असिफ जमादारने मी काश्मीरला निघालोय म्हटल्यावर अधिक कदम या ‘बोर्डरलेस’ या संस्थेच्या तरुण अध्यक्षाची फोनवरून ओळख करून दिली होती. ही संस्था काश्मीरमधल्या अनाथ मुलांची पुणे आणि खुद्द काश्मीरमध्ये अनाथाश्रम चालवण्याचे काम करते. कारण काश्मीरमधल्या एकूणच हिंसाचाराच्या परिस्थितीमध्ये सततच अतिरेक्यांकडून अथवा पोलीस आणि लष्कराकडून मारल्या गेलेल्या कुटुंबातील अनाथ मुलांची भर पडत असते. अशा मुलांसाठी केंद्रशासन आणि राज्यशासनही रतीमखाने चालवण्यासाठी भरपूर प्रोत्साहन देत असते. काश्मीरमध्ये अशा संस्थांचे पेवच आहे. काही संस्था या हिंदुत्ववादी परिवारातील संघटनांनी तर काही संस्था मुस्लीम संघटनांनीही चालवलेल्या आहेत. अधिक कदमही अशीच एक संस्था चालवतो आहे. आणि त्याला काश्मीरमधल्या हिंदू आणि मुस्लीम दोन्हीही समाजातल्या कार्यकर्त्यांचे सहकार्य आहे. त्याने जम्मूमध्ये चाललेल्या त्याच्या संस्थेच्या काही कार्यकर्त्यांचा संपर्क पत्ता दिला होता. दुपारी रोहन, महेश आणि मी अधिकने दिलेल्या त्याच्या कार्यकर्त्यांच्या नंबरवर फोन केला. त्यांनी दिलेल्या पत्यावर मग त्यांच्या ऑफिसचा पत्ता शोधत गेलो. पत्ता शोधताना अनाहूतपणे एका अनाथालयात पोहोचलो. त्यांनी गेल्या गेल्या आत बोलावून स्वागत केले. चहा पाजला. त्यांच्या सचिवांशी भेट घालून दिली. सचिव कुणी रिटायर्ड कर्नल होते. ही संस्था राष्ट्रीय स्वरंसेवक संघाने चालवलेली. हिंदू अनाथ मुले-मुली ते सांभाळत होते. मी विचारले, ‘मुस्लीम मुले-मुली सांभाळता की नाही?’ सचिव गंभीर होत म्हणाले, “आम्हाला सांभाळण्यासाठी काहीच हरकत नाही. पण अशी मुले आमच्याकडे पोहचवलीच जात नाहीत.” कर्नलसाहेबांचे आभार मानून बाहेर पडलो तोपर्यंत महेशने आम्हांला हव्या असलेल्या कार्यकर्त्यांचे ऑफिस शोधून काढले होते. खरे तर या कार्यकर्ता चाटर्ड अकौंटंट होता. आणि दिल्ली आणि जम्मू इथं त्याचा टॅक्स कन्सलटंन्सीचा व्यवसाय होता. हे ऑफिस म्हणजे त्याचे व्यवसायाचे ठिकाण होते. कधीतरी अधिकच्या संपर्कात हा आला. अधिकच्या कामावरती खूश होत त्याचा सहकारी झाला. महत्त्वाचे म्हणजे हा ‘पंडित’च होता. काश्मिरी पद्धतीने त्याने सर्वांसाठी कावा मागवला. कावा म्हणजे काश्मिरी बिनदुधाचा पण मसाला घातलेला गोड चहा. कावा पित आमच्यात चर्चा सुरू झाली.
“साधारण कुठली मुलं तुमच्या या वसतीगृहामध्ये असतात?”
“जे आपली मुले अजिबात सांभाळू शकत नाहीत असे गरीब, शेतमजूर, युद्धात मारल्या गेलेल्या सैनिकांची मुले आणि अतिरेक्यांच्या गोळ्यांना बळी पडलेल्या नागरिकांची मुले. काही वेळा खुद्द मारल्या गेल्या अतिरेक्यांची मुलेही असतात.”
“मला असं एखादं तुमचं हॉस्टेल पहायला मिळेल काय?”
“इथून सात किलोमीटरवर आमचं एक मुलींचं हॉस्टेल आहे. पण मला आता वेळ नाही. आणि तुम्हांला परस्पर कुणी ते हॉस्टेल पाहू देणार नाहीत.”
“इथं पंडितांची काय अवस्था?”
“भारतीय असून भारतीय म्हणून जगता येत नाही. मुस्लीम राष्ट्रात राहिल्यासारखं वाटतंय.”
“गेल्या वीस वर्षांत किती पंडित मारले गेलेत?”
“हजारों.”
“नक्की आकडा सांगता येईल? तुमच्या जवळचं कुणी त्यात आहे?”
“कसा आकडा सांगणार? पंडितांची हत्या सुरू झाल्यावर बरेचसे पंडित इथून परागंदा झाले. भारतभर कुठे कुठे विखुरलेत. वाजपेयी सरकारने काही सोई आणि सवलती भारतभर निर्माण करून दिल्या म्हणून कसेबसे तगलो आहोत.”
“काय काय सोरी-सवलती दिल्यात?”
“महिना पाच हजार जगण्याचा भत्ता. राहण्यासाठी कॉलनी बांधून दिल्या. शिक्षणात आणि नोकरीत भारतभर विद्यापीठांमध्ये राखीव जागा निर्माण करून दिल्या.”
“या तर त्या आधीच्या काँग्रेस सरकारनेही केल्याच होत्या.”
“यात काँग्रेस सरकारनेच या मुसलमानांचे अती लाड केले. त्याचे दुष्परिणाम आम्ही भोगतो आहोत.”
“पण इथले बिगर पंडित पंडितांनादेखील याच कारणासाठी नावे ठेवताना मी ऐकतोय.” मी माझ्या सवयीने इतरांकडून जे ऐकले होते त्या आधारावर खडा टाकला. कारण रस्त्यावरच्या चहावाल्यांपासून ते मोठ्या हॉटेलवाल्यांपर्यंत जेव्हा जेव्हा मी पंडितांबद्दल विषय काढायचो, तेव्हा मुस्लीमांपेक्षाही त्यांच्या प्रतिक्रिया अधिक तीव्र असायच्या.
“हो. आमची जमात सर्वांत हुशार ना. नोकरशाहीत आणि पूर्वीही राजदरबारात आम्हीच वरचढ होतो. आमच्याकडे भरपूर जमिनी. हे सगळे आमची कुळं होती. मग ते आमचा दुस्वास करणारच. आमचा दुस्वास करण्यापेक्षा त्यांनी आपलं कर्तृत्व दाखवावं ना?” पंडितांचा स्वाभिमान दुखावला होता. मी अनेकदा विनंती करूनही त्यांनी त्या सात किलोमीटरवरच्या त्या हॉस्टेलला भेट देण्यापासून मला रोखलं. संध्याकाळी जम्मूच्या बाजारातून आणि मंदिरातून फिरताना एक गोष्ट अनुभवत होतो की, इथे पंजाबी ब्राह्मण वर्गाचं बरंच वर्चस्व आहे. पण त्यांनाही काश्मिरी पंडितांबद्दल एक प्रकारचा हेवायुक्त मत्सर आहे. रात्री रवीचा फोन आला. की जम्मूत आलोय. आणि उद्या श्रीनगरला निघणार आहे. रवी हा माझा भटक्या पण त्या आवडीतूनच आता टुरिस्ट कंपनी चालवणारा एक जिवलग मित्र. त्याचा आग्रह होता की, आम्ही त्याच्याबरोबर श्रीनगरला यावं. आम्हालाही श्रीनगरला निघायचे होतेच. यावेळी त्याच्याकडे केवळ एका कपलची हनीमून टूर होती. त्यामुळे गाडीत बरीच जागा रिकामी. रवीलाही केवळ टूरपेक्षा हे काश्मीर समजून घेणं अधिक आवडणारं होतं. त्यानं आमचं सामान गाडीच्या डिक्कीत जबरदस्तीनं टाकलं आणि श्रीनगरला निघण्यासाठी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जम्मू सोडलं.
(‘सत्याग्रही विचारधारा’च्या २०१४च्या दिवाळी अंकातून लेखकाच्या पूर्वपरवानगीने साभार)
लेखक इंग्रजीचे निवृत्त प्राध्यापक आणि प्रवासी लेखक आहेत.
rajashirguppe712@gmail.com
……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment