अजूनकाही
१. गोहत्या बंदीवरून देशभरात गदारोळ सुरू असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित राष्ट्रीय मुस्लिम मंचाने आता गोरक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. ईदच्या इफ्तार पार्टीमध्ये गोमांसभक्षण न करता गायीचं दूध प्यावे, असा संदेश या मुस्लिम मंचातर्फे दिला जाणार आहे. या संघटनेकडून ईदच्या वेळी बीफचे दुष्परिणाम आणि गायीच्या दुधाचं महत्त्व उपस्थितांना समजावून देण्यात येणार आहे.
एमआयएम किंवा मुस्लीम लीग यांनीही आता राष्ट्रीय हिंदू मंच स्थापन करून हिंदू बांधवांना गणेशोत्सव आणि दिवाळीतील ध्वनीप्रदूषणाच्या दुष्परिणामांबद्दल त्यांचं प्रबोधन करायला हरकत नाही. दिवाळीत तेलकट आणि पित्तकारक फराळाचे पदार्थ खाण्याऐवजी रोस्टेड तंदूर चिकन आणि शीरखुर्मासारख्या आरोग्यदायी पदार्थांचं सेवनच कसं योग्य आहे, याच्याही कार्यशाळा आयोजित करता येतील.
.........................................................................................................
२. आयपीएलचा हंगाम ऐन बहरात असताना वादग्रस्त क्रिकेट प्रशासक आणि आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी एका नव्या वादाला तोंड फोडलं आहे. ललित मोदींनी सोशल मीडियावर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचं कथित अपॉइन्टमेन्ट लेटर प्रसृत केलं आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि चेन्नई सुपरकिंग्जचे मालक एन. श्रीनिवासन यांच्या या पत्रानुसार धोनीला श्रीनिवासन यांच्या इंडिया सिमेंट कंपनीच्या चेन्नई कार्यालयात व्हाइस प्रेसिडेंट (मार्केटिंग) म्हणून नियुक्त करण्यात आले होते. भारतीय संघात अ वर्गातील खेळाडू असणाऱ्या धोनीला दरमहा केवळ ४३ हजार रुपये मानधन निश्चित करण्यात आले होते. तसेच त्याला इतर सुविधा आणि भत्तेही देण्यात येत होते.
आयपीएल ही क्रिकेट भ्रष्टाचाराची आधुनिक गंगोत्री ज्याने जन्माला घातली, त्या ललित मोदींसारख्या महाठगाने श्रीनिवासन यांच्याकडे आणि धोनीकडे आत्ता बोट दाखवावं, हेच पुरेसं बोलकं आहे. या सगळ्यांनी साटंलोटं करून क्रिकेटचा केवढा सत्यानाश करून ठेवला आहे, याची भाबड्या प्रेक्षकांना अजून कल्पना नाही. इंग्लंडमध्ये बसून या उठाठेवी करण्याऐवजी मोदी भारतात येऊन आपल्यावरचे खटलेही लढतील आणि शिक्षा भोगतील, तर त्यांच्या या आरोपबाजीला काही किंमत असेल.
.........................................................................................................
३. एकीकडे सत्तेत राहूनही शिवसेना सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्याविरोधात भूमिका घेत असते. प्रसंगी सत्तेतून बाहेर पडण्याच्या पोकळ डरकाळ्याही मारत असते. मात्र शिवसेनेने फडणवीस सरकारचा पाठिंबा काढला तरी शिवसेनेतील १७ आमदार भाजपसोबतच राहतील, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केला आहे. परिस्थिती अशीच राहिली तर २०१९ साली शिवसेनेच्या हातात फक्त काठी उरेल, झेंडा गायब झालेला असेल, असेही ते म्हणाले.
राणेसाहेब, शिवसेनेचं शिवसेना पाहून घेईल, त्यांना असेही त्यांचे मतदारही आता सिरीयसली घेत नसतील. लोकांना तुमच्याबद्दल मात्र खरोखरच फार उत्सुकता आहे. तुमच्या हातात काठी तरी आहे का? असल्यास तिच्यावर हाताचा पंजा फडकतोय की कमळ, याचाच कुणाला काही पत्ता नाही. त्याबद्दलही थोडी माहिती दिलीत तर बरं होईल.
.........................................................................................................
४. नक्षलवादी हे विविध राज्यांतील जंगलांमध्ये दडून हिंसक कारवाया करीत असले तरी देशातील विविध विद्यापीठांमध्ये त्यांचे बुद्धिजीवी पाठीराखे ठाण मांडून बसले आहेत. त्यांच्याही मुसक्या आवळणे आवश्यक आहे, अशी ‘सूचना’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. छत्तीसगडमधील सुकमा येथे नक्षलवाद्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर केलेल्या भीषण हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दहा नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित केली होती. त्यात फडणवीस म्हणाले, ‘नक्षलवाद्यांच्या कारवाया ही आपल्यासाठी चिंतेची बाब आहेच, पण त्याचसोबत त्यांचे बुद्धिजीवी पाठीराखे ही देखील चिंतेची बाब आहे. पुणे, हैदराबाद, दिल्ली, पाटणा यांसारख्या विद्यापीठांमध्ये नक्षलवाद्यांचे उदात्तीकरण करणारी शहरी मंडळी बसली आहेत. न्यायव्यवस्थेमध्ये त्यांची लुडबूड असते. नक्षलवाद्यांना ते कायदेशीर सेवा पुरवितात, असा ठपका मुख्यमंत्र्यांनी ठेवला.
येनकेनप्रकारेण बुद्धिजीवींच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत, हवं तर त्यासाठी त्यांना नक्षलवादसमर्थक ठरवता येईल, हा फडणवीसांच्या बोलण्याचा थेट अर्थ. नक्षलवादाबद्दल सहानुभूती असणं, म्हणजे नक्षलवादी असणं नव्हे, असा निर्वाळा न्यायव्यवस्थेनं दिला आहे. नक्षलवादाच्या कारणांवर दीर्घकालीन उपाययोजना करण्यात राजकीय व्यवस्थेला जे अपयश आलं आहे, त्याबद्दल त्यांचं काय करायचं, हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाही. देशभरात जो फॅसिस्ट उन्माद सुरू आहे, त्याचे समर्थकच नव्हेत, तर थेट त्यांचे प्रतिनिधी सत्तेत बसले आहेत, त्यांच्या मुसक्या कधी आवळायच्या?
.........................................................................................................
५. भ्रष्टाचारी मंत्र्यांना फाशी दिली पाहिजे. माझी ही आधीपासूनची भूमिका आहे, असं सांगून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्यांची भ्रष्टाचाराविरुद्धची ठाम भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या बोलण्याचा रोख दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे होता की नाही हे सांगणं त्यांनी टाळलं.
अहिंसक माणूस जेव्हा हिंसेची भाषा बोलतो, तेव्हा तो हिंस्त्र माणसाला लाजवेल इतका हिंसक होतो. अण्णांना आपलं हे खुनशी तर्कट आताच मांडावंसं वाटलं किंवा त्याचा पुनरुच्चार करावासा वाटला आणि वर ही माझी जुनीच भूमिका आहे, अशी केविलवाणी मखलाशी करावी लागली, यातच काय ते आलं.
editor@aksharnama.com
……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Nilesh Pashte
Tue , 09 May 2017
LOL
Nilesh Pashte
Tue , 09 May 2017