अजूनकाही
१. अरविंद केजरीवाल यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपांतर आपल्याला दु:ख झालं असल्याची प्रतिक्रिया त्यांचे एकेकाळचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ समाजसेवक हजारे यांनी दिली. दिल्लीतल्या ‘आप’ सरकारमधले मंत्री कपिल मिश्रा यांनी केजरीवालांवर सत्येंद्र जैन या दुसऱ्या एका आप नेत्याकडून दोन कोटी रुपये स्वीकारल्याचा आरोप केला आहे. “मी गेली ४० वर्षं भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा दिला आहे. ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’मुळेच अरविंद केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोचले. पण आता त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आऱोप होत आहेत. माझ्याकडे शब्दच नाहीत.”
उगी उगी अण्णा, उगी उगी! अहो, ते राजकीय नेते आहेत. त्यांच्यावर आरोप तर होणारच. केवळ आरोप केल्याने कोणी भ्रष्ट सिद्ध होत नाही, हे तुमच्यासारख्या, आरोप करण्यात तरबेज, समाजसेवकाला माहिती असायला हवं. केजरीवाल जणू भ्रष्ट सिद्ध झाले आहेत, अशा थाटात कशाला नक्राश्रू ढाळताय? इतकं भयंकर व्यथित वगैरे होण्यासाठी आधी केजरीवालांविरोधातले आरोप सिद्ध होईपर्यंत तरी वाट पाहा.
..........................................................................................
२. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपण राष्ट्रपतीपदाच्या स्पर्धेत नसल्याचे स्पष्ट केले असले तरी शिवसेनेने पुन्हा एकदा राष्ट्रपतीपदासाठी त्यांचं नाव पुढे केलं आहे. हिंदू राष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरसंघचालक भागवत यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरावे असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडले आहे.
राष्ट्रपतीपद हे मुळात रबर स्टँपचं पद. शोभेचा बाहुला. त्यात सर्वसमावेशक सामाजिक काम करून ते लोकाभिमुख बनवण्याची थोडीफार संधी असते. या पदाला राजकीय महत्त्व शून्य. तिथे भागवत बसले की राज्यघटनेत जादूच्या कांडीने बदल होऊन ३१ टक्क्यांच्या मताच्या जोरावर देशाला हिंदूराष्ट्र घोषित करता येईल, हा आडाखा शिवसेनेने कशाच्या आधारावर बांधला असेल? शिवाय हेच देशाचं मुख्य लक्ष्य आहे, हेही त्यांनी कशाच्या आधारावर ठरवलं असेल?
..........................................................................................
३. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रचंड जनादेश मिळाला असल्यामुळे केवळ तेच काश्मीरचा प्रश्न सोडवू शकतात, असे सांगून जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी त्यांना काश्मीर खोऱ्याला दलदलीतून बाहेर काढण्याचे आवाहन केले. आपले वडील मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या राजवटीदरम्यान पूर्वीच्या रालोआ सरकारने जम्मू-काश्मीरसाठी आखलेले धोरण कायम ठेवण्यात यूपीए सरकार अपयशी ठरल्याने लोकांच्या मनात जो संताप साठलेला होता, त्यामुळेच राज्यात सध्याची परिस्थिती दिसत असल्याचे काश्मीर खोऱ्यातील वाढत्या निदर्शनांना तोंड देत असलेल्या मेहबूबा म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तानभेटीचं समर्थन करून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यात पाकिस्तानला भेट देण्याचे धैर्य नव्हते, असा टोलाही त्यांनी हाणला.
हत्तीला आता काश्मीरचा राष्ट्रीय प्राणी घोषित करायला हरकत नाही. तो खूप गोष्टी दीर्घकाळ लक्षात ठेवतो म्हणे. ज्या काळात लोकांच्या मनात संताप येत होता, तो त्यांनी त्या काळात व्यक्त केला नाही; त्या संतापाशी काहीच संबंध नसलेलं पीडीपी-भाजपचं सरकार सत्तेत येईपर्यंत ते वाट पाहात बसले, हे विधान मेहबूबा यांच्या विनोदबुद्धीची साक्ष देणारं आहे. शिवाय, विद्यमान पंतप्रधानांच्या अचानक पाकिस्तानभेटीतून उभय देशांमध्ये किती प्रेमाचे पूर वाहतायत, ते रोज बातम्यांमधून दिसतंच आहे. मोदी हा प्रश्न सोडवायला सक्षम आहेत की नाहीत, हे काळ ठरवेल; पण, सध्याची परिस्थिती मेहबूबा आणि मोदी यांनीच मिळून निर्माण केली आहे, ती त्यांनाच निस्तरावी लागेल, एवढं खरं.
..........................................................................................
४. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएसनं गर्भधारणा विज्ञान संशोधन केंद्राच्या माध्यमातून गर्भातच मुलांना चांगले संस्कार देण्याचा दावा केला आहे. त्यासाठी संघाची सहयोगी संघटना आरोग्य भारती प्रयत्नशील आहे. या कार्यक्रमाला ‘गर्भसंस्कार कार्यशाळा’ असे नाव देण्यात आले आहे. डॉ. करिश्मा नरवीन या गुजरातमधील जामनगरमध्ये एका आयुर्वेदिक विश्वविद्यापीठात एक अतिथी व्याख्याता आहेत. त्या कार्यशाळेला संबोधित करण्यासाठी कोलकात्यात येणार आहेत.
मुलांवर चांगले संस्कार करणार म्हणजे काय करणार? संघाचे संस्कार म्हणजे चांगले संस्कार, असं नासा किंवा युनेस्कोने जाहीर केलं आहे काय? चांगल्या संस्कारांची काही सर्वसमावेशक व्याख्या वगैरे आहे का? एकाला जे चांगलं वाटेल, ते दुसऱ्याला वाईट वाटेल, त्याचं काय? आरोग्य भारतीच मुलांवर संस्कार करणार तर मुलांचे आई-वडील फावल्या वेळात कंचे खेळतील की पतंग उडवतील?
..........................................................................................
५. सीमेवर जवान सुरक्षित नाहीत आणि गावात शेतकरीही सुखी नाहीत, अशी परिस्थिती सध्या देशात निर्माण झाल्याची टीका विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी केली आहे. उत्तर प्रदेशातील एका कार्यक्रमाच्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना तोगडिया यांनी मोदी सरकारच्या कारभारावर अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. सध्या देशात अशी परिस्थिती आहे की, सीमेवरचा जवान सुरक्षित नाही आणि गावातील शेतकरीही सुखी नाहीत. सीमेवर कोणी जवानांचा शिरच्छेद करतो आणि गावात शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव मिळेनासा झालाय. पूर्वी एका क्विंटल मिरचीला १२ हजार रूपये मिळायचे. मात्र, आता तेवढ्याच मिरचीसाठी १५०० रुपये मिळताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहेत. तूरडाळ आणि अन्य उत्पादनांच्याबाबतीतही तीच स्थिती आहे. जवळपास सर्वच पिकांच्या किमती घसरल्या आहेत, असे तोगडिया यांनी म्हटले.
तोगडिया हे एकदम ‘तागडिया’ कुठून बनले? सीमेवरचे जवान, शेतातले किसान यांच्याशी तुमचा कधी काही संबंध होता का तोगडिया? लोक जगोत नाहीतर मरोत; आपण फक्त मंदिर वही बनायेंगे म्हणून थयथयाट करायचा आणि हिंदूंना मुसलमानांविरुद्ध भडकवायचं, हाच तुमचा उदयोग. त्यातून हा पक्ष सत्तेवर आला आणि गो-गुंडगिरीछाप हिंदुत्ववादी कार्यक्रम सुरू झाले. आता आनंदाने नाचा की मस्त!
editor@aksharnama.com
……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment