भीमसेन देठे : शोषित-वंचितांचा भाष्यकार
संकीर्ण - श्रद्धांजली
टीम अक्षरनामा
  • भीमसेन देठे आणि त्यांची ग्रंथसंपदा
  • Mon , 08 May 2017
  • संकीर्ण श्रद्धांजली भीमसेन देठे Bheemsen Dethe तुफानातील दिवे Toofanatil Dive इस्कोट Iskot

ज्येष्ठ साहित्यिक भीमसेन देठे यांचं ६ मे २०१७ रोजी मुंबईत कर्करोगाच्या आजारानं निधन झालं. ते ७०वर्षांचे होते. गेली दोन वर्षं ते रक्ताच्या कर्करोगानं आजारी होते.

देठे यांनी उदरनिर्वाहासाठी सरकारी नोकरी केली. त्यातून निवृत्त झाल्यानंतर मात्र त्यांनी स्वत:ला समाजकार्यात झोकून दिलं होतं. देठे यांनी मोजकीच पण लक्षणीय साहित्यनिर्मिती केली. ती करताना त्यांनी प्रस्थापित साहित्यातले मानदंड आपल्या परीनं मोडण्याचा प्रयत्न केला. प्राकृत मराठी भाषेचा वापर आंबेडकरी साहित्यात केला. कल्पनारंजनाच्या मागे न धावता आपल्या साहित्यातून समाजवास्तवाला भिडण्याचा प्रयत्न केला. आपल्यापरीनं समाजाशी झोंबी घेतली. त्यांच्या निधनानंतर मुलगी आणि पत्नी यांनी त्यांना अग्नी दिला, ही घटनाही बरीचशी सूचक आहे.

भीमसेन देठे हे दलित साहित्यातील एक लक्षणीय नाव. ते मूळचे मंचरचे. ते राहत असलेल्या सिद्धार्थनगरमध्ये राजानंद गायन पार्टी होती. शाहीर भीमानंद देठे या पार्टीचे कार्यक्रम करत. या शाहीराला साथ द्यायला म्हणून वस्तीतल्या मुलांसह देठेही जायचे. त्यांचं बोट पकडून देठे यांनीही शब्द जुळवायला सुरुवात केली. त्यातून कधी गाणी, तर कधी कविता तयार होऊ लागल्या. दहावीनंतर देठे पुढील शिक्षणासाठी मोठ्या भावासोबत मुंबईला आले. सिद्धार्थ महाविद्यालयात दाखल झाले. तिथं त्यांना शिकवायला होते, प्रा. रमेश तेंडुलकर. त्यांनी देठे यांच्या पहिल्याच निबंधाचं भर वर्गात कौतुक केलं. मुंबईचं मायावी जग पाहून बावरलेल्या देठेंना या कौतुकानं हायसं वाटलं. पुढे त्यांची एक कविता तेंडुलकरांनी महाविद्यालयाच्या वार्षिकात छापली. त्याने खेड्यातल्या या मुलाला आत्मविश्वास आला.

देठे गोरेगावात जिथं राहत होते, तिथं त्यांच्याजवळच दया पवारही राहत. त्यांच्यासह काही मित्रांनी मिळून ‘संबोधी’ नावाची वाङ्मयीन संस्था सुरू केली. त्याअंतर्गत कवितांच्या मैफली झडू लागल्या, स्पर्धेसाठी नाटकं केली जाऊ लागली. झोपडपट्टीतल्या मुलांसाठी उजळणी वर्ग सुरू केले गेले. तर दुसरीकडे देठे यांच्या कविता ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘अस्मितादर्श’, ‘निकाय’, ‘आयुध’, ‘पूर्वा’ या नियतकालिकांच्या दिवाळी अंकांत येऊ लागल्या. ‘होरपळ’ या देठे यांच्या कवितासंग्रहाला तेंडुलकरांनी प्रस्तावना लिहिली. तेव्हाच त्यांनी या कवीतल्या कथा-कादंबरीकाराची बीजं हेरली होती. जी पुढे खरी ठरली.

देठे निखिल वागळे यांच्या हस्ते दया पवार स्मृती पुरस्कार स्वीकारताना

दरम्यान दया पवारांचं ‘बलुतं’ हे आत्मकथन प्रकाशित झालं. या पुस्तकाचा देठे पहिला श्रोता. नंतर पुस्तक वाचून देठेंनी पवारांना पत्र लिहिलं. तेव्हा पवारांनी ‘तुम्ही कादंबरी छान लिहाल’ असं त्यांना कळवलं. देठे यांनाही हा वाङ्मयप्रकार साद घालत होताच. त्याने उचल खाल्ली आणि ‘इस्कोट’ ही कादंबरी लिहिली गेली. ती बरीच गाजली. ‘भीमसेन देठे यांची ‘इस्कोट’ कादंबरी म्हणजे समाज-पुरुषाच्या वेदनेची हृदयस्पर्शी कहाणी आहे’ असे उदगार तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी काढले. या कादंबरीचे वाचन प्रसिद्ध कथाकार अरविंद गोखले यांच्या पुढाकाराने साहित्य-सहवासमधील साहित्यिकांसमोर झाले...नि देठे कादंबरीकार झाले.

पुढे देठे कथेकडे वळले. अण्णा भाऊ साठे, शंकरराव खरात, बाबुराव बागूल यांच्या कथांनी ते प्रभावित झाले होते. ‘तुफानातील दिवे’ या त्यांच्या पहिल्या कथासंग्रहातील कथा या साठे-खरात-बागूल यांच्या तोडीच्या आहेत. सर्व जातिधर्मातील माणसं ही वंचित, शोषित असतात. त्यांच्या आयुष्यातल्या तुफानाला ती न घाबरता त्याविरुद्ध संघर्ष करत राहतात. या कथासंग्रहातील माणसंही तशीच आहेत.

‘इस्कोट’, ‘घुसमट’, ‘झाकळ’ या कादंबऱ्या; ‘तुफानातील दिवे’, ‘इंगा’, ‘गिऱ्हाण’, ‘रिडल्स’ हे कथासंग्रह; ‘योद्धा’, ‘बांडगुळ’ ही नाटकं आणि ‘होरपळ’ व ‘कृष्णमेघ’ हे कवितासंग्रह ही देठे यांची साहित्यसंपदा. ‘डबुलं’ हे त्यांचं आत्मकथनही दोन वर्षांपूर्वी प्रकाशित झालं आहे. ‘तुफानातील दिवे’ या कथासंग्रहात देठे यांनी म्हटलं आहे – “माझ्या जीवनाच्या वेगवेगळ्या वळणावर जी माणसं भेटली ती नुसती दलित नव्हे तर इतर जातिधर्माचीही होती. त्यांची सुख-दु:ख माझी झाली. स‌र्व अर्थाने ही माणसं माझा झाली. माझ्या जीवननिष्ठेशी या माणसांनी संवाद साधला आहे.” स्वातंत्र्य, समता, न्याय या मूलभूत हक्कांच्या जाणीवेनं जागा झालेला, त्यासाठी संघर्ष करणारा समाज हा देठे यांच्या लेखनाचा आत्मा होता.

पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानतर्फे २०१५सालच्या दया पवार स्मृती पुरस्काराने देठे यांना गौरवण्यात आले होते. तसेच महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार’ त्यांना २०१३-१४ या वर्षासाठी देण्यात आला होता. त्यांच्या निधनानं निरलसपणे आपलं काम करणारं आंबेडकरी साहित्यातील एक व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेलं.

editor@aksharnama.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......