अजूनकाही
२३ एप्रिल हा जगविख्यात नाटककार शेक्सपिअरचा जन्मदिन आणि मृत्यदिनही. शेक्सपिअरचा जन्मदिन ‘जागतिक पुस्तक दिन’ म्हणून साजरा केला जातो. शेक्सपिअरच्या नाटकातील अनेक पात्रं अजरामर झाली आहेत. त्यांचे वेगवेगळे अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न जगभरचे समीक्षक करत असतात. म्हटलं तर शेक्सपिअरच्या म्हटलं तर त्याच्या नसलेल्या एका पात्राला लिहिलेलं हे मानपत्र...
……………………………………………………………………………………………
“लहानपणी तुमच्यात असलेल्या गुणांचं खूप कौतुक होतं. जस जसं तुमच्या गुणांचं चीज होऊ लागतं तसे तुमचे मित्र… तुमचा सहवास वाढू लागतो. लोक तुम्हाला जवळ करू लागतात. पुढे तुम्हाला मिळणाऱ्या यशामुळे तुम्ही अनेकांच्या नजरेत येऊ लागता. आता लोक तुमच्या जवळ येऊ लागतात. याच लोकांना बरोबर घेऊन तुम्ही तुमचा पुढचा प्रवास सुरू करता. आधी तुम्ही त्यांच्या बरोबरीनं चालता. मग हळूहळू तुमचा वेग... तुमची ताकद जशी वाढू लागते, तसे तुमच्या बरोबरीचे मागे पडू लागतात. आता ते तुम्हाला फॉलो करू लागतात. पण सगळेच नाही. त्यातले काही तुम्हाला विरोधही करतात. काहींचा विरोध खरा असतो, तर काहींचा मत्सरी. त्यातला फरक नेमका ओळखून, निंदक समोर असण्यापेक्षा शेजारी असलेला बरा या विचारानं, चांगल्या विरोधकाला निर्विष करून तुम्ही तुमच्या जवळ करता. मत्सरी विरोधकांची मात्र कोणालाच गरज नसते.
लहानपणीच्या तुमच्या गुणांमध्ये आता शतपटीनं वाढ झालेली असते. यात सत्त्व, रज आणि अगदी तामसी गुणांचीही भर पडते. (राजा होण्यासाठी या तिघांचं रसायन गरजेचं असतं). तुमचा हा प्रवास कधी ठरवून, तर कधी सवयीनं, नकळत होत राहतो.
मोठं होण्यानं हळूहळू तुमची प्रतिमा तुमच्यापेक्षा वेगळी होऊ लागते. आता तुम्ही विभागले जाता. तुमच्यात आणि तुमच्या प्रतिमेत. हाच तो काळ जिथं तुमची पूर्ण कसोटी लागते. काय जपावं? स्वतःला की स्वतःच्या प्रतिमेला? याच काळात तुमचे मत्सरी विरोधक किंवा खरे स्पर्धक कार्यरत होऊ लागतात. तुमच्या चुकांची वाट पाहात किंवा मुद्दाम तुम्हाला त्या करायला भाग पाडून तुमच्या पुढे जाण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होतो.
एव्हाना तुमच्या लक्षात आलेलं असतं की, तुम्ही गुरुत्वाकर्षणाच्या फेऱ्यात आलेले आहात. सूर्याच्या (सत्तेच्या) जवळ जाण्यानं दाह वाढतो याची जाणीव तुम्हाला असते, पण तेजही वाढतं, हे सत्य तुम्हाला आवडू लागलेलं असतं. काही काळ त्या फेऱ्यात राहून सत्तेच्या जास्तीत जास्त जवळ जात राहता. तशातच सत्तेचं तेज तुमच्यावर पडत राहतं. तुम्ही उजळून निघता. हा काळ तुम्ही लांबवू पाहता. आणि तुमच्यातल्या गुणांमुळे (ज्यात तिन्ही आले.) तुमचा हा काळ तुम्ही लांबवू शकता. या काळात तुमचे विरोधक लपून बसतात, तर स्पर्धक तुमच्याशी हातमिळवणी करतात.
……………………………………………………………………………………………
शेक्सपिअरच्या अनेक नाटकांचे मराठीमध्ये अनुवाद झाले आहेत. पण त्याचं जीवनचरित्र ज्येष्ठ लेखक के. रं. शिरवाडकर यांनी ‘विल्यम शेक्सपिअर : जीवन आणि साहित्य’ या पुस्तकात सविस्तर लिहिलं आहे. या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://goo.gl/t4sXES
……………………………………………………………………………………………
तरीही तुम्हाला अनेक विरोधक आणि स्पर्धक असतातच, पण तुमच्या चाणाक्ष जगण्यामुळे तुमचे शत्रू मात्र कमी होत असतात. अजातशत्रू हे लेबल तसं फसवंच. तुम्हाला ते कधीच लागत नाही. उलट तुमचे शत्रू कोण आणि मित्र कोण, याविषयीचा लोकांच्या मनातला संभ्रम तुम्ही कायम ठेवता. तुमच्याविषयीचे किस्से, कहाण्या, वदंता, अफवा यांना आलेला पूर आणि त्यामुळे उठलेल्या वादळांना कधी तुमच्या हुशारीनं, कधी ताकदीनं तर कधी नशिबाची साथ मिळून तुम्ही परतवलेलं असतात. पण या प्रत्येक वादळानंतरचे तुम्ही फारच वेगळे असता. ही वादळं तुमच्यातली शक्ती वाढवतात हे जसं तुमच्या लक्षात येऊ लागलं, तशी काही वादळं तुम्हीच निर्माण करता. आणि शिताफीनं त्यातून बाहेर पडत तुमच्या प्रतिमेवर साचलेली धूळ साफ करता. हा, आता तुमच्यासाठी एक खेळच झालेला असतो जणू. पण खेळ असला म्हणून काय झालं! तो तुम्हाला दमवतोच. आणि एका टप्प्याला आपण मर्त्य आहोत, याची तुम्हाला जाणीवही करून देतो. आणि तुम्ही शांत पण सतर्क होता.
सत्तेच्या गुरुत्वाकर्षणाचा हा फेरा भल्याभल्यांना गरगरवून टाकतो. यासाठी तुमचे पाय जमिनीत घट्ट रोवलेले असावे लागतात हे खरं, पण तुमचे विरोधक व स्पर्धक सतत तुमच्या पायाखालची माती खणून बाजूला करण्याच्या प्रयत्नात असतात. अनेकदा तुम्हीच त्यांना तशी संधी देता. अशा समरप्रसंगी विरोधक त्यांच्या डोक्यावर पाय ठेवायला तुम्हाला भाग पाडतात. तसा तो ठेवून तुम्ही त्या विरोधालाच तुमचं सामर्थ्य करता. तुम्ही आणखी वर जाता. यामुळे सत्तेतला तुमचा काळ वाढतो खरा, पण तुम्ही स्थैर्य गमावता. कारण तुमचा पाय मातीत न राहता विरोधकाच्या डोक्यावर असतो. आणि विरोधक कधीच स्थिर नसतो. एव्हाना सत्तेइतकंच स्थिरतेचं तुम्हाला महत्त्व पटू लागलेलं असतं. हा काल आत्मभानाचा (introspection) असतो. आत्मभान येणं हा प्रगल्भतेचा उच्चतम बिंदू.
आयुष्याच्या शाळेतल्या फळ्यावर लिहिलेल्या सुभाषितांनी सुरू झालेला हा प्रवास, त्यातल्या भाबडेपणाच्या आणि कटू वास्तवाच्या जाणीवेपर्यंत येऊन ठेपलेला असतो. स्तुती, कौतुक, टीका, घणाघाती टीका, संशय, आरोप, वाद-संवाद, संघर्ष या सगळ्या धातूंनी तयार झालेला तुमचा ग्रह आता गुरुत्वाकर्षणाचं कवच भेदण्याच्या प्रयत्नाला लागतो. सत्ताही राहील आणि स्थैर्यही, अशी ती जागा. गुरुत्वाकर्षणा पल्याडची. आज सगळी ताकद एकवटून, गुरुत्वाकर्षणाचं कवच भेदून, आपल्याला हव्या असलेल्या जागेवर स्थिर होण्याच्या प्रयत्नात असलेले, तुम्ही…”
लेखक चित्रपट व नाट्यदिग्दर्शक आणि लेखक आहेत.
mahendrateredesai@gmail.com
……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Sandeep Shinde
Fri , 12 May 2017
Each of us struggle . What I understand and u mean is eternal stability one to achieve needs special quality tags in life? Is it not possible to achieve it without compromises as u suggest I think some clarity is required. But a good Lekh
Rohit Deo
Sun , 07 May 2017
Changla lekh