अजूनकाही
सकाळचे ७ – जॉनीचा दिवस सुरू होतो. त्याचं विमानतळावर आगमन
८.१५ – जॉनी हॉटेलवर परततो
८.४५ – जॉनी बस स्थानकावर पोहोचतो
९.२० – माइकचं घर
११.२९ – माइक बस स्थानकावर पोहोचतो
दुपारचे १२.१० – माइक रेस कोर्सवर येतो
३.३२ – पोलिस अधिकारी रँडी त्याची कामगिरी बजावतो
त्याच दिवशी दुपारचे २.३० – चेस क्लबमध्ये मॉरिसचा प्रसंग
४.२३ – रेस कोर्सवर गोंधळ घालणाऱ्या मॉरिसला पोलिस घेऊन जातात
त्याच दिवशी सकाळी ११.४० – निक्की त्याच्या फार्मवरून निघतो
१२.३० – निक्की रेस कोर्सवर पोहोचतो
४.२४ – निक्की पोलिसांच्या गोळीला बळी पडतो
२.१५ – शहरात फिरणारा जॉनी दिसतो
रेसकोर्सवर रॉबरी होते (कुठलीही विशिष्ट वेळ नाही)
संध्याकाळचे ७.१५ – एका घरात सगळे जॉनीची वाट बघत थांबलेत (त्याला १५ मिनिटं उशीर झालाय.)
६.२५ – एका मॉटेलमधल्या आपल्या खोलीतून जॉनी लुटीची रक्कम असलेली बॅग ताब्यात घेतो
७.२९ – जॉनी सगळे वाट बघत असतात त्या इमारतीपाशी येतो
७.३९ – जॉनी एका दुकानातून एक मोठी बॅग घेतो
वरचे प्रसंग लिहिलेत त्याच क्रमाने चित्रपटात घडतात... म्हणजे, जसे घडलेत त्या क्रमाने दिसत नाहीत, तर वरील क्रमाने घडलेले ते आपल्याला दिसतात...
हा नॉन लिनिअर फॉरमॅट ‘द किलिंग’ या चित्रपटाचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य. या फॉरमॅटचा वापर हा प्रामुख्याने मोनोटोनी तोडण्यासाठी आणि चमत्कृतीपूर्ण पद्धतीने गोष्ट सांगण्याचं एक साधन म्हणून केला जातो. त्यात कधीकधी प्रेक्षकांच्या मनात हेतूत: गोंधळ उडवण्याचाही दिग्दर्शकाचा उद्देश असतो. पण हे करत असताना प्रेक्षक कथेपासून लांब जाण्याचाही धोका असतो. दिग्दर्शकाने एका मर्यादेत हा धोका स्वीकारलेला असतो. पण दिग्दर्शकाचं एकूण नियंत्रण सुटलं तर प्रेक्षक त्याच्या हातात राहात नाही.
‘द किलिंग’मध्ये प्रेक्षकांच्या मनात मर्यादित गोंधळ नाही, तर पूर्ण गोंधळ माजवणं हाच दिग्दर्शकाचा हेतू आहे. आणि प्रेक्षकांचा तसा गोंधळ उडतोही... आणखी एक बाब म्हणजे हा कोणा एकाचा चित्रपट राहात नाही. म्हणजे, कथेच्या केंद्रस्थानी जॉनी क्ले आहे. कथेचा क्लायमॅक्स क्लेशीच जोडलेला आहे. पण तरीही ही गोष्ट एकट्या क्लेची आहे, असं म्हणता येणार नाही. कारण चित्रपट पूर्णत: त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने उलगडत नाही. अकिरा कुरोसावाने ‘मल्टिपल पॉइंट ऑफ व्ह्यू’ची ही गंमत ‘राशोमान’मधून फार वेगळ्या उंचीवर नेली होती. पण तिथं एकच घटना वेगवेगळ्या लोकांच्या नजरेनं वेगवेगळ्या पद्धतीनं दिसते आणि त्या एका घटनेचे त्या लोकांनी आपापल्या परीनं अर्थ लावलेले असतात. ‘द किलिंग’मधला प्रकार वेगळा आहे. इथं काही काही प्रसंग पुन्हा पुन्हा दिसतात, ते विशिष्ट वेळी एखादं पात्र नेमकं काय करत होतं किंवा त्या व्यक्तिरेखेचा एकूणच घडामोडींमध्ये नेमका काय रोल आहे, ते प्रेक्षकांच्या मनावर ठसवण्यासाठी. जॉनी हा रॉबरीच्या योजनेचा सूत्रधार आहे, म्हणून घटकाभर त्याला नायक मानूया. पण पडद्यावरील त्याच्या आगमनाच्या पूर्वीच (मोजून सात मिनिटं उलटल्यानंतर) कथेतील चार महत्त्वाच्या पात्रांशी आपली ओळख होते. रेसकोर्स लुटायच्या जॉनीच्या योजनेला फायनान्स करणारा त्याचा बुजुर्ग मित्र मार्विन उंगर, रेसकोर्सच्या बारमधला बारटेंडर माइक, रेसकोर्सचा कॅशियर जॉर्ज आणि या योजनेत महत्त्वाची भूमिका बजावणारा पोलिस अधिकारी रँडी. चित्रपटभर विविध प्रसंग काळाच्या पटलावर उलटसुलट क्रमाने दिसताना या व्यक्तिरेखांच्या नजरेतून उलगडतात. त्यामुळे कधी कधी एकच प्रसंग वेगवेगळ्या दृष्टिकोनातून दोन-तीन वेळा पाहायला मिळतो. अगदी मुख्य रॉबरीच्या क्षणाच्या आसपासचे प्रसंगही. त्यामुळे रॉबरीच्या महत्त्वाच्या क्षणी प्रत्येक पात्र कुठे आहे आणि ते काय करतंय किंवा त्या प्रसंगाला समांतर, पण महत्त्वाची अशी नेमकी कुठली घटना दुसरीकडे घडतेय, हे प्रेक्षकाच्या मनात इतकं घट्ट बसलेलं असतं की, प्रेक्षकाला आपोआप त्या प्रसंगाचा थ्री डायमेन्शनल व्ह्यू मिळतो आणि प्रेक्षक केवळ समोर पडद्यावर उलगडणारी कथा तटस्थपणे पाहाणारा घटक न ठरता ज्या रेसकोर्सवर ती थरारक रॉबरी होत असतो, त्या रेसकोर्सवर सदेह पोहोचतो.
हे फारच थोर आहे. म्हणजे घटनाक्रम उलटसुलट क्रमाने दाखवून प्रेक्षकांच्या मनात गोंधळही माजवायचा आणि त्याच वेळी त्याला विश्वासात घेऊन आपल्या कथाविश्वात फिरवूनही आणायचं. हे येरागबाळ्याचं काम नाही. आणि ते देखील लुटीची योजना नेमकी कशा प्रकारे पार पडणार आहे, हे प्रेक्षकांनाच काय, त्या लुटीत सहभागी असलेल्यांनाही देखील न सांगता. ही गंमत फारच क्वचित एखाद्या चित्रपटात अनुभवायला मिळते.
उंगर वगळता बाकीच्या तिघांकडे जॉनीच्या योजनेत सहभागी होण्याची भक्कम कारणं आहेत आणि प्रत्येकाच्या ‘पॉइंट ऑफ व्ह्यू’ने त्या बाजू समोरही येतात. पैसा हे अर्थातच मुख्य कारण आहेच, पण पैशांच्या निकडीमागची कारणं मात्र वेगवेगळी आहेत. रँडी कर्जात बुडालाय, कर्ज देणारा त्याच्या मागे हात धुऊन लागलाय, त्यामुळे कर्ज फेडण्यासाठी त्याला पैसे हवेत. बारटेंडर माइकची परिस्थितीही यथातथाच आहे. तो ना धड तरुण, ना धड म्हातारा अशा अर्धवट वयाचा आहे. त्याची आजारी बायको अंथरुणाला खिळलेली आहे आणि तिच्यावर उपचार करण्यासाठी त्याला भरपूर पैसे हवेत. कॅशिअर जॉर्जची सुंदर बायको शेरी केवळ दुसरा कुठलाही पर्याय नाही म्हणून जॉर्जबरोबर राहातेय. तिच्या लेखी जॉर्ज कुचकामी आणि मुर्ख आहे. ती पदोपदी त्याचा अपमान करते, पण जॉर्जचं तिच्यावर अतोनात प्रेम आहे. त्यामुळे अनवधानानं तो थोड्याच दिवसांत मला भरपूर पैसे मिळणार आहेत, असं सांगून तिचं प्रेम मिळवू बघतो. शेरीही त्याला तसंच भासवते आणि नेमके कशामुळे इतके सारे पैसे मिळणार आहेत, हे त्याच्याकडून खुबीनं काढून घेते. जॉर्जकडून तिला जेवढं काही समजतं ते ती आपला प्रियकर वेल याला येऊन सांगते.
जॉर्जची ही ‘बारिकशी’ चूक सगळ्यांनाच महागात पडते. बायकोच्या इमोशनल ब्लॅकमेलला तो बळी पडतो. जॉनीच्या योजनेचं सगळं यश अवलंबून आहे ते नेमका प्लॅन काय आहे, हे कोणालाच नेमकं ठाऊक नसतं. जॉनी, जॉर्ज, रँडी, माइक आणि उंगर या पाच प्रमुख पात्रांव्यतिरिक्त आणखी दोन पात्रं या योजनेत आहेत, ती म्हणजे बॉक्सर मॉरिस आणि शूटर निक्की. पण हे दोघे भाडोत्री आहेत, त्यांची मूळ योजनेत भागिदारी नाही. ते दोघेही स्वतंत्रपणे आपली कामगिरी बजावणार आहेत. किंबहुना जॉनी वगळता इतर चौघांना हे दोघं आणि या दोघांना इतर चौघं माहितीही नाहीत. ते दोघे परस्परांनाही ओळखत नाहीत. मॉरिसचं काम आहे रेसट्रॅकवर राडा करून पोलिसांचं लक्ष वेधून घेणं आणि निक्कीचं काम आहे रेस सुरू झाल्यावर फेवरिट घोड्याला उडवणं. दोघांनाही या कामाचे आगाऊ पैसे मिळाले आहेत. आपण हे काम का करतोय आणि जॉनीला त्याचा नेमका काय फायदा होणार आहे, हे त्यांना ठाऊक नाही. ‘तुम्हाला जी मी घसघशीत रक्कम देतोय, ती प्रामुख्यानं कुठल्याही प्रकारचे प्रश्न न विचारण्यासाठी,’ असं जॉनी त्यांना सुरुवातीलाच बजावतो.
कथेतील प्रमुख पात्रं ज्या वेळी अशा प्रकारे रॉबरी वगैरे करणार असतात, त्यावेळी त्यांचा नेता सर्वांना योजना काय आहे ते समजावून सांगतो. ‘द किलिंग’मध्ये असं काही होत नाही. जॉनी हा योजनेचा सूत्रधार आहे आणि त्याच्या डोक्यात सगळा आराखडा अगदी वेळेसकट निश्चित आहे. तो प्रत्येकाला केवळ आपापली जबाबदारी निश्चित करून देतो. त्या पलिकडे नेमकं काय आणि कसं होणार आहे, हे कोणालाच ठाऊक नाही आणि जॉनीच्या दृष्टीनं हेच या योजनेचं यश असणार आहे. जॉनी त्यात यशस्वी होतो, वेल अलमोस्ट!
‘द किलिंग’ हा फिल्म न्वारमधला एक महान चित्रपट समजला जातो. क्वांटिन टॅरँटिनोच्या ‘रिझरव्हॉयर डॉग्ज’ या धमाल चित्रपटाचा प्रेरणास्त्रोत ‘द किलिंग’ होता. पण प्रदर्शित झाला त्या वेळी तो कमालीचा अपयशी चित्रपट ठरला होता. अमेरिकेत तो धड प्रदर्शितही होऊ शकला नव्हता. ‘द किलिंग’च्या दिग्दर्शकाचा हा तिसरा चित्रपट. त्या आधीच्या दोन चित्रपटांमध्ये तो स्वत:ची शैली आणि स्वत:चा आवाज शोधण्यासाठी धडपडत होता. ‘द किलिंग’मध्ये त्याला तो सापडला. त्यामुळेच हा चित्रपट त्याच्यासाठी टर्निंग पॉइंट समजला जातो. चित्रपटात जशी प्रसंगांच्या उलटसुलट क्रमाची गंमत आहे, तसंच काहीसं दिग्दर्शकाच्या प्रत्यक्ष आयुष्यात घडलं. त्याचे नंतरचे सिनेमे गाजल्यानंतर दर्दींचं त्याच्या या चित्रपटाकडे लक्ष गेलं आणि त्यानंतर या चित्रपटाचा चाहता वर्ग तयार झाला.
चित्रपटातला नॉन लिनिअर फॉरमॅट त्याच्या दिग्दर्शकाच्या बाबतीतही घडत होता! अर्थात त्याच्या नंतरच्या सर्वच चित्रपटांची जातकुळी ही परस्परांपेक्षा भिन्न होती.
पण त्याला स्वत:चा सूर या चित्रपटापासून गवसला...
त्या दिग्दर्शकाचं नाव होतं स्टॅनली क्युब्रिक!
लेखक मुक्त पत्रकार आहेत.
chintamani.bhide@gmail.com
……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment