अजूनकाही
काही कलाकृतींमध्ये जबरदस्त सामाजिक घुसळण करण्याची ताकद असते. 'बाहुबली' या बहुचर्चित चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आणि अशीच एक सामाजिक घुसळण सुरू झाली आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि वेगवेगळ्या माध्यमांमध्ये विशेषतः सामाजिक माध्यमांमध्ये अनेक प्रकारच्या चर्चाना तोंड फुटलं. ‘बाहुबली’ आवडणारा एक वर्ग (जो अर्थातच बहुसंख्य आहे) आणि ‘बाहुबली’ न आवडणारा वर्ग (जो अल्पसंख्य आहे), अशी सरळसोट विभागणी सामाजिक माध्यमांमध्ये दिसून येऊ लागली. बाहुबली न आवडणाऱ्या लोकांचा आक्षेप त्यातल्या दुय्यम प्रतींच्या व्हीएफएक्स, अविश्वसनीय अॅक्शन दृश्यं अशा गोष्टींवर आहे. दलित समाजातल्या एका वर्गात कटाप्पा या लोकप्रिय पात्राच्या चित्रीकरणावरून असंतोष आहे. तर चित्रपटाच्या समर्थकांची (थोडी आक्रमक) भूमिका अशी आहे की, आपल्या देशात प्रथमच एवढ्या भव्य स्केलवर सिनेमा बनत आहे, तर त्याचं कौतुक करायचं सोडून खुसपटं कसली काढताय?
व्यक्तीशः मला दोन्ही बाजूंच्या थोड्या थोड्या गोष्टी पटतात. अर्थातच राजामौली हा माझा आवडता दिग्दर्शक आहे. त्याचं दिग्दर्शक म्हणून बहुतांश काम मला आवडतं. बाहुबलीचे दोन्ही भागही मला आवडले. पण 'बाहुबली २'च्या संदर्भात अजून एक फार महत्त्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, तो म्हणजे 'बाहुबली' ही चित्रपटमालिका सोनेरी पडद्यावरच्या हिंदू पुनरुत्थानाचं प्रतीक आहे का?
हा प्रश्न ऐरणीवर येण्यास एक अप्रिय घटना कारणीभूत ठरली. अॅना वेत्तिकाड या समीक्षिकेने ‘बाहुबली २’वर टीका केली आहे. चित्रपटाचं कौतुक करून त्याला अडीच स्टारही (म्हणजे बऱ्यापैकी) दिले. पण ही टीका काही लोकांच्या चांगलीच जिव्हारी लागली. ऑनलाईन ट्रोल्सनी अॅनावर जोरदार टीका सुरू केली. त्यातली काही टीका फारच खालच्या पातळीवर होती. अॅनाने बाहुबलीच्या पहिल्या भागावरही टीका केली होती. 'बाहुबली -द बिगिनिंग'मध्ये नायक अवंतिकेच्या (तमन्ना ) पात्राचं 'स्त्रीत्व' ज्या प्रकारे जागृत करतो, त्यावर तिने जोरदार आक्षेप घेतला होता. नुसता आक्षेप घेऊनच ती थांबली नाही, तर तिने 'द रेप ऑफ अवंतिका' नावाचा लेख लिहून दिग्दर्शक राजामौलीचा खरमरीत निषेधही केला. त्यावेळेसही तिच्यावर ट्रॉल अटॅक झाला होताच. पण 'बाहुबली -द कन्क्ल्युजन'च्या तिच्या परीक्षणानंतर तिच्यावर झालेला ट्रोल अटॅक तीव्र झाला. तिच्यावर असा हल्ला करणाऱ्यांचा आक्षेप असा होता की, अॅना ही ख्रिश्चन असल्यामुळे तिला 'हिंदू' चित्रपटाबद्दल आकस आहे. ती धर्मांतरित ख्रिश्चन असून तिने पोपकडून पैसे घेतले असणार असेही आरोप तिच्यावर करण्यात आले. अॅनाने चेहरा लपवून फिरणाऱ्या ट्रोल्सना सडेतोड जवाब दिला हा भाग अलाहिदा.
आता याचीच दुसरी बाजू. एका मान्यवर समीक्षकाने बाहुबली चित्रपटमालिकेत इतर धर्मांच्या संस्कृतीवरही दिग्दर्शकाने प्रकाश का टाकला नाही अशी बेजबाबदार टीका केली. त्या समीक्षकाचेच शब्द सांगायचे तर ‘lack of representation of 'non-Hindu culture' in the film’. चित्रपटात काय दाखवायचं, काय नाही दाखवायचं हा दिग्दर्शकाचा निर्णय असतो. दिग्दर्शकाने पडद्यावर नेहमीच सर्व धर्मांची संस्कृती दाखवली पाहिजे, हा अट्टाहास एखाद्या समीक्षकाने करावा हाच अत्युच्च प्रतीचा भोळसट आदर्शवाद किंवा उच्च प्रतीचा खोडसाळपणा आहे. अॅनावर खालच्या पातळीची टीका झाल्यामुळे हा दुसरा प्रसंग झाकोळला गेला, पण यानिमित्ताने सर्वच नाही तरी काही बाहुबली समर्थक आणि काही बाहुबली विरोधक या दोघांचेही 'छुपे अजेंडे' समोर आले.
पण जसं काही लोक म्हणत आहेत किंवा वर उल्लेख केलेला समीक्षक आडून सुचवत आहे, तसं 'बाहुबली' हा हिंदू सिनेमा आहे का? (भारताने पहिला अणुबॉम्ब तयार केला, तेव्हा अमेरिकन माध्यमांनी त्याला 'हिंदू बॉम्ब' असं नाव दिलं होतं, हे इथं सहजच आठवलं.). बाहुबली चित्रपटमालिकेच्या दृश्यभाषेवर अमर चित्रकथाचा प्रचंड प्रभाव आहे. बाहुबलीच नव्हे तर राजामौलीच्या प्रत्येक चित्रपटामध्ये हिंदू संस्कृतीच्या प्रतीकांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. बाहुबलीमध्ये शंकर, गणपती या देवांच्या मूर्त्यांची दृश्यं चित्रपटाच्या कथानकामध्ये मोठा वाटा उचलतात. बाहुबलीच्या पहिल्या भागात अतिशय जड असणारं शिवलिंग उचलून चालणारा प्रभास ही बाहुबलीमधली प्रतिमा लोकांच्या डोक्यात ठसली आहे. चित्रपटातील पात्रांमध्ये महाभारतातल्या पात्रांचे संदर्भ आढळतात. संस्कृत भाषेचा वापर चित्रपटात करण्यात आला आहे. त्या अर्थानं हिंदू संस्कृतीचा प्रभाव चित्रपटाच्या कथानकावर आहे हे नक्कीच.
पण हे सगळं दिग्दर्शकाच्या हिंदू देवांवरील श्रद्धेमुळे दाखवलं जात का, याचं उत्तर नकारार्थी असावं. कारण दिग्दर्शक राजामौली हा नास्तिक आहे. आपल्या नास्तिकपणाची जाहीर कबुली राजामौलीने दिली आहे. एकेकाळी प्रचंड देवभोळा असणाऱ्या राजमौलीच्या वाचनात आयन रँडचं 'द फाउंटनहेड' हे पुस्तक आलं आणि त्याची विचारप्रक्रिया पूर्ण बदलून गेली. तो नास्तिकतेकडे झुकला. चित्रपटाचे लेखक आणि राजामौलीचे वडील हे पक्के शिवभक्त आहेत, हे खरं पण कॅप्टन ऑफ द शिप हा दिग्दर्शकच असतो. चित्रपटात कुठली दृश्यं असावीत किंवा नसावीत याचा निर्णय दिग्दर्शकच घेत असतो. मग एका नास्तिक माणसाने मोठ्या प्रमाणावर धार्मिक प्रतीकांचा वापर चित्रपटात का केला असावा? तर आपल्या वैयक्तिक विचारसरणीचं प्रतिबिंब आपल्या कामात पडू नये याची काळजी घेणारा चतुर दिग्दर्शक राजामौली इथं दिसतो. आपण मोठ्या पडद्यावर काय दाखवलं म्हणजे प्रेक्षकांना आवडेल याचा पुरेपूर अंदाज त्याला आहे. आपली कला आणि आपली विचारसरणी यांचं संमिश्रण सिनेमाला तारू शकत नाही, याची त्याला जाणीव आहे. त्यामुळे स्वतः नास्तिक असून हिंदू धर्मातील दैवत आणि प्रतिमांचा वापर त्याने चित्रपटात केला. त्यामुळे 'बाहुबली' ही 'हिंदू' कलाकृती आहे किंवा नाही, हे तुम्ही कुठल्या चष्म्यातून त्या कलाकृतीकडे पाहता यावरून ठरू शकतं.
गेल्या काही वर्षांपासून देशात एकूणच जो राजकीय दुभंग आला आहे, त्याचं प्रतिबिंब या वादातही उमटलं आहे. आपली मतांच्या विरुद्ध मत असणारा आणि आपल्या आदर्शांवर (यात सिनेमा, नट गायक, राजकीय नेते) टीका करणारा माणूस म्हणजे शत्रू गटातला, अशी भावना दिवसेंदिवस प्रबळ होत चालली आहे. त्याचं बाहुबली हे अजून एक उदाहरण. या सगळ्या प्रकरणाला एक राजकीय अँगलही आहे. सध्या भाजप एका पाठोपाठ एक निवडणुका जिंकत आहे. नुकतीच उत्तर प्रदेशची निवडणूक भाजपने दणदणीत बहुमताने जिंकली. दिल्ली महानगरपालिकेत दहा वर्षांचा 'प्रस्थापितविरोधी' कल असूनही तिन्ही महानगरपालिका जिंकल्या. या विजयात तिथल्या सामाजिक-राजकीय कारणांसोबतच हिंदुत्वाचा एक 'अंडरकरंट' आहे हे उघड आहे.
या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर भाजप समर्थक आणि भाजप विरोधक सोशल मीडिया आणि मिळेल त्या प्लॅटफॉर्मवर एकमेकांशी भिडत असतात. बाहुबलीसारखी कलाकृती या दोन्ही बाजूच्या राजकारणी समर्थकांच्या तावडीतून सुटली नाही. पण देशातल्या लाखो चित्रपटरसिकांना बाहुबली चित्रपटमालिका एक दणदणीत मनोरंजक कलाकृती म्हणून आवडली आहे. सोशल मीडियावर एकमेकांना भिडणाऱ्या राजकीय समर्थकांशी आणि बाहुबली ही हिंदू कलाकृती आहे का, या वादाशी देशातल्या सर्वसामान्य रसिकाला काहीही देणंघेणं नाही. चित्रपटाचे लेखक विजयेंद्र राव म्हणतात तसं, ‘ही भारतीय कलाकृती आहे हेच खरं!’
लेखक फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.
amoludgirkar@gmail.com
……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment