अजूनकाही
१. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हिमालयातील केदारनाथ मंदिराला भेट देऊन त्या ठिकाणी रूद्राभिषेकासह पूजाअर्चा केली. बर्फवृष्टीमुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले केदारनाथ मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले झाले तेव्हा पहिल्या पूजेचा मान मोदींना दिला गेला. या ठिकाणी खास हेलिपॅड उभारण्यात आले होते. तसेच सुरक्षाव्यवस्थेसाठी केदारनाथ मंदिराजवळ सेफ रूम उभारण्यात आला होता.
राज्यघटनेने सेक्युलर घोषित केलेल्या देशाचे पंतप्रधान दुसऱ्या देशाच्या पंतप्रधानांबरोबर तास न् तास महाप्रदूषित गंगेची आरती करण्यात मश्गुल असलेले देशाने पाहिलेले आहेत. त्यामुळे आणि देशातल्या एकंदरित धर्मभारित वातावरणात त्यांनी सरकारच्या खर्चाने केदारनाथाचे व्यक्तिगत पूजापाठ करण्यात कोणाला काही खटकणार नाही. पण, एकीकडे गाड्यांवरचे लाल दिवे काढून व्हीआयपी कल्चर संपुष्टात आणल्याच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे केदारनाथाच्या पहिल्या दर्शनाचा लाभ घ्यायचा, हे एका श्वासात करायला असामान्य धैर्य लागतं.
....................................................................................
२. सीमेपलीकडच्या शत्रूंशी किंवा नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या जवानांच्या मुलांसाठी याच वर्षी शाळा सुरू करण्याची अभिनव घोषणा योगगुरू बाबा रामदेव यांनी केली आहे. ही शाळा निवासी आणि निःशुल्क असेल, असं त्यांनी जाहीर केलं आहे. त्याच वेळी उत्तर प्रदेशातील लोकांना मराठी लिहिता, बोलता आणि वाचता यावी म्हणून उत्तर प्रदेशातील विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याचा निर्णय योगी आदित्यनाथ सरकारने घेतला असून त्याची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
या दोन्ही बातम्या एकमेकींबरोबर कशा, असा प्रश्न वाचकांना पडू शकतो. वरवर पाहता छान छान, स्वागतार्ह वाटणाऱ्या गोष्टी कशा फुसक्या असतात, त्याचं दर्शन या बातम्यांमधून घडतं. रामदेव बाबांची शाळाच पाहा. एखादा जवान शहीद होतो, तेव्हा त्याचे कुटुंबीय जिथं कुठे असतील, तिथं मुलांना शिकवत असतात, त्याची काही तजवीज असते, अनेक सवलती अशाही असतात. रामदेव बाबांनी शाळा काढली म्हणून आहे त्या सोयीच्या, सवयीच्या शाळा-कॉलेजातून मुलांना काढून या शाळेत कोण आणि का पाठवणार? केजीपासून बारावीपर्यंतची शाळा निव्वळ शहीद जवानांच्या मुलांसाठी तर चालवता येणार नाही. मग हे त्या नावाखाली सवलती घेऊन ‘नाईलाजा’ने इतरांना घेऊन तुकड्या भरणार आणि नेहमीसारखी शाळा चालवणार. मराठी शिक्षणाचाही तोच विषय आहे. उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात येताना प्रत्येक जण मराठीचा अभ्यासक्रम पूर्ण करून येणार आहे का? शिवाय ज्याला महाराष्ट्राशी काही देणंघेणं नसेल, तो इतक्या भाषांमधून मराठीच का शिकायला जाईल?
....................................................................................
३. वातावरणात वारंवार होणारा बदल, उल्कापात आणि वाढत्या लोकसंख्येमुळे पृथ्वीवरील सर्व मानवांना येत्या १०० वर्षात पृथ्वी सोडावी लागणार असून त्याला नव्या ग्रहावर बस्तान बसवावे लागणार आहे, अशी भविष्यवाणी ब्रम्हांडावर मूलभूत संशोधन करणारे प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी केली आहे. पृथ्वी आणि मानवाची वेळ जलदगतीने संपत असल्याचा दावाही हॉकिंग यांनी केला आहे.
हॉकिंगसाहेब, तुमची वेळ आली की तुम्ही अगदी निश्चिंतपणे अखेरचा श्वास सोडू शकता. मानवजात इज कम्प्लीटली सुरक्षित. तुमच्याआधी एक नॉस्ट्राडेमस नावाचे काका होते भाकितं करणारे. त्यांच्या भाकितांमधल्या ब्रह्मांडनायकाने भारतात जन्म घेतलेला आहे आणि लहानपणीच एक मगर मारून आपल्या अवतारकार्याची ग्वाही दिलेली आहे. आता विश्वनायकाच्या हातात पृथ्वीच काय, सगळं ब्रह्मांड सुरक्षित आहे.
....................................................................................
४. वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत असलेले खासदार पप्पू यादव (राजेश रंजन) यांनी, नक्षलवाद्यांनी जवानांची हत्या करण्यापेक्षा राजकीय नेत्यांची हत्या करणं चांगलं, असं बोलून नवा वाद ओढवून घेतला आहे. पाटणातील बेऊर तुरुंगात तीन आठवड्याच्या कैदेतून परतल्यानंतर यादव यांनी सुकमामधील नक्षलवाद्यांच्या हल्ल्यातील शहीद जवानाच्या कुटुंबाला ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली. त्यानंतर ते म्हणाले की, नक्षलवाद्यांनी जवानांना नव्हे तर राजकीय नेत्यांना संपवलं पाहिजे. जे देशाची व्यवस्था चालवत आहेत, अशा राजकीय नेत्यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली पाहिजे. देशातील राजकीय स्थिती खूप खराब झाली आहे. गरीब जास्त गरीब होत आहे. गरजू लोकांना न्याय मिळत नाही. उलट त्यांचं शोषण होत आहे, अशी टीका त्यांनी केली. राजकीय नेते देशाला लुटत असल्याचा आरोप त्यांनी केला.
पप्पूशेठ, तो बाहेर एक माओवादी आलाय कपाळावर लाल पट्टी बांधलेला, बंदूक घेतलेला... तो म्हणतो, साहेबांचा आदेश आमच्यासाठी आज्ञेसारखाच आहे... त्यांच्यापासूनच सुरुवात करावी म्हणतो. पाठवू का आत त्यांना?
....................................................................................
५. विविध विक्रमांना गवसणी घालणारा ‘बाहुबली २’ हा चित्रपट खऱ्या अर्थाने ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमाचं एक सर्वोत्तम उदाहरण ठरत आहे’, असं केंद्रीय नगर विकास आणि केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री एम वेंकय्या नायडू नुकतेच म्हणाले. किंबहुना हल्लीच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये ‘मेक इन इंडिया’ची झलक पाहायला मिळते, असा दावाही त्यांनी ६४व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या वेळी केला.
तरी नायडूसाहेबांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या नाहीत. गेली ६० वर्षं भारतात फक्त इटालियन आणि इंग्लिश भाषेतलेच सिनेमे तयार होत होते. तीन वर्षांपासून ‘मन की बात’ ऐकून ऐकून लोकांना हिंदी भाषेतही सिनेमे काढण्याचा धीर आला. आतापर्यंत चित्रपटसृष्टीत खानांचं राज्य होतं, ते सगळे बुरखानशीन नायिकांबरोबर मुस्लीम सोशल्स काढत होते. आता कुठे हिंदू दिग्दर्शक-नायक-कथानकं यांना उठाव आला आहे. ‘ले ले ले ले ले ले तू सेल्फी ले ले’ या पंतप्रधानांनी प्रेरणा दिलेल्या गाण्याचा तर त्यांनी उल्लेखच केला नाही विनयामुळे!
editor@aksharnama.com
……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
ADITYA KORDE
Fri , 05 May 2017
खरेतर ह्याची सुरुवात मे १९५० साली झाली जेव्हा तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहेरु ह्यांचा वैयक्तिक विरोध डावलून सोमनाथच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाच्या उदघाटनाला हजर राहिले आणि त्यांच्या हस्तेच ते काम सुरु झाले. गांधीजी आणि सरदार पटेल ह्यांनी सोमनाथच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराला अनुकूलता दाखवली होती पण लागणार पैसा सरकारी तिजोरीतून नाही तर लोक वर्गणीतून उभारावा असेही सुचवले होते पण हि सूचना डावलून तत्कालीन अन्न व नागरी पुरवठा मंत्री के. एम. मुनशी ह्यांनी ह्या कामात जातीने लक्ष घातले होते... सरकारचा अशा बाबतीत काही सहभाग असता कामा नये. त्याच न्यायाने पुरोगामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दरवर्षी पंढरपूरच्या विठोबाची अग्रपूजा करतात ते ही थांबले पाहिजे आणि 'वर्षा' वर सत्यसाईबाबा किंवा अन्य कोणी बाबा येणे निंदनीयच मानावे