ब्राह्मण (आणि इतरही) स्थलांतर का करतात?
सदर - सत्तावर्तन
राजा कांदळकर
  • पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक
  • Thu , 04 May 2017
  • सत्तावर्तन राजा कांदळकर Raja Kandalkar मुक्ता टिळक Mukta Tilak आरक्षण Reservation स्थलांतर Migration

पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी नाशिकमध्ये भाषण करून गदारोळ माजवला. राखीव जागांमुळे ब्राह्मणांवर अन्याय होतो. त्यामुळे त्यांच्यावर परदेशात स्थलांतर करायची पाळी आली, अशी मतं त्यांनी समस्त ब्राह्मण समुदायापुढे व्यक्त केली. ब्राह्मण समाजावरचा हा अन्याय दूर व्हावा, अशी कळकळही त्यांनी बोलून दाखवली. ब्राह्मणांना स्थलांतरं करावी लागली, ही काहीतरी भयंकर गोष्ट आहे, असं त्यांना सुचवायचं होतं.

टिळकबाई यांच्या या मतांवर विविध माध्यमांत राखीव जागा आणि ब्राह्मण समाज या मुद्द्यांना धरून भरसमसाठ भलीबुरी चर्चा झडली. टिळकबाईंना हे सांगायला हवं की, स्थलांतरांचा आणि राखीव जागांचा काहीही अर्थाअर्थी संबंध नाही. ब्राह्मण समाजातल्या व्यक्ती युरोप-अमेरिकेत जातात किंवा दुसऱ्या कुठल्याही देशात जातात, त्याचा संबंध नव्या, सुखी जीवनाच्या शोधाशी आहे. आणि यापुढेही राहणार. हे टिळकबाईंनी समजून घेतलं तर ब्राह्मण समाजानं स्थलांतर केलं, हे त्यांच्या पथ्यावरचं पडलं हे त्यांच्या लक्षात येईल.

आपल्या देशात ब्राह्मण समाजाने खेडेगावातल्या गावगाड्यातून पहिल्यांदा स्वत:ची सुटका करून घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गीय, विशेषत: दलित समाजाला ‘शहराकडे चला’ असा संदेश देण्यापूर्वीच काळाची पावलं ओळखून ब्राह्मण समाजानं गावगाडा सोडायला सुरुवात केली होती. गाव ते शहर म्हणजे कोकण ते मुंबई किंवा पुणे असं ब्राह्मणांचं स्थलांतर काही त्यांना खेड्यात राखीव जागा नव्हत्या म्हणून झालं नाही. ते अधिक चांगलं जगण्याच्या शोधासाठीची धडपड म्हणून झालं.

मानवाचा इतिहास हा खरं म्हणजे स्थलांतरांचाच इतिहास आहे. जंगलात हिंडणारा माणूस गुहेत राहायला लागला. गुहेत राहणारा टोळी समाज शेती समाजाकडे स्थित्यंतरीत झाला. त्यानंतर नदीकाठी तो अधिक स्थिर समाजाकडे वाटचाल करता झाला. नदीकाठी त्याची लोकसंख्या वाढली. मग तो नव्या जमिनीच्या शोधात स्थलांतर करू लागला.

उदहारण म्हणून आपल्याला अमेरिका या देशाचं घेता येईल. अमेरिकेत पहिल्यांदा युरोपातून कोलबंस गेला. नंतर इतर युरोपियन लोक गेले. युरोपियनांनी अमेरिकेत स्थलांतर करून तिथल्या मूळ रेड इंडियनांची कत्तल केली. इतकी की रेड इंडियन तर नावापुरते शिल्लक राहिले. या अमेरिकेत शेती, उद्योग, कारखाने, सेवाउद्योग यासाठी कष्टाची कामं कुणी करायची? त्यासाठी मजुरांची मोठ्या प्रमाणावर गरज होती. त्यासाठी आफ्रिका खंडातून कृष्णवर्णीय गुलाम कसे आणले गेले याच्या कहाण्या प्रसिद्ध आहेत. हे गुलाम पहिल्यांदा अमेरिकेत जायला उत्सूक नव्हते. त्यांना गुराढोरांसारखे ओढूनताडून जहाजात हातपाय बांधून कोंबलं गेलं, काहींना अमानवी पद्धतीनं मारण्यात आलं. छळ करून अमेरिकेत नेण्यात आलं. तिथं धाक दाखवून आणि ढोरांसारखे राबून त्यांच्या घामातून अमेरिकेची प्रगती झाली, हे जगजाहीर आहे.

ज्या अमेरिकेत प्रथम काम करायला माणसं मारझोड करून, गुलाम बनवून न्यावी लागली; तिथं जाणं, नोकरी मिळवणं हे आता प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जाऊ लागलं आहे. अमेरिकेतल्या प्रतिष्ठेच्या नोकरीनं ज्या भारतीयांना अधिक खुणावलं त्यात ब्राह्मण समाज अग्रेसर होता.

इस्रायल या राष्ट्राची उभारणीही स्थलांतरितांनीच केली आहे. हे स्थलांतरित ज्यू धर्मिय आहेत. स्थलांतरितांना उभं केलेलं हे आधुनिक राष्ट्र म्हणता येईल. जगभरचे ज्यू या राष्ट्रात गोळा झाले आहेत. एक धर्म, एक भाषा, एक झेंडा, एक संस्कृती हे या देशाचं वैशिष्ट्य आहे. ब्राह्मण समाजातल्या मोठ्या वर्गाला या एकेरी संस्कृतीचं आकर्षण आहे. इस्रायलसारखा एकसारखेपणा आपल्या देशात यावा यासाठी काही लोक आग्रही आहेत.

जगामध्ये गेली लाखो वर्षं दुष्काळ, पूर, भूकंप, युद्ध या नैसर्गिक संकटांतून स्थलांतरं सुरू आहेत. जगाच्या निर्मितीतच मुळी स्थलांतरितांचा सिंहाचा वाटा आहे. इजिप्तमधली महाकाय पिरॅमिडस स्थलांतरित मजुरांकडून बांधून घेतली गेली. अमेरिकेतले सारे आधुनिक उद्योग, शस्त्रास्त्रांचे कारखाने स्थलांतरित मजुरांनी उभे केले आहेत.

आपल्या देशातही स्थलांतरितांचा नवं काही घडवण्यात महत्त्वाची भूमिका राहिली आहे. गिरीश कानार्ड यांचं ‘तलेदण्ड’ हे नाटक या दृष्टीनं अभ्यासण्यासारखं आहे. या नाटकात शरण संप्रदाय आणि त्याचा संस्थापक बसवण्णा यांना राजा बिज्वळाने राजाश्रय दिल्याची चर्चा आहे. हा शरण संप्रदाय स्थलांतरित मजुरांचा होता. ते काम करून जगणं प्रतिष्ठेचं मानतं. त्यांच्या गरजा कमीत कमी असत. त्यांना कमी साधनसामग्री लागे. अशा शरण संप्रदायाच्या कष्टामुळे बिज्वळाच्या राज्याची भरभराट झाली होती. हे उदाहरण पाहिलं तर आपल्या समाजातही स्थलांतरातून भरभराट होऊन नवा समाज तयार झाला हे दिसून येतं.

स्थलांतरांची मोठी लाट पहिल्या-दुसऱ्या औद्योगीकीकरणानंतर आली असं मानलं जातं. कारखानदारी वाढली. तिथं मजुरीसाठी लोकांची गरज वाढली. मग लोक स्थलांतरित होऊ लागले. त्यातून औद्योगिक शहरं उभी राहिली. जगभर सर्वांत जास्त स्थलांतर विसाव्या शतकात गावाकडून शहरांकडे झालेलं दिसतं.

शहरं फक्त पैसा, तंत्रज्ञानानं उभी राहत नाहीत. शहरं म्हणजे रस्ते, रेल्वे, वाहतूक, सफाई, गटारं, वीज-पाणी, इमारती, मॉल्स, मल्टिप्लेक्स, हॉटेल्स-रेस्टॉरंटस आणि नागरी वस्तीला लागणारी सर्व प्रकारची सेवाव्यवस्था, सेवाउद्योग… त्यात गरज ते चैन आणि मनोरंजन ते ज्ञान उद्योगापर्यंत सर्व काही येतं. हे सर्व उभारायला मूळ लोक कमी पडतात, म्हणून बाहेरचे लोक (स्थलांतरित मजूर) लागतात.

जगात शेती समाज आता मागे पडतोय, औद्योगिक समाज पुढे जातोय. शेतीसमाज स्थिर होता, औद्योगिक समाज अस्थिर असतो. म्हणून गतिशील समजला जातो. औद्योगिक समाजात घरदार सोडून आलेली माणसं एकत्र येतात. धर्म, जात, परंपरा, देश, संस्कृती, भाषा वेगवेगळी असलेली माणसं एका सांस्कृतिक संगमात विलीन होतात. त्यातून नवं जग जन्माला येतं. नवा मानव, नवा समाज उभा राहतो. या नवेपणाचं आकर्षण म्हणून ब्राह्मण समाज किंवा इतर जगाच्या पाठीवरचे समाज स्थलांतर करतात. स्थलांतरित समाजाची जुनी मूल्यं, सरंजामी व्यवस्था, राजेशाही, दैववाद, धिमी कार्यशैली या गोष्टी गळून पडतात. त्या जागी नवी मानसिकता, जलद कार्यशैली, परंपरा आणि रचना विकसित होतात.

नव्या औद्योगिक रचनेत शासनकर्ते, भांडवलदार, उद्योजक आणि कष्टकरी हे पाया घटक असतात. हे उद्योग केवळ उत्पादनांच्या आधारे चालत नाहीत. नव्या उद्योगातून तयार होणाऱ्या मालाला, उत्पादनांना विक्रीसाठी बाजारपेठा तयार केल्या जातात. मग स्थानिक ते परदेश अशा विविध स्तरावर बाजारपेठा विकसित होतात.

थोडक्यात औद्योगिक प्रगती, नवं जग हे स्थलांतरितांच्या कष्टातून उभं राहतं. आता मानव समाज संगणक-तंत्रज्ञान युगात वावरतोय. सेवाक्षेत्र विस्तारतंय. शेतीसमाज ते औद्योगिक समाज ते तंत्रज्ञानावर आधारित समाज असा हा मानव जातीचा प्रवास स्थलांतरितांच्या साक्षीनं, कष्टानं साकार झाला आहे. आता तर तंत्रज्ञानावर आधारित समाजात भूगोल महत्त्वाचा राहणार नाही असं दिसतं आहे. अमेरिकेतल्या कंपन्यांसाठी भारतातून माणसं काम करताना दिसतात. तेव्हा यापुढे स्थलांतरित व्हावं लागेल की नाही, याची चर्चा होतेय. कारण इंटरनेट आणि इतर तंत्रज्ञानानं अंतर ही संकल्पना मोडीत काढली आहे. मुंबईत किंवा मालेगावात बसून मलेशियातल्या सेवा उद्योगासाठी काम करता येत असेल तर माणसं स्थलांतरं कशाला करतील? पण ही स्थलांतरं थांबण्याची वेळ यापूर्वी मोठ्या प्रमाणावर स्थलांतरं झाली, त्यातून प्रगती झाली म्हणूनच आली आहे. हे लक्षात घेऊन टिळकबाईंनी स्थलांतरांच्या मुद्द्याकडे गांभीर्याने पाहावं. त्याचं राजकारण करू नये, अशी अपेक्षा करायला काय हरकत आहे?

……………………………………………………………………………………………

लेखक राजा कांदळकर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.

rajak2008@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......