अजूनकाही
कविता महाजन हे नाव ऐकल्यावर अनेकांच्या भुवया उंचावतात, कान टवकारतात तर काहींच्या चेहऱ्यावर ओळखीचं हसू पसरतं. सोशल मीडियावर सतत चर्चेत असणाऱ्या मराठीतल्या सध्याच्या ‘हॅपनिंग’ लेखिकेविषयी, तिने फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारावी म्हणून धडपडणाऱ्या अनेकांना तिचे अपडेटसविषयी जाणून घ्यायची उत्सूकता असते.
‘ब्र’ आणि ‘भिन्न’सारख्या कादंबऱ्यांमुळे कविता चर्चेत आली असली तरी तिची साहित्यक्षेत्रातली वाटचाल कवितांपासून सुरू झाली. ‘तत्पुरुष’, ‘धुळीचा आवाज’ यासारख्या कवितासंग्रहांतल्या कविताच्या कविता ‘अनुष्टुभ’, ‘कवितारती’, ‘मिळून साऱ्याजणी’सारख्या प्रथितयश नियतकालिकांतून प्रसिद्ध होत होत्या. या कविता वाचून ना.धों.महानोर, इंदिरा संत, शंकर-सरोजिनी वैद्य, प्रभा गणोरकर अशा अनेक दिग्गजांची तिला दादही मिळाली होती.
तसे तुम्ही आधी माझे परिचित होतात
त्यानंतर माझे मित्र होता तुम्ही
मग दिलं होतंत वचन सहचर बनण्याचं
त्यामुळे आज तुम्ही माझे मालक असणं
मला अवघड नाहीये वाटत…
अशी धारदार उपहासानं भरलेली तिची कविता कदाचित तिच्यावर तथाकथित स्त्रीवादाचा शिक्का मारत असेल, पण अनेक ज्येष्ठ व्यक्तींना तिच्या चित्रांतून व्यक्त होणारी तिची तरल अशी संवेदनशीलता अधिक महत्त्वाची वाटते.
‘ब्र’, ‘भिन्न’, ‘ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम’ लिहिण्यापूर्वी कवितानं केलेलं भरपूर संशोधन या कादंबऱ्यांच्या कथानकातून जाणवत राहतं. ‘वारली लोकगीते’ संपादित करण्यामागं आणि ‘कुहू’सारखी मल्टिमीडिया कादंबरी लिहिण्यामागंही हे संशोधन सतत कार्यरत असतं. ‘भारतीय लेखिका’ या कवितानं एकहाती पूर्ण केलेल्या प्रकल्पामुळे मराठी साहित्याला अनेक भारतीय लेखिकांची ओळख होऊ शकली. कन्नड, मल्याळम, हिंदी, पंजाबी अशा अनेक भाषेतल्या लेखिकांच्या साहित्यकृतींचं वाचन करून, त्यांचा अनुवाद करवून घेणं, त्यांचं संपादन करणं, त्यांना अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिणं, अशी अनेकांगी कामं अगदी सहजरीत्या पूर्ण करून कवितानं अनुवादाच्या क्षेत्रात नोंद घेण्याजोगी कामगिरी केली आहे.
व्यावहारिक कारणांसाठी कवितानं रेसिपी बुक्सचंही काम केलेलं असलं तरी ती तिनं टाइमपास म्हणून लिहिलेली नाहीत, हे आपल्या सहज लक्षात येतं. पदार्थांचं पोषणमूल्य, तो पदार्थ बनवतानाची पूर्वतयारी याचा तिनं बारकाईनं विचार केलेला दिसतो. जोयानाच्या गोष्टी लिहिणारी कविता लहान मुलांशी गप्पा मारताना किती रमून जाते, हे पाहणं मोठं गमतीशीर असतं. लहान मुलांच्या पातळीवर जाऊन, त्यांना बोअर न करता नकळत त्यांना योग्य ठरेल अशी गोष्ट सांगणं हे काम सोपं नसतं. पण ती मुलांमध्ये इतकी रमते की, मुलं गळेपडूपणा करून तिच्याकडून गोष्टी काढून घेतात. मुलांना हवं ते करू देणाऱ्या, त्यांच्या खोड्या काढणाऱ्या आणि त्यांच्या एवढंच होऊन जाणाऱ्या कवितामावशीला मुलांमध्ये एकदम मस्त ‘डिमांड’ असते. इंद्रायणी साहित्यने तिचा नुकताच प्रसिद्ध केलेला पुस्तकसंच चाळला तरी याची कल्पना येते. ‘सामसूम वाघ’, ‘कोकळू कोल्हा’, ‘बेडूक काका’, ‘बकरीचं पिल्लू’, ‘चतुर लाली मांजर’ या तिने निर्माण केलेल्या व्यक्तिरेखांची नावंच इतकी छान आहेत की, कोणत्याही चळवळ्या मुलाची उत्सूकता जागृत होते. लोककथांची पार्श्वभूमी आणि हस्तकलेची जोड, यामुळे हा संच आणखीनच इंटरेस्टिंग झाला आहे.
चित्रं, कॅलिग्राफी, फोटोग्राफी, अॅनिमेशन, संगीत अशी विविध माध्यमं वापरून कविताने लिहिलेलं ‘कुहू’ हे पुस्तक म्हणजे मराठीतलाच नव्हे तर भारतातला आगळावेगळा प्रयोग आहे. या पुस्तकाच्या निमित्तानं दिसलेली तिची आगळीवेगळी प्रतिभा निश्चितच नोंद घेण्याजोगी आहे, पण काळाच्या फार पुढे असणाऱ्या या प्रयोगाला लोकांचं फारसं पाठबळ मिळू शकलं नाही याची खंत वाटते.
या पुस्तकांबरोबरच काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या ‘समुद्रच आहे एक विशाल जाळं’सारख्या दीर्घकवितेमुळे कविता अरुण कोलटकरांसारख्या दिग्गज कवीच्या रांगेत जाऊन बसली आहे. या कवितासंग्रहात मासोळीचं रूपक वापरून कविताने जीवन, मृत्यू, मानवी नातेसंबंध, माणसाची संघर्षप्रेरणा अशा अनेक गोष्टींविषयी चिंतन केलं आहे. म्हटलं तर ती एका विशाल समुद्रातल्या छोट्याशा मासोळीची कथा आहे, पण या साध्यासुध्या कथेला दीर्घकवितेचं रूप दिल्यामुळे तिला डॉ. सुधार रसाळांसारख्या नामवंत समीक्षकाचीही दाद मिळाली आहे.
या सर्व कामगिरीचा वेध घेताना कविताच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू दिसत असले तरी तिच्या जवळच्या व्यक्तींना कविता अजूनही एक साधीसुधी मैत्रीणच वाटते हे महत्त्वाचं. मराठवाड्यातल्या नांदेडसारख्या छोट्या शहरातून मुंबईसारख्या महानगरात स्थिरस्थावर होताना तिने खाल्लेले टक्केटोणपे ज्यांनी जवळून पाहिलेत, त्यांना कवितानं आता गाठलेला टप्पा अभिमानास्पद वाटतो. तर कोणाला राज्य मराठी विकास संस्थेत कंत्राटी तत्त्वावर काम करणारी कविता आता स्वत:च इतरांना नोकरीवर ठेवते याचं कौतुक वाटतं. व्यक्तिगत आयुष्यात अनेक संघर्षांना सामोरं जात, अनेक आजारपणांना तोंड देत, आर्थिक अस्थिरतेच्या टांगत्या तलवारीकडे दुर्लक्ष करत कवितानं स्वत:ची सर्जनशीलता जागती ठेवली आहे.
तिच्यातला बंडखोरपणा कोणाला कितीही डाचत असला तरी मरणपंथावरच्या एडसग्रस्त मुलाला दत्तक घेण्याचं तिचं धाडस नक्कीच दाद देण्याजोगं आहे. कोणालाही पटकन मदत करण्याची तिची वृत्ती, हातचं राखून न ठेवता स्पष्टवक्तेपणा जपण्याचं धैर्य, सतत कष्ट व अभ्यास करण्याचा चिवटपणा या सगळ्या गोष्टींतून अनेकांना अनेक गोष्टी शिकता येतील.
तिच्या प्रचंड मोठ्या मित्रपरिवारामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या, वेगवेगळ्या वयोगटांतल्या व्यक्ती आहेत. कविताशी कोणत्याही वेळी, कोणत्याही विषयावर बोलण्यासाठी त्यांना कुठल्याही औैपचारिकतेची गरज भासत नाही, यातच तिचं वेगळेपण आहे. (ते असंच बहरत राहो!)
कविताची लोकप्रियता एका रात्रीत तयार झालेली नाही. त्यामागे तिचे अथक परिश्रम, चिकाटी आणि प्रवाहाविरुद्ध लढत राहण्याचं धाडस आहे, हे मात्र फार थोड्या जणांना माहिती असेल. फक्त कविता करणं, फक्ट पेंटिंग करणं या गोष्टी अनेकजण करत असतात. पण या सगळ्याला कविता चौकटीबाहेरचं जे परिमाण देते, त्यामुळे ती वेगळी ठरते. उमेदवारीच्या काळात तिनं कुसुमाग्रजांच्या फारशा न गाजलेल्या कविता आणि स्वत:ची पेंटिंग्ज असं एक प्रदर्शन भरवलं होतं. ‘कुहू’सारखी मल्टिमीडिया कादंबरी लिहिणं, त्याच्या दोन वयोगटांसाठी दोन वेगळ्या आवृत्त्या काढणं, यातूनही तिचा चौकटीबाहेर विचार करण्याचा गुण दिसून येतो!
वरवर बंडखोर वाटणारी कविता आतून किती हळवी आणि संवेदनशील आहे, याची जाणीव तिच्या जवळच्या व्यक्तींना मनापासून असते. पुण्या-मुंबईतल्या लेखकांना समविचारी लेखकांचा कंपू करून फक्त एकमेकांनाच प्रोत्साहन देण्यात इतिकर्तव्यता वाटते, अशी चर्चा अनेक जण करत असतात. पण लेखकीय पार्श्वभूमी नसलेल्या अनेक मित्र-मैत्रिणींना आजारपणात दवाखान्यात सोबतीला जाण्यापासून पडेल ती मदत करण्यात कविता सर्वांत पुढे असते. मैत्रिणीच्या होणाऱ्या बाळासाठी स्वेटर विणणारी कविता आणि जवळच्या व्यक्तींच्या आजारपणामुळे अस्वस्थ होणारी कविता, ही तिची रूपं खूप वेगळी आहेत.
लेखक म्हणून प्रतिभा, कल्पनाशक्ती, मूडस या गोष्टींचा बडेजाव न करता नव्या तंत्रज्ञानाला आत्मसात करणं हा कविताचा आणखी एक उल्लेखनीय गुण. बदलत्या तंत्रज्ञानाशी तिची नेहमीच मैत्री असते. ‘कुहू’च्या निमित्तानं तिनं वापरलेली वेगवेगळी तंत्र आणि तिचे हजारो फेसबुक फ्रेंडस या तंत्रज्ञानमैत्रीची उत्तम उदाहरणं आहेत. विविध संगणकीय कौशल्य शिकून स्वत:ला अपडेट ठेवणं, या गुणामुळेच विविध वयोगटातल्या मित्र-मैत्रिणींशी ती खूप चांगल्या रीतीनं रिलेट होऊ शकते, चांगली मैत्री करू शकते.
काही वर्षांपूर्वी कविताची शेजारीण असणारी छोटी जोयाना नावाची मुलगी स्वत:च्या घरापेक्षा कविताच्याच घरात रमलेली असायची. कारण तिची सगळी बडबड न कंटाळता ऐकून घेणारी, तिच्याएवढीच लहान होऊन चित्रं रंगवणारी, छान छान खाऊ देणारी कवितामावशी तिला घरच्यांपेक्षा जास्त आवडायची. ‘आपण कवितामावशीला काहीही सांगू शकतो’ याबाबतचा तिचा सार्थ विश्वास खूप गमतीशीर वाटायचा.
कविताच्या एका मैत्रिणीचा मुलगा अगदी बाळ असल्यापासून तिच्या मागे-पुढे असायच्या. कवितामावशी येणार आहे का, मग मज्जाच मज्जा अशी त्याची ठाम खात्री होती. हा मुलगा जेव्हा सहावी-सातवीला गेला, तेव्हा सगळ्याच मुलांना असतो, तसा त्यालाही ऑटोग्राफ जमवण्याचा नाद लागला होता. तेव्हा कविताच्या ‘ब्र’ आणि ‘भिन्न’ या कादंबऱ्या खूप गाजत होत्या. त्यामुळे आईनं त्याला ‘तू, कवितामावशीचाही ऑटोग्राफ घेऊ शकतोस,’ असं सुचवलं, पण त्यानं हा प्रस्ताव उडवून लावला. त्यावर त्यानं स्वत:च्याच आईला एक प्रश्न विचारला. तो म्हणाला, ‘‘आई, अभिषेक बच्चनने अभिताभ बच्चनचा ऑटोग्राफ घेतल्याचं तू कधी ऐकलंयस का? मग मी कवितामावशीचा ऑटोग्राफ कसा घेणार? ती तर आपल्या घरातलीच आहे, आपलाच भाग आहे.” मुलाच्या या उत्तरानं आई निरुत्तर झाली आणि अंतर्मुखही.
कविताचं सर्वार्थानं मोठं होणं अनुभवणारे अनेक असतील, पण छोट्या छोट्या गोष्टींतून तिने असंख्य माणसांच्या मनात निर्माण केलेली आपलुकी जास्त मोठी आहे.
लेखिका व्यवसायाने शिक्षिका व ग्रंथसंपादक आहेत.
smita1707@gmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment