भारतीय चित्रपटांचा विस्तीर्ण पट
कला-संस्कृती - चलत्-चित्र
अभिजित देशपांडे
  • भारतीय सिनेमा
  • Wed , 03 May 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti चलत-चित्र भारतीय सिनेमा Indian Cinema देशी सिनेमा National Cinema जागतिक सिनेमा World Cinema

३ मे १९१३ रोजी दादासाहेब फाळक्यांचा ‘राजा हरिश्चंद्र’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याहीआधी १८ मे १९१२ रोजी दादासाहेब तोरणे यांचा ‘भक्त पुंडलिक’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्याचा उल्लेख सापडतो. हा इतिहासकारांचा प्रांत आहे. पण मे हा भारतीय चित्रपटसृष्टीचा जन्माचा महिना म्हणता येईल, एवढे नक्की. यानिमित्ताने, भारतीय चित्रपट या संकल्पनेचा घेतलेला हा शोध.

………………………………………………………………………………

“What our cinema needs above everything else is a style, an idiom, a sort of iconography of cinema, which would be uniquely and recognizably Indian.” - Satyajit Ray.

सत्यजित राय यांनी १९४८ साली ‘What is Wrong with Indian Films?’ या तक्रारवजा शीर्षकाचा एक लेख लिहून संगीत, चित्रकला, कविता आदी कलांचा प्रेरणास्त्रोत ठरलेल्या या देशात अस्सल भारतीय चित्रपट बनवण्यासाठी चित्रपटकर्मीला मात्र ऊर्जा मिळू नये, याबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त केले होते आणि त्यासाठी चित्रपटकर्मीने आपले कान, डोळे उघडे ठेवायला हवेत, असा अर्थपूर्ण सल्लाही शेवटी दिला होता. तोवरचा भारतीय चित्रपटांचा इतिहास पाहता, काहींना राय यांची ही तक्रार पटणारही नाही, अथवा अनाठायी वाटेल, परंतु या त्यांच्या विधानांचे संदर्भ तपासू गेल्यास, राय यांच्या म्हणण्यात तथ्य जाणवेल.

भारत नुकताच स्वतंत्र झाला होता, राष्ट्रवादाने समाज आणि राजकीय जीवनच नव्हे, तर कलाजीवनही भारलेले होते. अनेक कलांतून ते ठळकपणे जाणवतही होते. चित्रपटांत मात्र  ‘भारतीयत्व’  चाचपडतच होते. दुसऱ्या बाजूला, दुसऱ्या महायुद्धाने सारे जगच ढवळून निघाले होते. आंतरराष्ट्रीय समीकरणे बदलली होती. होरपळलेल्या देशांची राष्ट्रीयत्वाची भावना अधिक प्रखर बनली होती. ‘बायसिकल थिव्हज्’  हा इटलीचा चित्रपट त्या देशाचे प्रखर वास्तव त्याच्या देशी तपशीलांसकट, समग्र राष्ट्रीय चरित्र आणि चारित्र्यासकट समोर मांडू पाहत होता. तसे आपल्या समाजाचे भारतीयपण (खऱ्या अर्थाने भारतीय सृष्टीदृष्टी) आपल्या चित्रपटांत का नाही, अशी राय यांची उपरोक्त तक्रारीमागची धारणा असावी. अर्थात राय निव्वळ तक्रार मांडून थांबले नाहीत, तर अल्पावधीतच म्हणजे १९५५ साली ‘पाथेर पांचाली’ या अस्सल देशी चित्रपटाची निर्मिती करून आपल्याच तक्रारीला त्यांनी चोख कलात्मक उत्तरही दिले. आपल्या संपूर्ण कलाप्रवासातून त्यांनी भारताचा आणि भारतीयत्वाचाच अखंड शोध घेतला, हे सर्वज्ञातच आहे. 

‘National Cinema’ ही संकल्पना Film Studies मध्ये तुलनेने अगदी अलिकडची. १९८० च्या दशकात वापरली जाऊ लागली. तोवर ‘World Cinema’ ही संकल्पना अधिक ठळकपणे प्रचलित होती. त्याचा वास्तविक अर्थ जगभरचा, विविध देशांमधला सिनेमा. पण हॉलिवुडबाहेरचा सिनेमा याच मर्यादित अर्थाने ‘National Cinema’ ही संकल्पना वापरली जात होती. १९८९ मध्ये Andrew Higson यांनी ‘National Cinema’ या संकल्पनेचा स्वतंत्रपणे विचार आरंभला. त्या त्या देशातले सिनेमाचे स्वतंत्र अर्थकारण, इतिहास, सिनेमा संस्कृती, सिनेमातील प्रवाह, सिनेमाच्या जातकुळी व शैली, सिनेमाची संस्कृतिविशिष्ट आशय-विषय दृष्टी,  लोकांच्या सिनेमाकडून अपेक्षा आणि त्यांची सिनेमाची अनुभव घेण्याची संस्कृतिविशिष्ट पद्धती...

थोडक्यात, सिनेमाकर्मी, सिनेमा आणि प्रेक्षक या सर्वांतून प्रतीत होणारे त्या देशाचे चरित्र आणि चारित्र्य यांना व्यापणारी ही संकल्पना आहे. Higson यांच्याच शब्दांत सांगायचे तर, “A Nation does not express itself through Culture; it is Culture that produce the Nation.” जिथे जिथे म्हणून चित्रपटसंस्कृती ठळकपणे विकसित झाली, त्या त्या देशाचा विशिष्ट सिनेमा... फ्रेंच, ब्रिटिश, जर्मन, रशियन, इटालियन सिनेमाचा, त्याच्या स्वरूप-संदर्भ-वैशिष्ट्यांचा... असा स्वतंत्रपणे विचार करता येईल. पण त्याआधी तसा स्वतंत्र चेहऱ्याचा सिनेमा तिथे विकसित झालेला असावा लागतो. राय यांच्या लेखात त्याबद्दलचीच अपेक्षा व्यक्त झालेली दिसते. आज राय हयात असते तर त्यांनी ही तक्रार मागे घेतली असती, हे निश्चित.

दरम्यान, पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. भारतीय चित्रपटसृष्टी आज, ३ मे रोजी आपली अकशे चार वर्षे पूर्ण करत आहे. आजवर भारतात हजारो चित्रपट बनले आहेत, बनत आहेत. भारत हा जगात सर्वाधिक चित्रपटनिर्मिती करणारा देश आहे. २००७ मध्ये तर जगभरात सुमारे २४०० चित्रपट बनले, त्यापैकी ११६४ चित्रपट भारतातले होते. मागील दोन-तीन वर्षांत १२०० ते १३०० पर्यंत ही संख्या पोहोचली आहे आणि सातत्याने वाढतेच आहे. इतक्या मोठ्या संख्येने असणाऱ्या या चित्रपटांचे नेमके स्वरूप सांगणे म्हणूनच अवघड आहे.

इतर कुठल्याही देशाच्या सिनेमाची वैशिष्ट्ये ज्या  प्रकारे व ज्या निकषांआधारे दाखवता येतील, तसे भारतीय चित्रपटांबद्दल करता येणार नाही. भारत हा एक व्यामिश्र संस्कृती असलेला देश आहे. अनेकविध धर्म-जाति-भाषा-प्रांत असलेला हा देश आहे. अनेकविध सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक-कलापरंपरांच्या प्रभावातून भारतीय चित्रपटसृष्टी आकाराला आलेली आहे. नवनवे प्रभाव पचवत-रिचवत ती घडतेच आहे. आणि म्हणूनच भारतीय चित्रपटसृष्टी ही संकल्पना व्यापक आणि गुंतागुंतीची होऊन बसते. तरी त्याचे स्वरूप समजून घेण्यासाठी विवेचनाच्या सोयीसाठी पुढीलप्रमाणे काही एक वर्गीकरण करता येणे शक्य आहे.

व्यावसायिक-लोकप्रिय हिंदी चित्रपट अर्थात बॉलिवुड

हा भारतीय चित्रपटातला मुख्य, मध्यवर्ती प्रवाह आहे. पण फक्त तो म्हणजेच भारतीय सिनेमा नव्हे. परदेशी चष्म्यातून हिंदी चित्रपटसृष्टीलाच भारतीय चित्रपट मानले जाते. व्यावसायिक-लोकप्रिय हिंदी चित्रपटांना सर्वसाधारणपणे बॉलिवुड या नावाने देखील ओळखले जाते. अमेरिकेतील हॉलिवुडच्या धर्तीवर बॉम्बे हॉलिवुड म्हणून बॉलिवुड हा शब्द १९८०च्या दशकापासून वापरला जाऊ लागला. काहींना तो त्याचमुळे पटतही नाही. पटो अथवा न पटो, बॉलिवुड हा शब्द मागील तीस-पस्तीस वर्षांत जगभर रूढ झालाय.

बॉलिवुडची ठळक वैशिष्ट्ये साधारणपणे पुढीलप्रमाणे सांगता येतील. बिग बजेट, बिग स्टार्स आणि बिग एन्टरटेनमेन्ट व्हॅल्यू असणारे हे चित्रपट असतात. (अलिकडच्याच एका चित्रपटातला डायलॉग वापरायचा तर, ‘फिल्मे सिर्फ तीन चिजोंसे हीट होती है- एन्टरटेनमेन्ट, एन्टरटेनमेन्ट और एन्टरटेनमेन्ट!’) आणि हेच त्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. सर्व प्रकारची व्यावसायिक गणिते डोळ्यासमोर ठेवूनच हा चित्रपट बनलेला असतो. नयनमनोहर अशी दृश्ये, नाच, सुश्राव्य संगीत, रंजनाला पोषक हरतऱ्हेचा मसाला (अभिजातच शब्द वापरायचा तर विविध रसांचा वापर) त्यात पुरेपूर असतो. संपूर्ण भारताचे मार्केट डोळ्यासमोर असल्याने कुठल्याही एका विशिष्ट प्रांताचा-भाषेचा प्रेक्षक अपेक्षित नसतो. एका अखिल भारतीय चेहरेविहीन प्रेक्षकाची कल्पना करावी लागते. आणि त्यामुळेच कथानकाला बरेचदा निश्चित कालावकाश नसतो. उदाहरणार्थ, चित्रपटातले रामपूर म्हटले की, ते तमिळनाडूपासून काश्मीरपर्यंत कुठलेही असू शकते. वास्तवात, काही मैलांगणिक गावाचे सामाजिक-सांस्कृतिक स्वरूप बदलेल. चित्रपटात मात्र असा विशिष्ट चेहरा टाळलेला असतो. एका अर्थाने, प्रेक्षक म्हणून आपणा सर्वांना एका चेहरेविहीन भारतीय सूत्रात बांधण्याचा प्रयत्न त्यात असतो. अथवा एक खिचडी संस्कृती कृत्रिम रीतीने रचलेली असते. उदा. ‘शोले’ किंवा ‘लगान’मधले गाव आठवून पहा. त्यात विविध जाती-धर्माचे लोक आहेत, पण त्यांतील परस्परसंबंधांतील व्यामिश्रता टाळून एक सपाट सुलभ समाजवास्तवाचा आभास विणलेला असतो. विविध प्रदेशांतील विविध संस्कार घेऊन त्यातून एक कृत्रिम संस्कृती रचलेली असते. असे चित्रपट वरकरणी सामाजिक विषयांचा चेहरा धारण करणारे असले तरी मुळात त्याचे स्वरूप गुडी-गुडी सामाजिकतेचे, More Escapist आणि Less Potentially Disturbing असे असते. रंजनाच्या नानविध क्लृप्त्या शोधत तांत्रिकदृष्ट्या चकचकीत व अद्ययावत असणारा हा चित्रपट असतो. रंजनप्रधान-पलायनवादी दृष्टीचे हे चित्रपट असतात. व्यावसायिक दृष्टिकोनातून त्याला निश्चित मूल्य आहे. अधिकाधिक लोकांना (खेड्यातल्या अशिक्षितापासून ते शहरातल्या रिक्षावाला नि बेकार तरुणांपासून ते १२-१२ तास ऑफिसमध्ये राबणाऱ्या कॉर्पोरेट कर्मचाऱ्यापर्यंत सर्वांना) ते कळावेत, आवडावेत, घटकाभर मनोरंजन करणारे ठरावेत, जमलाच तर काही संदेशही त्यातून द्यावा- इतकाच माफक विचार त्यामागे असतो. अशा चित्रपटांना भारतात आणि भारताबाहेरही मोठा प्रेक्षकवर्ग आहे. 

प्रादेशिक चित्रपट 

भारतातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये चित्रपट बनत असले तरी संख्येने सर्वाधिक (एकुण भारतीय चित्रपटांच्या अर्धेअधिक) चित्रपट दक्षिणेतल्या चार राज्यांत बनतात. यातही वरीलप्रमाणेच व्यावसायिक दृष्टी असणाऱ्या चित्रपटांचीच संख्या अधिक असते. हिंदी चित्रपटांच्या तुलनेत त्यात भडकपणाही अधिक असतो. विशेषतः तमिळ आणि तेलुगु चित्रपटांमध्ये. चित्रपटातील अभिनेते, अभिनेत्री इतके लोकप्रिय होतात की, त्यांना जवळपास देवाखालोखालचा दर्जा मिळतो. एन.टी. रामाराव, चिरंजीवी, रजनीकांत...ही काही वानगीदाखल नावे. 

त्यांचे फोटो देवघरात ठेवून आरतीही केली जाते. अशा लोकप्रियतेमुळेच हे अभिनेते राजकारणातही सहजपणे जम बसवताना दिसतात. (हिंदीतले लोकप्रिय अभिनेते मात्र निवडणुकीत जिंकतीलच याची ते स्वतःही खात्री देऊ शकत नाहीत. दक्षिणेची –विशेषतः या दोन राज्यांची बातच निराळी.) बरेचदा चित्रपट तमिळ आणि तेलुगु अशा दोन्ही भाषांत एकदमच बनवला जातो. तमिळ सिनेमाला तर मलेशिया, सिंगापूर असे परदेशी मार्केटही खूप मोठे आहे. ब्रिटिश चित्रपटांपेक्षाही हे मार्केट मोठे आहे. अनेक तमिळ चित्रपट बॉक्स ऑफिसबाबत हिंदी चित्रपटांनाही मागे टाकतात. उदा. रजनीकांतचे चित्रपट. ‘बाहुबली’ने तर अनेक बाबतीत इतिहास रचला आहे. अशा चित्रपटांचा हिंदी रिमेक (अगदीच नाही तर डब) करण्याचा स्वाभाविक मोह बॉलिवुडला होतो. पण तिकडचे हिट दक्षिणेमध्ये जोरदार चालले, असे होताना मात्र दिसत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे, प्रादेशिकतेची गणितेच पूर्ण वेगळी असतात. प्रदेशागणिक ती बदलतातही.

चेन्नई हे दाक्षिणात्य चित्रपटांचे मुख्य केंद्र आहे. (त्यानंतर हैद्राबाद) तिथे तमिळबरोबरच तेलुगु, कन्नड व मल्याळी चित्रपटही बनतात. अलिकडच्या काळात तर भारतभरातली पोस्ट प्रोडक्शनची कामे चेन्नईत होऊ लागली आहेत. नजिकच्या काळात मुंबईऐवजी चेन्नई हीच भारताची फिल्म कॅपिटल अर्थात चित्रपट राजधानी ठरली तर आश्चर्य वाटायला नको.

दक्षिणेखालोखाल बंगाली, मराठी, उत्तरेतील भोजपुरी चित्रपटसृष्टी मोठी आहे. इतर प्रदेश त्यामानाने खूपच क्षीण आहेत. कलात्मकतेच्या दृष्टीने पाहू गेल्यास, बंगाली, मल्याळी, कन्नड, मराठी चित्रपट लक्षणीय आहेत.

कलात्मक अथवा समांतर चित्रपट

कलात्मक अथवा समांतर चित्रपट याचा अर्थच मुळी मुख्य व्यावसायिक चित्रपटप्रवाहाच्या बाहेरचा सिनेमा असा होतो. तंत्रज्ञान आणि भांडवल हे चित्रपटमाध्यमात अंगभूतच असल्याने व्यावसायिकता ही गोष्ट चित्रपटांना टाळताच येत नाही. हे खरे असले तरी काही एक व्यावसायिक जोखीम पत्करून कलात्मक धाडस अशा चित्रपटांनी केलेले असते. चित्रपट हे एक कलामाध्यम आहे म्हणून त्याची हाताळणी केलेली असते.  अनेकदा तर, कमी खर्चाचे, बेताचेच तंत्रज्ञान असलेले, स्टारकास्ट नसलेले (पर्यायाने अपेक्षित संथ, कंटाळवाणे) चित्रपट  म्हणून कलात्मक चित्रपटांकडे चेष्टेनेही पाहिले जाते. अशा चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग तुलनेने खूपच मर्यादित असतो. फिल्म सोसायटीज, फिल्म फेस्टिवल्स, गंभीर कलाचर्चा, उत्तम सामाजिक भान यांतून हा प्रेक्षक घडलेला असतो. असा चित्रपट प्रामुख्याने More Realistic, Socially Relevant आणि Potentially Disturbing असा असतो. याचा अर्थ प्रत्येकच सामाजिक चित्रपट कलात्मक असतो, असे नाही. पण बहुतेक कलात्मक, समांतर चित्रपटांमागे असलेली प्रबोधनाची प्रेरणाही दुर्लक्षित करता येत नाही. वैचारिकता, अधिक आशयघनता, चित्रभाषेचा समर्थ वापर, कलात्मक प्रयोगांचे धाडस, प्रबोधनाची प्रेरणा...ही  कलात्मक अथवा समांतर चित्रपटांची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत. हा खऱ्या अर्थाने ओतर सिनेमा म्हणजे दिग्दर्शकाचा सिनेमा म्हणता येईल. हिंदी तसेच प्रादेशिक चित्रपटांतदेखील समांतर चित्रपटांची ही धारा दिसते. सत्यजित राय, ऋत्विक घटक, बुद्धदेव दासगुप्ता, मृणाल सेन, अपर्णा सेन,गौतम घोष, अदूर गोपालकृष्णन, गोविंदन अरविंदन, जॉन अब्राहम, शाजी करून, गिरीश कासारवल्ली, श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, मणी कौल, कुमार शाहनी, केतन मेहता, सईद मिर्झा, मनमोहन महापात्रा, निराद महापात्रा...या थोर दिग्दर्शकांनी ही धारा विकसित केली नि खळाळती ठेवली. पण १९९० च्या दशकात येईतो हा प्रवाह संपला.

मध्यममार्गी चित्रपट

विशेषत: जागतिकीकरणानंतर, जागतिक चित्रपटांचे विश्व आपल्याला अनेक अर्थांनी खुले झाले. चॅनेल्सपासून ते इंटरनेटपर्यंत अनेक प्रकारांनी हरतऱ्हेचा जगभरातला सिनेमा आपल्या दाराशी येऊन ठेपला. फिल्म फेस्टिवल्स रूजू लागले. प्रेक्षकांची जातकुळी बदलू लागली. व्यवसायाची गणिते बदलली. मल्टिप्लेक्स आले. या सर्वांचा परिणाम म्हणजे १९९० च्या दशकाअखेरीस मध्यममार्गी चित्रपट उदयाला आला. व्यावसायिकतेशी फटकून न वागता पण कलात्मकतेची कासही न सोडता दोहोंना सामावून घेत प्रयोगशील असलेला हा प्रवाह आहे. ‘सत्या’ ते ‘गॅंग्ज ऑफ वासेपूर’, ‘नीरजा’, ‘अलीगढ’, ‘पिकू’, ‘पिंक’ ते अलीकडचा ‘मुक्ती भवन’, ‘सोनाटा’ ...व्हाया ‘चांदनी बार’, ‘फॅशन’, ‘पिपली लाईव्ह’, ‘धोबी घाट’... ही या मध्यममार्गी प्रवाहातली काही ठळक उदाहरणे म्हणून सांगता येतील. 

अनिवासी भारतीयांचा चित्रपट 

जगभर पसरलेल्या भारतीयांनी भारतीय विषय व कथानकांवर बनवलेला चित्रपट संख्येने आजघडीला इतका आहे कीअनिवासी भारतीयांचा चित्रपट असा वेगळा स्वतंत्र प्रवाहच दाखवता येईल. मिरा नायर, दीपा मेहता, गुरींदर चढ्ढा...ही यातली काही वानगीदाखल नावे. यांनी बनवलेल्या चित्रपटांवर वरकरणी कलात्मक चित्रपटांचा प्रभाव जाणवत असला, तरी हे सर्वच्या सर्व चित्रपट कलात्मक, समांतर जातकुळीतले नाहीत. भारतीय कथावस्तू असली तरी काहीशा अंतरावरून, अनेकदा परक्या वा तटस्थ नजरेने स्वतःकडे पाहण्याचा हा प्रकार आहे. समांतरच्या तुलनेत एक व्यावसायिक चकचकीतपणा व सफाईदारपणा त्याच्या हाताळणीत दिसतो.

परदेशीयांचे भारतीय चित्रपट

परदेशी चष्म्यांतून, काही वेळा परक्या वा तटस्थ नजरेने तर कधी अंतरंगात खोलवर शिरून पाहण्याचा हा प्रयत्न आहे. परदेशी लोकांनी अलिकडेच भारतीय कथाविषयांवर चित्रपट बनवले आहेत, असे मात्र मुळीच नाही. १९३६ सालचा फ्रान्झ ओस्टीन दिग्दर्शित व अशोक कुमार-देविका राणी अभिनित ‘अछूत कन्या’ हा सुरुवातीच्या काळातला असाच एक महत्त्वाचा चित्रपट आहे. ओस्टीन यांनी थोडेथोडके नाही तर तब्बल १४ चित्रपट बॉम्बे टॉकीजसाठी दिग्दर्शित केले होते. ज्याचे कोलकात्यातील चित्रीकरण पाहण्यासाठी सत्यजित राय आणि चिदान्द दासगुप्ता आवर्जून जात असत, तो ज्यॉं रेन्वां दिग्दर्शित ‘रिव्हर’ (१९५१), रिचर्ड एटनबरो दिग्दर्शित ‘गांधी’ (१९८२), डेव्हीड लीन दिग्दर्शित ‘अ पॅसेज टू इंडिया’ (१९८४), डॅनी बॉयल दिग्दर्शित ‘स्लमडॉग मिलियेनिएर’ (२००८), ‘लाईफ ऑफ पाय’ (२०१२)  ही या प्रकारातली काही ठळक उदाहरणे.

भारतीय चित्रपट असा अनेक प्रवाहांनी घडला आहे. प्रत्येक प्रवाहातून वेगळा भारत समोर आला, नव्याने रचला गेला. भारतीय समाज जसा व्यामिश्र आहे, तसाच भारतीय प्रेक्षक आणि म्हणून भारतीय चित्रपटही. जागतिकीकरणाने आपण एकीकडे जगाशी जोडलो गेलो आहोत, तर दुसरीकडे आपल्या सांस्कृतिक मुळांना घट्ट बिलगून आहोत. आपल्या चष्म्यातून जग आणि जगाच्या चष्म्यातून स्वतःचा वेध घेत आहोत. सर्वच कलांतून ते दिसते. चित्रपटासारख्या जनमाध्यमांतून तर ते अधिकच. त्यातूनच भारतीय चित्रपटसृष्टी आणि त्याविषयीची संकल्पना समृद्ध होत जाईल.

लेखक प्रभात चित्र मंडळाच्या ‘वास्तव रूपवाणी’ या त्रैमासिकाचे संपादक आहेत.

abhimedh@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख