‘बाहुबली’ - व्हिएफएक्सचा भपका असलेला एक ट्रेंडी सिनेमा
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
नरेंद्र बंडबे
  • ‘बाहुबली - द कन्क्लूजन’चं एक पोस्टर
  • Wed , 03 May 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा बाहुबली - द कन्क्लूजन Bahubali - The Conclusion S. S. Rajamouli बाहुबली - द बिगिनिंग Bahubali - The Beginning

एस. एस. राजामौलीचा ‘बाहुबली’ आणि जे. के. रोलिंगच्या ‘हॅरी पॉटर’ यात प्रचंड समानता आहे. एक सिनेमा आणि दुसरी कादंबरी ही अशी वेगवेगळी माध्यमं असली तरी. लोकप्रियता हा निकष लावला तर दोन्ही सरस आहेत. दोघांनी ट्रेंड बनवला. हॅरी पॉटरनं लहान मुलं, तरुण तसंच त्यांच्या आई-बाबांना पुन्हा वाचतं केलं. दुसरीकडे ‘बाहुबली’ हा सिनेमा फॅमिली इंटरटेंमेन्ट आहे. ‘हॅरी पॉटर’ आणि ‘बाहुबली’ दोन्ही आवडणारा बहुतांश एकच वयोगट आहे. तो म्हणजे ८ ते १५  वर्षे. ‘कटप्पाने बाहुबली को क्यों मारा?’ याचं उत्तर जाणून घेण्याची उत्सुकता असलेला हा वर्ग गेली दोन वर्षं दुसऱ्या भागाची आतुरतेनं वाट पाहात होता. ‘बाहुबली’ची ही जादू भूरळ घालणारी, भव्य दिव्य अशी आहे. पडद्यावरच्या नाटकाची जागा या जादूनं घेतली. हे सर्वजण ही जादू पाहायला थिएटरमध्ये पोचले.

‘हॅरी पॉटर’ आणि ‘बाहुबली’त आणखी एक समानता आहे आणि जे त्यांच्या लोकप्रियतेचं मुख्य कारण आहे. ती म्हणजे हॅरी पॉटरची लेखिका जे. के. रोलिंग आणि ‘बाहुबली’चे दिग्दर्शक राजामौली यांची प्रचंड क्रिएटिव्ह कल्पनाशक्ती. त्यांनी तयार केलेलं जग गारूड करतं. तोंडात बोट घालायला लावतं. लार्जर दॅन लाईफचा फिल देतं. ‘बाहुबली’ मिथक आहे. यामुळे त्याचा अनुभव आजीने  रोज रात्री झोपण्यापूर्वी सांगितलेल्या ‘आटपाट नगराचा एक होता राजा’ या पठडीतला आहे, जो रोजच ऐकायला आवडायचा. पण जे. के. रोलिंगचा कल्पनाविलास हा वेगळ्या उंचीवरचा आहे. प्रचंड कल्पक आहे. कथानकाला पुढे घेऊन जाताना कल्पनाशक्तीचा अतिरेक झालाय असं कुठेच जाणवलं नाही. म्हणूनच हॅरी पॉटरची पुस्तकं आणि सिनेमे या दोघांनी पाचव्या भागापर्यंत उत्कंठा ताणून ठेवली. वेड लागल्यागत लहान मुलं आणि मोठेही ते वाचत होते, पाहात होते. पण ‘बाहुबली’च्या बाबतीत तसं दिसत नाही. पहिल्या भागातलं कथानक दुसऱ्या भागात सपशेल घसरलं आणि घाईघाईच्या युद्धात महेंद्र बाहुबली माहेष्मती नरेश झाला. हॅरी पॉटरच्या पुस्तकात ही उत्सुकता प्रत्येक भागानुसार वाढत गेली. यामुळे पुस्तकाच्या लाखो प्रति खपल्या होत्या. तरीही सिनेमाची क्रेझ राहिलीच. हे श्रेय फक्त जे. के. रोलिंगचं. तिच्या कल्पनाशक्तीचं. मूळ कथानकातच दम होता, म्हणून सिनेमेही गाजले. यातही स्पेशल इफेक्ट होतेच की! हॅरीचं जग जादूचं होतं. या कल्पनाविष्काराला जगभरात लोकांनी डोक्यावर घेतलं. आय. एम. स्पार्टाकसप्रमाणे प्रत्येक जण हॅरी पॉटर झाला. त्याचा व्होल्डेमोरबरोबर कधी अखेरचा सामना होणार याची वाट बघत राहिला. अगदी पाचव्या भागापर्यंत.   

 ‘बाहुबली’ लोकांना वाट बघायला लावण्यात यशस्वी झाला असला तरी कथानकात मार खाल्लेला हा सिनेमा पहिला भागाइतकाच आनंद देईल का याबद्दल थोडी शंकाच आहे. एक मात्र नक्की की, ‘कट्प्पाने बाहुबली को क्यों मारा?’ या प्रश्नाचं अगदी प्रेडिक्टेबल अपेक्षितच उत्तर मिळाल्यानं सर्वच पातळीवर ‘बाहुबली’ची बोंब आहे.

राहिली गोष्ट व्हिएफएक्सची. ते सुंदर आहेत. पहिल्या भागात मनमोहक लँडस्केप, वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेला माहेष्मती साम्राज्याचा राजवाडा, धोधो बरसणारा-रोरावणारा धबधबा आणि फुलपाखरांच्या आवरणात कमनीय शरीर अधिक डौलदारपणे हेलकावणारी अवंतिका आणि अंगावर काटा उभं करणारं सुरसुरी बाण आणि अस्सल भारतीय वाटणारं युद्ध. हा सर्व व्हिएफएक्सचा भाग आहे. दुसऱ्या भागात यापेक्षा मोठा कल्पनाविलास अपेक्षित होता, पण तसं काहीही घडलेलं नाही.

‘बाहुबली’ हा भारतीय सिनेमाक्षेत्रातला महत्त्वाचा सिनेमा आहे याबद्दल शंका नाही. बॉक्स ऑफिस कलेक्शनच नव्हे तर व्हिएफक्सच्या बाबतीतही. ‘बाहुबली’च्या व्हिएफएक्सवर काम करणारी मकुता कंपनी ही कॅलिफोर्नियातली असली तरी तिची बांधणी ही एका भारतीयाची आहे. आर. कमलाकन्नन हे कंपनीचे एक संस्थापक आहेत. २००९ साली ती तेलुगुतल्या  ‘मगधीरा’ या सिनेमातून पहिल्यांदा चर्चेत आली. चिरंजीवीचा मुलगा राम चरण यांचा हा दुसरा सिनेमा. गोष्ट  ‘बाहुबली’सारखीच. फ्लॅशबॅकच्या जोरावर उभं राहिलेलं साधारण कथानक. पण व्हिएफएक्सनं सिनेमात अशी काही जान आणली की, तो सुपरडुपर हिट झाला. इतकंच नव्हे तर रामचंद्रनच्या या पहिल्याच सिनेमाच्या गर्दीत गुदमरून तेव्हाच्या आंध्रात दोन जणांचा मृत्यू झाला. इतकी ही व्हिएफएक्सची क्रेज. जे पडद्यावर जे घडतंय ते 300 या हॉलीवुडपेक्षाही जास्त चांगलं आहे असं वाटणाऱ्यांची संख्या मोठी होती. म्हणूनच अस्सल भारतीय व्हिएफएक्स असलेल्या मगधीराची क्रेझ अजूनही पाहायला मिळते. कथानकाच्या बाबतीत तो ‘बाहुबली’पेक्षा उजवा आहे. त्यानेच भारतात व्हिएफएक्सच्या सिनेमांची मुहूर्तमेढ रोवली आणि नेहमीच वेगळं काही देण्याचा प्रयत्न करणाऱ्या एस. एस. राजामौलीनं मगधीराच्या लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होऊन ‘बाहुबली’ची आखणी केली. त्याला साथ मिळाली ती करन जोहरची. त्यातून बॉलिवुड आणि टॉलिवुड असा अनोखा संगम असलेला ‘बाहुबली’ तयार झाला. हिंदीसहित इतर चार भाषेत तो तयार झाल्यानं प्रसिद्धी आणि पैशीचं गणित साधता आलं. किंबहुना कलेक्शन चौपट होऊ शकलं.

एस. एस. राजामौली हा प्रयोगशील दिग्दर्शक आहे. त्याची कथानकाची निवड ही ट्रेंडी असते. म्हणूनच तो पॉप्युलर सिनेमांचा बादशहा झालाय. मग ‘मख्खी’ असो किंवा ‘बाहुबली’. त्यानं प्रेक्षकांना काय हवंय हे चांगलं ओळखलंय. मध्यंतरीच्या काळात रामगोपाल वर्मा जसा टेक्नॉलॉजीच्या आहारी गेला. कॅमेऱ्याच्या वेगवेगळ्या अँगलच्या प्रेमात पडला. तसंच राजामौलीचं झालं. ‘मख्खी’च्या अभूतपूर्व यशानंतर तो व्हीएफएक्सच्या आहारी गेला. त्यातूनच ‘बाहुबली’चा जन्म झाला.

हे व्हिएफएक्स वापरताना त्यानं आजीने सांगितलेल्या कथांचा, आपल्या मिथकांचा, रामायण-महाभारतासारख्या महाकाव्याचा आधार घेतला. तेवढं भव्य-दिव्य पडद्यावर साकारण्याचं शिवधनुष्य हाती घेतलं. आपली सर्वच्या सर्व कल्पनाशक्ती पणाला लावली. यातूनच माहेष्मतीचा भव्य राजवाडा तयार झाला. सिनेमात घनघोर युद्ध असल्यानं रणसंग्रामासाठी विस्तीर्ण युद्धभूमी तयार झाली. हे असं घणघोर युद्ध रामायण-महाभारत या सिरिअलमध्ये पाहिलं होतं. फक्त छोट्या पडद्यावर. त्यावेळी तंत्रज्ञान एवढं विकसित नव्हतं. तरी छोट्या पदड्यावर रामानंद सागर आणि बी. आर. चोप्रा यांनी जे काही साकारलं होतं, त्याला तोड नाही. राजामौलीनं तेच मोठ्या पडद्यावर प्रचंड मोठं असं साकारण्याचा प्रयत्न केला खरा, पण तो दुसऱ्या भागातच फोल ठरला.

‘बाहुबली’च्या कथानकात (दोन्ही भागात) काही मोजकीच ठिकाणं आहेत. त्यापैकी माहेष्मतीचा राजवाडा, भीती वाटेल तरीही मनमोहक असा प्रचंड उंच धबधबा, अवंतिकाच्या राज्याचं जंगल आणि युद्धभूमी. दुसऱ्या भागात देवसेनेचं कुंतल राज्य, तिथलं पिंढरींबरोबरचं युद्ध, माहेष्मतीचा राजवाडा आणि पुन्हा युद्धभूमी. ज्यावर भल्लालदेव आणि महेंद्र बाहुबलीत झालेली घमासान. आणि अपेक्षित असा भल्लालदेवाचा खातमा. या सर्व भागात व्हिएफएक्सचा भडिमार करण्यात आलाय. राजहंसांच्या बोटीतलं महेंद्र आणि देवसेनेचं प्रणयदृश्य असो किंवा मग वनवासातला बाहुबलीचा संघर्ष असो. सर्व काही अपेक्षित असल्यानं व्हिएफएक्सचा कितीही भपका केला तरी कथानकाची मोडतोड सिनेमाला फ्रॅक्चर करते. तरीही राजामौलीने उभारलेल्या ‘बाहुबली’ नावाच्या गारुडाची बाधा होतेच. थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट होतो. प्रचंड हशा पिकतो. हसरे चेहरे एक्सिट करतात. ही राजामौलीची खासियत म्हणावी लागेल. ‘मख्खी’च्या बाबतीतही असंच घडलं होतं. त्याचं कथानकही संपताना अगदी विनोदी बनलं. याचा अर्थ असा की, राजामौली हा चांगली स्टोरीटेलर नाही. तो तंत्रज्ञानाच्या जोरावर सामान्य कथानक मारून नेतो.

गेल्या पंधरा दिवसात दक्षिणेमध्ये दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. प्रसिद्ध दिग्दर्शक के. विश्वनाथ यांना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित झाला आणि दुसरी घटना म्हणजे ‘बाहुबली’ प्रदर्शित झाला. के. विश्वनाथ यांचा सिनेमा अस्सल भारतीय आहे. गाणं, संगीत आणि कथा सर्व काही परिपूर्ण भारतीय. त्यांनी जेव्हा सिनेमे बनवले, तेव्हा स्पेशल इफ्केट अशी काही भानगड नव्हती. किंबहुना त्याची गरजही नव्हती. त्यामुळे के. विश्वनाथ यांचा सिनेमा थेट मनात घर करतो. कुठल्याही स्पेशल इफेक्टशिवाय. गेल्या तीन पिढ्यावर के. विश्वनाथ यांच्या सिनेमांनी गारूड केलंय. परिपूर्ण अस्सल भारतीय कथा हीच त्यांच्या सिनेमाची शिदोरी आहे. त्यामुळे जगभरात त्यांचे फॅन आहेत. दक्षिणेतला अभिनेता कलमा हासन, रजनीकांत, चिरंजीवी यांना के. विश्वनाथ यांच्यासोबत काम करायला मिळणं भाग्याचं वाटतं. त्या काळात के. विश्वनाथ यांनी बॉलिवुड-टॉलिवुडला एकत्र आणलं. आणि हिंदीतही आपला प्रेक्षकवर्ग तयार केला. ‘कामचोर’, ‘सरगम’, ‘ईश्वर’, ‘संजोग’ असे एकापेक्षा एक हिट सिनेमे त्यांनी बॉलिवुडला दिले. कथा हिच त्यांच्या सिनेमाची जान आहे. हे राजामौलीच्या सिनेमात दिसत नाही. तिथं फक्त टेक्नॉलॉजीचा भडिमार असतो. म्हणून ‘बाहुबली’ मोठा सिनेमा असूनही लवकरच विस्मृतीत जाईल यात शंका नाही. कारण टेक्नॉलॉजी सतत बदलत असते. दुसऱ्या कुणीतरी नव्यानं कल्पनाशक्तीला व्हिएफएक्सची जोड देऊन सिनेमा केला तर तो ‘बाहुबली’ला सहज मागे टाकेल हे नक्की.

राजामौलीचा सलग दुसरा सिनेमा बॉलिवुडनं स्वीकारला. तोही डब म्हणून. रिमेक केला असता तर त्याचा खर्च परवडणारा नसता. यामुळे पीएस 4 आणि अॅन्ड्रॉईड गेम्सच्या जमान्यात टेक्नॉलॉजीच्या भडिमारामुळे प्रेक्षकांची एक्सिटसीची भावना ओळखून आणि सिनेमाचा वस्तूसारखा वापर ‘बाहुबली’च्या माध्यमातून करण्यात आला. त्याला मार्केटिंगची जोड दिली आणि कथानक तकलादू असल्यानं व्हिएफएक्सच्या जोरावर सिनेमा खेचण्याची जी लकब राजामौलीला जमलीय, ती खरोखरच वाखणण्याजोगी आहे. त्यासाठी त्याचं कितीही अभिनंदन केलं तरी कमीच ठरेल.

लेखक ‘महाराष्ट्र वन’ या मराठी वृत्तवाहिनीमध्ये न्यूज एडिटर असून आंतरराष्ट्रीय फिल्म क्रिटिक असोसिएशन FRIPRESCI चे सदस्य आहेत.

narendrabandabe@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख