अजूनकाही
१. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ गोरखपूरमध्ये आरएसएस आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या समन्वय बैठकीत म्हणाले, फक्त ‘गोमाता की जय’ म्हणून गोमातेचं संरक्षण होणार नाही. त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकाने स्वत:हून गोमातेच्या रक्षणासाठी प्रयत्न केल्यावरच गोमातेला वाचवण्यात यश येईल. त्याच वेळी, अनेक स्वयंघोषित गोरक्षकांच्या झुंडीच्या झुंडी देशामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यारस्त्यांवर दादागिरी करत आहेत. या स्वयंघोषित गोरक्षकांनी गोरक्षणाच्या नावाखाली धुडगूस घालू नये, असा इशारा त्यांनी वेगळ्या ठिकाणी दिला.
थोडं थांबून, विचार करून, दीर्घ श्वास वगैरे घेऊन नंतरच काय ते पक्कं बोललं तर बरं होईल आदित्यनाथजी! की तुम्ही आतापासूनच ‘छोटे मोदी’ बनायला सुरुवात केली आहे? गावोगावचे गो-गुंड हे त्यांच्या मते ‘गोमातेच्या रक्षणासाठी व्यक्तिगत पातळीवर अतिशय प्रामाणिक प्रयत्न’च करत असतात. त्यासाठी दोन-पाच परधर्मीय कापावे लागले, तर तेही धर्मकृत्यच वाटतं त्यांना. त्यांना जरब कशी बसवणार तुम्ही?
............................................................................................
२. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत, अशी चर्चा मागील महिन्याभरापासून राजकीय वर्तुळात रंगली असताना राणे यांनी भाजपमध्ये जावं, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नुकताच दिला. ‘नारायण राणे भाजप गेल्यास त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे, हा माझा त्यांना मित्रत्त्वाचा सल्ला आहे,’ असं रामदास आठवलेंनी म्हटलं. ‘राणे यांनी अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा केल्यास त्यांना पाहिजे ते मिळेल,’ असं सूचक विधानदेखील आठवले यांनी केलं.
ते जायला तयार नव्हते तरी मी त्यांना पाठवले
त्यांचे हित मी माझ्या आर्जवात साठवले
त्यांच्या विरोधातले प्रचार मी जागीच गोठवले
कारण मी त्यांचा खरा हितचिंतक रामदास आठवले
............................................................................................
३. अमेरिकेच्या अन्याय्य ‘एच-१बी’ व्हिसा धोरणाविरोधात भारताने कठोर भूमिका घेण्याची गरज आहे. यासाठी भारतानेही फेसबुक, गुगल आणि व्हॉट्सअॅपसारख्या कंपन्यांवर का बंदी घालू नये, असा प्रश्न भारतीय दूरसंचार कंपनी एअरटेलचे अध्यक्ष सुनील मित्तल यांनी उपस्थित केला आहे. अमेरिकेच्या चुकीच्या धोरणांचा विरोध करणं आवश्यक आहे. भारतात विदेशी कंपन्या मोठ्या प्रमाणात नफा मिळवतात. त्यामुळे भारताच्या आयटी व्यावसायिकांसाठी व्हिसाधोरण कडक करणं योग्य नाही. ज्या ठिकाणी कामगार आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती प्राप्त करून देतात, तिथं भारतीय कंपन्यांना एक निश्चित पगार देण्यासाठी सक्ती केली जाते. हे अतिशय चुकीचं धोरण आहे, असं त्यांनी म्हटलं.
मित्तल म्हणतायत त्यात तथ्य आहेच. मात्र, ट्रम्प यांना धडा शिकवण्यासाठी ट्रम्प बनण्याची गरज नाही. आपण कितीही देशप्रेमानं फुगलो, तरी बेडकीचा बैल होऊ शकत नाही. अमेरिकेतल्या उद्योगांचे भारतातले हितसंबंध सांभाळण्यासाठी त्या कंपन्या सक्षम आहेत. त्या ही ट्रम्पबाजी धुडकावून लावल्याशिवाय राहणार नाहीत. ते त्यांच्या संस्कृतीला मानवणारच नाही. लगेच आपल्या पर्यायी कंपन्यांची घोडी दामटवण्याची गरज नाही. त्यांचा या कंपन्यांएवढा वकूबही नाही आणि पोहोचही नाही.
............................................................................................
४. उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील खासदार प्रियंका रावत यांनी एका पोलीस अधिकाऱ्याची चामडी सोलून काढण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यांनी भर पत्रकार परिषदेतही याच धमकीचा पुनरुच्चार केला. पोलीस अधिकाऱ्यांनी आतापर्यंत बरीच ‘मलई’ (पैसे) खाल्ली आहे. आता भाजपचं सरकार आहे. आता या लोकांनी कामं केली नाहीत तर ‘मलई’सह त्यांची चामडीही सोलून काढेन, असं रावत म्हणाल्या. जे काम करतील तेच या जिल्ह्यात राहतील. आम्ही सगळ्यांचा रेकॉर्ड तपासणार आहोत. यात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. रावत यांनी पोलीस अधिकारी सिंह यांना रामनगर परिसरातील हत्या प्रकरणाच्या संदर्भात फोन केला होता. मी पोलीस अधिकारी आहे. माझं काम मला माहीत आहे, असं उत्तर त्यांनी दिल्याचा आणि ते उद्धटपणाचे असल्याचा रावत यांचा दावा आहे.
रावतबाईंचा उद्धटपणाचा अनुभव पाहता त्यांना पोलिस अधिकाऱ्याचं उत्तर उर्मट वाटणं स्वाभाविक आहे. भारतीय जनता पक्षाचे सगळेच लोकप्रतिनिधी शुचिर्भूत असल्याने जमिनीच्या दोन बोटं वरूनच चालतात आणि नैतिकतेचं आभाळ त्यांना दोन बोटंच उरलेलं असतं. फावल्या वेळात या ताईंना ‘सिंघम’ सिनेमा दाखवला पाहिजे आणि त्यातून अर्थबोध न झाल्यास सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गजाआड करून शिकवणी घेतली पाहिजे. आपण लोकप्रतिनिधी आहोत, सर्वज्ञ आणि राज्याचे मालक नव्हेत, हे यांना कळेल तो सुदिन.
............................................................................................
५. ‘लव्ह जिहाद’ टाळण्यासाठी एका शाळेमध्ये मुले आणि मुलींना वेगवेगळ्या वर्गांत बसवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मेरठमधील रिषभ अॅकॅडमी या शाळेमध्ये असा अजब नियम घालण्यात आला आहे. या शाळेच्या सचिवांच्या म्हणण्यानुसार ‘मुस्लिम मुलं हिंदू नावं घेतात आणि हिंदू मुलींना ‘नादी लावतात’ आणि हा ‘लव्ह जिहाद’ टाळण्यासाठी शाळेनंच मुलांना आणि मुलींना वेगवेगळ्या वर्गात बसवलं आहे. या शाळेनं मुलांना दाढी ठेवायलाही बंदी घातली आहे. शाळेतल्या सगळ्या मुलांना ‘योगी कट’ करून घ्यायला सांगितलं गेलं आहे. योगी कट म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची हेअरस्टाईल. ही शाळा जैन व्यवस्थापनाची असल्यामुळे आम्ही हा नियम लागू केल्याचं शाळेनं म्हटलं आहे. मुलांच्या डब्यांची तपासणी केली जाईल, असंही शाळेनं म्हटलं आहे.
आता इतकं सगळं करताच आहात तर लगेहाथ भगवी छाटी आणि कफनी हा गणवेषही जाहीर करून टाका आणि सगळ्या मुलांना अभ्यासाऐवजी धर्मदीक्षाच द्यायला सुरुवात करा. म्हणजे शहाणी माणसं मुलांना या शाळेत धाडणार नाहीत. न रहेगा बाँस, न बजेगी बाँसुरी और ना ही होगा ‘लव्ह जिहाद’. शाळेची जागा बरी असेल तर तिथं गोशाळाही काढायला हरकत नाही... फक्त नाव बदलून आलेल्या बैलांपासून हिंदू गायींचं संरक्षण करायला लागेल थोडंसं.
............................................................................................
editor@aksharnama.com
……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment